न्या य नि र्ण य
(दि.23-07-2024)
व्दाराः- मा. श्री अरुण रा. गायकवाड, अध्यक्ष
1. प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदाराने त्यांचे चारचाकी वाहन सामनेवालाकडे दुरुस्तीसाठी दिल्यानंतर ती वेळेत दुरुस्ती करुन दिलेली नाही म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथने थोडक्यात पुढील प्रमाणे-
तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांना त्यांचे व्यवसायाकरिता अनेक ठिकाणी प्रवास करावा लागतो. त्यासाठी 6/07/2017 रोजी सामनेवाला यांचे वालोपे ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथील नेक्सा चे शोरुममधून मारुती सुझुकी कंपनीची इग्निस रक्क्म रु.7,10,895/- किंमतचे वाहन रक्कम रु.2,00,000/- डाऊन पेमेंट भरुन व उर्वरित रक्कमेवर कोटक महिंद्रा बँकेकडून कर्ज घेऊन विकत घेतली. त्याचा R T O क्र.MH-08-AN-1999 असा आहे. तक्रारदार दि.18/07/2019 रोजी सकाळी 11.00 वाजता सदर वाहन घेऊन पोलादपूर येथून खेड येथे जात असताना समोरुन खेड बाजूकडून एक सिल्वर रंगाची इनोव्हा गाडीने तक्रारदाराचे वाहनाला समोरुन धडक मारुन अपघात केला. सदर अपघातामध्ये तक्रारदारांच्या गाडीचे खुप नुकसान झाले. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे सदरचे वाहन दुरुस्तीसाठी दिले. सामनेवाला यांनी पंचनामा केल्यानंतर सामनेवाला यांनी दि.29/08/2019 रोजी जॉबकार्ड बनविले. त्यानंतर तक्रारदार हे पुढील दोन महिने वाहनाच्या दुरुस्तीबाबत सामनेवाला यांचेकडे वांरवार चौकशी करीत होते. त्यावेळी सामनेवाला यांचेकडून काम चालू आहे, वेळ लागेल अशी उत्तरे येत होती. सामनेवाला यांचेकडून वेळोवेळी वाहन दुरुस्ती करुन न मिळालेने व तक्रारदार यांना बांधकाम साईटसवर पोहचण्यासाठी वेळोवेळी भाडयाच्या गाडीचा वापर करावा लागत होता. सामनेवाला यांनी अपघात झालेनंतर 1 वर्षे 3 महिने झालेतरी तक्रारदाराची गाडी दुरुस्त करुन दिली नव्हती. नाईलाजास्तव दि.31/08/2019 रोजी तक्रारदार यांनी नवीन हयुंडाई कंपनीची व्हेन्यू ही चारचाकी कार रक्कम रु.11,70,000/- इतक्या किंमतीस विकत घेतली. अपघातग्रस्त गाडीचा इन्शुरन्स सामनेवाला क्र.3 यांचेकडे काढलेला आहे. गाडी अपघातसमयी व सामनेवाला यांचेडे देताना इन्शुरन्स मुदतीत होता. त्यामुळे कारच्या दुरुस्तीसाठी येणारा खर्च सामनेवाला क्र.3 देणार असून तो सामनेवाला क्र.2 यांनी इन्शुरन्स कंपनीकडून घेऊन वेळेत गाडी दुरुस्त करुन देणेस सामनेवाला हे असमर्थ ठरले. त्यामुळे तक्रारदार यांचे भरुन न येणारे आर्थिक व मानसिक स्वरुपाचे प्रचंड नुकसान झाले. याबाबत तक्रारदार यांनी सामनेवाला यांना दि.19/09/2020 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली होती. सदर नोटीस मिळूनदेखील सामनेवाला यांनी नोटीसला लेखी अथवा तोंडी उत्तर दिलेले नाही. त्यनंतर दि.24/10/2020 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदारास ई-मेल व फोन व्दारे तक्रारदाराची कार दुरुस्त झालेबाबत व खर्चापोटी रक्क्म रु.12,000/- भरावे लागतील असे कळविले. तक्रारदार यांनी गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली असता कारच्या दुरुस्तीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेचे आढळून आले तसेच कारमध्ये सुमारे 16 बाबींमध्ये त्रुटी दिसून आल्या. सदरच्या त्रुटी तक्रारदाराने सामनेवाला यांच्या प्रतिनिधींना कळविल्या. त्यानंतर