निकालपत्र :- (दि.15.12.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.8, 10, 13, 14 व 15 यांनी म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.8, 10, 13, 14 व 15 यांनी दाखल केलेले म्हणणेच सामनेवाला क्र.9 यांचे म्हणणे म्हणून वाचणेत यावे अशी पुरसिस दिली आहे. उर्वरित सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या व सामनेवाला क्र. 8, 9, 10, 13, 14, 15 यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. उर्वरित सामनेवाला गैरहजर आहेत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे मुदत बंद ठेवीच्या स्वरुपात रक्कमा ठेवलेल्या आहेत, त्यांच्या तपशील खालीलप्रमाणे :- अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | ठेव तारीख | मुदतपूर्ण तारीख | मुदतपूर्ण रक्कम | 1. | 06597 | 9500/- | 13.10.2001 | 13.04.2002 | 10165/- | 2. | 10187 | 8000/- | 13.07.2002 | 13.07.2003 | 9200/- | 3. | 203 | 8000/- | 24.10.2002 | 24.11.2003 | 9220/- |
(3) तक्रारदार हे अतिशय वयोवृध्द ज्येष्ठ नागरिक असून अत्यंत आजारी म्हणजेच अंथरुणाला खिळून असलेने त्यांनी औषधोपचारांकरिता सदर ठेवींची मुदत संपल्यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेकडे रक्कमांची वारंवार मागणी केली आहे. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी काहीच दाद दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी व्याजासह ठेव रक्कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्या, वैद्यकिय दाखला इत्यादींच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवाला क्र.8, 9, 10, 13, 14 व 15 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला संस्था ही सन 2003 मध्ये अवसायानात काढणेत आली आहे. सामनेवाला क्र.18 यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करणेत आलेली आहे. सदर संस्थेशी सामनेवाला यांचा कोणताही वैयक्तिक संबंध राहिलेला नाही. तक्रारीस कारण घडलेले नाही. तसेच, तक्रार मुदतीत नाही. प्रस्तुत सामनेवाला हे सामनेवाला संस्थेचे संचालक नसल्याने तक्रारदारांच्या ठेव रक्कमा देणेची प्रशासक यांची जबाबदारी आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे. (6) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्थेमध्ये ठेव रक्कमा ठेवलेल्या आहेत; सदर ठेव पावत्यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्थेमध्ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव रक्कमांच्या मुदती संपून गेलेल्या आहेत व सदर रक्कमांची तक्रारदारांनी व्याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. (7) सामनेवाला क्र.8, 9, 10, 13, 14, व 15 यांनी त्यांच्या म्हणण्यात सामनेवाला संस्थेवर प्रशासकांची नियुक्ती झाल्याने तक्रारदारांच्या ठेव रक्कम अदा करणेस प्रशासक जबाबदार असून प्रस्तुत सामनेवाला यांनी जबाबदारी येत नसल्याचे कथन केले आहे. सदर कथनाच्या पुष्ठयर्थ सामनेवाला यांनी कोणताही समाधानकारक पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. तसेच, तक्रारदारांच्या वकिलांनी त्यांचे युक्तिवादाचेवेळी प्रस्तुत सामनेवाला या तक्रारदारांनी त्यांच्या ठेव रक्कमा या प्रस्तुत सामनेवाला संचालक हे संचालक पदावर कार्यरत असताना ठेवलेल्या असल्याचे प्रतिपादन केले. त्यामुळे प्रस्तुत सामनेवाला हे संस्थेचे संचालक असल्याने तक्रारदारांच्या ठेव रक्कमा व्याजासह परत करणेची त्यांची जबाबदारी टाळू शकत नाहीत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (8) सामनेवाला क्र.11-राजाराम श्रीपती मिरजे हे मयत झालेमुळे तक्रारदारांनी त्यांचे दि.26.10.2010 रोजीचे विनंती अर्जान्वये त्यांचे नांव