रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
तक्रार क्रमांक :- 25/2008. तक्रार दाखल दि. :- 22/5/08. निकालपत्र दि. :- 05-08-2008. श्री. उत्तम नानाभाऊ ओव्हाळ, रा. सौरभ को.ऑप.हौसिंग सोसायटी, सी/31, रुम नं. 11, खारघर, ता. पनवेल, जि. रायगड. .... तक्रारदार.
विरुध्द
श्री. राजेंद्र श्रावण गायकवाड, रा. हेमावती, रुम नं. 10, बी.ए.आर.सी., न्यु मंडाला, मानखुर्द, सायन ट्रॉंम्बे रोड, मुंबई – 400088. .... विरुध्दपक्ष
उपस्थिती – मा.श्री.आर.डी.म्हेत्रस, अध्यक्ष मा.श्री.बी.एम.कानिटकर, सदस्य मा.सौ.ज्योती अभय मांधळे, सदस्या
तक्रारदारांतर्फे – अड. एस.आर.वावेकर विरुध्दपक्षातर्फे – अड. आर.बी.कोसमकर
-: नि का ल प त्र :-
द्वारा मा.सदस्या, सौ.मांधळे. तक्रारदारांचे थोडक्यात कथन खालीलप्रमाणे आहे. तक्रारदार हे खारघर ता. पनवेल, जि. रायगड येथील रहिवासी असून त्यांनी विरुध्दपक्षाशी त्यांचे रो-हाऊस प्लॉट नं. सी 36/30 सेक्टर 12, खारघर, ता. पनवेल, जि. रायगड या ठिकाणी रक्कम रु. 11,30,000/- साठी घेण्याचा करार केला. सदर रकमेपैकी 25% रक्कम सुरुवातीला व उर्वरित रक्कम बँकेचे कर्ज मंजूर झाल्यावर देण्याचे ठरले. याप्रमाणे तक्रारदारांनी विरुध्दपक्षाला एकूण रक्कम रु. 2,95,000/- दिले व उर्वरित रकमेसाठी त्यांनी बँकेमध्ये कर्जाचा प्रस्ताव मांडला. दि. 25/8/06 रोजी त्यांना एच.डी.एफ.सी. बँक बेलापूर शाखा यांचेकडून रु. 5,00,000/- चे कर्ज मंजूर झाले. सदर कर्जाची रक्कम मंजूर झाल्याबाबत त्यांनी विरुध्दपक्षाला सांगितले परंतु विरुध्दपक्षाने त्यांना हा व्यवहार त्यांना करावयाचा नाही असे सांगितले. 2. विरुध्दपक्षाने तक्रारदारांना दि. 3/10/06 रोजी नोटीस पाठवून करार रद्द करण्यास सांगितले. तक्रारदारांनी सदर नोटीसीला उत्तर दिले. त्यानंतर वारंवार तक्रारदारांनी विरुध्दपक्षाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु विरुध्दपक्षाने त्यांना काहीही प्रतिसाद दिला नाही. यावरुन तक्रारदारांना असे वाटले की, विरुध्दपक्षाने त्यांची फसवणूक केली आहे. 3. तक्रारदारांची विनंती की, त्यांनी विरुध्दपक्षाला अदा केलेली रक्कम रु. 2,95,000/- व्याजासहीत परत मिळावेत व जर विरुध्दपक्ष पुढील व्यवहार करण्यास तयार असेल तर विरुध्दपक्षाने सदर प्लॉटचे No Objection Certificate तक्रारदारांचे लाभात करुन देणे तसेच जर विरुध्दपक्ष त्यांना प्लॉट देऊ शकत नसेल तर रक्कम रु. 1,00,000/- नुकसान भरपाई पोटी मिळावेत. 4. तक्रारदारांनी नि. 2 अन्वये आपले प्रतिज्ञापत्र दाखले केले आहे. नि. 3 अन्वये तक्रारदारांनी दस्तऐवजांची यादी दाखल केली आहे. त्यात मुख्यतः उभयपक्षांमध्ये दि. 24/5/06 रोजी झालेल्या कराराची प्रत (Memorandum of Understanding) , दि. 25/8/06 रोजी एच.डी.एफ.सी. बँकेने कर्ज दिल्याचे पत्राची प्रत, विरुध्दपक्षाने तक्रारदारांना दि. 3/10/06 व दि. 2/11/06 रोजी पाठविलेली नोटीस, तक्रारदारांनी विरुध्दपक्षाच्या नोटीसीला दि. 10/10/06 व दि. 15/11/06 रोजी दिलेले उत्तर, इत्यादींचा समावेश आहे. 5. नि. 4 अन्वये विरुध्दपक्षाला मंचाने नोटीस पाठवून आपला लेखी जबाब दाखल करण्याचा निर्देश दिला. नि. 5 अन्वये सदर नोटसीची पोच उपलब्ध आहे. नि. 6 अन्वये अड. आर.बी.कोसमकर यांनी विरुध्दपक्षातर्फे आपले वकीलपत्र दाखल केले आहे. नि. 10 अन्वये विरुध्दपक्षाने मंचात तक्रारदार हे त्यांचे ग्राहक नसल्याने हया मंचास तक्रार चालविण्याचा अधिकार नाही याबाबत प्राथमिक मुद्दा काढण्याबाबत अर्ज दाखल केला. नि. 11 अन्वये अड. एस.आर.वावेकर यांनी तक्रारदारांतर्फे आपले वकीलपत्र दाखल केले आहे. नि. 12 अन्वये तक्रारदारांनी विरुध्दपक्षाने तक्रारीच्या अधिकारक्षेत्राबाबत केलेल्या अर्जावर आपला लेखी जबाब दाखल केला आहे व त्यासोबत मा. राज्य आयोगाचे काही निवाडे दाखल केले आहेत.
