::निकालपत्र::
(पारीत व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या )
(पारीत दिनांक–04 जुलै, 2017)
01. तक्रारकर्त्याने मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष बिल्डर विरुध्द करारा प्रमाणे भूखंडाचे विक्रीपत्र व ताबा न दिल्याचे कारणावरुन दाखल केली आहे.
02. तक्रारकर्त्याचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता हा किरकोळ व्यवसाय करुन त्यावर आपले कुटूंबियांचा उदरनिर्वाह करतो. त्याला स्वतःचे राहण्यासाठी भूखंडाची गरज होती व त्यासाठी त्याने किस्तीवर भूखंड विकत घेण्याचे ठरविले. विरुध्दपक्षाचा शेतजमीनीचे अकृषक वापरात परावर्तन करुन निवासी भूखंड विक्रीचा व्यवसाय आहे. विरुध्दपक्ष राजसुमन लॅन्ड डेव्हलपर्स आणि मॉं जगदंबा लॅन्ड डेव्हलपर्स या नावाने व्यवसाय करतो. तक्रारकर्त्याने भूखंड खरेदीसाठी विरुध्दपक्षाशी संपर्क साधला. उभय पक्षां मध्ये ठरल्या नुसार तक्रारकर्त्याचे नावे विरुध्दपक्ष क्रं-1) राजेशकुमार खरभान गुप्ता याने दिनांक-08.08.2012 रोजीचे कब्जापत्रा नुसार मौजा तरोडी, तालुका नागपूर ग्रामीण, जिल्हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-38, खसरा क्रं-67/2 मधील भूखंड क्रं-32,33 व 40 एकूण क्षेत्रफळ-3848 चौरसफूट एकूण किम्मत रुपये-4,61,000/- मध्ये लिहून दिलेली आहे. सदर कब्जापत्रावर दोन साक्षीदारांच्या सहया असून कब्जापत्र नोटरी समक्ष नोंदणीकृत केलेले आहे. सदर कब्जापत्रामध्ये विरुध्दपक्ष क्रं-1) राजेश खरभान गुप्ता याने भूखंडाची संपूर्ण रक्कम नगदी मिळाल्याचे कबुल करुन आता काहीच घेणे राहिलेले नाही तसेच भूखंडाचा कब्जा दिल्याचेही त्यात नमुद केलेले आहे.
तक्रारकर्त्याने पुढे असेही नमुद केले की, त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) राजेश खरभान गुप्ता याला राजसुमन लॅन्ड डेव्हलपर्स या फर्मचे नावे कब्जापत्र लिहून देण्यास विनंती केली होती परंतु त्याने सदर खसरा क्रं-67/2 च्या शेतजमीनीचे विक्रीपत्र अद्दाप पर्यंत राजसुमन लॅन्ड डेव्हलपर्स या नावाने व्हावयाचे असल्याचे सांगून तो राजसुमन लॅन्ड डेव्हलपर्स या फर्मचे नावे कब्जापत्र आणि रक्कम प्राप्त झाल्याची रसिद देऊ शकत नाही तसेच विरुध्दपक्ष क्रं-1) राजेशुमार खरभान गुप्ता याने असेही सांगितले की, ले-आऊटचा नकाशा हा मॉं जगदंबा लॅन्ड डेव्हलपर्स या नावाने बनविलेला आहे. तक्रारकर्त्याने असेही नमुद केलेले आहे की, विरुध्दपक्ष क्रं-1) राजेश खरभान गुप्ता याने प्रथम त्याला भूखंडापोटी रकमा मिळाल्या बाबत पूर्ण रकमेच्या पावत्या दिल्या होत्या पंरतु नंतर त्या पावत्या परत घेऊन भूखंडाचे कब्जापत्र बनवून दिले.
