द्वारा : मा.अध्यक्ष, श्रीम. अपर्णा वा. पळसुले.
1) प्रस्तुतची तक्रार सामनेवालाने ट्रक इंजिनमधील दोष दुरुस्त करुन न दिल्याबद्दल तसेच बेकायदेशीर ट्रकचा ताबा घेतला यासाठी तक्रारदाराने मंचासमोर दाखल केली आहे.
2) सदर तक्रारीचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणेः- तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांचेकडून दि.07/09/11 रोजी अशोक लेलँड 1616IL हा ट्रक Engine No.JAPi02294 chesses No. MB1A3DY1APJ3930 खरेदी केला. दि.22/10/11 रोजी ताबापूर्व तपासणी (Pri Delivery Inspection) केली. त्यावेळी ट्रकचे रनिंग 102 कि.मी. होते. रत्नागिरी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी केल्यानंतर त्यास नोंदणी क्र.MH-08-H-1883 देण्यात आला. ट्रक खरेदी केल्यानंतर साधारणपणे 30 दिवसानंतर ट्रकमध्ये प्रथमच दोष निर्माण झाला. त्यावेळी वाहनाचे रनिंग 200 कि.मी. झाले हाते. सदर माल ट्रकमध्ये किमान लोड भरल्यानंतर वाहन पिकअप घेत नव्हते. त्याप्रमाणे तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 कडे वाहन नेल्यानंतर त्याने आपल्या वर्कशॉपमध्ये सर्व्हीसींग करुन देऊन अजून रनिंग झाल्यावर गाडी पीकअप घेईल. पिकअपचा प्रॉब्लेम येणार नाही, इंजिन पिस्टनला सिट येणे गरजेचे आहे असे सामनेवाला क्र.1 यांनी सांगितलेने त्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने गाडी ताब्यात घेतली. दि.29/11/2011 रोजी रत्नागिरी येथून 8 टन माल भरुन जात असताना हातखंबा येथे पुन्हा गाडी बंद पडली व पुन्हा पिकअपचा प्रॉब्लेम निर्माण झाला. सपाट रस्त्यावरही गाडी पिकअप घेत नव्हती. तक्रारदाराने कॉल सेंटरला फोन केल्यानंतर चिपळूण येथून लाकडे अॅटो मोटीव्हमधून एक मनुष्य आला. त्याने Fuel Tank/ Fuel Line/Fuel Filter R&R and Clean FIP, Timing Reset करुन गाडी चालू करुन दिली. त्यावेळी बॉश पंपातून इंजिनमध्ये जाणारे डिझेलचे प्रमाण वाढवून दिले. त्यामुळे गाडी चालू लागली. मात्र अॅव्हरेज फारच कमी मिळू लागले. त्यावेळी गाडीचे रनिंग 1240 इतके झाले होते. त्यानंतर 2218 कि.मी. रनिंग झाल्यावर पुन्हा तोच प्रॉब्लेम येण्यास सुरुवात झाली. दि.16/12/11 रोजी सामनेवाला क्र.1 ने कंट्रोल केबल रिप्लेस केली. इंजिन टिअर ऑईल अॅन्ड ऑईल सील बदलून दिले. त्यानंतर पुन्हा दि.22/12/2011 रोजी पिकअपचा प्रॉब्लेम आल्याने सामनेवाला क्र.1 यांचेकडून Fuel Tank/ Fuel Line/Fuel Filter R&R and Clean FIP, Timing Reset करुन दिले, हे सर्व केल्यावरील दि.28/10/11 रोजी पुन्हा Adjust Valve Clearance and Timing Gear Replaced U/W करुन दिले. त्यावेळी गाडीचे रनिंग 4,700 कि.मी. इतके झाले होते. हे सर्व करुनही गाडी पिकअप घेत नव्हती. त्यामुळे क्षमतेपेक्षा कमी लोड भरुन व्यवसाय करावा लागत होता. सहाजिकच भाडेही कमी मिळत होते. त्याचा परिणाम व्यवसायावर होऊन बँकेचे हप्ते भरणेही कठीण झाले. गाडीच्यास इंजिनचा व बॉश पंपाचा मोठा प्रॉब्लेम आहे असे सामनेवाला क्र.1 यांना सांगूनही त्याने तात्पुरती दुरुस्ती करुन वेळ मारुन नेण्यात स्वारस्य दाखविले. त्यानंतर सातत्याने गाडीमध्ये प्रॉब्लेम येतच राहिला. दि.27/01/12, 17/06/12 रोजी गाडी रस्त्यातच बंद पडली. 