ग्राहक तक्रार क्र. 34/2014
दाखल तारीख : 31/11/2014
निकाल तारीख : 18/06/2015
कालावधी: 0 वर्षे 06 महिने 18 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद_
1. प्रविण वसंतराव कदम,
वय – 35, धंदा - नौकरी,
रा.बँक कॉलनी, ज्ञानेश्वर मंदिर, ता.जि.उस्मानाबाद, ... तक्रारदार.
वि रु ध्द
1. प्रो. प्रा. राजयोग बजाज,
भानुनगर, मेनरोड उस्मानाबाद,
2. शाखाधिकारी,
आय.सी.आय.सी. आय. लोम्बार्ड मोटार इन्शुरन्स
हॉटेल व्यंकटेश तिसरा मजला,
औसा रोड, लातूर. ता.जि. लातूर 413512.
3. शाखाधिकारी,
आय.सी.आय.सी.आय.,
लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स, 2 रा मजला
अॅडव्हेंचर टॉवर सावेडी रोड, अहमदनगर,
ता.जि. अहमदनगर पिन. 414001. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रादारातर्फे विधीज्ञ : श्री. ए. ए. पाथरुडकर.
विरुध्द पक्षकार क्र.1 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत.
विरुध्द पक्षकार क्र.2 व 3 तर्फे विधीज्ञ : श्री. एम.डी.गायकवाड.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्रीमती विद्युलता जे.दलभंजन यांचे व्दारा:
अ) 1. अर्जदार प्रविण वसंतराव कदम हे बँक कॉलनी, ज्ञानेश्वर मंदिर उस्मानाबाद येथील रहिवाशी आहेत त्यांनी विरुध्द पक्ष यांचे विरुध्द नुकसान भरपाईची तक्रार दाखल केलेली आहे.
2. अर्जदाराने विप क्र.1 कडून दि.14/10/2011 रोजी रक्कम रु.75,550/- भरुन दि.14/10/2011 रोजी बजाज पल्सर 150 सी.सी. मोटारसायकल क्र. एम.एच 25 एक्स 1179 सी. नं. एम.डी. 2 DHDH ZZUCF44389 इंजिन क्र.DHGBUF 21595 विकत घेंतली त्यावेळेस विप क्र. 1 व 2 यांचे अधिकृत अधिका-यांनी मोटारसायकलचा विमा विप क्र.1 कडे दि.14/10/2011 रोजी दि.14/10/2011 ते 13/10/2012 पर्यंत काढला / उतरविला ज्याचा पॉलिसी क्र.3005/2010639927/0000000632 असा आहे.
3. अर्जदारासह सुनिल राठोड हे दि.17/04/2012 रोजी बजाज पल्सर 150 सी.सी. ज्याचा क्र.MH25X1179 या गाडीवर दोघे 8 वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी सदर पल्सर हॅन्डल लॉक करुन मंदिराबाहेर उभी केली होती. अर्जदार हा दर्शन घेऊन मंदिरात काही वेळ बसून 9 वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या बाहेर आला असता हॅन्डल लॉक करुन लावलेल्या ठिकाणी सदरची मोटार सायकल दिसुन आली नाही त्यानंतर संपूर्ण उस्मानाबाद शहर व इतर ठिकाणी गाडीचा शोध घेतला परंतु गाडी मिळून आली नाही. शेवटी दि.18/06/2012 रोजी उस्मानाबाद पोलिस स्टेशन येथे जाऊन बजाज पल्सर जिचा क्र.एम.एच.25 एक्स 1179 चोरी गेल्याची नोंद केली व त्यानुसार 379 नुसार फिर्याद घेतली जिचा गु.रं.नं.113/12 असा आहे. त्यानंतर चोरी गेलेल्या घटनास्थळाचा पंचयनामा केला व सदरचा गाडीचा शोध घेण्याची कार्यवाही सुरु केली परंतु गाडी मिळून आली नाही.
