- नि का ल प त्र -
( दि.18-07-2018)
द्वारा : मा. श्री. विजयकुमार आ.जाधव, अध्यक्ष.
1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांचेकडून घर बांधण्याचा ठरलेला संपूर्ण मोबदला स्विकारला परंतु करारात ठरलेप्रमाणे बांधकाम विहित मुदतीत पूर्ण न करता अर्धवट बांधकाम ठेवून सेवेत त्रुटी ठेवली म्हणून तक्रारदार यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रार अर्ज मंचात दाखल केलेला आहे.
2) तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे-
सर्व तक्रारदार हे मुंबई येथे राहतात. त्यांचे मुळ गांव तलावत जावळी, ता.खेड, जि.रत्नागिरी येथील त्यांचे सामुहिक मालकीचे जुने झालेले घर मोडकळीस आले होते म्हणून जुने घर तोडून नविन घर बांधण्यासाठी राजेंद्र मनोहर बोंडकर यांना बांधकाम विकासक म्हणून नेमले. उभयतामध्ये दि. 8-12-2014 रोजी करारनामा होऊन जुने घर तोडून त्याठिकाणी 1400 चौ. फुटाचे नविन घर बांधायचे ठरले. त्याचा मोबदला रक्कम रु. 14,00,000/-(चौदा लाख फक्त) ठरला. सदर घर हे सामनेवाला यांनी दि.15-05-2015 रोजीपर्यंत बांधुन देण्याचे ठरले. सदर करारनाम्यात परिशिष्ट अ/1 प्रमाणे अटी व शर्थी ठरल्या. तसेच सदर करारनाम्यातील परिच्छेद-3 मध्ये ठरलेप्रमाणे जास्तीचा मोबदला रक्कम रु. 7,30,000/-(सात लाख तीस हजार फक्त) घेऊन सोयीसुविधा देणेचे उभयतामध्ये ठरले. तसेच ठरलेप्रमाणे तक्रारदार यांनी एकूण मोबदला रक्कम रु. 21,30,000/-(अक्षरी एकवीस लाख तीस हजार फक्त) सामनेवाला यांना पोहच केले. त्यानंतर सामनेवाला यांनी जुने घर तोडून त्याठिकाणी नविन घर बांधले परंतु ज्या सोयीसुविधा देण्याचे ठरले होते त्या सोयीसुविधा न देता तक्रारदारांना सेवा पुरविण्यात कसूर केली. त्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाला यांना वारंवार भेटून अपूर्ण काम पुरे करण्याची विनंती केली परंतु सामनेवाला यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शेवटी तक्रारदार यांनी "भारतीय जनता पार्टी ग्राहक मंच" मार्फत दि. 4-08-2015 रोजी पत्र लिहून संवाद साधला व अपूर्ण काम 21 दिवसांत पूर्ण करण्याचे सुचवले. सदर पत्र सामनेवाला यांना मिळूनही त्यांनी अपूर्ण काम पूर्ण केले नाही. तसेच तक्रारदार यांचेशी संपर्कही साधला नाही त्यामुळे तक्रारदार यांना दुसरा बांधकाम विकासक शोधून रक्कम रु. 3,00,000/- (तीन लाख फक्त) खर्च करुन अपूर्ण काम पूर्ण करुन घ्यावे लागले तसेच अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आणखी रु. 3,00,000/- (तीन लाख फक्त) ची आवश्यकता आहे. तसेच सामनेवाला यांनी जुने घर तोडताना घरातील जुने साहित्य रक्कम रु. 1,50,000/- (एक लाख पन्नास हजार फक्त) चे तक्रारदारांना न कळवता विकून टाकले अशा रितीने सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी ठेवल्या. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द मंचात तक्रार दाखल करुन सामनेवाला यांनी रक्कम रु. 7,30,000/- (सात लाख तीस हजार फक्त) घेवून अर्धवट काम केले ती रक्कम द.सा.द.शे. 18 % व्याजाने दिलेल्या तारखेपासून परत मिळावी तसेच मानसिक त्रासापोटी प्रत्येकी रक्कम रु. 1,00,000/- (एक लाख फक्त), शारिरीक त्रासापोटी प्रत्येकी रक्कम रु. 50,000/- तसेच सामनेवाला यांनी रक्कम रु. 1,50,000/- किंमतीचे जुने सामान परस्पर विकले त्यांचे रक्कम रु. 1,50,000/- परत मिळावेत. कोर्टाचा व वकिलांचा खर्च रक्कम रु. 50,000/- मिळावेत अशी मागणी मंचाकडे केली आहे.