19867 कि.मी. रनिंग झाल्यावर वर्कशॉपमध्ये तक्रारदार गाडी घेऊन गेले त्यावेळी सामनेवाला क्र.1 ने कबूल केले की, गाडीलाच प्रॉब्लेम आहे. इंजिन व बॉश पंपाचे वर्कींग जुळत नाही. त्यामुळे पिकअपचा प्रॉब्लेम पुढे कायमच येणार असे कबूल केले. दि.17/06/12पासून तक्रारदार यांनी मालट्रक सामनेवाला क्र.1 यांच्या वर्कशॉपमध्ये काम करण्यासाठी ठेवलेला आहे. तेव्हापासून मालट्रक सामनेवाला क्र.1 यांच्या ताब्यात आहे. गाडीचे इंजिन व बॉश पंप पूर्णत: बदलल्याशिवाय गाडीमध्ये निर्माण झालेला दोष निवारण होणार नाही असे तक्रारदाराचे म्हणणे असून तसे त्याने सामनेवाला क्र.1 यांना दि.24/07/12 रोजी नोटीस पाठवून कळविलेले होते. मात्र नोटीसीला खोडसाळपणे उत्तर देऊन सामनेवाला क्र.1 यांनी त्याची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
3) तक्रारदाराने गाडी दुरुस्तीसाठी सामनेवाला क्र.1 यांच्या ताब्यात दिल्यानंतर सामनेवाला क्र.2 बॅंकेस ट्रक नादुरुस्त असल्याचे व दुरुस्तीसाठी सामनेवाला क्र.1 यांच्या ताब्यात असल्याचे सुचित केले होते. त्यामुळे सदर ट्रकच्या सुरक्षेच्या पूर्ण जबाबदारी सामनेवाला क्र.1 यांची होती. सामनेवाला क्र.2 यांचे दोन महिन्याचे हप्ते ट्रक नादुरुस्त असल्याने व व्यवसाय बंद असल्याने थकीत राहिले होते. अशी वस्तुस्थिती असतानाही तक्रारदार यास पूर्ण अंधारात ठेवून सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे ताब्यातील ट्रक(वाहन) कोणतीही पूर्वसुचना न देता सामनेवाला क्र.2 च्या अवैदयरित्या ताब्यात देण्यास सहाय्य केले. सामनेवाला क्र.2 यांना कोणतीही पूर्वसुचना न देता अशाप्रकारे ट्रक जप्त करण्याचा कोणताही अधिकार नसताना सामनेवाला क्र.1 ने परस्पर त्याच्या कब्जातील वाहन सामनेवाला क्र.2 यांना देण्याची कृती बेकायदेशीर आहे. त्यामुळे सामनेवाला क्र.2 यंना पक्षकार केलेले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी ट्रक ताब्यात घेतल्यावर तो कमी किंमतीत विक्री करण्याचे प्रयत्न चालू केले होते. तक्रारदाराला हे समजल्यावर त्याने दि.07/8/12 रोजीच्या पुढारी वृत्तपत्राच्या कोल्हापूर/रत्नागिरी आवृत्तीमध्ये जाहीर नोटीस प्रसिध्द केली. त्या नोटीसीत सदर ट्रक कोणीही विकत घेऊ नये यासंबंधी जाहीर आवाहन केले. तक्रारदाराची मागणी अशी आहे (1) दोषयुक्त इंजिन व बॉश पंप बदलून नवीन इंजिन व बॉश पंप बसवून देण्यात यावा (2) सामनेवाला क्र.2 च्या ताब्यातील वाहन सामनेवाला क्र.1 ने ताब्यात घेऊन सुस्थितीत तक्रारदाराला दयावे. (3) दि.17/06/12 पासून आजपर्यंत प्रती दिन रु.10,000/- याप्रमाणे 80 दिवसाचे नुकसानभरपाई रु.8,00,000/- द.सा.द.शे.12 टक्के व्याजाने दयावेत. (4) तक्रार दाखल झाल्यापासून प्रत्यक्षात वाहन तक्रारदाराच्या ताब्यात देईपर्यंत दरमहा 3,00,000/- नुकसानभरपाई सामनेवाला क्र.1 यांनी दयावी. (5) सामनेवाला क्र.2 यांनी बेकायदेशीरपणे वाहन ताब्यात घेतल्यामुळे रु.10,000/- मिळावेत. (6) मानसिक त्रासापोटी सामनेवाला क्र.1 कडून रक्कम रु.1,00,000/- व सामनेवाला क्र.2 कडून रु.50,000/- वसूल होऊन मिळावेत यासाठी प्रस्तुतचा तक्रार अर्ज मंचात सादर केला आहे.