4. अर्जदाराने बजाज पल्सर घेतलेल्या विप क्र.1, 2 , 3 च्या कार्यालयात जाऊन गाडी चोरीला गेल्याचे सांगितले नंतर विप ने अर्जदारास विप क्र.2 कडे जाऊन क्लेम फॉर्म कागदपत्रे जमा करा असे सांगितले. अर्जदाराने विप क्र. 2 च्या कार्यालयात माहिती देऊनही त्यांनी अर्जदाराला मदत केली नाही आणि लवकरात लवकर रक्कम पाहिजे असल्यास विप क्र. 3 कडे क्लेम फॉर्म व पूर्ण कागदपत्रे पाठवा असे सांगितले असे अर्जदाराचे म्हणणे आहे.
5. अर्जदाराने विप क्र. 3 कडे क्लेमफॉर्म भरुन फिर्याद, घटनास्थळ पंचनामा, विप क्र.1 कडून घेतलेल्या पावत्या, पॅन कार्ड, परवाना, इन्शुरन्स कव्हर नोट, इ. दि.15/10/2013 रोजी आर.पी.ए.डी. ने पाठविण्यात आले. सदर कागदपत्रे विप क्र.3 यास दि.21/10/2013 रोजी मिळाली असून काहीही कार्यवाही नाही. विप क्र.1 ते 3 यांचेकडून व्यवस्थित सेवा मिळाली नाही अनुचित व्यापारी प्रथेचा मार्ग अवलंबिला.
6. अर्जदाराने विप क्र.2 व 3 कडे प्रस्ताव पाठवून ही विमा रक्कम दिलेली नाही म्हणून अर्जदाराने प्रस्तुत तक्रारीमार्फत एम.एच.25 एक्स.1179 मोटारसायकलच्या गाडीची विमा रक्कम रु.75,500/- विप क्र.2 व 3 यांचेकडून मिळावी, तसेच शारीरिक आर्थिक, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- मिळावेत अशी विनंती केलेली आहे.
ब) विप क्र. 1 यांना नोटिस मिळून अपस्थित राहिले नाही म्हणून त्यांचे विरुध्द दि.10/06/2014 रोजी एकतर्फा चौकशीचा आदेश पारीत करण्यात आला.
क) 1) विप क्र. 2 व 3 यांचे विरुध्द ही एकतर्फा आदेश पारीत केला होता परंतू रु.300/- खर्चासह तो मंजूर करण्यात आला आणि त्यांचे कैफियत अभिलेखावर दाखल करुन घेण्यात आली. विप क्र. 2 व 3 यांचे म्हणणे अभिलेखावर आहे. त्यांचे म्हणण््यानुसार परिच्छेद नं.1 मध्ये अर्जदाराने गाडी घेतल्याचे अमान्य करुन तक्रारदार आपला ग्राहक नसल्याचे म्हंटले आहे. गाडी चोरीला गेली, तिचा शोध घेतला याबाबत काही सबळ पुरावा नसल्याचे म्हंटले आहे. गाडीचा पोलिसांकडून शोध घेतला परंतु शोध लागला नाही नंतर विप क्र. 2 व 3 च्या व विप क्र.1 च्या कार्यलयात जाऊन क्लेम फॉर्म व कागदपत्रे जमा करण्यास सांगितले हे निराधार आहे. विप क्र.2 च्या अधिका-यांनी काही मदत केली नाही हे चुकीचे आहे. अर्जदाराने विप क्र.2 व 3 यांचेकडे क्लेम फॉर्म पुर्ण कागदपत्रे जमा केलेले नाहीत त्यामुळे अर्जदाराचा क्लेम मंजूर करण्याचा प्रश्नच येत नाही असे विप क्र. 2 व 3 चे म्हणणे आहे.
2) अर्जदाराने सर्व कागदपत्रे पाठवली व विप क्र.3 यांना ता.29/10/2013 रोजी प्राप्त झाली. अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदारास व्यवस्थित सेवा मिळाली नाही, अर्जदाराचे मोठे नुकसान झाले, आर्थिक मानसिक, शारीरिक त्रास दिलेला आहे वगैरे चुकीचे असून विप क्र. 2 व 3 यांना मान्य नाही असे म्हंटले आहे.
