जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्ष - श्री.डी.डी.मडके.
मा.सदस्या – श्रीमती.एस.एस.जैन.
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – 56/2011
तक्रार दाखल दिनांक – 23/03/2011
तक्रार निकाली दिनांक –31/01/2013
श्री.सतीश रमण पाटील. ----- तक्रारदार
उ.वय.48 वर्षे, धंदा-नोकरी,
रा.प्लॉट नं.14,सुभाषचंद्र बोस कॉलनी,
स्टेडियमच्या जवळ,देवपुर,धुळे.ता.जि.धुळे.
विरुध्द
(1)श्री.राजेश वाणी,उत्पादक. ----- विरुध्दपक्ष
हिमालया वॉटर स्टोरेज टॅक,
ओम शांती कंटेनर्स,बी/4,पांझरापोळ,
कॉम्पलेक्स,पारोळारोड,धुळे.ता.जि.धुळे.
(2)श्री.सुनील पुनमराव पाटील,सज्ञान.
प्रोप्रायटर-अश्वीनी ट्रेडर्स,वाडीभोकररोड,
स्टेडियमजवळ,देवपूर,धुळे.
ता.जि.धुळे.
न्यायासन
(मा.अध्यक्षः श्री.डी.डी.मडके.)
(मा.सदस्याः श्रीमती.एस.एस.जैन.)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.डी.डी.जोशी.)
(विरुध्दपक्ष क्र.1 तर्फे – वकील श्री.आर.एस.शिकारे.)
(विरुध्दपक्ष क्र.2 तर्फे – वकील श्री.आनंद शर्मा.)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्ष- श्री.डी.डी.मडके.)
(1) विरुध्दपक्ष यांनी सेवेत त्रृटी केली म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
(2) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांनी विरुध्दपक्ष क्र.1 या उत्पादक असलेल्या कंपनीची, पाणी साठविण्याची 1000 लिटर क्षमता असलेली प्लॅस्टीक टाकी विरुध्दपक्ष क्र.2 या अधिकृत वितरकाकडून दि.03-05-2003 रोजी रक्कम रु.2,800/- देऊन खरेदी केली. त्यावेळी विरुदपक्ष क्र.2 यांनी या टाकीची गॅरंटी 11 वर्षाची सांगितली असून तसे गॅरंटीकार्ड तक्रारदारास दिले आहे.
(3) सदर पाण्याची टाकी विरुध्दपक्ष क्र.2 यांच्या कारागिरांनी योग्य जागेवर बसवून दिली व तक्रारदार त्याचा वापर करीत आहे. सन 2008 मध्ये सदर पाण्याची टाकी बाजुला गळू लागली. त्यावेळी विरुध्दपक्ष क्र.2 चे कारागिरांनी ती दुरुस्त करुन दिली. त्यानंतर पुन्हा सन 2009 मध्ये पुन्हा सदर पाण्याची टाकी गळू लागली,त्यावेळी विरुध्दपक्ष क्र.2 यांना कळविले असता त्यांनी विरुध्दपक्ष क्र.1 यांचेशी संपर्क साधण्यास सांगितले. त्याप्रमाणे संपर्क साधला असता त्यांच्या कारागिरांनी टाकीची दुरुस्ती करुन दिली. त्यानंतर पुन्हा सन 2010 मध्ये सदर पाण्याची टाकी गळू लागली. त्यावेळीही विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना कळविले असता,त्यांनी टाकी दुरुस्त करुन देण्यास चालढकल केली. शेवटी बराच प्रयत्न केल्यानंतर त्यांनी टाकी दुरुस्त करुन दिली. परंतु फेबृवारी 2011 मध्ये पुन्हा सदर पाण्याची टाकी गळू लागली. त्यावेळी तक्रारदारांनी, सदर टाकी कायमची दुरुस्त होत नसल्यास व ती गॅरंटी कालावधीत असल्यामुळे बदलून द्यावी अशी विनंती विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना केली. त्यावेळी विरुध्दपक्ष यांनी ते मान्य केले,परंतु त्याप्रमाणे कृती केली नाही. त्यानंतर पुन्हा तक्रारदार मार्च 2011 मध्ये टाकी दुरुस्त करुन द्यावी अथवा बदलून द्यावी अशी तक्रार करण्यास गेले असता,विरुध्दपक्ष यांनी टाकी बदलून देण्यास स्पष्टपणे नकार दिला. तसेच टाकी दुरुस्त करुन देण्यासही नकार दिला.
(4) वास्तविक सदर पाण्याची टाकी खरेदी करते वेळीच विरुध्दपक्ष क्र.2 यांनी 11 वर्षाची गॅरंटी दिली आहे. सदर टाकी आजही गॅरंटी कालावधीत असल्याने ती दुरुस्त किंवा बदलून देण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष यांची आहे. परंतु विरुध्दपक्ष जबाबदारी नाकारुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करीत आहेत. त्यामुळे तक्रारदारास शारीरिक,आर्थिक व मानसिक त्रास होत आहे.
(5) सबब विरुध्दपक्ष यांचेकडून, सदर पाण्याची टाकी बदलून मिळावी अथवा नवीन टाकीची किंमत मिळावी. शारीरिक,आर्थिक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- मिळावेत व तक्रारीचा खर्च मिळावा अशी विनंती तक्रारदारांनी केली आहे.
(6) तक्रारदारांनी नि.नं.5 सोबत विरुध्दपक्ष यांनी दिलेले पाण्याच्या टाकीचे गॅरंटीकार्डची छायांकीत प्रत दाखल केली आहे.
(7) सदर प्रकरणी विरुध्दपक्ष क्र.1 हे वकीलांमार्फत दि.02-05-2011 रोजी हजर झाले असून, त्यांनी खुलासा दाखल करणेकामी मुदत मिळावी असा विनंती अर्ज दाखल केला. व मंचाने तो मंजूर केला आहे.
(8) सदर प्रकरणी विरुध्दपक्ष क्र.2 हे वकीलांमार्फत दि.11-04-2012 रोजी हजर झाले असून, त्यांनी खुलासा दाखल करणेकामी मुदत मिळावी असा विनंती अर्ज दाखल केला. व मंचाने तो मंजूर केला आहे.
(9) तक्रारदारांची कैफीयत, तसेच पुराव्यासाठी दाखल कागदपत्रे पाहता तसेच तक्रारदारांच्या विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर विष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः |
निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे विरुध्दपक्ष कंपनीचे ग्राहक आहेत
काय ? |
ः होय. |
(ब)विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत
त्रृटी केली आहे काय ? |
ः होय, अंशतः |
(क)आदेश काय ? |
ः अंतिम आदेशा प्रमाणे
|
विवेचन
(10) मुद्दा क्र. ‘‘अ’’–तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्र.1 कंपनीने उत्पादीत केलेली पाण्याची टाकी विरुध्दपक्ष क्र.2 यांचेकडून दि.03-05-2003 रोजी रक्कम रु.2,800/- देऊन खरेदी केल्याचे शपथेवर कथन केले आहे. तसेच विरुध्दपक्ष यांनी ही बाब नाकारलेली नाही. त्यावरुन तक्रारदार हे विरुध्दपक्षाचे ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(11) मुद्दा क्र. ‘‘ब’’–तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्र.1 यांनी उत्पादीत केलेली पाण्याची टाकी विरुध्दपक्ष क्र.2 यांचेकडून विकत घेतल्यानंतर वारंवार अनुक्रमे सन 2008 मध्ये, सन 2009 मध्ये, जुलै 2010 मध्ये आणि फेबृवारी 2011 मध्ये गळती झाल्याचे शपथेवर कथन केले आहे. त्यापैकी जुलै 2010 पर्यंत वेळोवेळी विरुध्दपक्ष यांनी टाकी दुरुस्त करुन दिली आहे. तथापि फेबृवारी 2011 मधे गळती झाली असता विरुध्दपक्ष यांनी टाकी दुरुस्त करुन दिली नाही किंवा नवीन बदलूनही दिली नाही. विरुध्दपक्ष क्र.1 व 2 हे सदर प्रकरणी हजर झाले असून, त्यांनी खुलासा देणेकामी मुदत मागून घेतली. परंतु त्यानंतर वेळोवेळी नेमलेल्या तारखांना विरुध्दपक्ष क्र.1 व 2 हे सतत गैरहजर आहेत तसेच त्यांनी स्वतःचा खुलासा अथवा कोणतीही कागदपत्रे पुराव्यासाठी व स्वतःचे बचावार्थ दाखल केली नाहीत. त्यामुळे विरुध्दपक्ष यांना तक्रारदारांची तक्रार मान्य आहे असे समजण्यात येत आहे.
(12) विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांची पाण्याची टाकी वारंवार नादुरुस्त (गळती) होत असतांनाही ती कायमस्वरुपी गळती होणार नाही अशा पध्दतीने दुरुस्त करुन दिली नाही. अथवा कायमस्वरुपी गळती थांबणे शक्य नसल्यास ती बदलुनही दिली नाही. तसेच संधी देऊनही विरुध्दपक्ष यांनी न्यायमंचासमोर स्वतःचे बचावार्थ कोणताही खुलासा सादर केला नाही आणि त्यामुळे तक्रारदारांच्या तक्रारीकडे विरुध्दपक्ष यांनी जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होते. वास्तविक विक्री पश्चात सेवा पुरविणे ही विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांची कायदेशीर जबाबदारी आहे. परंतु तक्रारदारांनी वेळोवेळी स्वतः पाठपुरावा करुन तसेच न्यायमंचात तक्रार दाखल करुनही विरुध्दपक्ष त्यास दाद देत नाहीत या सर्वार्थाने विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना दिलेल्या सेवेत निश्चितच त्रृटी आहे असे या न्यायमंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(13) मुद्दा क्र. ‘‘क’’ - विरुध्दपक्षाच्या अशा सेवेतील कमतरतेमुळे, तक्रारदारांना मानसिक त्रास झाला असणे स्वाभाविक आहे. तसेच त्यांना यासाठी सदरील तक्रार अर्जाचा खर्चही सोसावा लागला आहे. त्याचे खर्चापोटी रक्कम मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत असे आमचे मत आहे. तक्रारदारांनी सदरीची पाण्याची टाकी विरुध्दपक्ष यांचेकडून बदलून मिळावी अथवा नविन टाकी विकत घेण्यासाठी नविन टाकीची किंमत मिळावी तसेच शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च विरुध्दपक्ष यांचेकडून मिळावा अशी विनंती केली आहे. परंतु तक्रारदारांनी दीर्घकाळ पर्यंत सदर पाण्याचे टाकीचा वापर केला आहे आणि उपभोग घेतला आहे हेही दुर्लक्षीत करता येणार नाही. त्यामुळे पाण्याचे टाकीचा वापर केलेल्या कालावधीचा काही अंशी घसारा (रक्कम रु.500/-) वजा जाता, टाकी खरेदीची उर्वरीत रक्कम (रक्कम रु.2,300/-) विरुध्दपक्ष यांचेकडून परत मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत असे आमचे मत आहे. तसेच शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.500/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.500/- विरुध्दपक्ष यांचेकडून मिळण्यास पात्र आहेत असे आमचे मत आहे. उपरोक्त सर्व विवेचनावरुन हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(ब) विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिक रित्या, या आदेशाच्या प्राप्ती पासून पुढील 30 दिवसांचे आत.
(1) तक्रारदारास वादातील पाण्याचे टाकीचेकिमतीपोटी अंशतः रक्कम 2,300/- (अक्षरी रु.दोन हजार तीनशे मात्र) द्यावेत आणि तक्रारदाराचे ताब्यातील वादातील पाण्याची टाकी स्वखर्चाने स्तःचे ताब्यात घ्यावी.
(2) तक्रारदार यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम 500/- (अक्षरी रु.पाचशे मात्र) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम 500/- (अक्षरी रु.पाचशे मात्र) द्यावेत.
धुळे.
दिनांकः 31/01/2013
(श्रीमती.एस.एस.जैन.) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.