4) तक्रारदाराने आपल्या म्हणणेच्या पुष्टयर्थ स्वत:च्या शपथपत्रासह नि.5 वर एकूण 10 कागदपत्रे पुराव्यादाखल सादर केलेली आहेत. तसेच नि.5/8 वर जाहीर नोटीस इत्यादी कागदपत्रे पुराव्यादाखल सादर केलेली आहेत.
5) सामनेवाला क्र.1यांनी नि.18 वर आपले म्हणणे दाखल केलेले असून तक्रारदाराच्या तक्रार अर्जातील सर्व मुद्दे फेटाळलेले आहेत. त्यांनी गाडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोड भरल्यामुळेच ट्रक पिकअप घेत नव्हता हा मुद्दा प्रकर्षाने मांडला. तसेच रु.14,010/- वाहन दुरुस्तीचे बील तक्रारदार देणे असून वेळोवेळी कळवूनही त्यांनी वाहन नेणेस टाळाटाळ केली आहे. सामनेवाला क्र.2 यांनी गाडीची सर्व कागदपत्रे दाखवून ट्रक आमचेकडून आपल्या ताब्यात घेतलेला आहे. सामनेवाला क्र.1 यांनी वटमुखत्यार म्हणून नि.17 वर सर्जेराव हिंदुराव माळी यांना नेमलेले आहे. सदर ट्रकचा संपूर्ण व्यवहार हा सामनेवाला क्र.1 यांचे वाठार तर्फ वडगांव ता.हातकणंगले जि.कोल्हापूर येथे झालेला आहे. वाहनाची डिलीव्हरी देखील कोल्हापूर येथे दिलेली आहे. सबब सदरचा संपूर्ण व्यवहार सामनेवाला क्र.1 यांचे शोरुममध्ये झाला असलेमुळे या मंचासमोर सदरची तक्रार चालणेस पात्र नाही. तसेच आपल्या म्हणणेच्या पुष्टयर्थ नि.21 वर 15 कागदपत्र दाखल केली आहेत.
6) सामनेवाला क्र.2 यांनी नि.19 वर आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्यामध्ये त्यांनी तक्रारदारांच्या तक्रारीतील सर्व मुद्दे खोळसाळ व बेकायदेशीर असल्याचे कथन केले आहे. सामनेवाला यांचे म्हणणेनुसार सामनेवाला क्र.2 बँकेने तक्रारदाराला दि.26/08/11रोजी रक्कम रु.11,12,000/-चे कर्ज अशोक लेलॅन्ड वाहन खरेदी करणेसाठी दिले. त्यावेळी तक्रारदाराने सामनेवाला क्र.2 कडे करारपत्र लिहून दिले. तसेच सदरचे कर्ज रु.38,960/- दरमहा हप्त्याने फेडण्याची हमीदेखील दिली होती. सदर ट्रकची नोंदणी रत्नागिरी प्रादेशिक कार्यालयात एम.एच.08-एच-1883 ने झाली असून त्यावर बँकेचे हायपोथीकेशन आहे. तक्रारदाराने सुरुवातीला कर्जाचे हप्ते वेळेवेर भरले व त्यानंतर हप्ते भरणेची टाळाटाळ सुरु केली. त्यामुळे हप्ते थकीत झालेने तक्रारदार हे बँकेचे थकबाकीदार झाले. सदरचे हप्ते भरणेबाबत सामनेवाला यांनी तक्रारदारास वेळोवेळी सुचना दिल्या. परंतु तक्रारदाराने थकीत हप्ते भरले नाहीत. सबब दि.16/04/12 रोजी कर्ज हप्ते व दंड व्याज रु.86,649/-व चालू हप्ता न भरलेस वाहन जप्तीची कारवाई केली जाईल व इतर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी नोटीस पाठविली. सदर नोटीस पोहचूनदेखील तक्रारदाराने व त्यांचे जामीनदाराने कर्जाचे थकीत हप्ते भरणेस टाळाटाळ केली. म्हणून सामनेवाला क्र.2 बॅंकेने दि.24/04/12 रोजी वाहन जप्तीच्या कारवाईबाबत पूर्वसुचनेची नोटीस दिली. तरीदेखील तक्रारदाराने थकीत कर्ज बँकेत भरले नाही. सबब सदर वाहन कोठेही, कुठल्याही स्थितीत ताब्यात घेणेचा पूर्ण अधिकार करारानुसार सामनेवाला क्र.2 बँकेस आहे. त्यामुळे जप्तीची कारवाई योग्य व बरोबर आहे. सबब तक्रारीतील सर्व मागण्या चुकीच्या व बेकायदेशीर असलेने फेटाळण्यात याव्यात अशी विनंती केली आहे.