तक्रारकर्त्याने पुढे असेही नमुद केले की, कब्जापत्रा नंतर विरुध्दपक्ष क्रं-1) राजेशकुमार खरभान गुप्ता याची भेट घेतली असता त्याने ले आऊटला शासकीय मंजूरी मिळाल्या नंतर भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर त्याने सतत पाठपुरावा केला असता विरुध्दपक्ष क्रं-1) राजेशकुमार खरभान गुप्ता याने त्याला असे सांगितले की, त्याने संपूर्ण खस-याची मालमत्ता ही विरुध्दपक्ष क्रं-2) मॉं जगदंबा लॅन्ड डेव्हलपर्स तर्फे-अशोक फुलचंद राऊत याला विक्री करुन दिलेली आहे, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-2) अशोक फुलचंद राऊत याचेशी संपर्क साधावा, त्याप्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-2) याचेशी संपर्क केला असता त्याने भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्यास टाळाटाळ केली म्हणून तक्रारकर्त्याने दोन्ही विरुध्दपक्षानां दिनांक-25/12/2015 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली परंतु नोटीस पाठविल्या नंतर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही वा उत्तरही देण्यात आले नाही. विरुध्दपक्ष क्रं-1) राजेशकुमार खरभान गुप्ता याने तक्रारकर्त्याला कब्जापत्र करुन दिल्या नंतर सदरचा खसराच विरुध्दपक्ष क्रं-2) अशोक फुलचंद राऊत याला विक्री करुन दिलेला असल्याने त्याची फसवणूक करण्यात आली आणि इतकेच नव्हे तर त्याने भूखंडा पोटी विरुध्दपक्ष क्रं-1) राजेश गुप्ता याला दिलेली रक्कम सुध्दा परत केलेली नाही.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, तो खाजगी नौकरी करीत असून त्याने त्याचे कष्ठाची संपूर्ण कमाई विरुध्दपक्ष क्रं 1 राजेशकुमार गुप्ता याला भूखंडापोटी दिलेली आहे, तो विरुध्दपक्षाचा ग्राहक असून त्याचे सोबत विश्वासघात/धोखागडी विरुध्दपक्ष क्रं-1) राजेशकुमार गुप्ता याने केलेली आहे. म्हणून त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन पुढील मागण्या विरुध्दपक्षा विरुध्द केल्यात-
(1) विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी भूखंड क्रं-32,33 आणि क्रं-40 चे तक्रारकर्त्याचे नावे भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र नोंदवून देऊन मोजणी करुन ताबा देण्याचे आदेशित व्हावे.
(2) उपरोक्त नमुद भूखंड क्रं-32,33 आणि क्रं-40 चे नोंदणीकृत विक्रीपत्र आणि मोजणी करुन ताबा देण्यास दोन्ही विरुध्दपक्ष असमर्थ ठरल्यास भूखंडांची बाजारभावा प्रमाणे रक्कम तक्रारकर्त्यास परत करण्याचे दोन्ही विरुध्दपक्षानां आदेशित व्हावे.
(3) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल दोन्ही विरुध्दपक्षां कडून रुपये-1,00,000/- आणि तक्रार व नोटीस खर्च म्हणून रुपये-10,000/- देण्याचे आदेशित व्हावे.
04. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांचे नावे उपरोक्त नमुद पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने नोटीस ग्राहक मंचा तर्फे पाठविण्यात आली, सदर रजिस्टर नोटीस विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांना प्राप्त झाल्या बद्दल पोस्ट ट्रॅकींग रिपोर्टच्या प्रति अभिलेखावर दाखल आहेत परंतु ग्राहक मंचाची रजिस्टर पोस्टाची नोटीस प्राप्त होऊनही विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) हे मंचा समक्ष हजर झाले नाहीत वा त्यांनी आपले लेखी निवेदनही सादर केले नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात ग्राहक मंचाने दिनांक-16/03/2017 रोजी पारीत केला.
05. तक्रारकर्त्याने निशाणी क्रं 3 वरील यादी नुसार दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात ज्यामध्ये प्रामुख्याने भूखंडाचे कब्जापत्राची प्रत, मॉं जगंदबा लॅन्ड डेव्हलपर्सचा ले आऊट मॅप, तक्रारकर्त्याने दोन्ही विरुध्दपक्षांना रजिस्टर पोस्टाने पाठविलेली कायदेशीर नोटीसची प्रत, रजिस्टर पोस्टाच्या पावत्यांच्या प्रती व पोच अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला.
06. तक्रारकर्त्या तर्फे अधिवक्ता श्री सावल यांनी मौखीक युक्तीवादा संदर्भात त्यांची तक्रार आणि लेखी युक्तीवाद यालाच मौखीक युक्तीवाद समजण्यात यावे अशी पुरसिस दाखल केली.
07. तक्रारकर्त्याची सत्यापना वरील तक्रार तसेच प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजांच्या प्रती इत्यादींचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले असता न्यायमंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
::निष्कर्ष::
08. तक्रारकर्त्याने जी वादातील भूखंडाचे कब्जापत्राची प्रत दाखल केलेली आहे, त्याचे सुक्ष्मरितीने अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्याचे नावे विरुध्दपक्ष क्रं-1) राजेशकुमार खरभान गुप्ता याने दिनांक-08.08.2012 रोजी वादातील भूखंडांचे कब्जापत्र करुन दिल्याचे दिसून येते, त्या कब्जापत्रा नुसार मौजा तरोडी, तालुका नागपूर ग्रामीण, जिल्हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-38, खसरा क्रं-67/2 मधील भूखंड क्रं-32,33 व 40 एकूण क्षेत्रफळ-3848 चौरसफूट एकूण किम्मत रुपये-4,61,000/- मध्ये त्याने तक्रारकर्त्याचे नावे लिहून दिल्याचे दिसून येते. सदर कब्जापत्रावर दोन साक्षीदारांच्या सहया असून कब्जापत्र नोटरी समक्ष नोंदणीकृत केलेले आहे. सदर कब्जापत्रामध्ये विरुध्दपक्ष क्रं-1) राजेशकुमार खरभान गुप्ता याने भूखंडाची संपूर्ण रक्कम नगदी मिळाल्याचे कबुल करुन आता काहीच घेणे राहिलेले नाही तसेच कब्जा दिल्याचे त्यात नमुद केलेले आहे.
