जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 262/2010
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-20/02/2010.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 29/11/2013.
डॉ.प्रमोद रामदास चौधरी,
उ.व.सज्ञान, धंदाः डॉक्टर,
रा. विकास कॉलनी, जामनेर रोड, भुसावळ,
ता.भुसावळ,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
राकेश शर्मा,
कॉन्ट्रॅक्टर,
रा.53, प्रोफेसर कॉलनी, रामेश्वर नगर समोर,
जामनेर रोड, भुसावळ,जि.जळगांव. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे सौ.उज्वला र.कुलकर्णी वकील.
विरुध्द पक्ष 1 तर्फे श्री.प्रभु कृष्णा कापडे वकील.
निकालपत्र
श्री.विश्वास दौ.ढवळे, अध्यक्षः विरुध्द पक्ष क्रॉन्ट्रॅक्टर यांनी तक्रारदाराचे घराचे गच्चीचे कोब्याचे व वॉटरप्रुफींगचे काम सदोष व त्रृटी युक्त करुन दिलेल्या सेवेतील त्रृटीदाखल प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदाराने या मंचासमोर दाखल केलेला आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
विरुध्द पक्ष हे एक गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टर असुन बांधकामासंबंधीचे कॉन्ट्रॅक्ट घेत असतात. तक्रारदाराचे वर नमुद पत्यावरील घराचे छतातून ओल येत होती म्हणुन त्यांनी विरुध्द पक्षास गच्चीचे कोब्याचे व वॉटरप्रुफींगचे काम सर्व मटेरियलसह रक्कम रु.19,800/- इतक्या रक्कमेस करण्यास दिलेले होते. सदरचे काम डिसेंबर,2006 ते जानेवारी,2007 मध्ये साधारण 1400 चौ फुट केले. त्यानंतर तक्रारदाराचे गच्चीचे कामास तडे जावुन ऑगष्ट,2007 ते ऑक्टोंबर,2007 मध्ये छत गळु लागले. पुर्वी ओल येत होती परंतू सदर प्लॅस्टरचे पापूद्रे निघू लागल्याने घरातील भिंतींना ओल आली व संपूर्ण घर खराब होऊ लागले. तक्रारदाराने सदरची परिस्थिती विरुध्द पक्षास दाखविली असता त्यांनी संपुर्ण दुरुस्ती करुन देतो असे आश्वासन दिले तथापी काम करण्यास टाळाटाळ केली. शेवटी विरुध्द पक्षाने डिसेंबर,2008 मध्ये दुरुस्तीचे काम करण्यास नकार दिल्याने तक्रारदाराने नाईलाजाने दुस-या इंजिनिअर कडुन गच्चीचे कोब्याचे व वॉटरप्रुफींगचे काम डिसेंबर,2008 ते जानेवारी,2009 मध्ये करुन घेतले त्यासाठी तक्रारदारास रु.45,000/- एवढा खर्च आला. विरुध्द पक्षाने केलेल्या सदोष कामामुळे तक्रारदारास खुप मनस्ताप होऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. सबब विरुध्द पक्षाकडुन त्यांना कामासाठी दिलेले रु.19,800/-, अन्य इंजिनिअरला दिलेले रु.45,000/-, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- रंगाचे रु.10,000/- अशी एकुण रक्कम रु.80,000/- मिळावेत, आर्थिक, शारिरिक व मानसिक त्रासादाखल रु.5,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे.
3. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीस काढण्यात आली.
4. विरुध्द पक्ष याकामी हजर होऊन तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. विरुध्द पक्षाने तक्रारदाराचे छताचे काम हे तक्रारदाराचे विनंतीवरुन व संमतीने केलेले आहे. सदर कामात वापरलेले सर्व मटेरियल हे तक्रारदाराचे पसंतीचे होते व मागणी प्रमाणे वापरले होते. विरुध्द पक्षाने तक्रारदाराचे छताचे काम हे प्रामाणिकपणे केलेले आहे त्यावेळी तक्रारदार हे स्वतः हजर राहत व सदर काम करतेवेळी तक्रारदाराचे परिचीत असलेल्या एका खाजगी इंजिनिअरचा सल्ला व मार्गदर्शनही तक्रारदाराने घेतलेले होते. सदरचे काम हे एकुण रु.45,000/- मध्ये ठरले होते मात्र कामापोटी तक्रारदाराने विरुध्द पक्षास रु.19,000/- दिलेले होते व उर्वरीत रक्कम काम पुर्ण झाल्यावर देण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे विरुध्द पक्षाने तक्रारदाराचे काम वेळेत म्हणजे डिसेंबर,2006 ते जानेवारी,2007 च्या दरम्यान प्रामाणीकपणे व समाधारकारकरित्या करुन दिले. त्यानंतर विरुध्द पक्षाने तक्रारदाराकडे उर्वरीत रक्कम रु.26,000/- ची मागणी केली परंतू विरुध्द पक्षाशी गोड बोलुन पैशांची अडचण असल्याने नंतर देतो असे सांगुन वारंवार टाळाटाळ केली. पैशांची वारंवार मागणी केल्याने सदरची रक्कम देणे लागु नये या मलीन हेतुने प्रेरीत होऊन तक्रारदाराने दि.24/12/2009 रोजी खोटया मजकुराची नोटीस पाठविली. उर्वरीत कायदेशीर रक्कम देण्यास टाळण्याचे अप्रामाणिक हेतुने तक्रारदाराने प्रस्तुतचा खोटा अर्ज केलेला आहे. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज रद्य करण्यात यावा अशी विनंती विरुध्द पक्षाने केलेली आहे.
5. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, विरुध्द पक्ष यांचे लेखी म्हणणे, व तक्रारदाराचा युक्तीवाद इत्यादीचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर.
1. विरुध्द पक्षांनी तक्रारदारास सेवा देण्यात त्रुटी केली
आहे काय ? होय.
2. तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे अंतीम आदेशानुसार
6. मुद्या क्र. 1 - तक्रारदाराचे घराचे गच्चीचे कोब्याचे व वॉटर प्रुफींगचे काम विरुध्द पक्ष राकेश शर्मा, कॉन्ट्रॅक्टर यांनी केले याबाबत दोन्ही पक्षांमध्ये दुमत नाही. तक्रारदाराची याबाबत तक्रार अशी की, विरुध्द पक्षाकडुन सदरचे काम सर्व मटेरियलसह रु.19,800/- इतक्या रक्कमेस ठरवुन ते डिसेंबर,2006 ते जानेवारी,2007 मध्ये पुर्ण केले. तथापी सदरचे काम विरुध्द पक्षाने निकृष्ठ दर्जाचे केल्याने गच्चीचे कामास तडे जावुन ऑगष्ट,2007 ते ऑक्टोंबर,2007 मध्य छत गळु लागले त्यामुळे छत खराब होऊन भिंतीचा रंग उडाला, प्लॅस्टरचे पापुद्रे निघु लागले अशी तक्रारदाराची प्रमुख तक्रार आहे. याबाबत विरुध्द पक्षास कल्पना देऊनही त्यांनी तक्रारदाराचे काम दुरुस्त न करुन दिल्याने तक्रारदाराने नाईलाजास्तव सदरचे काम अन्य माणसांकरवी करवुन घेतले त्याकामी तक्रारदारास आलेला खर्च तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारी अर्जातुन मागणी केलेला आहे.
7. विरुध्द पक्षाने याकामी हजर होऊन तक्रारदाराचे सुचनेनुसार समाधानकारकरित्या काम पुर्ण करुन दिलेले आहे तथापी सदर कामाचे एकुण रक्कम रु.45,000/- ठरलेले असतांना तक्रारदाराने अवघे रु.19,000/- दिले व उर्वरीत रक्कम देणे लागु नये म्हणुन विरुध्द पक्षास खोटया मजकुराची नोटीस पाठवुन प्रस्तुतचा खोटा तक्रार अर्ज केला आहे असे लेखी म्हणण्यातुन प्रतिपादन केलेले आहे.