7) सामनेवाला यांचे म्हणणेनुसार तक्रारदारानी सदरचा ट्रक हा व्यवसाय करणेसाठी खरेदी केलेला होता. सबब त्याचा वापर मालवाहतूकीच्या व्यवसायासाठी केला असलेने सदरचा तक्रारदार हा ग्राहक संरक्षण अधिनियम कलम 2(ड) नुसार ग्राहक या संज्ञेत समाविष्ट होत नाही. सबब सदर मंचास ही ग्राहक तक्रार चालविणेचे ज्युरिडीक्शन नाही. बँकेने केलेली जप्तीची कृती समर्थनीय असल्याचे आपले म्हणण्यात नमुद केले आहे. तक्रारदाराच्या नुकसानभरपाईस ते जबाबदार नसलेचे कथन केले आहे.
8) तक्रारदाराची तक्रार, लेखी पुरावे, सामनेवाला क्र. 1 व 2 यांचे लेखी म्हणणे व पुरावे तसेच तक्रारदाराच्या विधिज्ञांनी केलेला तोंडी युक्तीवाद ऐकला असता तक्रारीच्या न्याय निर्णयासाठी या मंचाचे विचारार्थ पुढील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हे सामनेवालांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | सदरची तक्रार या मंचाच्या कार्यक्षेत्रात चालणेस पात्र आहे काय? | होय. |
3 | सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे काय ? | होय. |
4 | आदेश काय ? | अंतिम आदेशानुसार अर्ज अंशत: मंजूर. |
09) मुद्दा क्र.1 - सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी त्यांचे म्हणणेमध्ये तक्रारदारांनी सदरचा ट्रक हा व्यवसायासाठी खरेदी केला असलेमुळे ते ग्राहक या संज्ञेमध्ये येत नाहीत असा बचाव घेतलेला आहे. तथापि, तक्रारदारांनी सदरचा ट्रक हा स्वत:ची उपजिवीकेचे साधन म्हणून घेतलेला होता. तो वाहन खरेदी-विक्रीच्या व्यवसायासाठी घेतलेला नव्हता. नि.5/2 वरील व्हॅट रिटेल इनव्हाईस वरुन तक्रारदार व सामनेवाला क्र.1 यांचेमध्ये खरेदीदार व विक्रेते असा नातेसंबंध निर्माण झाल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे नि.21/3वर ही सामनेवाला क्र.1 हे व्हॅट रिटेल इनव्हाईस दाखल केलेली आहे. म्हणजेच पर्यायाने तक्रारदार हे त्यांचे ग्राहक असल्याचे मान्य केले आहे. सबब तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 यांचे ग्राहक आहेत या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र.2 यांचेकडून सदर ट्रकसाठी कर्ज घेतलेची बाब सामनेवाला क्र.2 यांनी दाखल केलेल्या नि.22 कडील कागदपत्रावरुन दिसून येते. सदरचा ट्रक हा सामनेवाला क्र.2 बँकेबरोबर लोन अॅग्रीमेंट करुन तक्रारदाराने खरेदी केलेचे दिसून येते. म्हणजेच तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांची सेवा कर्जप्रकरणाचे संबंधाने घेतलेली दिसून येते. सबब तक्रारदार हे सामनेवाला क्र.2 यांचेदेखील ग्राहक आहेत या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
