:: नि का ल प ञ::
(आयोगाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :-20 /05 /2022)
1. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 35 सह38अन्वये दाखल केली असून सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ता निवृत्ती व्यक्ती आहे. विरुद्ध पक्ष क्रमांक 1 हे विरुद्ध पक्ष क्रमांक 2 प्रतिष्ठानचे संचालक आहेत. विरुद्ध पक्ष क्रमांक 2 चे नियंत्रण व व्यवहार विरुद्ध पक्ष क्रमांक 1 करतात. तक्रारकर्त्याला कुटुंबाकरिता घराची आवश्यकता असल्याने त्यांनी चौकशी केली असता वि.प.क्रमांक 1 व 2 यांनी ग्रामपंचायत देवाडाचे हद्दीत सर्वे क्रमांक 130/2अ/2 असलेल्या जागेपैकी काही भागात डुप्लेक्स बंगले बांधण्याची योजना आणली आली आहे असे समजले. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्षांसोबत संपर्क केला तेव्हा त्यांनी नऊ महिन्याचे आत रुपये 25लाखचे मोबदल्यात डूप्लेक्स बंगल्याचे बांधकाम करून देण्याची तयारी दर्शविली. तक्रारकर्त्याने प्रस्ताव मान्य करून स्टेट बँकेचे दिनांक20/2/2021` रोजी धनादेश क्र.337117 द्वारे बुकिंग रक्कम रुपये एक लाख दिले. विरुद्ध पक्षांनी दिनांक 19/ 3 /2021 रोजी प्लॉट क्रमांक 10 वरिल बंगला क्रमांक 10अ, अविभक्त आराजी 98.80 चौरस मीटर व एकूण बांधकाम आराजी 84. 47 चौरस मीटर विक्रीचे विसार् पत्र करून दिले व त्यावेळी तक्रारकर्त्याने ,वि.प. यांना दिनांक 22/3/2021 ला रु. 4 लाख धनादेश क्रमांक 337118 द्वारे दिले असे एकूणरु.5,00,000/- दिले त्याबाबत विरुद्ध पक्षांनी तक्रारकर्त्याला त्याची एकत्रित पावती दिली. विरुध्द पक्षाने दि.20/2/2021 रोजी, कराराचे दिनांकापासून 9 महिन्याचे आत बंगल्याचे बांधकाम पूर्ण करून विक्रीपत्र करुन देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यानंतर तक्रारकर्त्याने साइटवर वारंवार म्हणजे जवळपास 15 वेळा जाऊन बघितले, परंतु विरुद्ध पक्षांनी कोणत्याही बांधकामाला सुरुवात केली नव्हती. याबाबत विचारणा केली असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरून तक्रारकर्त्यास अपमानित केले. तक्रारकर्त्यास घराची आवश्यकता असल्याने व चंद्रपूर शहरामध्ये सदनिका उपलब्ध होत असल्याने त्यांनी विरुद्ध पक्षाना बंगल्या पोटी डूप्लेक्स करीता दिलेली रक्कम रु. 5 लाख परत देण्याची विनंती केली परंतु विरुद्ध पक्षांनी रक्कम परत देण्यास नकार देऊन खुला प्लाॅट घेण्याची अट घातली. विरुद्ध पक्षांनी तक्रारकर्त्याकडून मोबदला रक्कम घेऊनही करारनुसार पुर्तता केली नाही ही तक्रारकर्त्याप्रती न्युनतापूर्ण सेवा आहे.