3) तक्रारदार यांनी अर्जासोबत नि.6/1 वर करारनामा, नि.6/2 वर पावती, नि. 6/3 वर अपुर्ण कामाची यादी, अपुर्ण कामाचे फोटो, श्री. मोनेंचे पत्र, जादा कामाची पावती, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4) सामनेवाला यांना नोटीस नि.7 प्रमाणे काढण्यात आली. सामनेवाला यांनी हजर होवून नि. 15 वर लेखी म्हणणे दाखल करुन तक्रारदार यांचा तक्रार अर्ज खोटा, खोडसाळ व लबाडीचा असून तो खर्चासह फेटाळण्यात यावा अशी मागणी केली. सामनेवाला यांचे म्हणण्याप्रमाणे तक्रारदार यांनी कामातील त्रुटींची जी यादी दिली आहे ती खोटी असून सामनेवाला यांना मान्य व कबूल नाही. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये दि. 8-12-2014 रोजी करारनामा होवून दि. 15-05-2015 रोजीपर्यंत काम करण्याचे ठरले तसेच जादा सुखसुविधा देण्यासाठी सामनेवाला यांनी तक्रारदार यांचेकडून जास्तीची रक्कम रु. 7,30,000/- ची मागणी केली व एकूण रक्कम रु. 21,30,000/- तक्रारदार यांचेकडून स्वीकारले. ज्या जादा सुविधा देण्याचे मान्य केले होते त्यामध्ये ब-याच त्रुटी ठेवल्या व सामनेवाला यांनी सेवा पुरवण्यात कसूर केली तसेच तक्रारदार यांनी वारंवार सामनेवाला यांना भेटून काम पुरे करण्याची विनंती केली परंतु सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे विनंतीकडे दुर्लक्ष केले तसेच भारतीय जनता पार्टी ग्राहक मंचामार्फत दि. 04-08-2015 रोजी सामनेवाला यांना पत्र पाठवून 21 दिवसांत काम पुर्ण करण्यास सुचवले तसेच दुसरा बांधकाम विकासक नेमून तक्रारदारांना काम पूर्ण करुन घ्यावे त्यासाठी त्यांना रक्कम रु. 3,00,000/- जादा खर्च करावे लागले तसेच इतर अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी अजून रक्कम रु. 3,00,000/- ची गरज आहे तसेच सामनेवाला यांनी जुने घर जोडताना घरातील रक्कम रु. 1,50,000/- चे जुने साहित्य परस्पर विकून टाकले. अशा रितीने सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून संपूर्ण रक्कम स्विकारुन काम अर्धवट सोडून निघून गेले इत्यादी मजकूर खोटा असून सामनेवाला यांना मान्य नाही.
5) सामनेवाला यांचे पुढे असे म्हणणे आहे की, करार करण्यासाठी जो स्टॅंम्प पेपर वापरला तो ज्या कारणासाठी घेतला त्यासाठी वापरला नाही त्यामुळे करारनामा बेकायदेशीर आहे. तक्रारदार यांना इमारत कमीत कमी किंमतीस बांधून घ्यायची होती त्यामुळे जसे जसे बांधकाम होवू लागले तसे तसे तक्रारदार यांनी बांधकाम साहित्याच्या दर्जामध्ये बदलाची मागणी केली त्याप्रमाणे सामनेवाला यांनी साहित्यात बदल केले त्यामुळे बांधकामाची किंमत वाढली. तसेच तक्रारदार यांनी बांधकाम रचनेत वेळोवेळी बदल सुचविले व त्याप्रमाणे ते करुन घेतले त्यामुळे बांधकामाचा खर्च वाढला. त्यामुळे करारनाम्यात ठरलेप्रमाणे बांधकामात बराच बदल करावा लागला तसेच वाढीव बांधकाम करावे लागले त्यामुळे खर्च वाढला. त्यामुळे ठरलेल्या रक्कम रु. 21,30,000/- ऐवजी रक्कम रु. 23,50,220/- एवढा खर्च सामनेवाला यास झाला असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे पंरतु सामनेवाला यांनी निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले, सेवेत त्रुटी केली, ठरलेप्रमाणे काम केले नाही वगैरे तक्रारी खोटया असून सामनेवाला यांना मान्य नाहीत असे म्हणणे मांडले.
