संयुक्त निकालपत्र :- (दि.28.02.2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुत चारही तक्रारींच्या विषयांमध्ये साम्य आहे. तसेच, सामनेवाला हे देखील एकच असल्याने हे मंच चारही प्रकरणांमध्ये एकत्रित निकाल पारीत करीत आहे. (2) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (3) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाले बांधकाम व्यावसायिक यांनी कोल्हापूर बी वॉर्ड, मंगळवार पेठ येथील सि.स.नं.2454 ही मिळकत विकसित करुन ‘विष्णु-प्लाझा’ ही अपार्टमेंट बांधली आहे. सदर अपार्टमेंटमध्ये तक्रारदारांनी सदनिका घेतलेल्या आहेत. त्यांचा ग्राहक तक्रार केस क्रमांकनिहाय तपशील खालीलप्रमाणे :- ग्राहक तक्रार केस नं. 661/09 :- यातील तक्रारदारांनी सदर विष्णु-प्लाझा अपार्टमेंटमधी पहिल्या मजल्यावरील फलॅट युनिट नं.101, सुपरबिल्ट क्षेत्र 48.47 चौरस मिटर, सदर सदनिका खरेदी घेणेबाबतचा करार दि.14.12.2005 रोजी झाला असून कराराप्रमाणे रक्कम रुपये 6 लाख सामनेवाला यांना अदा केलेल्या आहेत. तसेच, जादा काम स्टॅम्प डयुटी, रजिस्ट्रेशन फी, लाईट-पाणी-मेंटेंनन्स, सरकारी कर इत्यादी रक्कमा सामनेवाला यांनी स्विकालेल्या आहेत. ग्राहक तक्रार केस नं. 662/09 :- यातील तक्रारदारांनी सदर विष्णु-प्लाझा अपार्टमेंटमधी पहिल्या मजल्यावरील फलॅट युनिट नं.102, सुपरबिल्ट क्षेत्र 42.16 चौरस मिटर, सामनेवाला यांनी तक्रारदारांना फलॅटचे क्षेत्रफळ 691 चौरस फूट असलेचे सांगून 653.66 चौरस मिटर इतक्या कमी क्षेत्रफळाचा फलॅट ताब्यात दिला. सदर सदनिका खरेदी घेणेबाबतचा करार दि.14.07.2008 रोजी झाला असून कराराप्रमाणे रक्कम रुपये 5,56,000/- सामनेवाला यांना अदा केलेल्या आहेत. तसेच, जादा काम स्टॅम्प डयुटी, रजिस्ट्रेशन फी, लाईट-पाणी-मेंटेंनन्स, सरकारी कर इत्यादी रक्कमा सामनेवाला यांनी स्विकालेल्या आहेत. ग्राहक तक्रार केस नं. 663/09 :- यातील तक्रारदारांनी सदर विष्णु-प्लाझा अपार्टमेंटमधी पहिल्या मजल्यावरील फलॅट युनिट नं.103, सुपरबिल्ट क्षेत्र 93.02 चौरस मिटर, सदर सदनिका खरेदी घेणेबाबतचा करार दि.08.11.2006 रोजी झाला असून कराराप्रमाणे रक्कम रुपये 8 लाख सामनेवाला यांना अदा केलेल्या आहेत. तसेच, जादा काम स्टॅम्प डयुटी, रजिस्ट्रेशन फी, लाईट-पाणी-मेंटेंनन्स, सरकारी कर इत्यादी रक्कमा सामनेवाला यांनी स्विकालेल्या आहेत. ग्राहक तक्रार केस नं. 664/09 :- यातील तक्रारदारांनी सदर विष्णु-प्लाझा अपार्टमेंटमधी पहिल्या मजल्यावरील फलॅट युनिट नं.104, सुपरबिल्ट क्षेत्र 88.21 चौरस मिटर, सदर सदनिका खरेदी घेणेबाबतचा करार दि.16.12.2006 रोजी झाला असून कराराप्रमाणे रक्कम रुपये 7,28,000/- सामनेवाला यांना अदा केलेल्या आहेत. तसेच, जादा काम स्टॅम्प डयुटी, रजिस्ट्रेशन फी, लाईट-पाणी-मेंटेंनन्स, सरकारी कर इत्यादी रक्कमा सामनेवाला यांनी स्विकालेल्या