काही दिवसांनी सामनेवाला यांनी गाडी दुरुस्त झाली असून खर्चाचे रक्क्म रु.35,000/- भरावे लागतील असे सांगितले. सदर रक्कमेबाबत तक्रारदाराने सामनेवाला यांना विचारले असता सदर रक्कमेची सुट देतो तुमची गाडी लगेच घेऊन जा असे कळविले. सामनेवाला यांनी गाडीचे संपूर्ण काम योग्यरित्या न केल्यामुळे तसेच आवश्यक कालावधी घेऊन दिरंगाई केल्यामुळे गाडीचे व तक्रारदाराचे पैशाचे स्वरुपात कधीही भरुन न येणारे असे अपरिमित नुकसान झाले असल्यामुळे सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारास मारुती सुझुकी इग्निस या जुन्या गाडीच्या बदल्यात त्याच मॉडेलची नवीन गाडी देणेबाबत अथवा त्या गाडीची किंमत रु.7,10,897/- तक्रारदार यांना देणेबाबत आदेश व्हावा. तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी तसेच झालेल्या सर्व खर्चाच्या नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.36,17,452/- सामनेवाला क्र.1 ते 3 यांचेकडून वसुल होऊन मिळावा. वैकल्पिकरित्या यदाकदाचित वाहन संपूर्ण दुरुस्त करुन देण्याबाबत आदेश झाल्यास सदर वाहनाचा दुरुस्तीचा संपूर्ण खर्च सामनेवाला क्र.3 अथवा सामनेवाला क्र.1ते3 यांना संयुक्तिक करण्याचे आदेश व्हावेत. तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.35,000/- सामनेवालांकडून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने या आयोगास केली आहे.
2. तक्रारदार यांनी तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.6 कडे एकूण 12 कागद दाखल केले असून त्यामध्ये तक्रारदाराच्या अपघातग्रस्त वाहनाचे टॅक्स इन्व्हॉईस रिसीट नं.11700992, वाहनाचे आर.सी.बुक, तीन वर्षाच्या इन्शुरनस पॉलीसी, भाडयाच्या गाडीची एकूण 10 बीले, जॉब कार्ड JC19013048, तक्रारदाराने घेतलेल्या हयुंडाई कंपनीच्या गाडीचे टॅक्स इन्व्हॉईस, तक्रारदाराने सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस पोचपावतीसहीत, तक्रारदार व सामनेवाला यांचेदरम्यान झालेले ई-मेलव्दारे संभाषण, तक्रारदाराच्या गाडीच्या अपघाताचा पंचनामा, तक्रारदार यांचा अपघातावेळीचा जबाब इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहे. नि.18 कडे तक्रारदाराचे अपघातग्रस्त वाहनचे सदयस्थिती दर्शविणारे फोटोग्राफ दाखल केले आहेत. नि.26 चे कागदयादीने सामनेवाला क्र.3 यांना वृत्तपत्रामध्ये दिलेल्या जाहीर नोटीसची प्रत दाखल केली आहे. नि.27 कडे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.28 कडे साक्षीदार श्री शुभम दिपक दरेकर यांचे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.29 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.37 ला लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
3. सामनेवाला क्र.1 हे प्रस्तुत कामी वकीलामार्फत हजर झाले त्यांनी नि.11कडे लेखी म्हणणे दाखल केले. सदर लेखी म्हणणेमध्ये सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराचा तक्रार अर्जातील मजकूर खोटा, चुकीचा दिशाभूल करणारा व खोडसाळ असून तो मान्य व कबूल नाही असे म्हटले आहे. सदर सामनेवाला पुढे सांगतात, तक्रारदार यांच्या इग्निस डेल्टा या गाडीला दि.18/07/2019 रोजी पोलादपूर खेड दरम्यान अपघात झाला होता. त्यानंतर तक्रारदाराने दि.23/07/2019 रोजी त्यांची गाडी सामनेवालांच्या चिपळूण येथील वर्कशॉपमध्ये दिली. सदर गाडीचा इन्शुरन्स न्यू इंडिया ऍश्युरन्स कं.