8. उपरोक्त दोन्ही बाजुंचे म्हणणे विचारात घेता एक बाब स्पष्ट होते ती म्हणजे तक्रारदाराने लेखी युक्तीवादाचे सोबत विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराकडुन त्याचे गच्चीचे कोब्याचे व वॉटर प्रुफींगचे कामापोटी सर्व मटेरियल व लेबर चार्जेसह रक्कम रु.19,800/- इतकी रक्कम स्विकारल्याचे दि.22/02/2007 रोजीचे विरुध्द पक्षाने दिलेल्या पावतीचे छायाप्रतीवरुन स्पष्ट होते. त्यामुळे विरुध्द पक्षाचे म्हणणे की, रु.45,000/- मध्ये काम ठरलेले असतांना तक्रारदाराने रु.19,000/- दिले या कथनास काहीएक अर्थ उरत नाही. तसेच तक्रारदाराचे विरुध्द पक्षाने केलेले काम खराब व निकृष्ठ दर्जाचे झाल्याने तक्रारदाराने विरुध्द पक्षास दि.24/12/2009 रोजी रजिष्ट्रर ए.डी.नोटीसीने कळवुन नुकसान भरपाईची मागणी केली असल्याचे नोटीसीचे स्थळप्रतीवरुन स्पष्ट होते. तसेच तक्रारदाराचे घरी बैठकीतल्या खोलीतील प्लॅस्टर ऑफ पॅरीसचे काम जे छतामधील पाण्याच्या गळतीमुळे पूर्णपणे खराब झाले ते पुर्णपणे पाडुन तेथे प्लॅस्टर ऑफ पॅरीसचे नवीन काम अब्दुल रहेमान तालुक अली मंसुरी यांनी केले व त्याबाबत रक्कम रु.100/- चे स्टॅम्प पेपरवर सदर कामापोटी तक्रारदार डॉ.प्रमोद चौधरींकडुन रु.10,000/- दि.11/02/2010 रोजी रोख मिळाल्याचे लिहुन दिलेले आहे. तक्रारदाराचे काम विरुध्द पक्षाने निकृष्ठ दर्जाचे केल्याने तक्रारदाराने सदरचे काम व्दारका सेल्स यांचेकडुन करवुन घेतले व त्याकामी तक्रारदारास एकुण रक्कम रु.45,035/- इतका खर्च आला त्याबाबत तक्रारदाराने दि.20/02/2009 रोजीची पावती छायाप्रत दाखल केलेली असुन त्यावरुन तक्रारदाराने सदर कामापोटी पुन्हा रक्कम रु.45,035/- खर्च केल्याचे स्पष्ट होते.
9. उपरोक्त एकंदर विवेचन व तक्रारदाराने दाखल केलेले वरील कागदोपत्री पुराव्यावरुन विरुध्द पक्षाने तक्रारदाराचे घराचे गच्चीचे कोब्याचे व वॉटर प्रुफींगचे काम निकृष्ठ केल्यामुळे तक्रारदारास सदरचे काम पुन्हा अन्य व्यक्तींकडुन करवुन घ्यावे लागले व त्याकामी तक्रारदारास रक्कम खर्च करावी लागली व त्यास नाहक मानसिक,शारिरिक व आर्थिक त्रास झाला. यास्तव मुद्या क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
10. मुद्या क्र. 2 - तक्रारदाराने याकामी तक्रार अर्जातुन विरुध्द पक्षाकडुन त्यांना कामासाठी दिलेले रु.19,800/-, अन्य इंजिनिअरला दिलेले रु.45,000/-, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- रंगाचे रु.10,000/- अशी एकुण रक्कम रु.80,000/- मिळावेत, आर्थिक, शारिरिक व मानसिक त्रासादाखल रु.5,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे. आमचे मते वरील एकुण मागण्यांपैकी तक्रारदाराने मागणी केलेली रक्कम रु.19,800/- तक्रारदार विरुध्द पक्षाकडुन मिळण्यास पात्र नाही कारण संबंधीत विरुध्द पक्षाने सदरची रक्कम खर्च करुन तक्रारदाराचे कोब्याचे व वॉटरप्रुफींगचे काम मटेरियल व मजुरीसह केले असल्याचे दाखल पावतीवरुन स्वयंस्पष्ट असल्याने याकामी विरुध्द पक्षास तेवढा खर्च येणे सहाजीक आहे मात्र सदरचे काम सदोष व दोषयुक्त केल्यामुळे तक्रारदार हे विरुध्द पक्षाकडुन सदर काम पुनश्चः केल्याचे खर्चादाखल रु.45,000/-, तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरीसचे खर्चादाखल रु.10,000/- अशी एकुण रक्कम रु.55,000/- तक्रार अर्ज दाखल दि.20/02/2010 पासुन द.सा.द.शे. 7 टक्के व्याजासह नुकसान भरपाई दाखल मिळणेस पात्र आहे. तसेच मानसिक त्रासापोटी रु.4,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- विरुध्द पक्षाकडुन मिळण्यास पात्र असल्याचे निष्कर्षास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो.
2. विरुध्द पक्ष श्री.राकेश शर्मा, कॉन्ट्रॅक्टर यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाई दाखल रक्कम रु.55,000/- (अक्षरी रक्कम रु.पंच्चावन्न हजार मात्र ) दि.20/02/2010 पासुन द.सा.द.शे. 7 टक्के व्याजासह या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.
3. विरुध्द पक्ष श्री.राकेश शर्मा, कॉन्ट्रॅक्टर यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासा दाखल रु.4,000/- (अक्षरी रक्कम रु.चार हजार मात्र ) व तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/- (अक्षरी रु.तीन हजार मात्र ) या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.
ज ळ गा व
दिनांकः- 29/11/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.