आहेत. (4) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, सामनेवाला यांनी सदर अपार्टमेंट व सदनिकेचे अपूर्ण कामे व कागदपत्रे पुढीलप्रमाणे करुन दिलेली नाहीत :- शेडयुल करुन दिलेले नाही, पार्किंगची कायमस्वरुपची व्यवस्था, पिण्याचे व खर्चाच्या पाण्यासाठी कायमस्वरुपी पाण्याची टाकी व पाईप लाईनची व्यवस्था, महानगनगरपालिकेकडील मंजूर ले-आऊट प्लॅन, डिड ऑफ डिक्लेरेशन, प्रॉपर्टी कार्ड व असेसमेंट उतारा, बँकेचे एन्.ओ.सी., सुधारित मंजुर नकाशा, टेरेसच्या दरवाजास कुलूप काढून कायमस्वरुपरी सर्व फलॅटधारकांना टेरेस प्रवेशासाठी उपलब्ध करुन द्यावा, गॅलरीचे काम करुन द्यावे, डक्ट व गॅलरीचे रंगकाम करुन द्यावे, अपार्टमेंट बिल्डींगच्या स्लॅबला 10 ते 12 ठिकाणी लिकेज आहे, त्याचे काम करुन द्यावे व पेटीस्टोन करुन द्यावे, अपार्टमेंट बिल्डिंग व फलॅटमधील लाईट फिटींगचे शॉर्ट सर्किटपासून संरक्षण करुन देणे, फलॅटच्या वेगवेगळया कामासाठी दिलेल्या पैशाची पावती देणे, जिन्यामधील भिंतीस दोन्ही बाजूने संरक्षण रॉड बसवून देणे, एकत्रित वर्गणी रक्कमेची पूर्तता करुन देणे, टेरेसवरील बाथरुमसाठी सोडलेले खांब, लिफटसाठी सोडलेल्या जागेत साठलेल्या घाण पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सबब, सदर बाबींचा बंदोबस्त करणे. अपार्टमेंट बिल्डिंग मधील सर्वत्र लोंबकळत असलेल्या तारा व वायर यांचेपासून धोका निर्माण झाला आहे. त्याचे फिटींग करुन देणे. अपार्टमेंट बिल्डींगचे रंगकाम करुन इमारतीच्या दर्शनी भागावर इमारतीच्या नांवाचा फलक लावावा व इमारतीच्या दर्शन बाजूस सर्व फलॅटधारकांच्या नांवाची नोंद करुन द्यावी. पावसाळयातील स्लॅब, भिंती व खिडकयांच्या गळतीमुळे भिंतीचा व सिलींगचा रंग खराब झाला आहे. तो रंगवून मिळावा. फलॅट व अपार्टमेंटच्या भिंतीना निकृष्ट कामामुळे तडे गेले आहेत. त्याची दुरुस्ती करुन मिळावी. कॉमन लाईट, स्वीच बॉक्स तळमजल्यावरुन काढून पहिल्या मजल्यावर जोडून मिळावा. (5) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, सामनेवाला यांनी उपरोक्त बाबींची अद्याप पूर्तता केलेली नाही. याउपर सामनेवाले हे स्वत: सदर मिळकतीतील दुकानगाळे, कॉमन पार्किंग, कॉमन पॅसेजमध्ये बेकायदेशीर बांधकाम केले आहे व फलॅटधारकांना त्रास देणेचे उद्देशाने भागीदारीमध्ये कोणतीही रितसर परवानगी न घेता हॉटेल व्यवसाय चालू केला आहे व सदर जागेमध्ये भाडेकरु ठेवले आहेत. हॉटेल व्यवसायासाठी लागणारे पाणी व लाईट वगैरेचा वापर फलॅटधारकांची परवानगी न घेता सामनेवाला यांच्या परवानगीने वापर करीत आहेत. (6) सामनेवाला यांनी पिण्याच्या व खर्चाच्या पाण्यासाठी महानगरपालिकेकडून अथवा बोअरिंग मारुन कायमस्वरुपी पाण्याची व्यवस्था करणेची होती. तशी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. तसेच, फलॅटधारकांची सहकार संस्था स्थापन