3) विप क्र.3 यांनी सत्य परिस्थिती खालीलप्रमाणे नमूद केलेली आहे. अर्जदार हा वादग्रस्त पल्सर मोटारसायकल चा मालक आहे. विप क्र. 1 हे प्रोपरायटर आहेत. विप क्र. 2 हे शाखाधिकारी आय.सी.आय.सी. आय. लोंम्बार्ड इन्शुरन्स कंपनी आहे. अर्जदाराने विप क्र.1 कडून गाडी खरेदी केल्याचा व 2 ने विमा उतरविल्याचा पुरावा देणे आवश्यक आहे.
4) अर्जदाराने प्रिमीयम उतरल्याची पावती दाखल केलेली नाही. गाडी निश्चित कोणत्या वेळेला उभी केली हे कोठेही उल्लेख नाही. त्यामुळे सदर गाडी चोरीला गेली हे म्हणता येणार नाही. गाडी चोरीला गेली हे त्वरीत पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करणे आवश्यक होते. त्यांनी तब्बल 2 महिने 1 दिवस एवढा प्रदिर्घ विलंब पोलिस स्टेशनला तक्रार देण्यास का लावला यांचे स्पष्टीकरण दिलेले नाही. वस्तुस्थितीशी विसंगत खोटा, तथ्यहीन, लबाडीचा असल्याने खारीज करावा असे म्हंटले आहे.
5) गाडी चोरीला गेल्याचे विमा कंपनीलाही काही मुदतीत कळवलेले नाही उलट दोन वर्षांनी में. ग्राहक मंचात मुदत संपल्यावर कथीत तक्रार रचून सदरची खोटी तक्रार विमा कपंनीकडून पैसे मिळावेत म्हणून दाखल केलेली आहे. विलंब माफिचा अर्ज देऊन झालेला विलंबही क्षमापित करुन घेतलेला नाही.
6) त्यामुळे खारीज होणे न्याय व योग्य आहे तरी खर्चासह तक्रार खारीज करावी अशी विनंती केलेली आहे.
ड) अर्जदाराने तक्रारीसोबत क्लेम फॉर्म, पोष्टाची पावती एफ.आय.आर, घटनास्थळ पंचनामा, इन्शुरन्स पॉलिसी, आरसी बुक, कॅश मेमो, 2 ओळखपत्र, मतदान ओळखपत्र, वाहन परवाना, पॅनकार्ड, इ. कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले, अर्जदाराचा लेखी युक्तिवाद वाचला तोंडी युक्तिवाद ऐकला असता आमचे विचारार्थ सदर प्रकरणात खालीप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) अर्जदार विप क्र. 1, 2 व 3 चा ग्राहक आहे का ? होय.
2) अर्जदाराची तक्रार मुदतीत आहे का ? होय
3) विप क्र.2 व 3 यांनी सेवेत त्रुटी केली का ? होय
4) अर्जदार वादग्रस्त मोटार सायकलची नुकसान भरपाई
मिळण्यास पात्र आहे का ? होय.
5) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
इ) कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 :
1) अर्जदाराने विप क्र.1 कडून रु.75,000/- (रुपये पंच्यात्तर हजार फक्त) एवढी रक्कम देऊन बजाज पल्सर 150 UG4 ही मोटार सायकल खरेदी केली. सदर वादग्रस्त मोटार सायकल खरेदी केल्याच्या पावत्या अभिलेखावर दाखल केलेल्या आहेत आणि विप क्र.2 व 3 यांचेकडे सदर वादग्रस्त मोटार सायकलचा विमा उतरविला व त्यासाठी अर्जदाराने रक्कम रु.1,554/- एवढे प्रिमियम विप क्र.2, 3 यांचेकडे दिलेला आहे व विप क्र. 2 व 3 यांनी तो स्विकारला व तशी two wheeler pakage policy, certificate cum policy schedule अभिलेखावर दाखल आहे त्यामुळे अर्जदार विप क्र. 2 व 3 यांचा ग्राहक आहे त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 2 :
2) अर्जदाराने त्यांची चोरी गेलेली मोटार सायकल शोधली व शेवटी नाही मिळाली म्हणून पोलिस स्टेशनला तक्रार दिली त्यांनतर पोलिसांनी सदर वादग्रस्त गाडीचा घटनास्थळ पंचनामा केला. गाडीचा शोध घेतला परंतू गाडी मिळून आली नाही नंतर सर्व कागदपत्रे जोडून क्लेम फॉर्म सहीत दि.15/10/2013 रोजी आर.पी.ए.डी. ने अर्जदारास पाठवले व ते विप क्र.3 यांना दि.21/10/2013 रोजी मिळाले. अर्जदाराची वादग्रस्त गाडी 2012 साली चोरीस गेली व अर्जदाराने पाठवलेली सर्व कागदपत्रे विप ला मिळालेली आहेत आणि विमा रक्कम मिळेल या आशेवर पुन्हा पाच महिने वाट बघीतली. विप क्र.3 यांना कागदपत्रे मिळाल्यापासून 5 (पाच) महिन्यातच तक्रार दाखल केली आहे जी की मुदतीत आहे त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी देत आहेत.
