नि.58 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार क्रमांक : 19/2010 तक्रार दाखल झाल्याचा दि.15/03/2010 तक्रार निकाली झाल्याचा दि.12/11/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या मे.अल्पना ट्रेडर्स करीता प्रोप्रायटर सौ.अल्पना अरविंद कोळवणकर राहणार- मु.पो.जाकादेवी (खालगांव), ता.जि.रत्नागिरी – 415 620. ... तक्रारदार विरुध्द फिनिक्स वजन काटे करीता मालक / भागीदार, श्री.राजेश भटवाल रा.डेपो-नितिराज इंजिनिअरींग प्रा.लि., डी-61, एम.आय.डी.सी.अवधान, धुळे. मूळ ऑफिस फिनिक्स वजन काटे गुरुव्दारा पाठीमागे, मुंबई-आग्रा रोड, धुळे. रजिस्टर ऑफिस फिनिक्स वजन काटे 306, ए.भाभा बिल्डींग, एन.एम.जोशी मार्ग, मुंबई-400 011. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.एस.एस.थरवळ सामनेवालेतर्फे : विधिज्ञ श्री.एस.एम.परदेसी विधिज्ञ श्री.ए.पी.परुळेकर -: नि का ल प त्र :- द्वारा : मा.सदस्या, श्रीमती स्मिता देसाई 1. सामनेवाला यांचेकडून खरेदी केलेल्या इलेक्ट्रिक वजन काटयाच्या संदर्भातील सामनेवाला याने दिलेल्या सदोष सेवेबाबत प्रस्तुत तक्रार मंचासमोर तक्रारदार यांनी दाखल केलेली आहे. 2. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून जानेवारी 2008 मध्ये दोन इलेक्ट्रिक वजन काटे त्यांच्या स्वयंरोजगारासाठी खरेदी केले होते. परंतु प्रस्तुतचे दोन्ही वजन काटे सदोष निघाल्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेशी संपर्क साधला. सामनेवाला यांनी सदर वजन काटयांची तपासणी केली व त्यामध्ये मूलभूत दोष असल्याचे मान्य करुन दोन्ही वजन काटे परत घेतले व दोनच दिवसांत नविन वजन काटे इनव्हॉईससह पाठवितो असे सांगितले. परंतु सामनेवाला यांनी लगेचच तक्रारदार यांना वजन काटे पाठवून दिले नाहीत म्हणून तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेशी वारंवार संपर्क साधल्यानंतर तक्रारदार यांना सामनेवाला यांनी पहिल्या वजन काटयाऐवजी दोन इलेक्ट्रिक वजन काटे बदलून दिले परंतु नविन इनव्हॉईस दिले नाही. तक्रारदार यांनी नविन इनव्हॉईस देणेबाबत सामनेवाला यांचेशी वारंवार संपर्क साधला परंतु सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. मार्च 2009 च्या दरम्यान तक्रारदार हे इलेक्ट्रीक वजन काटयाची वजन-काटे निरिक्षक, वैधमापन शास्त्र यांचेकडे इलेक्ट्रीक वजन काटयाच्या प्रथम छपाई (First Stamping) करण्याच्या उद्देशाने मालगुंड कँप येथे सदर वजन काटयासह गेले. परंतु तेथील अधिका-यांनी प्रत्यक्षात दोन्ही वजन काटयाच्या प्लेटवरील सिरियल नंबर व खरेदी बिलातील नंबर तसेच मूळ पडताळणी प्रमाणपत्राच्या छायांकीत प्रतीत नोंद केलेले नंबर यामध्ये तफावत असल्याने त्यांच्या नियमाप्रमाणे वजन काटे छपाईस असमर्थता व्यक्त केली व तक्रारदार यांचेकडे वजन काटयाच्या मूळ पडताळणी प्रमाणपत्राच्या छायांकीत प्रतीची मागणी केली. सामनेवाला यांनी खरेदी दिलेल्या सदर वजन काटेसंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता केली नाही म्हणून तक्रारदार यांना सामनेवाला यांचेकडून खरेदी केलेल्या सदर वजन काटयांचा वापर मार्च 2009 पासून करता आला नाही त्यामुळे तक्रारदार यांना आर्थिक तसेच शारिरिक तसेच मानसिक नुकसानीस सामोरे जावे लागले. तक्रारदार यांनी सामनेवाला यांना आपल्या तक्रारीसंदर्भात वकिलांमार्फत नोटीस पाठवली. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार मंचासमोर दाखल केलेली आहे. तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जातील मागणीत तक्रारीचा विषय असलेले वजन काटे संपूर्ण कागदपत्रांसहीत बदलून नविन तक्रारदार यास देणेबाबत सामनेवाला यांना आदेश करण्यात यावेत तसेच मागणी क्र.1 मधील आदेश न्यायाच्या दृष्टीने आवश्यक होणारे नाहीत असे मे.मंचाचे मत बनल्यास तक्रारीचा विषय असलेल्या वजन काटयांच्या अनुषंगाने योग्य ती कागदोपत्री पूर्तता करणेबाबत सामनेवाला यांना आदेश करण्यात यावेत तसेच सामनेवाला यांनी दिलेल्या सदोष सेवेबाबत तक्रारदार यांना झालेला मानसिक, शारिरिक त्रास, आर्थिक नुकसान, दंड व नोटीसीस आलेला खर्च अशी रक्कम रु.28,000/- तक्रारदार यांना देणेबाबत सामनेवाला यांना आदेश करण्यात यावेत तसेच प्रस्तुत अर्जाचा खर्च सामनेवाला यांचेकडून वसूल होवून मिळावा अशी मागणी केलेली आहे. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीच्या पृष्ठयर्थ नि.2 वर शपथपत्र, नि.5 च्या यादीने नि.5/1 ते नि.5/10 वर कागदपत्रे, नि.36/1 वर अधिकारपत्र दाखल केलेले आहे. 3. सामनेवाला यांनी नि.17 वर तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक होत नाहीत याबाबत प्राथमिक मुद्दा काढण्यात यावा असा अर्ज दिला व त्यावर मंचातर्फे तक्रारदार हे सामनेवालाचे ग्राहक असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे तथापी सामनेवाला यांनी आपले म्हणणे सादर केल्यावर व दोन्ही बाजूंनी साक्षीपुरावा सादर केल्यावर सदरचा मुद्दा अंतिम युक्तिवादाचेवेळी निष्कर्षासाठी खुला ठेवण्यात येत आहे असा निष्कर्ष काढण्यात आला. 4. सामनेवाला यांना सदर तक्रार अर्जामध्ये संधी देवूनही त्यांनी आपले म्हणणे मांडले नाही म्हणून सामनेवाला यांचेविरुध्द म्हणणे नाही असा नि.1 वर हुकूम करण्यात आला. तथापी सामनेवाला यांनी नि.28 च्या अर्जान्वये व नि.29 च्या शपथपत्रान्वये सदर नि.1 वरील म्हणणे नाही हा आदेश रद्द करण्यात यावा असा अर्ज केला व तो मंचातर्फे खर्च देण्याच्या अटीवर मंजूर करण्यात आला. 5. सामनेवाला यांनी नि.30 वर आपले म्हणणे मांडलेले आहे. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज खोटा आहे असे नमूद केले आहे. सामनेवाला यांचेकडून दि.29/01/2008 रोजी एन.इ.पी.60/150 व एन.पी.डब्ल्यु. 15/30 हे वजन काटे तक्रारदार यांनी घेतले होते हे मान्य केले आहे. तक्रारदार यांनी सदर वजन काटे व्यापारी कारणासाठी घेतले त्यामुळे तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत मोडत नाहीत असे सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. सदरचे वजन काटे हे डिफेक्टीव्ह होते त्यामुळे बदलून देण्याचे कबूल केले हे म्हणणे सामनेवाला यांनी अमान्य केले आहे. तसेच तक्रारदार यांची तक्रार मुदतीत नाही व तक्रारदार यांनी सामनेवाला यांना वजन काटयाचे पेमेंट भरण्यासाठी चेक्स दिले होते परंतु सदरच्या चेक्सचा अनादर झाल्यामुळे तक्रारदार यांच्याविरुध्द कलम 138 ची कारवाई सामनेवाला यांनी केली. त्यातून बचाव होणेसाठी तक्रारदार यांनी सदरची खोटी तक्रार दाखल केली आहे असे सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. शेवटी तक्रारदार यांचा तक्रार अर्ज खर्चासह रद्द करण्यात यावा अशी मंचासमोर विनंती केली आहे. सामनेवाला यांनी नि.31 वर शपथपत्र, नि.9/1 वर अधिकारपत्र, नि.50 वर जादा पुरावा देण्याचा नाही अशी पुरशिस, नि.54 वर लेखी युक्तिवाद, नि.56 वर न्यायनिवाडा दाखल केला आहे. 