न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी घरगुती वापराकरिता फ्लीपकार्टवरुन वि.प. क्र.2 यांचे Inalsa Micro WE21 या ब्रॅण्डचा व्हॅक्युम क्लिनर रक्कम रु.4,890/- या खरेदी रकमेस दि. 31/10/21 रोजी खरेदी केलेला आहे. परंतु खरेदीपावतीवरील वर्णनाप्रमाणे सदरचे व्हॅक्युम क्लिनरची कार्यक्षमता नव्हती. सदरचा व्हॅक्युम क्लिनर हे तक्रारदार घरी वापरत असताना केवळ महिन्याभरातच तो व्यवस्थित कार्य करीत नव्हता. तो दैनंदिनचा ओला व कोरडा कचरा धूळ योग्य प्रकारे जमा करीत नव्हता. म्हणून तक्रारदारांनी दि. 16/12/2021 रोजी वि.प.क्र.2 यांचे कस्टमर केअरकडे मेलद्वारे तक्रार नोंदविली. त्यानुसार वि.प. तर्फे तंत्रज्ञ यांनी दि. 23/12/2012 रोजी सदर व्हॅक्युम क्लिनरची तपासणी करुन धूळ व कचरा जमा करणारे मशीन योग्य प्रकारे कार्य करीत नसलेचा निष्कर्ष काढला व त्याबाबत तंत्रज्ञ यांनी वि.प.क्र.2 यांचेशी संपर्क साधून देान दिवसांत मार्ग काढून अशी हमी दिली होती. परंतु तदनंतर वि.प. अथवा सदर तंत्रज्ञ यांनी तक्रारदार यांचेशी कोणताही संपर्क साधलेला नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदार यांना निकृष्ट दर्जाचा व्हॅक्युम क्लिनर पुरवून फसवणूक केलेली आहे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सदोष सेवा दिली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या आयोगात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून सदोष व्हॅक्युम क्लिनर परत घेवून त्याच वर्णनाचा निर्दोष असलेला व्हॅक्युम क्लिनर देणेचा आदेश व्हावा, तसे करणे वि.प. यांना अशक्य झालेस वि.प. यांनी तक्रारदाराकडून व्हॅक्युम क्लिनरसाठी घेतलेली किंमत रक्कम रु.4,890/- परत करावी, व्हॅक्युम क्लिनर वापरात न आलेने झालेल्या नुकसानीपोटी रक्कम रु. 20,000/-, मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारीचा खर्च रु. 10,000/- वि.प. कडून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत व्हॅक्युम क्लिनर खरेदीचा इनव्हॉईस, तक्रारदारांनी वि.प. यांना दिलेली नोटीस वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. प्रस्तुत कामी वि.प.क्र.1 व 2 यांना नोटीस लागू होऊनही सदर वि.प. याकामी गैरहजर राहिलेने वि.प. यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर पारीत झालेला आहे.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून सदोष व्हॅक्युम क्लिनर बदलून मिळणेस अथवा त्यांची खरेदी किंमत परत मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांनी घरगुती वापराकरिता फ्लीपकार्टवरुन वि.प. क्र.2 यांचे Inalsa Micro WE21 या ब्रॅण्डचा व्हॅक्युम क्लिनर रक्कम रु.4,890/- या खरेदी रकमेस दि. 31/10/21 रोजी खरेदी केलेला आहे. सदर व्हॅक्युम क्लिनर खरेदीची इन्व्हॉईस पावती तक्रारदाराने याकामी दाखल केली आहे. वि.प.क्र.1 व 2 यांनी याकामी हजर होवून प्रस्तुत बाब नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार व वि.प.क्र.1 व 2 हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट सिध्द झाली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. तक्रारदारांचे तक्रारअर्जातील कथनानुसार, खरेदीपावतीवरील वर्णनाप्रमाणे सदरचे व्हॅक्युम क्लिनरची कार्यक्षमता नव्हती. सदरचा व्हॅक्युम क्लिनर हे तक्रारदार घरी वापरत असताना केवळ महिन्याभरातच तो व्यवस्थित कार्य करीत नव्हता. तो दैनंदिनचा ओला व कोरडा कचरा धूळ योग्य प्रकारे जमा करीत नव्हता. म्हणून तक्रारदारांनी दि. 16/12/2021 रोजी वि.प.क्र.2 यांचे कस्टमर केअरकडे मेलद्वारे तक्रार नोंदविली. त्यानुसार वि.प. तर्फे तंत्रज्ञ यांनी दि. 23/12/2012 रोजी सदर व्हॅक्युम क्लिनरची तपासणी करुन धूळ व कचरा जमा करणारे मशीन योग्य प्रकारे कार्य करीत नसलेचा निष्कर्ष काढला व त्याबाबत तंत्रज्ञ यांनी वि.प.क्र.2 यांचेशी संपर्क साधून देान दिवसांत मार्ग काढून अशी हमी दिली होती. परंतु तदनंतर वि.प. अथवा सदर तंत्रज्ञ यांनी तक्रारदार यांचेशी कोणताही संपर्क साधलेला नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदार यांना निकृष्ट दर्जाचा व्हॅक्युम क्लिनर पुरवून फसवणूक केलेली आहे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सदोष सेवा दिली आहे असे तक्रारदाराचे कथन आहे. तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सदरची कथने वि.प. यांनी याकामी हजर होवून नाकारलेली नाहीत. वि.प. यांना तक्रारअर्जाची नोटीस लागू होऊनसुध्दा ते याकामी मंचात हजर झाले नाहीत. म्हणून, वि.प.क्र.1 व 2 यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. म्हणजेच वि.प. यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. तक्रारदारांनी त्यांचे कथनाचे पुष्ठयर्थ पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे तसेच कागदयादीसोबत वि.प. यांना मेलद्वारे पाठविलेल्या नोटीसची प्रत दाखल केली आहे. परंतु सदर नोटीसीस वि.प. यानी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही हे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. सबब, तक्रारदाराने तक्रारअर्जात केले कथनांवर विश्वासार्हता ठेवणे न्यायोचित वाटते. सदरची बाब विचारात घेता, वि.प.क्र.1 व 2 तक्रारदारास दिलेला सदोष व्हॅक्युम क्लिनर बदलून न देवून तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. सबब, तक्रारदार हे सदरचा सदोष व्हॅक्युम क्लिनर बदलून त्याच मॉडेलचा नवीन व्हॅक्युम क्लिनर वि.प. यांचेकडून परत मिळणेस पात्र आहे. जर वि.प. यांना सदोष व्हॅक्युम क्लिनर बदलून देणे शक्य झाले नाही तर व्हॅक्युम क्लिनरची किंमत रक्कम रु. 4,890/- परत मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे व्हॅक्युम क्लिनर खरेदी केले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.2,000/- वि.प. क्र.1 व 2 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना सदोष व्हॅक्युम क्लिनर बदलून त्याच मॉडेलचा नवीन व्हॅक्युम क्लिनर द्यावा.
अथवा
जर वि.प. यांना सदोष व्हॅक्युम क्लिनर बदलून देणे शक्य झाले नाही तर वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना व्हॅक्युम क्लिनरची किंमत रक्कम रु. 4,890/- अदा करावी व सदर रकमेवर व्हॅक्युम क्लिनर खरेदी केले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व अर्जाचा खर्च रु.2,000/- वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प.क्र.1 व 2 यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीं अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.