6) तक्रारदार क्र. 1, 2, 3 यांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र अनुक्रमे नि. 17,18 व 19 वर दाखल केले तसेच घराचे फोटो दाखल केले आहेत. सामनेवाला यांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र नि. 21 वर दाखल केले. तक्रारदार यांनी पुरावा बंद पुरशिस नि.20 वर दिली तसेच सामनेवाला यांनी पुरावा बंद पुरसीस नि. 22 वर दिली. नि.23 वर तक्रारदार यांनी तसेच नि.26 वर सामनेवाला यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला.
7) तक्रारीचा आशय, उभय पक्षांचा पुरावा तसेच, उभय पक्षांचा लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन करता या मंचाचे विचारार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यावरील विवेचन खालीलप्रमाणे-
अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
1. | तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2. | सामनेवाला यांनी तक्रारदार यांना ग्राहक म्हणून सदोष सेवा किंवा सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | होय. |
3. | तक्रारदार यांची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे काय ? | होय |
4. | आदेश काय ? | अंतिम आदेशाप्रमाणे. |
- का र ण मि मां सा-
मुद्दा क्र.1 -
8) सामनेवाला यांनी नि.15 वर दाखल केलेले त्यांचे म्हणणे तसेच नि.21 वर दाखल केलेले शपथपत्र तसेच नि.26 वर दाखल लेखी युक्तीवाद यामधील परिच्छेद क्र.3 मध्ये तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये दि. 8-12-2014 रोजी झालेला बांधकाम करारनामा हा बेकायदेशीर असलेचा बचाव सामनेवाला घेतात. परंतु करारासाठी वापरलेला स्टॅंम्प पेपर हा ज्या कारणासाठी घेतला त्या कारणासाठी वापरला नाही तसेच स्टॅंम्प पेपर खरेदी करणेपूर्वीच्या तारखेचा करार त्या स्टॅंम्प पेपरवर लिहिला म्हणून तो करार कायदेशीर नाही हा सामनेवाला यांचा युक्तीवाद मान्य होणारा नाही. कारण स्टॅंम्प पेपर हा सामनेवाला यांचे नावावर खरेदी केलेला असून तक्रारदार क्र. 1 ते 3 या महिला असून त्यातही तक्रारदार क्र. 1 व 2 यांचे वय अनुक्रमे 70 व 63 असल्याचे दिसून येते. सदर तक्रारदार महिलाकडून कायदेशीर व तांत्रिक बाबी पडताळून पाहण्याची अपेक्षा करु शकत नाही त्यामुळे स्टॅंम्प पेपर ज्या कारणासाठी घेतला त्या कारणासाठी वापरला नाही तसेच स्टॅंम्प पेपर खरेदी करणेपुर्वीच्या तारखेचा करार त्यावर करता येणार नाही या केवळ तांत्रिक बाबीवरुन तक्रारदार व सामनेवाला यांचेमधील बांधकाम करार कायदेशीर नाही हा सामनेवाला यांचा युक्तीवाद मान्य करता येणार नाही. तसेच तक्रारदार यांनी सामनेवाला यांना वेळोवेळी बांधकामाचे मोबदल्यापोटी ज्या रकमा दिल्या व सामनेवाला यांनी त्या स्वीकारल्या हे तक्रारदारांनी नि. 6/2 वर दाखल केलेल्या पावतीवरुन दिसून येते. तसेच सामनेवाला यांनी त्यांना तक्रारदार यांचेकडून मोबदला रक्कम रु. 21,00,000/- मिळालेचे नि.15, 21 व 26 प्रमाणे कबूल केले आहे. त्यामुळे तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये ग्राहक व सेवापुरवठादार असा संबंध असल्याचे दिसून येते. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 व 3 -