6. दि. 31/7/08 रोजी सदर तक्रार प्राथमिक मुद्याचे सुनावणीस मंचासमोर आली असता, उभयपक्ष व त्यांचे वकील हजर होते. अधिकारक्षेत्राच्या मुद्यावर मंचाने उभय पक्षांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकून मंचाने सदर तक्रारीची सुनावणी पुढील आदेशासाठी तहकूब केली.
7. तक्रारदारांनी दाखल केलेली तक्रार, त्यासोबत दाखल केलेले दस्तऐवज, विरुध्दपक्षाने दाखल केलेला अधिकारक्षेत्राबाबतचा अर्ज, तक्रारदारांचा त्यावरील जबाब या सर्वांचा विचार करुन मंचाने सदर तक्रारीच्या अंतिम निराकरणार्थ प्रथम खालील प्रमुख मुद्दा विचारात घेतला.
मुद्दा :- तक्रारदार हे विरुध्दपक्षाचे ग्राहक आहेत काय ? उत्तर :- नाही. स्पष्टीकरण मुद्दा :- या मुद्याबाबत मंचाचे मत असे की, तक्रारदारांनी दाखल केलेली तक्रार ही एका बिल्डर विरुध्द नसुन ती एका व्यक्तीच्या विरुध्द आहे. सदरच्या तक्रारीमध्ये विरुध्दपक्षाने सिडको यांचेकडून सदरची जागा विकत घेतली होती व ही जागा विकण्याचा करार (Memorandum of Understanding) त्यांनी तक्रारदारांशी केला होता. ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे जागेच्या फेरविक्रीला हा कायदा लागू होत नाही. सदरच्या तक्रारीमध्ये विरुध्दपक्षाने सिडको कडून त्यांनी सदर सदनिका (रो-हाऊस) खरेदी केलेली असून त्याच्या फेरविक्री साठी त्यांनी तक्रारदारांशी करार केल्याने तक्रारदार हे विरुध्दपक्षाचे ग्राहक होत नाहीत. तसेच विरुध्दपक्षाने तक्रारदारांस सेवा देण्याबाबतचा कोणताही प्रश्न उपस्थित होत नाही. एकूण तक्रारीचे स्वरुप कराराचे अंमलबजावणी करुन मागण्याचे आहे म्हणजे (Specific Performance) या बाबत ही बाब दिवाणी कोर्टाच्या अखत्यारीत येते असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांच्या वकीलांनी आपल्या जबाबासोबत मा.राष्ट्रीय आयोगाचे काही निवाडे दाखल केले आहेत. त्या निवाडयांमध्ये विरुध्दपक्ष हे विमा कंपनी किंवा बिल्डर आहेत. तसेच बिल्डर अथवा विमा कंपनीच्या विरुध्द दाद मागण्याचा अधिकार ग्राहक संरक्षण कायद्यात आहे परंतु सदर तक्रारीत तक्रारदार हा ज्या व्यक्ती विरुध्द दाद मागत आहे ती व्यक्ती बांधकाम व्यावसायिक नाही. त्या व्यक्तीने सिडकोकडून जे रो-हाऊस स्वतःसाठी खरेदी केले आहे त्याची विक्री त्यांनी तक्रारदारांना करावयाची ठरविलेले आहे त्या व्यवहारामध्ये जी तक्रार उपस्थित झाली त्या व्यवहारात जो वाद उत्पन्न झाला त्याबाबत ही तक्रार आहे त्यामुळे वरील निवाडे या तक्रारीस लागू होणार नसल्याचे मंचाचे मत आहे. सदर प्रकरणात तक्रारदार हे विरुध्दपक्षाचे ग्राहक नसल्याने सदर तक्रार चालविण्याचा या मंचाला अधिकार नाही. सबब, आदेश पारीत करण्यात येतो की, -: अंतिम आदेश :- 1. तक्रारदार विरुध्दपक्षाचे ग्राहक नसल्याने सदर तक्रार नामंजूर करण्यात येते. 2. न्यायिक खर्चाचे वहन उभयपक्षांनी स्वतः करावे. 3. आदेशाच्या सत्यप्रती उभयपक्षांना पाठविण्यात याव्यात. दिनांक :- 05/08/2008 ठिकाण :- रायगड – अलिबाग.
(बी.एम.कानिटकर) (आर.डी.म्हेत्रस) (ज्योती अभय मांधळे) सदस्य अध्यक्ष सदस्या रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
......................Hon'ble Shri R.D.Mhetras ......................Post vacant ......................Shri B.M.Kanitkar | |