10) मुद्दा क्र.2 – सामनेवाला क्र.1 यांचे म्हणणेनुसार सामनेवाला क्र.1यांचे ऑफिस अंबप क्रॉसींग, वठार तर्फ वडगांव ता.हातकणंगले जि.कोल्हापूर या ठिकाणी आहे. तसेच सामनेवाला क्र.1 ची शाखा रत्नागिरी जिल्हयात नाही. सबब त्यांचेविरुध्द रत्नागिरी मंचासमोर तक्रार चालणेस पात्र नाही. तसेच सामनेवाला क्र.2 यांचे म्हणणेनुसारदेखील सदरची तक्रार या मंचासमोर चालणेस पात्र नाही. कारण सदर बँकेचे रिजनल ऑफिस गोवा-पणजी येथे असून त्यांची शाखा रत्नागिरी येथे नाही. तथापि, तक्रारीत नमुद केलेनुसार सामनेवाला क्र.2 यांची शाखा रत्नागिरी, आरोग्य मंदिर येथे आहे असे नमुद केले आहे. तसेच सदरचा ट्रक हा रत्नागिरी रिजनल ऑफिस येथे रजिस्ट्रेशन करणेत आलेला आहे. सबब सामनेवाला क्र.2 यांची शाखा रत्नागिरी येथे असलेने सदरची तक्रार या मंचासमोर चालणेस पात्र आहे. तसेच एकापेक्षा जास्त सामनेवाला असतील तर कोणताही एक सामनेवाला ज्या मंचाच्या ज्युरिडिक्शनमध्ये आहे त्याठिकाणी तक्रार चालू शकते. सबब सदर तक्रार दाखल करणेस कारण या मंचाचे अधिकारक्षेत्रात घडलेले असलेने सदरचा सामनेवाला क्र.1 व 2 यांचा युक्तीवाद मान्य करता येणार नाही. सबब सदरची तक्रार या मंचाच्या अधिकारक्षेत्रात चालणेस पात्र आहे या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
11) मुद्दा क्र. 3 व 4 :- तक्रारदाराने आपल्या तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे सुरुवातीपासून वाहनामध्ये दोष असल्याने वारंवार सामनेवाला क्र.1 कडे वाहन नादुरुस्तीविषयी तक्रारी केलेल्या आहेत. दि.07/9/11 रोजी वाहनाची खरेदी केली व दि.22/11/11 रोजी वाहनाची पहिली तक्रार दिसून आली. म्हणजे जवळपास दोन महिन्यातच वाहनामध्ये दोष दिसून आला. त्याचे निराकरण सामनेवाला क्र.1 कडून क्रमप्राप्त होते. तात्पुरती डागडुजी करुन तक्रारदाराकडे वाहन दिले जात होते, कायम तात्पुरती मलमपट्टी करणे हे ग्राहकाच्या डोळयात धुळ फेकण्यासारखे आहे. त्यामुळे वाहनातील दोष कायमस्वरुपी निवारण न करणे ही ग्राहकाच्या सेवेतील त्रुटी ठरते.
12) सामनेवाला क्र.1 च्या म्हणण्यानुसार क्षमतेपेक्षा जास्त लोड केल्यानेच वाहनामध्ये दोष निर्माण झाला. त्यादृष्टीने त्यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सपाट रस्त्यावरसुध्दा वाहन ज्यावेळी पिकअप घेत नाही त्यावेळी त्या वाहनामध्ये असलेली मॅन्यूफॅक्चरींग डिफेक्ट निवारण्याचे काम सामनेवाला क्र.1 कडून अपेक्षित होते. किंबहूना एखादा ग्राहक ज्यावेळी व्यवसायासाठी वाहन खरेदी करतो त्यावेळी विक्रीपश्चात सेवा सामनेवालाकडून अपेक्षीत केलेल्या होत्या. त्या पुरविण्यात सामनेवालाने कसूर केल्याचे प्रत्यक्ष दिसून येते.