लि. या कंपनीचा आहे. सामनेवाला क्र.3 ही विविध कंपनीचे इन्शुरन्स करुन देणारी एजंट कंपनी आहे. गाडीचा दुरुस्तीपूर्व इन्शुरन्स सर्व्हे झाल्यानंतर इन्शुरन्स कंपनी व आणि गाडी मालक यांनी सांगितल्यानंतरच गाडीचे काम सुरु करणे शक्य होते. सदर कंपनीचा सर्व्हेअर सामनेवालाचे चिपळूण येथील वर्कशॉपमध्ये दि.29/08/2019 रोजी येऊन तक्रारदाराचे गाडीचे सर्व्हे करुन गेला. त्याच दिवशी गाडीचे जॉबकार्ड उघडण्यात आले. परंतु तक्रारदाराने “गाडीचे काम सुरु करु नका, मला गाडी टोटल लॉस दाखवायची आहे. त्याबाबत माझे इन्शुन्स कंपनीशी बोलणे सुरु आहे मी सांगेपर्यंत गाडी दुरुस्त करु नका” असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर दि.26/09/2019 रोजी इन्शुरन्स कंपनीचे सर्व्हेअर यांनी गाडीचे कामाचा त्यांचे म्हणणेनुसारचा खर्च व गाडीची इन्शुअर्ड किंमत नमुद करुन गाडीचे काम सुरु करण्याबाबत हरकत नसल्याचे सामनेवालास कळविले. मात्र तरीही तक्रारदारांनी गाडीचे काम सुरु करु नये असे कळवले. सामनेवाला यांचा तक्रारदार यांच्या व्यववसायाचा व त्यासाठी तक्रारदारास आलेल्या भाडयाच्या गाडीबाबतचा व त्याव्दारे प्रवासाबाबतचा सर्व मजकूर खोटा व खोडसाळ आहे. तक्रारदारास गाडीच्या कर्जाचा हप्ता भरावा लागत होता त्याचेशी सामनेवाला यांचा काहीही संबंध नाही. अपघात होण्यापूर्वी तक्रारदाराने 2 वर्षे ती गाडी वापरली होती.
4. सामनेवाला क्र.1 पुढे कथन करतात, सप्टेंबर-2019 मध्ये इन्शुरन्सचा फायनल सर्व्हे झाल्यानंतर सुमारे 6 महिन्यांनी म्हणजे मार्च-2020 मध्ये तक्रारदाराने सामनेवालाच्या वर्कशॉपमध्ये फोन करुन गाडीचा टोटल लॉस असा इन्शुरन्स होत नाही. तुम्ही गाडीचे दुरुस्तीचे काम सुरु करा असे कळवले. त्याप्रमाणे सामनेवालाने गाडीच्या दुरुस्तीसाठी लागणा-या स्पेअर पार्टची ऑर्डर देऊन गाडीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर कोरोनामुळे देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरु झाला. त्यामुळे सामनेवाला यांचे वर्कशॉपमध्ये काम करणा-या तंत्रज्ञ लोकांच्या कामावर येण्यामध्येही निर्बंध व वाहतुकीच्या बंधनामुळे अडचणी येत होत्या. तसेच गाडीचे सुटे भाग उपलब्ध होऊन प्रचंड डॅमेज झालेली गाडी पटकन दुरुस्त होईल ही अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. गाडीचे काम पूर्ण झाल्यावर गाडी घेऊन जाण्यासाठी तक्रारदाराला कळविण्यात आले. परंतु गाडी दुरुस्तीसाठीच्या खर्चाच्या कामाचे पैसे रु.3,83,153/- दयावे लागू नयेत म्हणून तक्रारदाराने दुरुस्ती झालेली त्यांची गाडी घेऊन जाण्यास टाळाटाळ केली. तक्रारदाराचे गाडीचे काम सामनेवाला यांनी उत्तम प्रकारे केलेले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराचे गाडीचे ओरिजिनल आणि विनाखराब पार्टसमध्ये कोणतेही बेकायदेशीर फेरफार केलेले नाहीत. तक्रारदार यांनी दि.25/12/2020 रोजी त्यांची गाडी नेली. गाडीसाठी एकूण दुरुस्तीचा खर्च रु.3,83,153/- इतका आला. त्यापैकी दि न्यु इंडिया एशोरन्स कंपनीकडून इन्शुरन्सची रक्कम रु.3,47,120/- सामनेवाला क्र.1 यांना अदा केली आहे. उर्वरित रक्कम रु.36,032/- एवढी सुट सामनेवाला यांनी तक्रारदारास दिली आहे. तक्रारदार यांचे मागणीला कोणताही संयुक्तिक, तार्किक, कायदेशीर आधार नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती सामनेवाला क्र.1 यांनी केली आहे.
5. सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ दि.12 कडे एकूण तीन कागदपत्रे दाखल केली असून त्यामध्ये तक्रारदाराचे नोटीसला दिलेले उत्तर, त्याची पोष्टाची पावती व पोहोच पावती, इन्शुरन्स सर्व्हेअर श्री सातोस्कर यांनी सामनेवालास तक्रारदाराचे गाडीचा पाठविलेला ई-मेल इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
6. सामनेवाला क्र.2 हे प्रस्तुत कामी वकीलामार्फत हजर झाले त्यांनी नि.15 कडे लेखी म्हणणे दाखल केले. सदर लेखी म्हणणेमध्ये सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदाराचा तक्रार अर्जातील मजकूर खोटा, चुकीचा दिशाभूल करणारा व खोडसाळ असून तो मान्य व कबूल नाही असे म्हटले आहे. सदर सामनेवाला पुढे सांगतात, सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 आस्थापनेचे कर्मचारी आहेत. सामनेवाला क्र.1 यांचे नि.11 कडील लेखी म्हणणे हेच सामनेवाला क्र.2 यांचे म्हणणे म्हणून वाचण्यात यावे. तक्रारदार यांनी दि.16/01/2021 रोजी मारुती सुझुकी इग्निस गाडी स्वत:/अन्य इसमामार्फत सामनेवालांच्या अधिकारी/कर्मचा-याची भेट न घेता सामनेवालांच्या चिपळूण येथील वर्कशॉप आवारात आणून सोडली. तेव्हापासून सामनेवाला यांची सदर गाडीबाबतची कोणतीही जबाबदारी नव्हती व नाही. त्यासाठी तक्रारदार यांनी दि.16/01/2021 पासून दररोज रु.100/- पार्कींग चार्जेस सामनेवाला यांना अदा करावेत. तक्रारदार यांची सदरची कृती ही कायदयाचा गैरवापर करणारी आहे सबब. तक्रारदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी विनंती केली आहे.
7. सामनेवाला यांनी नि.31 कडे तक्रारदाराला रजि.पोष्टाने पाठविलेले पत्र दाखल केले आहे. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी नि.32 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.36 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.38 कडे सामनेवाला क्र.1 व 2 यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. नि.39 कडे दि न्यु इंडिया एशो.कं. यांना सामनेवाला यांनी पाठविलेले पत्राची प्रत दाखल केली आहे. नि.42 कडे सामनेवाला क्र.2 यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी नि.43 कडे एकूण 4 कागदपत्रे दाखल केली असून त्यामध्ये दि.28/08/2020 रोजीचे प्रि-इन्व्हॉईस व ई-मेल, 09/10/2020रोजी इन्शुरन्स कंपनीकडून आलेला ई-मेल, दि.04/11/2020 रोजी सामनेवालाकडून तक्रारदारास पाठविलेला ई-मेल, सामनेवाला क्र.1 यांची दि.16/01/2021 रोजीचे इन-आऊट रजिस्टर इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
8. सामनेवाला क्र.3 यांना आयोगामार्फत पाठविलेली नोटीसचा कोणताही अहवाल न आलेने सामनेवाला क्र.3 यांना जाहीर नोटीस प्रसिध्द करण्यात आली होती. सदरची जाहीर नोटीसची वृत्तपत्राची प्रत तक्रारदार यांनी नि.26 कडे दाखल केली आहे. सामनेवाला क्र.3 यांना जाहीर नोटीस देऊनही ते सदर कामी गैरहजर राहिलेने दि.02/08/2022 रोजी सामनेवाला क्र.3 यांचेविरुध्द “एकतर्फा” आदेश पारीत करण्यात आला.