6. तक्रारदार यांनी प्रतिउत्तर दिले नाही म्हणून त्यांच्याविरुध्द नि.1 वर प्रतिउत्तर नाही असा मंचातर्फे आदेश करण्यात आला होता. तथापी तक्रारदार यांनी नि.39 च्या अर्जान्वये व नि.40 च्या शपथपत्रान्वये सदरचा आदेश रद्द करण्यात यावा असा अर्ज दिला. तक्रारदार यांचा सदर अर्ज सामनेवाला यांना खर्च देण्याच्या अटीवर मंजूर करण्यात आला. तक्रारदार यांनी नि.41 वर प्रतिउत्तर व प्रतिउत्तराच्या पृष्ठयर्थ नि.42 वर शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांनी आपल्या प्रतिउत्तरामध्ये सामनेवाला यांनी दिलेले म्हणणे खोटे आहे असे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी स्वयंरोजगारासाठीच सदर वजन काटे घेतले होते तसेच वॉरंटीचा कालावधी संपला तरीही योग्य त्या सेवा देणे अगर सेवा पुरवणे हे सामनेवाला यांचे कर्तव्य असून त्यामध्येच त्यांनी कसूर केलेली असल्याने वॉरंटी पिरियड संपला हा त्यास बचाव होणार नाही असे प्रतिउत्तरामध्ये नमूद केले आहे. तसेच तक्रारदार यांच्यावर धनादेश न वटविल्याबाबतची कार्यवाही सामनेवाला यांनी केली याबाबतचे कोणत्याही प्रकारचे समन्स तक्रारदार यांना मिळालेले नाही असे तक्रारदार यांनी प्रतिउत्तरामध्ये नमूद केले आहे. शेवटी तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात यावा अशी मंचासमोर विनंती केलेली आहे. 7. तक्रारदार यांनी नि.44 च्या अर्जान्वये नि.44/1 वर कागदपत्र व नि.51 वर जादा तोंडी पुरावा देण्याचा नाही अशी पुरशिस, तसेच नि.55 वर लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. 8. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाला यांनी दिलेले म्हणणे, शपथपत्र, सामनेवाला यांनी दाखल केलेली कागदपत्रे, प्रतिउत्तर, दोन्ही बाजूंनी दाखल लेखी युक्तिवाद व ऐकण्यात आलेला तोंडी युक्तिवाद यावरुन खालील मुद्दे मंचाच्या निष्कर्षासाठी उपस्थित होतात. अ.क्र. | मुद्दे | उत्तरे | 1. | तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. | 2. | सामनेवाला यांनी तक्रारदार यांना देण्यात येणा-या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे काय ? | होय. | 3. | तक्रारदार हे आपल्या मागणीप्रमाणे अनुतोष मिळण्यास पात्र आहेत काय ? | अंशतः मंजूर. | 4. | काय आदेश ? | अंतिम आदेशाप्रमाणे. |
विवेचन 9. मुद्दा क्र.1 - दि.22/06/2010 रोजी नि.17 वर झालेल्या मंचाच्या आदेशाप्रमाणे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय ? हा मुद्दा अंतिम युक्तिवादाचेवेळी निष्कर्षासाठी खुला ठेवण्यात आला होता. दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार हे सदर वजन काटयांचा वापर व्यापारी कारणाकरीता व नफा मिळवण्याकरीता करतात व त्यासाठीच त्यांनी वजन काटे खरेदी केले होते हया आपल्या नि.30 वरील म्हणण्याच्या पृष्ठयर्थ सामनेवाला यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी व्यापारी कारणाकरीता सदर वजन काटे विकत घेतले होते हे सामनेवाला सिध्द करु शकले नाहीत असे मंचाचे मत झाले आहे. नि.5/1 व नि.5/3 वर दाखल केलेले टॅक्स इनव्हॉईसचे अवलोकन करता तक्रारदार यांनी दि.29/01/2008 सामनेवाला यांचेकडून इलेक्ट्रॉनिक वजन काटे खरेदी केले होते हे स्पष्ट