9) मुद्दा क्र. 2 व 3 हे ऐकमेकांशी निगडीत असल्याने त्यांचे विवेचन एकत्रितरित्या करणेत येते. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये दि.08-12-2014 रोजी बांधकाम करार होवून सामनेवाला यांनी तक्रारदार यांना 1400 चौ.फूटाचे नविन घर दि.15-05-2015 पूर्वी बांधून देण्याचे व त्याचा मोबदला रक्कम रु.14 लाख ठरल्याचे नि.6/1 वर दाखल करारनाम्यावरुन दिसून येते. तसेच तक्रारदाराने त्यांचे तक्रारीमध्ये प्रस्तुत करारनाम्यात परिच्छेद 3 मध्ये नमूद केलेप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदारांना सोयीसुविधा दयावयाच्या होत्या त्याचा अतिरिक्त मोबदला रक्कम रु. 7,30,000/- हा तक्रारदार यांनी सामनेवाला यांना दयावयाचा होता असे नमूद आहे. परंतु सदर करारामध्ये नमूद असलेल्या परिच्छेद 3 मधील ज्या सोयीसुविधा देणेच्या होत्या त्याबद्दल रक्कम रु. 7,30,000/- तक्रारदाराने सामनेवाला यांना देणेचे आहेत त्याबद्दल कोणताही उल्लेख सदर करारामध्ये दिसून येत नाही. परंतु सामनेवाला यांनी नि. 15 वरील त्यांचे म्हणणे, नि. 21 वरील त्यांचे शपथपत्र व नि.26 वरील त्यांचा लेखी युक्तीवादामध्ये बांधकामाची जास्तीची कामे करण्याचे ठरले होते हे मान्य केलेले आहे. म्हणजेच बांधकामाचा एकूण मोबदला रक्कम रु. 21,30,000/- तक्रारदार यांनी सामनेवाला यांना दयावयाचा होता तो तक्रारदार यांचेकडून सामनेवाला यांना वेळोवेळी पोहच झालेचे सामनेवाला मान्य करतात तसेच नि. 8/2 वर तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पावतीवरुन तसेच नि.15 वर सामनेवाला यांनी दाखल केलेले त्यांचे म्हणणे, नि.21 वर सामनेवाला यांनी दाखल केलेले त्यांचे शपथपत्र, नि.26 वर सामनेवाला यांनी दाखल केलेला त्यांचा लेखी युक्तीवाद यावरुन स्पष्ट होते.
10) सामनेवाला यांनी जे काम करण्याचे मान्य केले परंतु पूर्ण केले नाही त्याची यादी तक्रारदार यांनी नि.6/3 वर दाखल केलेली आहे. नि.6/3 वरील अ.क्र.1 प्रमाणे सामनेवाला यांनी घराचे खिडक्यांना ग्रिल बसविले नाहीत असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. नि.6/1 वर दाखल कराराचे अवलोकन करता करारामध्ये ठरल्याप्रमाणे खिडक्यांना ग्रिल बसवून देणे आवश्यक होते. परंतु सामनेवाला यांनी घराचे खिडक्यांना ग्रिल बसविले नसल्याचे सामनेवाला हे नि.15 वर दाखल त्यांचे म्हणणे, नि.21 वर दाखल शपथपत्र, नि.26 वर दाखल लेखी युक्तीवादामध्ये मान्य करतात. तसेच नि.6/6 वर दाखल पावतीवरुन खिडक्यांना ग्रिल बसविल्याचे काम तक्रारदार यांनी रमेश शेटे यांचेकडून करुन घेतलेचे दिसून येते.
11) नि.6/3 वरील अ.क्र.2 प्रमाणे परसावनात कंपाऊंडला एका बाजूला 2 ते 2.5 फुटाची भिंत बांधली नाही व कंपाऊंडला 5 फुटाचे रेलींग लावले नाही व गेट लावले नाही. करारात नमूद केलेप्रमाणे प्रस्तुत काम सामनेवाला यांनी करुन देणे गरजेचे होते परंतु ते त्यांनी केले नाही हे नि.15, 21 व 26 वरुन दिसून येते तसेच नि.6/6 वरुन सदर काम तक्रारदार यांनी रमेश शेटे यांचेकडून करुन घेतलेचे दिसते.
12) घरातील सागाचे दरवाजे करारामध्ये ठरलेप्रमाणे सामनेवाला यांनी लावणे आवश्यक होते परंतु सामनेवाला यांनी सागाचे दरवाजे न लावता दुसरे दरवाजे लावले किंवा दरवाजेच लावले नाही याबाबत तक्रारदार यांनी कोणताही पुरावा सादर केलेला नाही.
13) नि.6/3 वर तक्रारदार यांनी दाखल केलेल्या अपूर्ण कामांचे यादीतील अ.क्र. 3 ते 12 ही कामे दि. 8-12-2014 रोजीचे करारामध्ये नमूद नसल्याने ती कामे सामनेवाला यांनी केली नाहीत व त्या कामाबाबत सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी दिली असे म्हणता येणार नाही.
14) सामनेवाला यांनी नि.15 वरील त्यांचे म्हणणे, नि. 21 वरील त्यांचे शपथपत्र, नि.26 वरील त्यांचा लेखी युक्तीवाद यामध्ये तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये स्लॅबवरती 16 आर.सी.सी.कॉलम बांधणेचे ठरले होते हे मान्य केलेले आहे. नि. 15, नि.21, व नि.26 मधील परिच्छेद- 8 अ.क्र.1 मध्ये नमूद केलेप्रमाणे घराचे स्लॅबवरती 16 आर.सी.सी. कॉलम बांधण्याचा एकूण खर्च रक्कम रु. 1,92,000/- (प्रती नग 12000/प्रमाणे) असे सामनेवाला मान्य करतात. एकूण 16 आर.सी.सी. कॉलम बांधण्याचे ठरले होते परंतु तक्रारदार यांनी नि. 17,18 व 19 यासोबत दाखल रंगीत छायाचित्रावरुन सामनेवाला यांनी प्रत्यक्षात 6 आर.सी.सी. कॉलम बांधल्याचे परंतु खर्च मात्र 16 आर.सी.सी. कॉलमचा लावल्याचे नि. 15, नि.21 व नि.26 मधील परिच्छेद क्र.8 अ.क्र. 1 वरुन दिसून येते. सामनेवाला यांनी 16 आर.सी.सी. कॉलम ऐवजी फक्त 6 आर.सी.सी. कॉलम बांधले हे जे तक्रारदाराचे म्हणणे आहे ते सामनेवाला यांनी नाकारलेले नाही.
15) तक्रारदार यांचे घराचे बांधकाम करण्यासाठी तक्रारदार यांनी वेळोवेळी बांधकामात बदल करण्यास सांगितलेमुळे तसेच जादा कामे करण्यास सांगितलेमुळे तसेच बांधकामासाठी वापरण्यात येणा-या साहित्याच्या स्वरुपात(Quality and Cost of the material) वारंवार बदल केलेमुळे सामनेवाला यांना एकूण खर्च रक्कम रु.23,50,220/- एवढा झालेला आहे. परंतु सामनेवाला यांनी त्यांना झालेल्या वाढीव खर्चाबाबत कोणताही भक्कम पुरावा सादर केलेला नाही.
16) तक्रारदार हे तक्रार अर्जामध्ये तसेच नि.17,18 व 19 वरील त्यांचे शपथपत्रामध्ये असे नमूद करतात की, सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या जुन्या घराचे रक्कम रु.1,50,000/- चे साहित्य परस्पर विकले. परंतु तक्रारदार यांनी त्याबाबत कोणताही पुरावा न्यायमंचामध्ये दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून सामनेवाला यांनी रक्कम रु. 1,50,000/- जुने घराचे साहित्य परस्पर विकले म्हणून मागितलेली भरपाई रक्कम रु. 1,50,000/- चा विचार मंचास करता येणार नाही.
17) तक्रारदार यांनी नि.6/6 वर पावती दाखल करुन रमेश शेटे यांचेकडून रक्कम रु. 1,47,500/- ची कामे करुन घेतलेबाबत पावती दाखल केलेली आहे. परंतु सदरील पावतीवरील अ.क्र.1,2 ही कामे दि. 8-12-2014 रोजीचे करारामध्ये नमूद असल्याने त्याच कामाबाबत सामनेवाला यांनी त्रुटी ठेवली हे पुराव्यावरुन सिध्द होते. तक्रारदार यांनी रविंद्र नरळकर यांचेकडून करुन घेतलेल्या कामांची पावती दाखल केलेली आहे परंतु सदरील कामांचा उल्लेख दि. 8-12-2014 रोजीचे करारामध्ये नसल्याने त्याबाबत सामनेवालाने कामात त्रुटी ठेवली हे सिध्द होत नाही.
18) नि. 6/6 वर तक्रारदार यांनी अपूर्ण कामाची जी यादी दाखल केली त्या यादीतील अंगणास रेलींग बसविणे व खिडक्यांना लोखंडी ग्रील बसवणे या दोन कामांचा उल्लेख तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये दि. 8-12-2014 रोजी झालेल्या करारनाम्यात दिसून येतो. नि. 6/1 वरील करारनाम्यात नमूद इतर कामे अपूर्ण असल्याचे नि. 6/3 वर दाखल अपूर्ण कामांच्या यादीत उल्लेख दिसून येत नाही. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजूर होण्यास पात्र आहे. सामनेवाला यांनी न केलेल्या आणि अपूर्ण कामासंबंधी तक्रारदार यास नुकसान भरपाई देणे न्यायाचे दृष्टीने उचित होईल. सामनेवाला यांनी न केलेली दोन कामे म्हणजेच अंगणास भोवती लोखंडी रेलींग सहा रुपये प्रति चौरस फुटाप्रमाणे 1000 चौ.फूटाचे एकूण रक्कम रु. 60,000/- व खिडक्यांना न बसविलेले ग्रिल्स किंमत रु. 80/- चौ.फूट प्रमाणे 140 चौ.फूटाचे रक्कम रु. 11,200/- तसेच सामनेवाला व तक्रारदार यांचेमध्ये घराचे स्लॅबवर एकूण 16 आर.सी.सी. कॉलम बांधायचे ठरलेले होते परंतु फक्त 6 आर.सी.सी. कॉलम सामनेवाला यांनी बांधले म्हणजेच राहिलेल्या 10 आर.सी.सी. कॉलमचे रक्कम रु. 12000/- प्रत्येक आर.सी.सी. कॉलमप्रमाणे 10 आर.सी.सी. कॉलमचे एकूण रक्कम रु. 1,20,000/- तसेच 3 तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी व शारिरीक त्रासापोटी प्रत्येकी रक्कम रु. 10,000/-, तसेच तक्रार अर्जाचे खर्चापोटी प्रत्येकी रक्कम रु.2,000/- प्रमाणे अदा करणे न्यायाचे दृष्टीने उचीत होईल अशा निष्कर्षाप्रत हे मंच येते. सबब, मुद्दा क्र. 2 व 3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देते.
मुद्दा क्र.4 -
19) सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या घराचे बांधकाम करण्यासाठी एकूण रक्कम रुपये 21,30,000/- स्वीकारुन दि. 8-12-2014 रोजीचे तक्रारदार व सामनेवाला यांचेतील करारात ठरलेप्रमाणे काम पूर्ण न करता अर्धवट काम सोडून तक्रारदार यांना देवायच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे हे तक्रारदार यांनी पुराव्यानिशी सिध्द् केलेले आहे. सबब, तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करणे न्यायोचित होईल या निष्कर्षाप्रत हे मंच येते. सबब, आदेश खालीलप्रमाणे.
- आ दे श -
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) सामनेवाला यांनी तक्रारदाराचे घराचे अंगणास भोवती रेलींगचे न केलेल्या कामाचा एकूण खर्च रक्कम रु. 60,000/- (अक्षरी रक्कम साठ हजार फक्त) आणि खिडक्यांना ग्रिल्स बसवले नाहीत त्याचा एकूण खर्च रक्कम रु.11,200/- (अक्षरी रक्कम अकरा हजार दोनशे फक्त) तसेच स्लॅबवरती न बांधलेल्या 10 आर.सी.सी. कॉलमचे खर्चापोटी एकूण रक्कम रु. 1,20,000/-(अक्षरी रक्कम एक लाख वीस हजार फक्त) तक्रारदार यांना प्रस्तुत तक्रार अर्जाचा आदेश दि. 18-07-2018 रोजीपासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 6 % व्याजाने अदा करावे.
3) तक्रारदार यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी व शारिरीक त्रासापोटी प्रत्येकी रक्कम रु. 10,000/-(अक्षरी रक्कम दहा हजार फक्त) तसेच तक्रार अर्जाचे खर्चापोटी प्रत्येकी रक्कम रु.2,000/- अदा करावेत.
4) वरील आदेशाची पुर्तता 30 दिवसांत करावी तसे न केल्यास तक्रारदार सामनेवाले यांचेविरुध्द ग्राहक सरंक्षण कायदा, कलम 25 व 27 खाली कार्यवाही करु शकतील.
5) या आदेशाची प्रत तक्रारदार व सामनेवाला यांना विनामुल्य दयावी.