9. वर नमुद तक्रारदार यांचा तक्रार अर्ज व दाखल कागदपत्रे व लेखी युक्तीवाद, सामनेवाला क्र.1 व 2 यांचे म्हणणे, कागदपत्रे व लेखी युक्तीवाद तसेच उभयतांचा तोंडी युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन करता सदर आयोगाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ खालील मुददे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्त्तरे |
1 | तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास वेळेत वाहन दुरुस्ती करुन न देऊन तक्रारदारास सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून वाहनाची दुरुस्ती करुन मिळणेस व मानसिक, शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
-वि वे च न-
मुद्दा क्रमांकः 1 ते 3 –
10. तक्रारदार यांनी नि.6/11 व 6/12 कडे दाखल केलेल्या अपघाताचा पंचनामा व जबाब याचे अवलोकन करता तो तक्रारदार यांच्या मारुती सुझुकी कंपनीच्या इग्निस R T O क्र.MH-08-AN-1999 असलेल्या वाहनाचा आहे. तक्रारदार दि.18/07/2019 रोजी सकाळी 11.00 वाजता सदर वाहन घेऊन पोलादपूर येथून खेड येथे जात असताना समोरुन खेड बाजूकडून एक सिल्वर रंगाची इनोव्हा गाडीने तक्रारदाराचे वाहनाला समोरुन धडक मारुन अपघात झाला. सदर अपघातामध्ये तक्रारदारांच्या गाडीचे खुप नुकसान झालेचे स्पष्ट होते. तसेच सदरची अपघातग्रस्त गाडी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे दि.23/07/2020 रोजी दुरुस्तीसाठी दिले. सामनेवाला यांनी त्यांचे नि.11 कडील म्हणणेमध्ये सदरची बाब मान्य केलेली असून उभयतांमध्ये त्याबाबत कोणताही वाद नाही. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक असलेचे व सामनेवाला क्र.1 व 2 हे सेवापुरवठादार असलेची बाब निर्विवादपणे सुस्पष्ट होते. सबब तक्रारदार व सामनेवाला क्र.1 व 2 हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुददा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
11. तक्रारदार यांनी त्यांच्या मारुती सुझुकी कंपनीच्या इग्निस R T O क्र.MH-08-AN-1999 असलेल्या वाहनाचा दि.18/07/2019 रोजी सकाळी 11.00 वाजता इनोव्हा गाडीने समोरुन धडक मारुन अपघात झाला. सदर अपघातामध्ये तक्रारदारांच्या गाडीचे खुप नुकसान झालेचे स्पष्ट होते. तसेच सदरची अपघातग्रस्त गाडी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे दि.23/07/2020 रोजी दुरुस्तीसाठी दिली. त्याबाबतचे सामनेवाला यांचेकडील जॉब कार्ड तक्रारदार यांनी नि.6/7 कडे दाखल केलेले आहे. सदर जॉब कार्डवर तारीख 29/08/2019 असलेचे स्पष्ट होते. तक्रारदार यांनी वेळोवेळी चौकशी करुनही सामनेवाला यांनी तक्रारदारास वेळेत गाडी दुरुस्ती करुन दिली नाही. त्यानंतर सामनेवाला यांनी दि.23/10/2020 रोजी गाडी तयार झाल्याचे तक्रारदाराला ई-मेल व्दारे कळविले. त्यानुसार तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे जाऊन अपघातग्रस्त गाडी दुरुस्ती केल्यानंतर टेस्ट ड्राईव्ह घेतली असता तक्रारदारास त्यांची गाडी व्यवस्थीत दुरुस्त झाली नसलेचे दिसून आल्याने तक्रारदाराने सदरच्या गाडीची डिलीव्हरी घेतली नाही. सामनेवाला यांना तक्रारदाराची अपघातग्रस्त गाडी दुरुस्तीसाठी खर्च रु.3,83,153/- इतका आला. त्यापैकी दि न्यु इंडिया एशोरन्स कंपनीकडून इन्शुरन्सची रक्कम रु.3,47,120/- सामनेवाला क्र.1 यांना अदा केली असलेचे सामनेवाला क.1 यांनी मान्य केलेले आहे. तसेच तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून अपघातग्रस्त वाहन दि.25/12/2020 रोजी ताब्यात घेतलेचे कथन केले आहे. परंतु त्याबाबतचा कोणताही पुरावा याकामी दाखल केलेला नाही. तसेच सामनेवाला यांनी नि.31 कडे तक्रारदाराला पाठविलेल्या पत्राची प्रत याकामी दाखल केली आहे. सदर पत्रामध्ये तक्रारदार यांनी त्यांची गाडी दि.16/01/2021 रोजी सदरची तक्रार प्रलंबीत असताना सामनेवालांकडे आणून उभी केलेचे कथन केले आहे. जर सदरची गाडी तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे आणून सोडली होती तर सामनेवाला यांनी त्याचवेळी सदरची बाब या आयोगाचे निदर्शनास का आणून दिली नाही? त्यांनी परस्पर तक्रारदाराला पत्र का पाठविले? तसेच सामनेवाला यांनी सदरची गाडी त्यांचेकडे आलेबाबतचे रजिस्टरची पानाची झेरॉक्स प्रत याकामी दाखल केली आहे. परंतु तक्रारदाराने सदरची गाडी दि.25/12/2020 रोजी ताब्यात घेतलेचे सामनेवाला त्यांचे म्हणणेमध्ये कथन करतात शोरुमच्या नियमाप्रमाणे कोणतीही गाडी शोरुमच्या किंवा वर्कशॉपच्या बाहेर जाताना त्याचे डिलिव्हरी दिलेची नोट असते तसे कोणतेही कागदपत्र याकामी सामनेवाला यांनी दाखल केलेले नाहीत. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी नि.42 कडे शपथपत्र दाखल करुन जुलै-2021 मधील पुरामध्ये रेकॉर्ड व कॉम्प्युटर नष्ट झालेबाबत कथन केले. त्यामुळे कोणताही पुरावा याकामी दाखल करता आला नाही. परंतु सामनेवाला यांना फक्त गेटवरील रजिस्टर सुस्थितीत सापडले हे स्पष्टीकरण योग्य वाटत नाही. तसेच तक्रारदार यांनी दि.25/12/2020 रोजी अपघातग्रस्त गाडी सामनेवालांच्या वर्कशॉपमध्ये येऊन ताब्यात घेतली आणि दि.16/01/2021 रोजी तक्रारदाराने सामनेवाला यांचे शोरुमच्या आवारामध्ये सदर गाडी आणून सोडली असे सामनेवाला कथन करतात. सदरची बाब शाबीत करणेसाठी सामनेवाला यांनी त्याचे शोरूमच्या जागेमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमे-याचे फुटेज दाखल करु शकले असते. तसे सामनेवाला यांनी केलेले नाही. यावरुन तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून दुरुस्तीसाठी दिलेले वाहन ताब्यात घेतलेले नाही ही बाब स्पष्ट होते. तसेच तक्रारदाराच्या अपघातग्रस्त वाहनाच्या दुरुस्तीसाठीचा आलेला खर्च दि न्यु इंडिया एशोरन्स कंपनीने परस्पर सामनेवाला क्र.1 यांना अदा केलेला होता. वास्तविक तक्रारदाराने जेव्हा सामनेवाला क्र.1 यांचे ताब्यात वाहन दुरुस्तीसाठी दिले होते. त्यानंतर सदर वाहनाची काळजी घेणेची जबाबदारी सामनेवाला क्र.1 व 2 यांची होती. यामध्ये सामनेवाला क्र.1 व 2 यांचा निष्काळजीपणा सिध्द होतो. त्यामुळे तक्रारदाराला वाहन दुरुस्त करुन वेळेत न मिळाल्यामुळे झालेल्या नुकसानीस सामनेवाला क्र.1 व 2 हे जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
12. सामनेवाला क्र.3 ही विविध कंपन्यांचे इन्शुरन्स करुन देणारी एजंट कंपनी असून तक्रारदाराचे अपघातग्रस्त वाहनाचा इन्शुरन्स दि न्यु इंडिया एशोरन्स कंपनीकडून सामनेवाला क्र.1 यांना मिळालेला असलेने सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदारास कोणतीही सेवेत त्रुटी दिलेली नाही या निष्कार्षाप्रत हे आयोग येत आहे.
13. तक्रारदाराचे अपघातग्रस्त वाहन दुरुस्त करुन देण्याची हमी सामनेवाला क्र.1 व 2 यांनी घेतलेली होती. परंतु सामनेवाला क्र.1 व2यांच्या निष्काळजीपणामुळे व बेजबाबदारपणामुळे तक्रारदाराचे वाहन वेळेत दुरुस्त झाले नसलेने सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवलेचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडून वाहन सुस्थितीत दुरुस्ती करुन मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर या आयोगाने होकारार्थी दिले आहे.
14 सामनेवाला यांनी तक्रारदारास वेळेत गाडी दुरुस्त करुन न दिलेने तसेच तक्रारदाराचा बांधकाम व्यवसायाकरिता फिरतीवर जावे लागत असलेने तक्रारदार यांनी एसडी टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स यांची गाडी भाडयाने घेतलेबाबतचे एकूण 10 बीले नि.6/6 कडे दाखल केली आहेत. सदर बीलांचे अवलोकन करता सदरची बीले दि.19/07/2019 ते 31/08/2019 या कालावधीतील दिसून येतात. सदर बीलावर तक्रारदार खेड ते मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, महाड, पनवेल, रत्नागिरी याठिकाणी फिरलेचे दिसून येते. तसेच नि.28 कडे सदर एस डी टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स चे श्री शुभम दिपक दरेकर यांचे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. परंतु सदर कालावधीत वर नमुद सर्व ठिकाणी एकाचवेळी तक्रारदाराचा व्यवसाय सुरु होता याबाबतचा कोणताही पुरावा तक्रारदाराने याकामी दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदाराने त्यांचे पुराव्याचे शपथपत्रामध्ये सामनेवाला यांनी वेळेत गाडी दुरुस्त करुन न दिलेने तक्रारदारांची अनेक बांधकामाची कामे वेळेत साईटसवर पोहचू न शकल्यामुळे हातून निघून गेली व त्याचे तक्रारदारास रक्कम रु.15,00,000/- चे आर्थिक नुकसान झाले असे कथन केले आहे. परंतु तक्रारदाराने भाडयाने घेतलेल्या गाडीचे बीलाचे अवलोकन केले असता तक्रारदाराने त्यांचे गाडीचा दि.18/07/2019 रोजी अपघात झालेच्या दुस-या दिवसापासून गाडी भाडयाने घेतलेचे बील दाखल केले आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी वाहन दुरुस्ती करुन वेळेत न दिल्यामुळे तक्रारदाराचे बांधकाम व्यवसायाचे झालेल्या नुकसान भरपाईची मागणी हे आयोग फेटाळत आहे. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदाराचे अपघातग्रस्त वाहनामध्ये दुरुस्तीवेळी गाडीच्या ओरिजिनल आणि विना खराब पार्टसमध्ये देखील बेकायदेशीरपणे फेरफार करुन जुने व खराब पार्ट बसविले असल्याची शक्यता असलेने तक्रारदारास सामनेवालाकडून अपघातग्रस्त गाडीची संपूर्ण किंमत रु.7,10,895/- अथवा जुन्या गाडीच्या बदल्यात नवीन इग्निस कार मिळावी अशी मागणी केली आहे. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदाराचे वाहनामध्ये दुरुस्तीवेळी गाडीच्या ओरिजिनल आणि विना खराब पार्टसमध्ये बेकायदेशीरपणे फेरफार करुन जुने व खराब पार्ट बसविले बाबतचा कोणताही पुरावा तक्रारदाराने याकामी दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदार सामनेवाला यांचेकडून तक्रारदाराची अपघातग्रस्त वाहन सुस्थितीत दुरुस्त करुन मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी तसेच खर्चाच्या नुकसान भरपाईपोटी म्हणून रक्कम रु.36,17,452/- ची मागणी केलेली आहे. सदरची मागणी अवाजवी व अवास्तव असलेने फेटाळण्यात येते. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदारास वेळेत अपघातग्रस्त वाहन दुरुस्त करुन न दिलेने तक्रारदारास झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी तक्रारदार रक्कम रु.50,000/- मिळणेस पात्र आहेत. तसेच तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्रमांकः 4 –
15. सबब, वरील सर्व विवेचनांचा विचार करता प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना अपघातग्रस्त वाहनाची दुरुस्ती करुन वाहन सुस्थितीत तक्रारदाराचे ताब्यात दयावे.
3) सामनेवाला क्र.1 व2 यांनी तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.50,000/-(रक्कम रुपये पन्नास हजार फक्त) व मानसिक, शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (रुपये दहा हजार फक्त) व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता सामनेवाला क्र.1 व 2 यांनी आदेशाची प्रत मिळाले
तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) सामनेवाला क्र.3 यांचेविरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
6) विहीत मुदतीत सामनेवाला क्र.1 व 2 यांनी आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण
कायदयातील तरतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
7) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.