2. त्यामुळे तक्रारकरर्त्याने दिनांक 27/9/2021 रोजी अधिवक्ता श्री अभय कुल्लरवार यांचेमार्फत विरुद्ध पक्ष क्र1 व 2 यांना पंजीबद्ध डाकेने नोटीस पाठविला. विरुद्ध पक्षांना सदर नोटीस प्राप्त होऊन सुद्धा वि.प.यांनी पूर्तता केली नाही. सबब विरुद्ध पक्ष क्र. 1व 2 यांचे विरुद्ध आयोगासमक्ष तक्रार दाखल करून त्यामध्ये अशी मागणी केली की विरुद्ध पक्ष क्र 1व 2 यांनी तक्रारकर्त्यास दिनांक 19/03/2021रोजी च्या करारानुसार घेतलेली उर्वरित मोबदला रक्कम स्वीकारून 9 महिन्याचे आत म्हणजे दि. 18/12/2021किवा त्यापूर्वी डूप्लेक्सचे बांधकाम पूर्णकरून डूप्लेक्सच ताबा व पंजीबद्ध विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे लाभात करून द्यावे. विरुद्ध पक्षांनी बांधकामास सुरुवातच केलेली नसल्यामुळे किवा अन्य कारणाने उपरोक्त कालावधीत बांधकाम पूर्ण करून ताबा देणे शक्य नसल्यास तक्रारकर्त्या कडून घेतलेली मोबदला रक्कम रुपये 5,00,000/- व त्यावर दिनांक 19/03/2021 पासून रक्कम मिळेपर्यंत 24 टक्के व्याज द्यावे. शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 1 लाख व तक्रार खर्च रुपये 25000/- विरुद्ध पक्षांनी वैयक्तिक व संयुक्तपणे तक्रारकर्त्याला द्यावा असे आदेश पारीत करण्यांत यावेत अशी विनंती केली.
3. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करुन विरूद्ध पक्षांविरुध्द नोटीस काढण्यात आले. विरुद्ध पक्ष क्रमांक1 व 2यांना पाठविलेला नोटीस प्राप्त होऊनसुद्धा ते आयोगासमक्ष ऊपस्थित राहिले नाही व त्यांनी कोणताही बचाव प्रस्तुत केला नाही. त्यामुळे आयोगाने दिनांक 10/02/2022 रोजी निशाणी क्रमांक 1वर विरुद्ध पक्ष क्रमांक 1 व 2 यांचेविरुद्ध प्रकरण एकतर्फा चालविण्यात यावे असा आदेश पारित केला.
4. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, शपथपत्र, तक्रारकर्त्याची तक्रार ,दस्तावेज शपथपत्रातील मजकुरालाच लेखीयुक्तिवाद समजण्यात यावा अशी पुर्सीस आणी तोंडी युक्तिवाद यावरुन खालील मुद्दे आयोगाच्याच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता विरूध्द पक्ष क्र.1व 2 यांचा ग्राहक आहे काय ? होय
2) विरूध्दपक्षांनी तक्रारकर्त्याप्रती न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय? होय
3) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्र.1 बाबत :-
5. तक्रारकर्ता यांनी विरुद्ध पक्ष क्र.1 व 2 यांचेशी दिनांक 19/3/2021 रोजी करारनामा करुन त्यांचेकडून खास मौजा देवाडा त.सा.क्र.8, तहसील व जिल्हा चंद्रपूर ग्रामपंचायतचे हद्दीतील सर्वे क्रमांक 130/2अ/2 पैकी लेआउटमधील प्लॉट क्र.10 वरील डूप्लेक्स बंगला न.10 अ (130) अविभक्त आराजी 98.80 चौ.मी., रु. 25लाख मध्ये विकत घेण्याकरिता करार केल्याचे उभय पक्षातील करारनाम्यारून सिद्ध होते. याशिवाय तक्रारकर्त्याने भारतीय स्टेट बँकेचा दिनांक 20/2/2021 रोजी बुकिंग रक्कम रु.1,00,000/- चा धनादेश क्र.33711 आणी दि. 22/03/2021 रोजी धनादेश क्र.337118 द्वारे रु.4,00,000/- असे एकूण रु 5,लाख वि.प. ना दिले व त्याबाबत वि.पक्षांनी तक्रारकर्त्यास दि. 24/03/2021 रोजी दिलेली एकत्रित रक्कम रु. 5,लाखाची पावती प्रकरणात निशाणी क्रमांक 4 सह दस्त क्र. अ 2 वर व करारनामा अ-1 वर दाखल आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुद्ध पक्ष क्र 1 व 2 चा, ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 2(7)(i) अन्वये ग्राहक आहे, ही बाब सिद्ध होते. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र.2 बाबत :-