09. तक्रारकर्त्याचा असाही आरोप आहे की, विरुध्दपक्ष क्रं-1) राजेशकुमार खरभान गुप्ता याने प्रथम त्याला भूखंडापोटी रक्कम मिळाल्या बाबत पूर्ण रकमेच्या पावत्या दिल्या होत्या पंरतु नंतर त्या पावत्या परत घेऊन वादातील भूखंडाचे कब्जापत्र बनवून दिले होते. तसेच त्याचा असाही आरोप आहे की, कब्जापत्रा नंतर विरुध्दपक्ष क्रं-1) राजेश खरभान गुप्ता याची भेट घेतली असता त्याने ले आऊटला शासकीय मंजूरी मिळाल्या नंतर भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर त्याने सतत पाठपुरावा केला असता विरुध्दपक्ष क्रं-1) राजेशकुमार खरभान गुप्ता याने त्याला असे सांगितले की, त्याने संपूर्ण खस-याची मालमत्ता ही विरुध्दपक्ष क्रं-2) मॉं जगदंबा लॅन्ड डेव्हलपर्स तर्फे- अशोक फुलचंद राऊत याला विक्री करुन दिलेली आहे, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-2) अशोक फुलचंद राऊत याचेशी संपर्क साधावा, त्याप्रमाणे संपर्क केला असता विरुध्दपक्ष क्रं-2) अशोक फुलचंद राऊत याने भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्यास टाळाटाळ केली.
10. महत्वाची बाब अशी आहे की, तक्रारकर्त्याने केलेल्या आरोपा नुसार विरुध्दपक्ष क्रं-1) राजेश खरभान गुप्ता याने त्याला असे सांगितले की, त्याने वादातील भूखंडाचे संपूर्ण खस-याची मालमत्ता ही विरुध्दपक्ष क्रं-2) मॉं जगदंबा लॅन्ड डेव्हलपर्स तर्फे- अशोक फुलचंद राऊत याला विक्री करुन दिलेली आहे, सदर खसरा क्रं-67/2 मौजा तरोडी बुजूर्ग पटवारी हलका क्रं-33, तालुका कामठी जिल्हा नागपूर या ले आऊटचा छापील नकाशा हा विरुध्दपक्ष क्रं-2) मॉं जगदंबा ले आऊटचे नावे आहे परंतु विरुध्दपक्ष क्रं-2) मॉं जगदंबा ले आऊट तर्फे अशोक फुलचंद राऊत याचेशी तक्रारकर्त्याचा प्रत्यक्ष्य कोणताही भूखंड खरेदी बाबतचा व्यवहार झालेला दिसून येत नाही वा तसा कोणताही पुरावा ग्राहक मंचा समोर आलेला नाही तसेच विरुध्दपक्ष क्रं-2) मॉं जगदंबा ले आऊट तर्फे अशोक फुलचंद राऊत याने तक्रारकर्त्या कडून भूखंडा बाबत काही रक्कम घेतल्याचा पुरावा ग्राहक मंचा समोर आलेला नाही वा तसे तक्रारकर्त्याचे म्हणणे सुध्दा नाही, अशापरिस्थितीत विरुध्दपक्ष क्रं-2) मॉं जगदंबा ले आऊट तर्फे अशोक फुलचंद राऊत याचे विरुध्द कोणतेही आदेश ग्राहक मंचास पारीत करता येणार नाहीत.
11. तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष क्रं-1) राजेशकुमार खरभान गुप्ता याने खसरा क्रं-67/2 मौजा तरोडी बुजूर्ग पटवारी हलका क्रं-33, तालुका कामठी जिल्हा नागपूर मधील भूखंड क्रं-32,33 व 40 भूखंड क्रं-32,33 व 40 जे कब्जापत्र करुन दिलेले आहे त्यातील नमुद खसरा क्रमांक व भूखंड क्रमांक हे जगदंबा लॅन्ड डेव्हलपर्स तर्फे छापील नकाशामध्ये अंर्तभूत दिसून येतात, यावरुन तक्रारकर्त्याचे तक्रारीतील विधानांना पुष्टी मिळते.
12. विरुध्दपक्ष क्रं-1) राजेशकुमार गुप्ता हा ग्राहक मंचा समक्ष हजर झालेला नाही व त्याने कोणतेही लेखी निवेदन सुध्दा दाखल केलेले नाही. सदर भूखंडाचे कब्जापत्र हे विरुध्दपक्ष क्रं-1) राजेशकुमार खरभान गुप्ता याने तक्रारकर्त्याचे नावे करुन दिल्याचे दिसून येते. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, राजेशकुमार खरभान गुप्ता हा राजसुमन लॅन्ड डेव्हलपर्स या फर्मचे नावाने भूखंड विक्रीचा व्यवहार करतो आणि त्याने कब्जापत्रात नमुद संपूर्ण खसराच हा मॉं जगदंबा लॅन्ड डेव्हलपर्स तर्फे अशोक फुलचंद राऊत याला विक्री केलेला आहे,. तक्रारकर्त्याने तक्रारीत केलेले हे आरोप विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) तर्फे नाकारण्यात आलेले नाहीत.
13. अशापरिस्थितीत तक्रारकर्त्याचेच तक्रारीतील आरोपा नुसार वादातील संपूर्ण खस-याची जमीन ही विरुध्दपक्ष क्रं-1) राजेशकुमार गुप्ता याने विरुध्दपक्ष क्रं-2) मॉं जगदंबा लॅन्ड डेव्हलपर्स तर्फे अशोक फुलचंद राऊत याला विक्री केलेली असल्यामुळे तक्रारकर्त्याचे तक्रारीतील मागणी प्रमाणे त्याचे नावे भूखंडाचे विक्रीपत्र विरुध्दपक्ष क्रं-1) राजेशकुमार गुप्ता याने नोंदवून द्दावे असे आदेशित करता येणार नाही असे ग्राहक मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच तक्रारकर्त्याचा विरुध्दपक्ष क्रं-2) मॉं जगदंबा लॅन्ड डेव्हलपर्स तर्फे अशोक फुलचंद राऊत याचेशी प्रत्यक्ष्य कोणताही व्यवहार झालेला दिसून येत नसल्याने विरुध्दपक्ष क्रं-2) विरुध्द सुध्दा कोणतेही आदेश पारीत करता येणार नाहीत. मात्र तक्रारकर्त्याने वादातील भूखंड क्रं-32,33 व 40 पोटी विरुध्दपक्ष क्रं-1) राजेशकुमार खरभान गुप्ता याला दिलेली एकूण रक्कम रुपये-4,61,000/- कब्जापत्र करुन दिल्याचा दिनांक-08/08/2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.12% दराने व्याजासह विरुध्दपक्ष क्रं-1) राजेशकुमार खरभान गुप्ता याचे कडून परत मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. याशिवाय त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- विरुध्दपक्ष क्रं-1) राजेशकुमार खरभान गुप्ता याचे कडून मिळण्यास तो पात्र आहे.
14. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन ग्राहक मंच प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
1) तक्रारकर्ता श्री धनीराम सुखईराम शाहू यांची विरुध्दपक्ष क्रं-1) राजसुमन लॅन्ड डेव्हलपर्स तर्फे राजेशकुमार खरभान गुप्ता याचे विरुध्दची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्दपक्ष क्रं-1) राजसुमन लॅन्ड डेव्हलपर्स तर्फे राजेशकुमार खरभान गुप्ता यास आदेशित करण्यात येते की, त्याने वादातील भूखंड मौजा तरोडी, तालुका कामठी, जिल्हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-33, खसरा क्रं-67/2 मधील भूखंड क्रं-32,33 व 40 पोटी तक्रारकर्त्या कडून स्विकारलेली एकूण रक्कम रुपये-4,61,000/- (अक्षरी एकूण रक्कम रुपये चार लक्ष एकसष्ठ हजार फक्त) कब्जापत्र करुन दिल्याचा दिनांक-08/08/2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.12% दराने व्याजासह तक्रारकर्त्याला परत करावी.
3) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-1) राजसुमन लॅन्ड डेव्हलपर्स तर्फे राजेशकुमार खरभान गुप्ता याने तक्रारकर्त्यास द्दावेत.
4) विरुध्दपक्ष क्रं-2) मॉं जगदंबा लॅन्ड डेव्हलपर्स तर्फे अशोक फुलचंद राऊत याचे विरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
5) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-1) राजसुमन लॅन्ड डेव्हलपर्स तर्फे राजेशकुमार खरभान गुप्ता याने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
6) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन
देण्यात याव्यात.