होते. सामनेवाला यांनी नि.30 वरील आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांनी दि.29/01/2008 रोजी वजन काटे घेतले होते हे मान्य केले आहे. दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी सामनेवाला यांना मोबदला देवून सेवा स्विकारलेली होती हे दिसून येते व त्या सेवेमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे तक्रारदार हे या ग्राहक विवादासंदर्भात सामनेवाला यांचे ग्राहक म्हणून ग्राहक संरक्षण कायदयांतर्गत दाद मागू शकतात अशा निर्णयाप्रत मंच आले आहे. 10. मुद्दा क्र.2 - तक्रारदार यांच्या तक्रारीप्रमाणे तक्रारदार यांना सामनेवाला यांनी पहिल्या वजन काटयाऐवजी मॉडेल एन.पी.डब्ल्यु-15/30 सिरियल नं.पी-15080 व मॉडेल एन.ई.पी.60/150 सिरियल नं.क्यू 18366 असे नविन वजन काटे दिले. परंतु त्या संदर्भात नविन इनव्हॉईस दिले नाहीत त्यामुळे तक्रारदार यांना वजन काटयाची प्रथम छपाई करता आली नाही व त्यामुळे मार्च 2009 पासून वजन काटयांचा वापर करता आला नाही. सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या सदर तक्रारीसंदर्भात आपल्या नि.30 वरील म्हणण्यामध्ये तक्रारदार यांच्या तक्रारी फक्त नाकारलेल्या आहेत व सामनेवाला यांचेकडून दि.29/01/2008 रोजी एन.इ.पी.60/150 व एन.पी.डब्ल्यु-15/30 हे वजन काटे घेतले होते एवढेच म्हणणे खरे आहे असे नमूद केले आहे. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदार यांचेविरुध्द कलम 138 अन्वये कार्यवाही केली आहे असे नमूद केले आहे. परंतु सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदार यांनी नमूद केलेले नविन वजन काटे संदर्भातील इनव्हॉईस दिले नाही याबाबतही सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे म्हणणे नाकारलेले आहे. परंतु सदर नविन वजन काटे सामनेवाला यांनी विक्री केले अथवा नाही, सदर तक्रारीत नमूद नविन वजन काटे सामनेवाला यांच्या ताब्यात विक्रीकरीता होते किंवा नाही अथवा त्याबाबतची पडताळणी सामनेवाला यांनी करुन घेतली होती किंवा नाही याबाबत सामनेवाला यांनी पुरावा सादर केलेला नाही व त्याबाबतचा तपशिलही आपल्या म्हणण्यामध्ये दिलेला नाही. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या ताब्यात असलेल्या वजन काटयाची तपासणी करण्यात यावी व खरी वस्तुस्थिती मंचासमोर यावी याबाबतही सदर तक्रारीत अर्ज दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदार यांनी तक्रार अर्जातील तक्रारीबाबत सामनेवाला यांना वकिलांमार्फत नोटीस पाठवली होती व ती नोटीस सामनेवाला यांना पोहोचली होती हे नि.5/6, नि.5/7, नि.5/8, नि.5/9 व नि.5/10 वरुन निदर्शनास येते. परंतु सामनेवाला यांनी याबाबतही आपल्या म्हणण्यामध्ये मौन धारण केलेले आहे. यावरुन सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही असे निदर्शनास येते. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या नि.5/1 वरील इनव्हॉईसमध्ये व्ही.सी.