6. प्रस्तूत प्रकरणात तक्रारकर्ता व विरूध्द पक्षांचे मध्ये दिनांक 19/3/2021 रोजी उपरोक्त स.क्र.मधील प्लॉट क्र.10वरील तळमजला व पहिल्या मजल्यावरील बांधकाम असा एकूण 84.47 चौ.मी. चा बंगला अविभक्त आराजी 98.80 चौ.मी. सर्व रुमला POP मॉडयुलर किचन, इलेक्ट्रीक फिटिंग्ज रु.25 लाख मध्ये तयार करुन विक्री करण्याबाबत करारनामा झाला असून किमतीच्या एकूण रकमेपैकी तक्रारकर्त्याने इसाऱ्याची रक्कम रुपये 5 लाख विरुद्ध पक्षांना दिलेली आहे हे प्रकरणात दाखल करारनामा दस्तावेज तसेच पावतीवरुन स्पष्ट होते. करारनाम्याचे अवलोकन केले असता त्यामध्ये वि.प.ने सदर मालमत्तेची विक्री करण्याची आणी तक्रारकर्त्याने विक्री करुन घेण्याची मुदत कराराचे दिनांकापासून नऊ महिने वा त्यापूर्वी अशी निर्धारीत केल्याचे नमूद आहे. मात्र वि.प. यांनी रु. 5 लाख घेऊनसुध्दा डयुप्लेक्सच्या बांधकामाला सुरुवातच केली नाही. तक्रारकर्त्याने वि.प.कडे बांधकामाबाबत पाठपूरावा केला व साईटला वारंवार भेट देवून बघतिले, परंतू वि.प.ने बांधकाम सुरु केले नाही. तक्रारकर्ता यांना सदनिकेची आवश्यकता असल्याने त्यांनी वि.प.ना दिनांक 27/09/2021 रोजी नोटीस पाठवून बंगला क्र.10अ चे बांधकाम एक महिन्याचे आंत करुन द्यावे अथवा मोबदल्यापोटी घेतलेली रक्कम रु.5,00,000/- परत करावी अशी मागणी केली. परंतु नोटीस प्राप्त होवूनसुध्दा वि.पक्षांनी नोटीसची पुर्तता केली नाही. सदर करारनामा, पावती, पँप्लेट(जाहिरातपत्रक) नोटीस व पोस्टाच्या पावत्या, पोच पावत्या प्रकरणात दाखल आहेत. विरुद्ध पक्षांनी तक्रारीत उपस्थित राहून आपले बचावा पुष्ट्यर्थ लेखी उत्तर वा कोणतेही दस्तावेज दाखल केलेले नाही व तक्रारकर्त्याचे कथन सुद्धा खोडून काढले नाही. विरुद्ध पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याकडून रु.5लाख घेवूनसुध्दा डयुप्लेक्सचे बांधकामाला सुरुवात केली नाही व ते करारनाम्याप्रमाणे उर्वरीत रकमा घेवून पूर्ण केले नाही तसेच करारनाम्यानुसार बांधकाम पूर्ण करुन9 महिन्याचे आंत त्याचे विक्रीपत्र तक्रारकर्त्याला करून दिलेले नाही. शिवाय तक्रारकर्त्याने मोबदल्यापोटी घेतलेल्या रकमेची मागणी केली असता तीदेखील परत न देऊन विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याप्रती त्रुटीपूर्ण सेवा दिलेली आहे हे सिद्ध होते या निष्कर्षाप्रत आयोग आलेले आहे.
7. अशा परिस्थितीत तक्रारकर्ता हा विरुद्ध पक्ष क्र.1 व 2 यांचेकडून वैयक्तिक अथवा संयुक्तरीत्या त्याने सदर डुप्लेक्स/बंगला क्र.10-अ करिता जमा केलेली रक्कम रु.5 लाख- व्याजासह परत मिळण्यास तसेच झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे या निष्कर्षाप्रत आयोग आले मत आहे. सबब, मुद्दा क.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र. 3 बाबत :-
8. मुद्दा क्र. 1 व 2 च्या विवेचनावरुन आयोग खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.186/2021 अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिक वा संयुक्तरीत्या, तक्रारकर्त्याला, त्याने बंगला/डूप्लेक्स क्रमांक10 अ चे किमती पोटी जमा केलेली रक्कम रू. 5,00,000/- त्यावर आदेशाचे दिनांक 20 /05/2022पासून प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यंत द. सा. द.शे.6% प्रमाणे व्याजासह परत करावी.
(3) विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिक वा संयुक्तरीत्या, तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्कम रू.10,000/- व तक्रार खर्च रू.10,000/ द्यावा.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती कीर्ती वैदय (गाडगीळ)(श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, चंद्रपूर.