केलेली नाही. तसेच, अपार्टमेंट बिल्डिंगच्या व्यवस्थेसाठी व मेटेंनन्स वगैरेसाठी जमा करीत असलेल्या वर्गणीचे रेकॉर्ड ठेवलेले नाही. उपरोक्त अपूर्ण कामे व कागदपत्रे पूर्ण करुन देणेबाबत मागणी केली असता सामनेवाला यांनी वकिलांमार्फत दि.30.09.2009 रोजी नोटीस पाठवून चुकीचे उत्तर दिले. (7) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये उपरोक्त नमूद केलेली कामे व कागदपत्रे पूर्ण करुन देणेबाबत सामनेवाला यांना आदेश व्हावा. तसेच, जादा काम, लाईट-पाणी, सरकारी कर, स्टॅम्प डयुटीसाठी घेतलेली रक्कम तसेच मानसिक त्रासापोटी रुपये 1 लाख, तक्रारीचा खर्च रुपये 7,000/- इत्यादी द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह देणेचा आदेश व्हावा व अपार्टमेंट अक्ट मधील तरतुदीस बाधा आणणारे वर्तन करु नये याबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (8) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत डिड ऑफ अॅग्रीमेंट, बलभीम बँकेस व सामनेवाला यांना एन्.ओ.सी.साठी लिहिलेले पत्र, सामनेवाला यांना अपूर्ण कामे व कागदपत्रे पूर्ण करुन देणेबाबत दिलेले पत्र, सामनेवाला यांना दि.01.09.2009 व दि.12.10.2010 रोजी पाठविलेली नोटीस, सामनेवाला यांची उत्तरी नोटीस दि.30.09.2009 इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (9) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारीत उल्लेख केलेली मिळकत त्यांनी विकसित केलेली आहे. रजिस्टर्ड करारपत्राचेवेळेसच फलॅटमधील संपूर्ण काम पूर्ण करुन सर्व कागदपत्रांसह तक्रारदारांना फलॅटचा ताबा दिलेला आहे. करारात नमूद केलेप्रमाणे स्टॅम्प डयुटी, रजिस्ट्रेशन फी, वकिल फी, लाईट-पाणी, सरकारी कर भागविणेची जबाबदारी तक्रारदारांची आहे. तक्रारदारांनी कोणतीही जादा रक्कम दिलेली नाही. तक्रारदार हे दुचाकी कॉमन पार्किंगचा वापर सुरवातीपासून आजपर्यत करीत आहेत. तसेच, पाण्याचे कनेक्शन, टाकी व पाईप लाईनची व्यवस्था केलेली आहें. सदर मिळकतीवरील बँकेचे कर्ज भागविलेले आहे. इमारतीवरील लाईट फिटींगचे शॉर्ट सर्किटपासून संरक्षण यापूर्वीच करणेत आले आहे. कॉमन लाईट स्विच बॉक्स पूर्वीपासून तळमजल्यावर होता, तो पहिल्या मजल्यावर तांत्रिकद्ष्टया जोडता येण अशक्य आहे. (10) सामनेवाला पुढे सांगतात, कराराप्रमाणे टेरेस व पार्किंग एरिया, ओपन स्पेस व उर्वरित विक्रीयोग्य बांधकाम क्षेत्र यावर तक्रारदारांना अधिकार सांगता येणार नाही. फलॅटधारक हे पूर्वीपासून वर्गणी काढून समाईक पाणी व वीजेचे बिल भागवितात, त्याचा हिशोब तक्रारदार फलॅटधारक-सुजय पाटील यांचेकडे आहे. जिन्यामधील भिंतीस संरक्षण रॉड बसविणेची आवश्यकता नाही. फलॅटधारक महादेव कुमठेकर, भिकू प्रभावळकर, अरुण गाडगीळ या फलॅटधारकांनी कब्जा स्विकारलेनंतर बेकायदेशीरपणे महानगरपालिकेची परवानगी न घेता फलॅटलगतच्या ओपन टेरेसवरुन छत टाकून फॅब्रिकेशन काम करुन बंदिस्त करुन घेतलेने भोगवटा प्रमाणपत्र मिळणेस उशिर झाला. त्यासाठी महानगरपालिकेने रक्कम रुपये 10,000/- चा दंड सामनेवाला यांचेकडून वसूल करुन घेतला आहे. सदर दंडाची रक्कम सदर फलॅटधारकांनी दिलेली नाही. (11) मिळकतीच्या प्रॉपर्टी कार्डावर नजरचुकीने ‘ब’ धारणाधिकाराची नोंद झाली आहे. सदर नोंद कमी करणेकरिता जिल्हाधिकारी यांना अर्ज दिला आहे. सदर नोंद रद्द केलेनंतर डिड ऑफ अपार्टमेंट - खरेदीपत्र यातील वि.प.हे पूर्ण करुन देत आहेत. तसेच, फलॅटच्या व्यवतिरिक्त अन्य बांधकाम - दुकानगाळे, पार्किंग टेरेस, ओपन स्पेस, विक्री करणेचा अथवा ते भाडयाने देणेचा, तसेच त्यात कायदेशीर व्यवसाय करणेचा सामनेवाला यांना पूर्ण हक्क व अधिकार आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खोटी व चुकीची असल्याने खर्चासह नामंजूर करुन कॉम्पेनसेटरी कॉस्ट रुपये 10,000/- देणेचा आदेश व्हावा. तसेच, तक्रारदारांच्या देय रक्कमा देणेचा आदेश व्हावा. (12) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ कोल्हापूर महानगरपालिकेने दिलेले बांधकाम नियमितीकरण (भोगवटा) प्रमाणपत्र, महानगरपालिकेकडे सादर केलेला नकाशा, बलभीम बँकेने कर्ज भागलेअसलेबाबत दिलेला दाखला, ‘ब’ धारणाधिकार बाबतचा शेरा होणेबाबत जिल्हाधिकारी यांचेकडे दिलेला अर्ज इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (13) या मंचाने तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे व लेखी युक्तिवाद, तसेच दोन्ही बाजूंच्या वकिलांनी केलेले युक्तिवाद यांचे अवलोकन केले आहे. सामनेवाला हे बांधकाम व्यावसायिक आहेत. तक्रारीत उल्लेख केलेली मिळकत ही सामनेवाला यांनी विकसित केलेली आहेत व सदर इमारतीमध्ये तक्रारदारानंनी सदनिका घेतलेल्या आहेत. सामनेवाला यांनी बांधकामामध्ये त्रुटी ठेवलेल्या आहेत; तसेच, महाराट्र ओनरशीप फलॅट (रेग्युरेशन ऑफ दि प्रमोशन ऑफ कन्स्ट्रक्शन, सेल, मॅनेजमेंट अँड ट्रान्स्फर) अॅक्ट 1963 यात असलेल्या तरतुचा भंग केलेला आहे. याबाबत प्रस्तुतची तक्रार आहे. सामनेवाला यांनी बांधकामामध्ये त्रुटी आहेत किंवा कसे याबाबत वस्तुनिष्ठ तज्ज्ञ अहवाल येणे आवश्यक असल्याने याबाबत कोर्ट कमिशनर म्हणून ‘असोसिएशन ऑफ अर्किटटेक्ट अँड इंजिनिअर्स, कोल्हापूर’ यांची नेमणुक केली होती. सदर तज्ज्ञ अभियंत्यांनी वस्तुस्थितीची पाहणी करुन कोर्ट कमिशनर अहवाल दाखल केलेला आहे. सदरचा अहवाल पुढीलप्रमाणे :- 1. सदर इमारतीच्या मंजूर नकाशात दाखविलेल्या पार्किंगच्या ठिकाणी अंशत: बांधकाम केल्याचे दिसून येते. तक्रारदार यांची वाहने कॉमन पॅसेजमध्ये पार्क केल्याचे दिसून येते. तसेच, वि.प. हे वास्तव्य करीत असलेली जागा ही मंजूर नकाशामध्ये रहिवाशी म्हणून निर्देशित केलेली आहे. 2. सदर इमारतीच्या पार्किंग लेव्हलला (तळमजल्याच्या खालील भागामध्ये) पाण्याची एक टाकी बांधलेली आहे व टेरेसवरती पाण्याच्या दोन टाक्या आहेत. सदर वरील टाक्यांमध्ये पाणी भरणेकरिता तात्पुरती रबरी पाईप लाईन टाकून प्रत्येक फलॅटधारकाला स्वतंत्ररित्या पाणी भरावे लागते. तसेच, पिण्याच्या पाण्याची व खर्चाच्या पाण्याची एकत्रित व्यवस्था केलेची दिसून येते. 3. सदर इमारतीमधील गॅलरीकरिता 2 फूट 6 इंच उंचीची पॅरापेट वॉल केलेली असून संरक्षणाच्या दृष्टीने सदर पॅरापेटची उंची वाढवणे आवश्यक आहे. 4. सदर इमारतीमध्ये दोन ठिकाणी वायरिंगची केसिंग पट्टी अंशत: खराब झालेली दिसून येते. तसेच, पावसाचे लाईट फिटींगवर पावसाचे पाणी पडल्यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका संभवतो. 5. सदर इमारतीचे मंजूर नकाशात दाखविल्याप्रमाणे वरील मजलयाचे बांधकाम झालेले दिसत नाही. त्यामुळे संबंधित स्लॅबवर पेटीस्टोन केलेले नसल्यामुळे त्या स्लॅबवरती पाणी साचून स्लॅबला गळती असलेचे दिसून येते. 6. सदर इमारतीमध्ये जिन्याच्या भिंतीस लोखंडी संरक्षक रॉड बसविलेचे दिसतात. 7. सदर इमारतीच्या टेरेसवर वरील बांधकामाकरिता ठेवलेल्या टॉयलेट संकमध्ये कचरा भरलेला आहे व लिफटसाठी सोडलेल्या जागेमध्ये पाणी साचलेचे दिसते. 8. सदर इमारतीचे बांधकाम अपूर्ण असलेने जिन्याच्या वरील भागावर रुफ काम केलेले नसलेने जिन्यावरुन पाणी येते. 9. सदर इमारतीच्या गिलाव्यावरती अंशत: तडे गेलेले दिसतात. 10. सदर इमारतीच्या जिना लॅन्डींग पॅसेजमध्ये एक ठिकाणी इलेक्ट्रिकल वायर भिंतीवरती लोंबकळत असलेचे दिसते. 11. सदर इमारतीमध्ये पाण्याच्या गळतीमुळे भिंतीचा व स्लॅबचा काही ठिकाणी रंग खराब झालेचे दिसते. 12. सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या कमिशन अर्जास दिलेल्या म्हणण्यासोबत जोडलेल्या जादा कामाची यादी आम्हांस प्राप्त झालेली नाही. (14) युक्तिवादाचेवेळेस, सामनेवाला यांच्या वकिलांनी तक्रारदारांनी सदनिकेचा ताबा घेवून 2 वर्षांच्या कालावधीनंतर केलेली त्रुटीबाबतची केलेली मागणी ही मुदतबाहय असलेचे प्रतिपादन केले आहे. परंतु, त्यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये मुदतीबाबतचा कोणताही मुद्दा उपस्थित केलेला नाही. हे मंच यापुढे असेही स्पष्ट करीत आहे, सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी तक्रारदारांना अद्याप नोंद खरेदीपत्र करुन दिलेले नाही. जोपर्यन्त नोंद खरेदीपत्र पूर्ण करुन दिले जात नाही तोपर्यन्त प्रस्तुत तक्रारीस सातत्याने कारण घडत आहे असा निष्कर्ष हे मंच काढीत आहे. (15) कोर्ट कमिशनर यांच्या अहवालाचे अवलोकन केले असता कोर्ट कमिशनर यांनी अहवालामध्ये नमूद केलेल्या त्रुटी सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी दूर करुन द्याव्यात या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मंजूर नकाशाचे अवलोकन केले असता सदरची जागा रहिवाशी कारणाकरिता