नं.1312547 असे नमूद आहे. तर नि.5/2 वरील पडताळणी पत्रामध्ये नंबर 1312567 याबाबत तफावत आढळून येते. परंतु सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये या कागदपत्राबाबत मौन धारण केलेले दिसून येते. दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता वास्तविक पाहाता सामनेवाला यांनी विक्री केलेल्या वजन काटयासंदर्भातील पडताळणीपत्रामध्ये नोंद केलेले नंबर एक सारखेच आहे याची खात्री करुन घेण्याची जबाबदारी सामनेवाला यांची होती असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांची तक्रार खोडून काढण्यासाठी एकही पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. त्यामुळे योग्य विचाराअंती तक्रारदार यांना सामनेवाला यांनी वजन काटयासंदर्भातील इनव्हॉईस न देवून सदोष सेवा दिली आहे हे तक्रारदार यांनी आपल्या नि.2 वरील शपथपत्राने व दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट केले आहे अशा निर्णयाप्रत मंच आले आहे. 11. मुद्दा क्र.3 - तक्रारदार यांनी आपल्या विनंती कलम अ मध्ये तक्रारीचा विषय असलेले वजन काटे संपूर्ण कागदपत्रांसहीत बदलून नविन तक्रारदार यांना देण्याचे आदेश सामनेवाला यांना करण्यात यावे अशी मागणी केली आहे. तसेच कलम ब मध्ये तक्रारदार यांनी वैकल्पिकरित्या तक्रारीचा विषय असलेल्या वजन काटयाच्या अनुषंगाने योग्य ती कागदोपत्री पूर्तता करण्याबाबत सामनेवाला यास आदेश करण्यात यावा अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांनी पूर्वी घेतलेले वजन काटे हे दोषपूर्ण असल्यामुळे सामनेवाला यांनी बदलून दिले असे आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. सामनेवाला यांनी आपल्या संपूर्ण म्हणण्यामध्ये व युक्तिवादामध्येही सदरची बाब नाकारण्यापलीकडे इतर कोणताही पुरावा मंचासमोर आणला नाही व त्याबाबत मौन पाळले आहे. सामनेवाला यांनी आपण वजन काटे तक्रारदारांना बदलून दिले ही गोष्ट नाकारलेली आहे. तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जामध्ये दि.29/01/2008 रोजी मॉडेल एन.पी.डब्ल्यु.15/30 चा सिरियल नं.पी 150458 तसेच मॉडेल नं.60/150 चा सिरियल नं.क्यू 14950 चे टॅक्स इनव्हॉईस नि.5/1 व नि.5/3 वर दाखल केले आहेत. तसेच सदर काटयाबाबत वैधमापन शास्त्र यांचेकडील पडताळणी प्रमाणपत्रही नि.5/2 व नि.5/4 वर दाखल केले आहेत. नि.5/2 व नि.5/4 वरील पडताळणी प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता सदरचे पडताळणी प्रमाणपत्र हे दि.03/01/2008 व दि.28/12/2007 रोजीचे असल्याचे दिसून येते. दि.28/12/2007 रोजीच्या पडताळणी प्रमाणपत्रामध्ये सिरियल नं.14950 ची नोंद असल्याचे दिसून येते. तथापी नि.5/2 वरील पडताळणी प्रमाणपत्रामध्ये नि.5/1 वर दाखल असलेल्या टॅक्स इनव्हॉईसमध्ये नमूद असलेल्या 150458 ची नोंद दिसून येत नाही. तथापी सदरच्या नि.5/2 वरील पडताळणी प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता त्यामध्ये मॉडेल 15/30 मधील सिरियल नं.150809 दिसून येतो. सदरचा 150809 चा सिरियल नंबरचा वजन काटा हा बदलून दिलेल्या वजन काटयाचा आहे ही बाब तक्रारदार याच्या परिच्छेद 5 मधील वर्णनाशी जुळणारा असल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार यास सामनेवाला यांनी वजन काटे बदलून दिले व त्यापैकी एकाचे पडताळणी प्रमाणपत्रही दिले ही बाब स्पष्ट होते. 12. तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जामध्ये वैकल्पिकरित्या कागदपत्रांची पूर्तता करणे शक्य नसल्यास नविन काटे सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेसह बदलून मिळावेत अशी मागणी केली आहे. सामनेवाला यांनी आपल्या संपूर्ण म्हणण्यामध्ये आपण तक्रारदारास कागदपत्रांची पूर्तता करुन देण्यास तयार आहोत असे नमूद केलेले नाही व तशी तयारी दर्शविली नाही. इलेक्ट्रॉनिक्स वजन काटयाचा वापर करताना इलेक्ट्रॉनिक्स वजन काटयाची निर्मिती करणा-याने सदरच्या काटयाची वैधमापन शास्त्र या विभागाकडून पडताळणी करणे जरुरीचे असते व तसे पडताळणी प्रमाणपत्र घेवून सदर पडताळणी झालेले वजन काटे विक्रीसाठी बाजारात आणणे कायदेशीर आहे. तक्रारदारांना बदलून दिलेल्या वजन काटयापैकी मॉडेल नं.15/30 चा सिरियल नं.150809 बाबत पडताळणी प्रमाणपत्र घेतल्याचे नि.5/2 वरुन दिसून येते. परंतु सदर काटयाचा टॅक्स इनव्हॉईस तक्रारदारास अदा केला नाही तसेच बदलून दिलेल्या दुस-या काटयाचा टॅक्स इनव्हॉईस व पडताळणी प्रमाणपत्रही तक्रारदारास अदा केले नाही. तक्रारदारास काटे जवळजवळ दोन वर्षांपूर्वी बदलून दिले आहेत. दुस-या काटयाची पडताळणी करुन घेतली अथवा नाही याबाबत सामनेवाला यांनी कोणताही उहापोह केलेला नाही. तक्रारदार हे मार्च 2009 मध्ये छपाईसाठी वैधमापन शास्त्र यांच्या कार्यालयात गेले असता सदरची बाब निदर्शनास आली आहे. दोन वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड तयार करणे शक्य होणार नाही असे तक्रारदार यांनी आपल्या युक्तिवादामध्ये नमूद केले. सामनेवाला यांनीही असे रेकॉर्ड तयार करुन देण्याची तयारी असल्याचे आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले नाही. तसेच तक्रारदार यांनी आपल्या युक्तिवादामध्ये सामनेवाला यांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे आपल्याला काटयांचा वापर करता आला नाही त्यामुळे ते खराब झाले असे नमूद केले आहे. सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये सदर काटयांचा वॉरंटी पिरियड संपला आहे असे नमूद केले आहे. सामनेवाला यांनी काटे बदलून देताना संपूर्ण कागदपत्रे पडताळणी प्रमाणपत्र तक्रारदारांना अदा केले नाहीत त्यामुळे तक्रारदारांना वजन काटयाचा वापर करता आला नाही. सदरचे दोन्ही वजन काटे तक्रारदाराचे विनावापर पडून राहिले व त्याचा वॉरंटी पिरियडही संपून गेला. ही बाब विचारात घेता तक्रारदार यास सर्व कागदपत्रांनी परिपूर्ण असलेले वैधमापन शास्त्र विभाग यांचेकडून योग्य ती पडताळणी केलेले नविन त्याच मॉडेलचे काटे वॉरंटीसह बदलून देण्याबाबत आदेश करणे न्यायोचित होईल या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे. तसेच नविन काटे देतेवेळी जूने काटे परत घेण्याचा सामनेवाला यांना हक्क राहिल असेही मंचाचे मत आहे. 13. सामनेवाला यांनी दिलेल्या सदोष सेवेमुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरिक, मानसिक त्रासास सामोरे जावे लागले व प्रस्तुतचे प्रकरण यामंचामध्ये दाखल करावे लागले ही बाब विचारात घेता तक्रारदार हे शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सर्व कागदपत्रांनी परिपूर्ण असलेले त्याच मॉडेलचे वजन काटे नविन वॉरंटीसह बदलून द्यावेत असा आदेश करण्यात येतो. 3. तक्रारदार यांना सामनेवाला यांनी शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.5,000/- (रु.पाच हजार मात्र) अदा करावेत असा आदेश करण्यात येतो. 4. वर नमूद आदेशाची पूर्तता सामनेवाला यांनी दि.31/12/2010 पर्यंत करण्याची आहे. 5. सामनेवाला यांनी विहीत मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार दाद मागू शकतील. रत्नागिरी दिनांक : 12/11/2010. (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |