तक्रारदार स्वत:
जाबदेणार एकतर्फा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- मा. श्री. श्रीकांत एम. कुंभार, सदस्य
:- निकालपत्र :-
दिनांक 19/ऑगस्ट/2013
तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार जाबदेणार विमा कंपनी विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे. यातील कथने थोडक्यात खालील प्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणार क्र 1 यांच्याकडून बिल क्र 28486 दिनांक 6/1/2012 अन्वये फ्रिज खरेदी केला. मे/जून महिन्यांच्या सुमारास त्यातून आवाज येऊ लागले तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार ते कदाचित कॉम्प्रेसर मधून असावेत. जाबदेणार क्र 1 यांना सांगूनही उपयोग झाला नाही. नंतर आवाज थांबले. परत ऑगस्ट/सप्टेंबर महिन्याच्या सुमारास आवाज येऊ लागले. जाबदेणार क्र 1 यांच्याकडे तक्रार नोंदवूनही कार्यवाही झाली नाही. परत वारंवार तक्रारी करुन, दिनांक 21/11/2012, 6/12/2012 व 12/12/2012 रोजी पत्रे पाठवूनही उपयोग झाला नाही. जाबदेणार क्र 2 यांच्याकडे तक्रार केली असता त्यांचे तंत्रज्ञ आले परंतू आवाजाची समस्या दूर झाली नाही. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार जाबदेणार क्र 1 यांच्याकडून सदोष फ्रिज बदलून मागतात अथवा खरेदी रक्कम रुपये 23500/- जुन्या युनिटची किंमत रुपये 2500/-, नुकसान भरपाई पोटी रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2000/- मागतात.
2. जाबदेणार क्र 1 व 2 यांना नोटीस बजावूनही गैरहजर. इंटरनेटचा पोस्टाचा अहवाल दाखल. सबब जाबदेणार क्र 1 व 2 यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश पारीत.
3. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पुराव्यास निरुत्तर करण्यासाठी जाबदेणार यांनी कोणताही लेखी पुरावा, शपथपत्र अथवा लेखी कैफियत दाखल केलेली नाही. सबब तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे व शपथपत्र यांचा विचार करुन गुणवत्तेनुसार प्रस्तुतचे प्रकरण निकाली काढण्यात येत आहे.
तक्रारदारांनी जाबदेणार क्र.1 यांच्याकडून रक्कम रुपये 23,500/- या किंमतीस पॅनासोनिक फ्रॉस्ट फ्री NR BU 343 SSIN दिनांक 6/1/2012 रोजी खरेदी केल्याचे दाखल पावतीवरुन स्पष्ट होते. सदर फ्रिजला खरेदीच्या दिनांकापासून म्हणजेच 6/1/2012 पासून एक वर्षाची वॉरंटी होती, वॉरंटी कार्ड मंचासमोर दाखल करण्यात आलेले आहे. वॉरंटी कालावधीतच फ्रिज मध्ये आवाजाची समस्या निर्माण झाली. जाबदेणार यांच्याकडे वारंवार तक्रारी करुनही उपयोग झाला नाही. तक्रारदारांनी जाबदेणार क्र 1 यांच्याकडे दिनांक 21/11/2012, 6/12/2012 व 12/12/2012 रोजी लेखी तक्रारी केल्याचा व त्या तक्रारी जाबदेणार क्र 1 यांना प्राप्त झाल्याचा जाबदेणार क्र 1 यांचा शिक्का देखील पत्रांवर आहे. वॉरंटी कालावधीत फ्रिज मध्ये निर्माण झालेल्या समस्यांबाबत जाबदेणार यांना वारंवार कळवूनही जाबदेणार यांनी त्याची दखल घेतली नाही, समस्यांचे निराकरण केले नाही ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी आहे. सबब तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून सदोष फ्रिज खरेदीची रक्कम रुपये 23,500/- मिळण्यास पात्र आहेत. तक्रारदारांना फ्रिज खरेदीची रक्कम देण्यात येत असल्यामुळे जाबेदणार यांनी तक्रारदारांकडून सदोष फ्रिज परत घेऊन जावा असे आदेशित करणे न्यायोचित होईल. तक्रारदारांनी जुन्या युनिटची रक्कम रुपये 2500/- मिळावेत अशी मागणी केली आहे. परंतू त्याची पावती दाखल केलेली नाही सबब तक्रारदारांची ही मागणी मंच नामंजूर करीत आहे. फ्रिज खरेदी केल्यापासून वॉरंटी कालावधीतच आवाजाची समस्या निर्माण झाल्यामुळे, वारंवार तक्रारी करुनही जाबदेणार यांनी समस्यांचे निराकरण न केल्यामुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागला असेल. तसेच गैरसोयही सहन करावी लागली असेल. म्हणून तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून नुकसान भरपाई पोटी रुपये 5000/- मिळण्यास पात्र आहेत.
वर उल्लेख केलेल्या विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी वॉरंटी कालावधीत फ्रिज मध्ये निर्माण झालेल्या
समस्यांचे निराकरण केले नसल्यामुळे सेवेत त्रुटी निर्माण केली आहे असे जाहिर करण्यात येत आहे.
3. जाबदेणार क्र 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना फ्रिज खरेदीची रक्कम रुपये 23,500/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी व सदोष फ्रिज घेऊन जावा.
4. जाबदेणार क्र 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1500/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
5. मा. सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत तक्रारदारांनी घेऊन जावेत अन्यथा ते नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.
स्थळ- पुणे
दिनांक – 19 ऑगस्ट 2013