आहे. त्यामुळे तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे त्यामध्ये सामनेवाला अथवा अन्य व्यक्तींना कोणताही व्यवसाय करता येणार नाही. तसेच, दुचाकी पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करुन द्यावी. तसेच, खराब वायरिंग धोकारहित करुन द्यावे. स्लॅबमध्ये असणा-या गळती काढाव्यात व त्यामुळे भिंती व स्लॅबचा खराब झालेला रंग विचारात घेता पुन्हा भिंती व स्लॅबचा रंग करुन द्यावा. सामनेवाला बांधकाम व्यावसायिकांनी तक्रारदारांना अद्याप नोंद खरेदीपत्र करुन दिलेले नाही व त्यासाठी विलंब लावलेला आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांना नोंद खरेदीपत्र करुन द्यावे याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. जादा रक्कमेच्या हिशेबाबाबत दोन्ही बाजूंनी स्पष्टपणे स्पष्टीकरण व पुरावे समोर आणलेले नाहीत. त्यामुळे या बाबीचा विचार हे मंच करीत नाही. (16) उपरोक्त विवेचन विचारात घेवून हे मंच खालीलप्रमाणे एकत्रित आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. उपरोक्त तक्रारदारांच्या सर्व तक्रारी मंजूर करणेत येतात. 2. सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी तक्रारदारांना तक्रारीत उल्लेख केलेल्या सदनिकांचे डिड ऑफ अपार्टमेंट (नोंद खरेदीपत्र) करुन द्यावे. 3. सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी मंजूर नकाशात दाखविलेल्या पार्किंगच्या ठिकाणी केलेले बांधकाम काढून टाकावे व सदनिकाधारकांना कॉमन पार्किंगची सुविधा करुन द्यावी. तसेच, पिण्याचे पाणी व वापराचे पाणी यासाठी दोन स्वतंत्र टाक्या करुन सुस्थितीत पाणी भरणेची व्यवस्था करुन द्यावी. तसेच, इमारतीतील गॅलरीकरिता असलेल्या पॅरापेट वॉलची उंची संरक्षणाच्या दृष्टीकोनातून वाढवावी. तसेच, इमारतीतील वायरिंगचे फिटींग तज्ज्ञ व्यक्तीकडून करुन घेवून धोकारहित करुन द्यावे. इमारतीचे स्लॅबवर गळती होत असल्याने स्लॅब वर पेटीस्टोन करुन गळती थांबवावी. टेरेसवरील बांधकामाकरीता ठेवलेल्या टॉयलेट संक स्वच्छ करुन द्यावा. तसेच, लिफटसाठी सोडलेली जागा स्वच्छ करुन द्यावी. तसेच, सदनिका धारकांना पाण्याची टाकी अथवा समाईक मिळणा-या सुविधांसाठी टेरेस येणे-जाणेस खुला करुन द्यावे. जिन्यावरुन पाणी येत असल्याने त्यास रुफ करुन द्यावा. इमारतीच्या गिलाव्यावर गेलेले तडे दुरुस्त करुन द्यावेत. इमारतीमध्ये पाण्याच्या गळतीमुळे भिंतीचा व स्लॅबचा रंग खराब झाला आहे, तो पुन्हा रंगवून द्यावा. 4. सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी प्रत्येकी रुपये 5,000/- (प्रत्येकी रुपये पाच हजार फक्त) द्यावेत. 5. सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी तक्रारदारांस तक्रारीच्या खर्चापोटी प्रत्येकी रुपये 1,000/- (प्रत्येकी रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |