(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 22 जुलै 2014)
1. अर्जदार यांनी, सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 सह 14 अन्वये दाखल केली. तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे.
2. अर्जदाराने रिलायन्स लाईफ इन्शुरन्सची पॉलिसी क्र.19689346 ही दि.9.1.2012 रोजी काढली व त्या पॉलिसीचा वार्षिक प्रिमियम नियमित भरत आहे. गैरअर्जदार क्र.1 कडून अर्जदाराचे मोबाईलवर दि.22.12.2013 रोजी अर्जदारास वरील पॉलिसीचे एजंट कोड लॅप्स झाले असल्याबाबत व पॉलिसीवरील प्रॉफीट रुपये 48260/- पाहिजे असल्यास त्यासाठी सेक्युरीटी म्हणून रुपये 20,000/- चा चेक, पॅन कार्डची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स आणि 2 पासपोर्ट फोटो रिलायन्स लाईफ इंशुरन्सच्या नावे नागपूर ब्रॅन्च येथे पाठविण्यास सांगण्यात आले. त्यानुसार अर्जदाराने दि.26.12.2013 रोजी रुपये 20,000/- चा चेक क्र.976059 स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा गडचिरोली आणि डाक्युमेंट्स पाठविले व तो चेक त्यांनी विड्रॉल केला. तसेच, दि.18.3.2014 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून पुन्हा फोन कॉल व्दारा वरील पॉलिसीवर रुपये 2,40,000/- नफा मिळत असल्याबाबत अर्जदारास सांगण्यात आले व त्यासाठी सेक्युरीटी म्हणून पुन्हा रुपये 41,000/- चा चेक आणि पॅन कार्डची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स आणि 2 पासपोर्ट फोटो अॅडव्हांस टॅक्स पेड करण्यासाठी पाठविण्यास सांगण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 व 2 कडून फसवणूक सुरु असल्याचे लक्षात आल्यानंतर दि.26.3.2014 ला गैरअर्जदार क्र.4 यांना पञ पाठवून अर्जदारासोबत घडलेला प्रकार सविस्तर सांगितला. त्यावर त्यांनी दि.1.4.2014 रोजी अर्जदारास पञ पाठवून फक्त दिलगिरी व्यक्त केली व पुढील 15 दिवसात सविस्तर उत्तर पाठवू असे सांगितले, परंतु अजुनपर्यंत अर्जदारास कोणत्याच प्रकारचे उत्तर मिळाले नाही. गैरअर्जदार क्र.3 ने दि.13.5.2014 ला फोन कॉलवरुन अर्जदारास रुपये 41,914/- चा चेक पाठविण्यास सांगितले व पॉलिसीवर प्रॉफीट रुपये 2,39,776/- रक्कम मिळणार असल्याचे सांगितले. गैरअर्जदार क्र.1, 2, 3 व 4 यांनी अर्जदारास नवीन पॉलिसी क्र.51441761 ही अर्जदाराची इच्छा नसतांनासुध्दा आणि अर्जदाराची सही स्कॅनिंग करुन पाठविलेली आहे. म्हणून अर्जदाराने गैरअर्जदाराकडे ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 सह 14 अन्वये सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली.
3. अर्जदाराचे सदर तक्रारीवर प्राथमिक सुनावणी ऐकण्यात आली. मंचाच्या मताप्रमाणे प्राथमिक सुनावणी ऐकण्यात आल्यानंतर खालील प्रमाणे मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदार क्र. 1, 2, व 4 चा ग्राहक : नाही.
आहे काय ?
2) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.3 चा ग्राहक आहे काय ? : होय.
3) सदर प्रकरण या मंचाचे कार्यक्षेञात आहे काय ? : नाही.
4) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
4. अर्जदाराने दाखल अर्ज व केलेल्या युक्तीवादाप्रमाणे गैरअर्जदार क्र.1, 2 व 4 यांचे अर्जदार ग्राहक नाही. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
5. अर्जदाराने दाखल केलेला अर्ज व केलेल्या युक्तीवादाप्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदार क्र.3 कडून इंशुरन्स पॉलिसी घेतली होती. तसेच गैरअर्जदार क्र.3 ने नवीन पॉलिसी अर्जदाराला पाठविली होती या अनुषंगाने अर्जदार हा गैरअर्जदार क्र.3 चा ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.2 होकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
6. गैरअर्जदार क्र.3 चे रजीस्टर्ड ऑफीस नवी मुंबई मध्ये आहे व व्यवसायीक ऑफीस गोरेगांव (पूर्व) मुंबई मध्ये आहे. गैरअर्जदार क्र.3 चे गडचिरोली येथे कोणतीही शाखा नाही, तसेच गैरअर्जदाराने दाखल केलेले नि.क्र.2 वर दस्त क्र.1 व 2 ची पडताळणी करतांना असे दिसले की, गैरअर्जदार क्र.3 ने दिलेली पॉलिसीचे एजंट/ब्रोकरचा पत्ता नागपूर येथे आहे. सदर तक्रार दाखल करण्याचा वाद गडचिरोली येथे घडले नसल्यामुळे सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 11 प्रमाणे मंचाचे कार्यक्षेञात येत नाही. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
7. मुद्दा क्र.1, 2 व 3 चे विवेचनावरुन व मंचाचे मताप्रमाणे खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आंदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अस्विकृत करण्यात येत आहे.
(2) अर्जदाराची मुळ तक्रार व दस्ताऐवजांचे प्रती ठेवून, अन्य प्रती व दस्ताऐवज अर्जदारास परत करण्यात यावी.
(3) अर्जदारास आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 22/7/2014.