13) सामनेवाला क्र.1 चे ताब्यात वाहन होते. रु.14,010/- दुरुस्तीचे बील भरुन गाडी न्यावी असा मुद्दा त्यांचा आहे. यापुर्वीही अशाच प्रकारे गाडीमध्ये किरकोळ व तात्पुरत्या दुरुस्त्या केल्यावरही गाडीतील दोष निवारण झालेला नाही. त्यामुळेच तक्रारदाराने वाहन ताब्यात घेण्याचे टाळले असावे असे मंचाला वाटते. मात्र तक्रारदार वाहन ताब्यात घेत नाही असे वाटल्यावर केवळ आकसाने सामनेवाला क्र.2 यांचेशी संपर्क साधून त्यांच्या ताब्यात वाहन देणे ही सामनेवाला क्र.1 ची कृती असमर्थनीय वाटते. किंबहूना कोणतेही कायदेशीर सोपस्कर पूर्ण न करता सामनेवाला क्र.2 ने जबरदस्तीने वाहन अनधिकृतरित्या ताब्यात घेणेची कृती सर्वथा चुकीची व तक्रारदारावर अन्यायकारक आहे. काही गोष्टी हया एकमेकांवर अवलंबीत तथा पुरक असतात. वाहन सातत्याने रस्त्यावर बंद पडत असल्याने तक्रारदाराला आपल्या व्यवसायात अडचणी निर्माण झाल्या. कमी लोड भरुन वाहन चालवावे लागले. सहाजिकच भाडे कमी मिळत गेले. मात्र डिझेल तेवढेच गेले. त्यामुळे तक्रारदार आर्थिक संकटात आला. पर्यायाने तो बॅंकेचे हप्ते वेळेत भरु शकला नाही. हया सर्व गोष्टी एकमेकांना व्यवसायिकदृष्टया नियमित असल्या तरच वाहतूकीचा व्यवसाय यशस्वी होतो असे या मंचाचे मत आहे. मात्र केवळ वाहन सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 कडे पूर्वग्रहदोषातून हस्तांतरीत करणे ही बाब दुर्लक्षणिय नाही. म्हणूनच तक्रारदाराने वृत्तपत्रातून काढलेली जाहीर नोटीसही समर्थनीय वाटते. कारण ते केले नसते तर आज वाहनही तक्रारदाराच्या ताब्यात येऊ शकले नसते.
14) उपरोक्त सर्व मुद्दयांचा विचार केल्यानंतर सामनेवाला क्र.1 ने तक्रारदाराला दयावयाच्या सेवेमध्ये निश्चितच त्रुटी केल्याचे दिसून येते. सबब मुद्दा क्र.2 हे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे. तसेच सामनेवाला क्र.2 हे सुध्दा तक्रारदाराच्या नुकसानीस जबाबदार असलेने तक्रारदाराच्या तक्रारीतील मागण्या अंशत: मान्य करण्यात येत आहेत. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
2) सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे ताब्यातील तक्रारदाराचे वाहन क्र.MH-08-H-1883 ट्रक 15 दिवसात सामनेवाला क्र.1 च्या ताब्यात दयावे असा आदेश देण्यात येतो.
3) सामनेवाला क्र.1 यांनी वाहन क्र.MH-08-H-1883 ट्रक ताब्यात घेऊन ट्रकचे डिफेक्टीव्ह इंजिन बदलून नवीन इंजिन व बॉश पंप बसवून देणेचा आदेश देण्यात येतो.
4) सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदाराचा बेकायदेशीररित्या ट्रक ताब्यात घेतल्यामुळे तसेच सामनेवाला क्र.1 यांनी सदरचा ट्रक तक्रारदाराच्या संमतीशिवाय सामनेवाला क्र.2 यांचे ताब्यात परस्पर दिलेमुळे तक्रारदारांनाशारिरी व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.25,000/- व सामनेवाला क्र.2 यांनी रक्कम रु.5,000/- दयावेत. तसेच या अर्जाचा खर्च म्हणून सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी प्रत्येकी रु.3,000/-(एकूण रु.6,000/-) दयावेत.
5) वरील आदेशाची पूर्तता सामनेवाला यांनी 30 दिवसांत करावी. तशी पूर्तता न केल्यास तक्रारदार हे सामनेवालाविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 25 व 27 मधील तरतुदीनुसार दाद मागू शकेल.
6) या निकालाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षांना विनामुल्य देण्यात / पाठविण्यात याव्यात.