मुद्दा क्र.3 :
3) अर्जदाराची वादग्रस्त मोटारसायकल विमा संरक्षीत काळात चोरी झालेली आहे सर्व कागदपत्रे क्लेम फॉर्म सहीत अभिलेखावर दाखल आहेत. विप क. 2 व 3 यांनी अशी हरकत घेतलेली आहे कि अर्जदाराची वादग्रस्त मोटर सायकलचे कागदपत्रे प्राप्त नाहीत परंतु विप क्र. 2 व 3 हे दि.12/06/2014 रोजी व्हीपी (वकिलपत्र) दाखल केलेले आहे त्यावेळेस त्यांना कागदपत्रे ही निश्चितच मिळालेली आहेत आणि सदर प्रकरणातील कागदपत्रे मिळाल्यामुळेच त्यानी त्यांचे म्हणणे रितसर नोंदविले आहे हे स्पष्ट होते. विप क्र.3 यांनी कागदपत्रे मिळाल्यावर किंवा तक्रारीची मंचातर्फे नोटीस मिळाल्यावर तरी सदर वादग्रस्त मोटारसायकलचा क्लेम सेटल करायला पहिजे होता पंरतू विप क्र. 3 यांनी तो सेटल केलेला नाही उलट वादग्रस्त मोटरसायकल ची पॉलिसीच काढलेली नाही व त्याबाबत पुरावाच नाही असे म्हंटलेले आहे. परंतु अर्जदाराने सर्व कागदोपत्री पुरावा अभिलेखावर दाखल केलेला आहे. असे असतांना क्लेम न देऊन टाळाटाळ करुन सेवेत त्रुटी केल्याचे स्पष्ट होत ही बाब गंभीर आहे.
4) तसेच अर्जदाराने विप क्र.3 यांचे कडे जो विमा पॉलिसी काढलेली आहे त्यावर वाहनाचे I.D.V. नमूद केलेली आहे त्याप्रमाणे विप क्र.3 यांना द्यावी लागेल हे स्पष्ट होते.
5) वरील सर्व विवेचनावरुन आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहचलो आहेत कि अर्जदार यांनी मागणी केल्याप्रमाणे विमा संरक्षित रक्कम मिळण्यास अंशत: पात्र आहे म्हणून मुद्दा क्र.4 चे उत्तर होकारार्थी देऊन खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
1) विप क्र.3 विमा कंपनी आय. सी. आय. सी. आय. जनरल इन्शुरन्स अहमदनगर यांनी वादग्रस्त मोटारसयकल बजाज पल्सर MH 25 X 1179 ची विमा संरक्षीत रक्कम रु.61,370/- (रुपये एकसष्ट हजार तिनशे सत्तर फक्त) दि.12/06/2014 पासून 9 टक्के व्याज दराने आदेश पारीत दिनांकापासून 30 दिवसात अर्जदारास द्यावी.
2) विप क्र.3 विमा कंपनी आय.सी.आय.सी.आय. जनरल इन्शुरन्स अहमदनगर यांनी तक्रार खर्चापोटी रक्कम रु.3,000/- (रुपये तिन हजार फक्त) आदेश पारीत दिनांकापासून 30 (तिस) दिवसात द्यावेत.
3) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज द्यावा.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.एम.व्ही.कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद