(पारीत व्दारा श्रीमती वृषाली जागीरदार,मा.सदस्या)
(पारीत दिनांक-17 सप्टेंबर, 2021)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष विक्रेत्या विरुध्द दोषपूर्ण मशीनचे साहित्याची विक्री केल्याने सदर मशीनचे साहित्याची दुरुस्त करुन मिळावी किंवा सदर मशीनचे साहित्य बदलवून दयावे तसेच ईतर अनुषंगीक मागण्यांसाठी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता हा उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून तो दुचाकी वाहन दुरुस्तीची कामे करतो व त्यावरच त्याचा व त्याचे कुटूंबियाचा उदरनिर्वाह आहे. तो नेहमीच विरुध्दपक्षा कडून दुचाकी वाहन दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य मशीनरी, हायड्रोलिक रॅम्प, सर्व्हीसिंग मशीन, हवा मशीन, न्युमीटीक गन विकत घेत असतो. विरुध्दपक्षाचे रजत इंजिनअरींग अॅन्ड मील स्टोअर्स, जनरल मर्चंट अॅन्ड गव्हरनमेंट ऑर्डर सप्लायरचे काम आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा कडून साहित्य विकत घेतले असल्याने तो विरुध्दपक्षाचा ग्राहक आहे. विरुध्दपक्षाने तो प्रोटेक्ट कंपनीचा हायड्रोलीक रॅम्पचा डिलर असल्याचे सांगितले, त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक-12 मे, 2018 रोजी विरुध्दपक्षा कडून दुचाकी वाहन दुरुस्तीसाठी लागणारे खालील साहित्य विकत घेतले त्याचा तपशिल खालील प्रमाणे आहे-
अक्रं | साहित्य | नग | किम्मत |
1 | हायड्रोलिक रॅम्प | 2 | 54,000/- |
2 | हायड्रोलिक पॉवर पॅक | 1 | 29,000/- |
3 | हायड्रोलिक अॅसेसरीज | 2 | 6000/- |
4 | निडल वॉल | 2 | 24,000/- |
5 | इन्स्टालेशनचा खर्च | | 5000/- |
| एकूण - | | 96,400/- |
अशाप्रकारे वर नमुद केल्या प्रमाणे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा कडून दिनांक-12.05.2018 रोजी एकूण रुपये-96,400/- चे विकत घेतले, विक्रीच्या वेळी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास नगदी रुपये-40,000/- दिले व उर्वरीत रक्कम रुपये-56,400/- स्टेट बॅंक ऑफ इंडीया, शाखा भंडारा धनादेश क्रं-356746, दिनांक-21.06.2018 अन्वये तक्रारकर्त्याने भंडारा येथील त्याचे दुकानातून विरुध्दपक्षाला दिली.
तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, सदर साहित्य विक्रीचे वेळी विरुध्दपक्षाने साहित्या बाबत मौखीक 5 वर्षाची गॅरन्टी/वॉरन्टी दिली होती व मशीन मध्ये कोणताही बिघाड झाल्यास मशीन दुरुस्त करुन देण्यात येईल किंवा मशीनरी मधील बिघाड दुरुस्त न झाल्यास मशीन बदलवून देण्यात येईल अशी हमी दिली होती. त्यावेळी तक्रारकर्त्याने सदर साहित्याचे बिल मिळावे अशी मागणी केली होती परंतु विरुघ्दपक्षाने सदर साहित्याचे बिल न देता स्वतःच्या इंजिनियरींग स्टोअर्सचे नावे बिल/पावती दिली. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने सदर साहित्याची मूळ पावती न देता तक्रारकर्त्याची फसवणूक केली. जून-2018 मध्ये विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचे दुकानात स्वतः येऊन सदरची मशीन लावून दिली परंतु त्याच दिवसां पासून मशीन मध्ये समस्या निर्माण झाल्यात, मशीन मध्येच आपोआप बंद पडत होती, वारंवार प्रयत्न करुनही मशीन सुरळीत चालत नव्हती, सदर बाब विरुध्दपक्षाचे निदर्शनास आणून दिली असता मशीनवर काही दिवस काम केल्या नंतर समस्या निघून जाईल असे सांगितले परंतु समस्या दुर झाल्या नाहीत. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाची प्रत्यक्ष भेट घेतली असता त्याने मशीन दुरुस्त करुन देण्याचे आश्वासन दिले परंतु त्यानंतर वारंवार दुरध्वनी वरुन सुध्दा उत्तर देण्याचे विरुध्दपक्षाने टाळले. मशीन नादुरुस्त असल्यामुळे तक्रारकर्त्याचे ग्राहकांनी दुकानाकडे पाठ फीरवली त्यामुळे त्याला आर्थिक अडचणींना तोंड दयावे लागत आहे व कुटूंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न त्याचे समोर निर्माण झालेला आहे. त्याचे प्रतीमाह रुपये-10,000/- प्रमाणे एकूण रुपये-1,20,000/- चे नुकसान झाले तसेच त्याला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे म्हणून त्याने वकीलांचे मार्फतीने विरुध्दपक्षाला दिनांक-25.06.2019 रोजी नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविली, सदर नोटीस विरुध्दपक्षाला मिळाली परंतु कोणताही प्रतिसाद दिला नाही. म्हणून शेवटी त्याने प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षा विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास विकलेल्या मशीन्स दुरुस्त करुन देण्याचे आदेशित व्हावे किंवा सदर मशीन्स विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला बदलवून दयावे.
- विरुध्दपक्षाने दोषपूर्ण सेवा दिल्याने त्याला झालेल्या मानसिक त्रासा बद्दल रुपये-25,000/- आणि आर्थिक व शारिरीक त्रास दिल्या बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-1,50,000/- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
- सदर तक्रारीचा खर्च म्हणून विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला रुपये-20,000/- देण्याचे आदेशित व्हावे.
- या शिवाय योग्य ती दाद त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्षाने लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. त्याने लेखी उत्तरा मध्ये जिल्हा ग्राहक आयोगास सदर तक्रार चालविण्याचे अधिकार क्षेत्र येत नसल्याचा आक्षेप घेतला. तक्रारकर्ता हा दुचाकी वाहन दुरुस्तीचे कामे करतो आणि त्यावर त्याचा व कुटूंबाचा उदरनिर्वाह आहे ही बाब नामंजूर केली. तक्रारकर्त्याने त्याचा व्यवसाय असल्या बाबत एकही दस्तऐवजी पुरावा दाखल केलेला नाही. विरुध्दपक्षाने तो पोटेक्ट कंपनीचा Hydraulic Ramp चा डिलर असल्याची बाब नामंजूर केली. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा कडून दिनांक-12.05.2018 रोजी दुचाकी वाहन दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य विकत घेतल्याची बाब तसेच त्यासाठी तक्रारकर्त्याने रुपये-40,000/- नगदी आणि उर्वरीत रुपये-56,400/- धनादेशाव्दारे विरुध्दपक्षाला दिल्याची बाब नामंजूर केली. त्यामुळे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला सदर साहित्या वर मौखीकरित्या पाच वर्षाची गॅरन्टी/वॉरन्टी देण्याचा प्रश्नच उदभवत नसल्याचे नमुद केले. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास कोणत्याही प्रकारचे साहित्य विक्री केलेले नसल्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक होत नाही. तक्रारकर्त्याची दिनांक-25.06.2019 रोजीची रजिस्टर पोस्टाने पाठविलेली कोणतीही नोटीस विरुध्दपक्षाला मिळालेली नाही त्यामुळे नोटीसला उत्तर देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रारच नामंजूर केली. तसेच तक्रारीतील विरुध्दपक्षा विरुध्द केलेल्या संपूर्ण मागण्या या नामंजूर केल्यात. आपले विशेष कथनात नमुद केले की, तक्रारकर्ता हा ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम-2 (d) (II) प्रमाणे विरुध्दपक्षाचा ग्राहक होत नाही. तक्रारकर्ता हा स्वच्छ हाताने जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष आलेला नाही आणि त्याने सदर तक्रार दाखल करुन कायदयातील तरतुदीचा दुरुपयोग केलेला आहे. तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रार ही खोटी, चुकीची, दिशाभूल करणारी आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा कडून कोणतीही सेवा घेतलेली नाही. सदर प्रकरणा मध्ये विस्तृत प्रमाणावर साक्षी पुरावा, उलट तपासणी होणे आवश्यक आहे आणि तक्रारीचे स्वरुप हे दिवाणी स्वरुपाचे असल्याने सदर तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र हे दिवाणी न्यायालयासच येते, जिल्हा ग्राहक आयोगास येत नसल्याने, सदर तक्रार ही खारीज होण्यास पात्र असल्याचे नमुद केले. तक्रारकर्त्याने जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष प्रस्तुत तक्रार ही दुषीत हेतूने आणि विरुध्दपक्षाला त्रास देण्याचे उद्देश्याने दाखल केलेली आहे.तक्रारकर्त्याचे तक्रारी मध्ये दर्शविलेले साहित्य जर व्यवस्थितरित्या काम करीत नव्हते असे त्याचे म्हणणे आहे तर त्या बाबत त्याने कधी तरी विरुध्दपक्षा कडे लेखी तक्रार केली काय आणि अशी लेखी तक्रार केल्या बाबतचा पुरावा जिल्हा ग्राहकआयोगा समक्ष दाखल केलेला आहे काय. तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष यांचे मध्ये व्यवहार झाल्या बाबत तक्रारकर्त्याने त्या बाबतचे बिल/इन्व्हाईस अभिलेखावर दाखल करावे. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन तक्रारकर्त्याची तक्रार रुपये-25,000/- खर्च बसवून खारीज करावी असा आक्षेप विरुध्दपक्षाने घेतला.
04. तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत रजत इंजिनअरींग अॅन्ड मिल स्टोअर्स, जरीपटका नारा रोड, नागपूर दिनांक-12.05.2018 रोजीची त्याचे नावे दिलेल्या डिलेव्हरी मेमोची प्रत दाखल केली. तसेच विरुध्दपक्षाला रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविल्या बाबत पोस्टाची पावती व पोच दाखल केली. तसेच तक्रारकर्त्याने त्याचे स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा भंडारा येथील खाते उतारा प्रत दाखल केली. तक्रारकर्त्याने त्याचा शपथे वरील पुरावा दाखल केला. तसेच तक्रारकर्त्याने सहाय्यक आयुक्त, लेबर ऑफीस, भंडारा येथील महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नियम-2018 नमुना ग सुचना दिल्या बाबतची पावती दाखल केली.
05. विरुध्दपक्षाने लेखी उत्तरा सोबत कोणतेही दस्तऐवज दाखल केले नाही. तसेच पुरसिस दाखल करुन त्याचे लेखी उत्तरालाच त्याचा शपथे वरील पुरावा समजावा असे नमुद केले. विरुध्दपक्षा तर्फे त्याचे अधिवक्ता यांनी स्वतःचे सहीचा लेखी युक्तीवाद दाखल केला.
06. तक्रारकर्त्याची तक्रार, दाखल दस्तऐवज, त.क.चा शपथे वरील पुरावा व लेखी युक्तीवाद तसेच विरुध्दपक्षाचे लेखी उत्तर व शपथे वरील पुराव्या बाबत दिलेली पुरसिस तसेच लेखी युक्तीवाद ईत्यादीचे जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे सुक्ष्म अवलोकन करण्यात आले. प्रकरणातील वस्तुस्थिती पाहता जिल्हा ग्राहक आयोगा समोर खालील मुद्दे न्यायनिवारणार्थ उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
01 | तक्रारकर्ता हा विरुदपक्षाचा ग्राहक होतो काय? | होय |
02 | तक्रारकर्त्यास विरुध्दपक्षाने विक्री केलेले साहित्य नादुरुस्त असून ते दुरुस्त करुन न दिल्याने त्याला विरुध्दपक्षाने दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | होय |
03 | काय आदेश | अंतीम आदेशा नुसार |
-कारणे व मिमांसा-
मुद्दा क्रं 1 ते 3
07. तक्रारकर्त्याने रजत इंजिनअरींग अॅन्ड मिल स्टोअर्स, जनरल मर्चंट अॅन्ड गव्हरनमेंट ऑर्डर सप्लायर्स, एल.आय.जी.-1/बी-7/50, हुडको कॉलिनी, जरीपटका, नारा रोड, नागपूर यांनी दिनांक-12.05.2018 रोजी त्याचे नावे जारी केलेल्या डिलेव्हरी मेमोची प्रत अभिलेखावर दाखल केली, त्यानुसार त्याने तक्रारी मध्ये नमुद केलेले साहित्य एकूण रुपये-96,400/- ला विकत घेतल्याचे आणि नगदी रुपये-40,000/- आणि उर्वरीत रुपये-56,400/- असल्याचे त्यावर नमुद असून त्या खाली विक्रेत्याची सही आहे. सदर डिलेव्हरी मेमोचा क्रं-208 असा नमुद आहे. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, त्याने उर्वरीत रक्कम रुपये-56,400/- विरुध्दपक्षाला त्याचे स्टेट बॅंक ऑफ इंडीया भंडारा शाखेतील धनादेश क्रं-356746, धनादेश दिनांक-21.06.2018 अन्वये दिली या संबधात पुराव्या दाखल त्याने त्याचे स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा केशव भवन, भंडारा येथील असलेले खाते क्रं-311555545006 चे खाते उता-याची प्रत दाखल केली, त्या अनुसार GUPTA RAJATKUMAR KALIKAPR यास CHEQUE NO.-356746 अन्वये रुपये-56,400/- तक्रारकर्त्याचे बॅंक खात्या मधून डेबीट झाल्याची नोंद अभिलेखावर दाखल बॅंकेच्या खाते उता-या वरुन दिसून येते. अशाप्रकारे तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याने विरुध्दपक्ष राजेश गुप्ता यास मशीन्स पोटी एकूण रुपये-96,400/- अदा केल्या बाबत पुरावा अभिलेखावर दाखल केला, त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा “ग्राहक” होतो म्हणून आम्ही मुद्दा क्रं-1 चे उत्तर “होकारार्थी” नोंदवित आहोत.
08. विरुध्दपक्ष राजेश गुप्ता यांनी आपल्या उत्तरा मध्ये तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रार ही खोटी, चुकीची असल्याचे नमुद केले तसेच त्याने कोणतेही साहित्य तक्रारकर्त्यास विक्री केलेले नसल्याचा उजर घेतलेला आहे परंतु वर नमुद केल्या प्रमाणे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष राजेश गुप्ता यास उर्वरीत रक्कम धनादेशाव्दारे अदा केल्याचा बॅंक खाते उता-या मधील नोंदीचा पुरावा दाखल केलेला आहे. क्षणभरासाठी असेही गृहीत धरले की, विरुध्दपक्ष राजेश गुप्ता यांचे सांगण्या प्रमाणे त्यांनी कोणतेही साहित्य तक्रारकर्त्यास विक्री केलेले नाही तर राजेश गुप्ता यांनी तक्रारकर्त्याने दिलेला धनादेश वटविण्याचे प्रयोजन काय? , ज्याअर्थी विरुध्दपक्ष राजेश गुप्ता यांनी तक्रारकर्त्याने देऊ केलेला धनादेश बॅंकेतून वटवून उर्वरीत रक्कम उचल केलेली आहे, त्याअर्थी त्याने तक्रारकर्ता म्हणतो त्या प्रमाणे तक्रारकर्त्याला साहित्याची विक्री करुन रजत इंजिनिअरींग अॅन्ड मिल्स स्टोअर्सचे नावे डिलेव्हरी मेमो दिलेला आहे आणि आता सदर डिलेव्हरी मेमो विरुध्दपक्ष राजेश गुप्ता नाकारु शकत नाही. विरुध्दपक्ष राजेश गुप्ता याने जे लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेले आहे त्यामध्ये सत्यापनाचे खाली राजेश गणेशप्रसाद गुप्ता, प्रोप्रायटर रजत इंजिनिअरींग अॅन्ड मिल स्टोअर्स जरीपटका नागपूर असे टायटल टाकून खाली सही केलेली आहे. यावरुन ही बाब सिध्द होते की, राजेश गणेशप्रसाद गुप्ता हे रजत इंजिनिअरींग अॅन्ड मिल स्टोअर्स, नागपूर या फर्मचे प्रोप्रायटर आहे आणि रजत इंजिनअरींग वर्क्स फर्मचे त्याने तक्रारकर्त्याचे नावे बिल दिलेले आहे . त्यांनी तक्रारकर्त्याने त्यास देऊ केलेल्या धनादेशाची रक्कम बॅंकेतून वटविल्याची बाब सिध्द होत असल्याने त्यांनी घेतलेला बचाव हा संपूर्णपणे खोटा असल्याचे दिसून येते. विरुध्दपक्ष राजेश गणेशप्रसाद गुप्ता याचा एकंदरीत व्यवहार हा बनवाबनवीचा दिसून येतो आणि त्याची ग्राहकास सहकार्य न करण्याची नकारात्मक भूमीका दिसून येते.
09. तक्रारकर्त्याने रजत इंजिनिअरींग वर्क्सच्या लोगोची प्रत अभिलेखावर दाखल केलेली आहे त्यावर रजत इंजिनिअरींग वर्क्स असे नमुद असून राजेश गुप्ता आणि रजत गुप्ता अशी नावे आणि त्यांचे मोबाईल क्रमांक नमुद आहेत. सर्व्हीस स्पेअर्स अॅन्ड ए.एम.सी आल टाईप एअर कॉम्प्र. वॉशिंग पम्प, गन, हायड्रोलीक जॅक, टू पोस्ट लिफट टू व्हीलर रॅम्प एस.पी.सी.टी. ईम्पॅक्ट गन असे नमुद असून पत्ता मेयो हॉस्पीटल स्क्वेअर नियर रामझुला, सी.ए.रोड, नागपूर असा नमुद आहे.
10. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष राजेश गुप्ता यास वकील श्री प्रमोदकुमार काटेखाये यांचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने दिनांक-25.06.2019 रोजी पाठविलेल्या नोटीसची प्रत दाखल केली. तसेच सदर नोटीस विरुध्दपक्षाला मिळाल्या बाबत रजिस्टर पोस्टाची पोच सुध्दा दाखल केली. विरुध्दपक्षाने सदर नोटीस मिळाली नसल्याचा बचाव घेतलेला आहे परंतु विरुध्दपक्षाच्या या बचावा मध्ये रजिस्टर पोच पाहता जिल्हा ग्राहक आयोगास कोणतेही तथ्य दिसून येत नाही. विरुध्दपक्ष राजेश गुप्ता याने तक्रारकर्त्यास मशीनचे पार्टस विक्री करुनही मी ते विकलेच नाही अशी जी भूमीका घेतलेली आहे त्या भूमीकेस विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याने देऊ केलेला धनादेश बॅंकेतून वटविल्याची बाब सिध्द झालेली असल्याने त्या भूमीकेस छेद मिळालेला आहे. दुसरी बाब अशी आहे की, तक्रारकर्त्याची रजि. नोटीस प्राप्त होऊनही त्याची कोणतीही दखल विरुध्दपक्षाने घेतलेली नाही, उलट रजि. नोटीस मिळालीच नाही त्यामुळे उत्तर देण्याचा प्रश्नच उदभवत नाही अशी भूमीका घेतलेली आहे. तक्रारकर्त्या कडून मोबदला प्राप्त होऊनही त्याचे तक्रारी कडे शेवट पर्यंत र्दुलक्ष्य केल्यामुळे शेवटी तक्रारकर्त्यास जिल्हा ग्राहक आयोगा समोर तक्रार दाखल करावी लागली. तक्रारकर्त्याचे अधिवक्ता यांची नोटीस मिळाल्या नंतर विरुध्दपक्ष राजेश गुप्ता हा मोक्यावर जाऊन त्याचे कडील मशीनची पाहणी करु शकला असता परंतु तसे त्याने केल्याचे दिसून येत नाही. तक्रारकर्त्याने मशीनचे साहित्य घेताना इन्स्टालेशन चॉर्जेस म्हणून रुपये-5000/- सुध्दा बिला प्रमाणे विरुध्दपक्षास अदा केल्याचे बिला वरुन दिसून येते परंतु मशीन बंद पडल्यामुळे त्याचा सदर इन्स्टालेशनचा खर्च सुध्दा वाया गेला तसेच व्यवसाय बंद पडल्यामुळे त्याचे आर्थिक नुकसान झाले या बाबी सिध्द होतात. ग्राहका कडून मोबदला संपूर्ण घ्यायचा परंतु सेवा दयावयाची नाही अशी विरुध्दपक्षाची भूमीका आहे. अशाप्रकारे विरुध्दपक्ष राजेश गुप्ता याने तक्रारकर्त्याचे तक्रारीची कोणतीही दखल न घेऊन त्याला दोषपूर्ण सेवा दिली आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याची बाब सिध्द होते असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्रं 2 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत. विरुध्दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसिक त्रास झाला आणि तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समोर दाखल करावी लागली, त्यामुळे तक्रारकर्ता हा निश्चीतच विरुध्दपक्षा कडून आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहे.
11. उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे मुद्दा क्रं 1 व क्रं 2 चे उत्तर होकारार्थी आल्याने तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर होण्यास पात्र असून आम्ही मुद्दा क्रं 3 अनुसार प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::अंतिम आदेश::
- तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष रजत इंजिनिअरींग अॅन्ड मील स्टोअर्स, जरीपटका, नागपूर ऑथोराईज्ड डिलर आफ एअर कॉम्प्रेसर अॅन्ड गॅरेज इक्विपमेंटस ही फर्म आणि तिचा प्रोप्रायटर राजेश गणेशप्रसाद गुप्ता यांचे विरुध्द वैयक्तिक व संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष रजत इंजिनिअरींग अॅन्ड मील स्टोअर्स, जरीपटका, नागपूर ऑथोराईज्ड डिलर आफ एअर कॉम्प्रेसर अॅन्ड गॅरेज इक्विपमेंटस ही फर्म आणि तिचा प्रोप्रायटर राजेश गणेशप्रसाद गुप्ता यांना आदेशित करण्यात येते की, सदर फर्मचे बिल क्रं-208, बिल दिनांक-12.05.2018 प्रमाणे तक्रारकर्त्यास बिला मधील अनुक्रमांक-1 ते 4 प्रमाणे विक्री केलेले साहित्य प्रत्यक्ष तक्रारकर्त्याचे मोक्यावर जाऊन दुरुस्त करुन दयावे व ते चालू झाल्या बाबत त्याचे प्रात्यक्षिक तक्रारकर्त्यास करुन दाखवावे व दुरुस्त केल्या बाबत तक्रारकर्त्या कडून लेखी घ्यावे. काही कारणास्तव सदर साहित्य/मशीन्स सुरु न झाल्यास तसेच दुरुस्त केल्याचे तारखे नंतर एक वर्षाचे आत बिलातील नमुद साहित्या मध्ये बिघाड निर्माण झाल्यास विरुध्दपक्षाचे बिलातील नमुद अ.क्रं 1 ते 4 वर्णनातीत साहित्य विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास कोणतेही शुल्क न आकारता बदलवून त्याऐवजी त्याच कंपनीचे व त्याच मॉडेलचे नविन साहित्य दयावे व बदलवून दिलेल्या मशीन/साहित्याची वॉरन्टी गॅरन्टीचे दस्तऐवज व नव्याने बिल विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास दयावे.
- तक्रारकर्त्याला झालेल्या आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-30,000/- (अक्षरी रुपये तीस हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) अशा रकमा विरुध्दपक्ष रजत इंजिनिअरींग अॅन्ड मील स्टोअर्स, जरीपटका, नागपूर ऑथोराईज्ड डिलर आफ एअर कॉम्प्रेसर अॅन्ड गॅरेज इक्विपमेंटस ही फर्म आणि तिचा प्रोप्रायटर राजेश गणेशप्रसाद गुप्ता यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्यास दयाव्यात.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष रजत इंजिनिअरींग अॅन्ड मील स्टोअर्स, जरीपटका, नागपूर ऑथोराईज्ड डिलर आफ एअर कॉम्प्रेसर अॅन्ड गॅरेज इक्विपमेंटस ही फर्म आणि तिचा प्रोप्रायटर राजेश गणेशप्रसाद गुप्ता यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणितप्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
(05) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(06) उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्त फाईल्स त्यांनी जिल्हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून घेऊन जाव्यात.