प्रस्तुत तक्रारीतून वगळणेत यावे अशी विनंती केली. सदरचा अर्ज मंजूर करणेत येवून सामनेवाला क्र.11 यांना प्रस्तुत तक्रारीतून कमी करणेत आले. सबब, सामनेवाला क्र.1 ते 10 व 12 ते 18 यांनी तक्रारदारांच्या व्याजासह ठेव रक्कमा सामनेवाला यांनी न देवून त्यांच्या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, सामनेवाला क्र.1 ते 10 व 12 ते 17 यांना वैयक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.18 हे सामनेवाला शासकिय अधिकारी असल्याने त्यांना तक्रारदारांच्या ठेव रक्कमा व्याजासह परत करणेकरिता जबाबदार धरणेत यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (9) प्रस्तुतचे प्रकरण सुनावणीकरिता असताना तक्रारदारांचे वारस सुचिन यशवंत पाटील यांनी दि.20.09.2010 रोजी अर्ज व शपथपत्र दाखल केले. ते त्यांच्या अर्जात पुढे सांगतात, तक्रारदार क्र.1 व 2 यांचे अनुक्रमे दि.25.06.2010 रोजी व दि.19.08.2010 रोजी मयत झाले आहेत. त्यामुळे तक्रारदारांचा मुलगा या नात्याने ते एकमात्र कायदेशीर सरळ वारस असून अन्य कोणीही वारस नाहीत. तसेच, वादविषय असलेल्या ठेव पावत्यांना एकमात्र नॉमिनी असल्याने तक्रारदार क्र.1 व 2 यांची नांवे वगळण्यात येवून तक्रारदारांचे वारस व नॉमिनी सचिन यशवंत पाटील यांना तक्रारदार म्हणून सामील करणेत यावे अशी विनंती केली आहे. सदर अर्जासोबत कार्यकारी दंडाधिकारी यांचेकडील वारसा शपथपत्र व तक्रारदारांचे मृत्यू दाखल्यांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. सदर अर्जावर दोन्ही बाजूंच्या वकिलांचे सविस्तर व विस्तृतपणे युक्तिवाद ऐकून या मंचाने दि. 26.10.2010 रोजी सदरचा अर्ज मंजूर केला व तक्रारदारांना तदनुसार तक्रारीमध्ये दुरुस्ती करणेचे आदेश पारीत केले. तक्रारदारांनी तदनुसार तक्रारदार क्र.1 व 2 यांची नांवे कमी करुन तक्रारदारांचे वारस म्हणून त्यांचा मुलगा, सचिन यशवंत पाटील यांचे नांव तक्रारदार म्हणून समाविष्ट केले आहे. (10) तक्रारदार क्र.1 व 2 हे मयत असल्याने सचिन यशवंत पाटील यांनी तक्रारदारांचे कायदेशीर सरळ वारस म्हणून कार्यकारी दंडाधिकारी यांचेकडील वारसा शपथपत्र दाखल केले आहे. तसेच प्रस्तुत प्रकरणातील ठेव पावत्यांवर त्यांचे नॉमिनी म्हणून नांव नमूद आहे. यांचा विचार करता सचिन यशवंत पाटील हे प्रस्तुत प्रकरणातील ठेव रक्कमा मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (11) तक्रारदार यांनी प्रस्तुत कामी दाखल केलेल्या ठेव पावत्यांच्या सत्यप्रतींचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्या या मुदत बंद ठेवींच्या आहेत व त्यांची मुदत संपलेचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे त्यांच्या मुदत ठेव रक्कमा पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना मुदत ठेवींची संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (12) तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला क्र.1 ते 10 व 12 ते 17 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.18 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदार, सचिन यशवंत पाटील यांना खालील कोष्टकातील मुदत बंद रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर ठेव पावत्यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के व्याज द्यावे. अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | 1. | 06597 | 9500/- | 2. | 10187 | 8000/- | 3. | 203 | 8000/- |
(3) सामनेवाला क्र.1 ते 10 व 12 ते 17 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.18 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदार, सचिन यशवंत पाटील मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |