जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 349/2008. प्रकरण दाखल तारीख - 22/10/2008 प्रकरण निकाल तारीख - 09/01/2008 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या सौ.अनुसयाबाई भ्र.नामदेवराव सोनकांबळे, अर्जदार वय वर्षे 45, व्यवसाय घरकाम, रा.डॉ.अंबेडकरनगर, नांदेड. विरुध्द राज लाईट हाऊस,प्रो.प्रा. गैरअर्जदार श्री.गुरुगोविंदसिंघजी रोड,संतकृपा मार्केटच्या समोर, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.पी.सोनकांबळे. गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.एस.के.दागडीया. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्या) यातील अर्जदार यांची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार यांनी गैरअर्जदार यांनी स्वतः निर्माण केलेले कुलर3 रिट स्टिल कुलर 1 दि.26/04/2008 रोजी रक्कम रु.2,400/- देऊन खरेदी केलेला आहे. कुलर खरेदी करतांना गैरअर्जदार यांनी सदर कुलरची वॉरंटी एक वर्षाची दिली होती आणि कुलरची मोटार जळाले तरच ती बदलुन मिळेल अन्यथा नाही असे सांगितले होते. सदर कुलर खरेदी केल्यानंतर फक्त दहा दिवसांच्या आंत म्हणजे दि.06/05/2008 रोजी कुलरची मोटार जळाली अर्जदाराने सदरील कुलर गैरअर्जदाराच्या दुकानात नेले त्यांनी ती दुरुस्त करुन दिली. यानंतर अनेक वेळा कुलरची मोटार जळाली तेंव्हा गैरअर्जदाराने सांगितले की, मोटार ही हलक्या प्रतीची आहे, चांगल्या प्रतीची पाहीजे असल्यास रु.400/- आगऊचे दिले व पावतीवर रेट डिफरन्स असे लिहुन दिले व कुलरला नवीन मोटर बसवुन दिले आणि असे सांगितले की, मोटारमध्ये पाणी गेल्यामुळे मोटर जळाली आहे. पुन्हा मोटार अनेक वेळा कुलरची मोटार जळाली तेंव्हा दि.12/10/2008 रोजी मोटर बसविले आणि ती अवघ्या दोनच दिवसात जळाली म्हणुन कुलर दुकानावर आणला असता, मोटारीत पाणी जाऊन मोटारीत पाणी जाऊन मोटार कशी जळते असे विचारले आणि मोटारीचे पैसे परत घेऊन जा आता बदलुन मिळणार नाही असे सांगितले. मोटारीची किंमत म्हणुन गैरअर्जदार यांनी रु.700/- परत करत होता. दि.15/10/2008 रोजी गैरअर्जदार यांनी कुलरची दुरुस्ती न करता अर्जदारास परत पाठविला. गैरअर्जदार यांनी अर्जदारास कुलर दुरुस्त करुन न दिल्यामुळे अर्जदारास खुप मानसिक त्रास सहन करावा लागला. म्हणुन त्यांनी ही तक्रार दाखल करुन तीद्वारे कुलरची किंमत रु.2,400/- + 400/- आणि रु.16,000/- मानसिक त्रासापोटी व दावा खर्च म्हणुन रु.1,200/- असे एकुण रु.20,000/- गैरअर्जदार यांचेकडुन मिळावेत अशी विनंती केली आहे. यातील गैरअर्जदार यांना नोटीस देण्यात आली त्यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला, त्यांचे म्हणणे असे की, अर्जदार यांना तक्रार दाखल करण्याचा कोणतेही कारण नाही. गैरअर्जदार यांनी कोणत्याही प्रकारची सेवेमध्ये कमतरता केलेली नाही किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंबन केलेले नाही. अर्जदार ग्राहक या व्याख्येत बसत नाही म्हणुन सदर प्रकरण चालविण्याचा या मंचास अधिकार नाही. अर्जदाराने आपल्या पंसतीचे कुलर विकत घेतले हे त्यांनी मान्य केले आहे.तसेच कुलरची वॉरंटी ही एक वर्षाची होती हेही मान्य आहे. परंतु एका वर्षात कुलरची मोटार जळाल्यास ती मोटार अर्जदाराच्या पैसाने मोटार बदलुन देण्याचे मान्य केले. कारण कुलरचे मोटारीचे उत्पादन गैरअर्जदार करीत नाही म्हणुन त्याबाबत कोणतेही गॅरंटी देण्यात आलेली नाही. मोटर जळाल्याच तक्रार अर्जदाराने गैरअर्जदाराकडे केली होती, अर्जदाराच्या निष्काळजीपणामुळे मोटारीत पाणी गेल्यामुळे मोटार जळाली आणि ती गैरअर्जदार यांनी बदलुन दिली. अर्जदारास निकृष्ट दर्जाचा कुलर विक्री केला आणि तो वारंवार खराब होत आहे हे म्हणुन चुकीचे व खोटे असुन मान्य नाही. अर्जदार यांनी केलेली इतर विपरीत विधाने गैरअर्जदार यांनी अमान्य केली आणि असा उजर घेतला की, अर्जदाराची तक्रार ही खर्चासह फेटाळण्यात यावी. अर्जदार यांचा अर्ज,शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र आणि दोन्ही पक्षकार यांचे वकीलांचा युक्तीवाद याचा विचार होता खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय. 3. काय आदेश ? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडुन दि.26/04/2008 रोजी 3 Rit Steel -1 cooler रक्कम रु.2,400/- एवढया किंमतीस खरेदी केलेले आहे, त्याबाबतची पावती अर्जदार यांनी अर्जासोबत मंचामध्ये दाखल केलेली आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडुन कुलर खरेदी केल्याची बाब गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये व शपथपत्रामध्ये नाकारलेले नाही. अर्जदार यांचा अर्ज,शपथपत्र त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे याचा विचार होता, अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत, असे या मंचाचे मत आहे. मुद्या क्र. 2 अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडुन दि.26/04/2008 रोजी कुलर खरेदी केलेले आहे. सदर कुलरची एक वर्षाची वॉरंटी गैरअर्जदार यांनी लिहुन दिलेले आहे. अर्जदार यांनी सदरचे कुलर खरेदी केल्यानंतर दहा दिवसांनी दि.06/05/2008 रोजी मोटर जळाल्याने कुलर बंद पडल्यामुळे दुरुस्तीसाठी गैरअर्जदार यांचेकडे घेऊन गेले असता मोटारीत पाणी गेल्यामुळे मोटर जळाली असे गैरअर्जदार यांनी सांगितले त्यानंतर पुन्हा दि.04/05/2008 रोजी मोटर जळाली म्हणुन अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचे दुकानात जाऊन कुलर दुरुस्त करुन घेतली त्यानंतर पुन्हा दि.25/05/2008 रोजी मोटर जळाली तेव्हीही अर्जदार यांनी कुलर गैरअर्जदार यांचे दुकानात घेऊन गेल्यानंतर गैरअर्जदार यांनी सदरची मोटर ही हलक्या प्रतीची असल्याने चांगल्या प्रतीची मोटर पाहीजे असल्यास रक्कम रु.400/- आगाऊ द्यावे लागेल असे सांगितल्याने अर्जदार यांनी रक्कम रु.400/- गैरअर्जदार यांना दिले तसे गैरअर्जदार यांनी अर्जदार यांच्या दि.26/04/2008 रोजीच्या कुलर खरेदीच्या पावतीवर मोटर रेट डिफरन्स रु.400/- असे लिहुन दिलेले आहे. अर्जदार यांची मोटर त्यानंतरही अनेक वेळा जळाल्याची अर्जदार यांनी त्यांच्या अर्जामध्ये नमुद केलेली आहे, शेवटी दि.12/10/2008 रोजी बसवुन दिलेली मोटर अवघ्या दोनच दिवसात जळाली तेव्हा अर्जदार हे गैरअर्जदार यांचे दुकानात दुरुस्तीसाठी गेले असता गैरअर्जदार यांनी कुलरची मोटर दुरुस्त न करता अर्जदारास परत पाठविले. अर्जदार यांनी सदरचे कुलर खरेदी केल्यानंतर गैरअर्जदार यांनी त्यांना घरी येऊन मोटर दुरुस्त करणे बाबत कोणतेही सहकार्य केले नाही, प्रत्येक वेळा अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडे दुरुस्तीसाठी कुलर घेऊन गेलेले आहेत, ही बाब स्पष्ट होत आहे. अर्जदार यांनी घेतलेला कुलर हा गैरअर्जदार यांनी स्वतः तयार केलेला आहे व त्याची एक वर्षाची वॉरंटी आहे. अर्जदार यांनी दि.26/04/2008 रोजी कूलर खरेदी केलेले आहे म्हणजेच त्याची वॉरंटी दि.27/04/2009 पर्यंत अबाधीत आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये अर्जदार यांनी घेतलेल्या कुलरमध्ये काही दोष निर्माण झाल्यास तो दुरुस्त करुन देणेची पुर्णपणे जबाबदारी गैरअर्जदार यांची आहे. परंतु अर्जदार यांनी शेवटी दि.15/10/2008 रोजी गैरअर्जदार यांचेकडे कुलर दुरुस्तीस नेले असता गैरअर्जदार यांनी तो दुरुस्त करुन देण्यास नकार दिलेला आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचे दुकानातील स्वनिर्मीत घेतलेल्या कुलरमध्ये काही दोष अगर बिघाड झाल्यास तो दुरुस्त करुन देण्याची पुर्ण जबाबदारी गैरअर्जदार यांची असतांनाही गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा कुलर दुरुस्त करुन न दिल्याने अर्जदार यांना सेवा देणेमध्ये कमतरता केलेली आहे, असे या मंचाचे मत आहे. युक्तीवादाच्या वेळेला गैरअर्जदार यांचे वकीलांनी अर्जदार यांना कुलरच्या किंमतीची रक्कम देण्याची तयारी दर्शविलेली होती. अर्जदार यांना निकृष्ठ दर्जाचा माल रोख रक्कम घेऊन विक्री करुन अर्जदार यांची दिशाभुल केलेली आहे म्हणजेच अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंबही केलेला आहे, असे या मंचाचे मत आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना कुलर दुरुस्त न दिल्यामुळे किंवा त्यांची किंमत न दिल्यामुळे अर्जदार यांना या मंचामध्ये अर्ज दाखल करावा लागला आहे व त्या अनुषंगाने खर्चही करावा लागला आहे, याचा विचार होता, अर्जदार गैरअर्जदाराकडुन मानसिक त्रासाबद्यल व अर्जाच्या खर्चा पोटी रक्कम वसुल होऊन मिळणेस पात्र आहेत, असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपथत्र त्यांनी दाखल केलेले कागदपत्र तसेच गैरअर्जदार यांचे म्हणणे व शपथपत्र व दोन्ही पक्षकार यांच्या वकीलाचा युक्तीवाद याचा विचार होता, आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश अर्जदार याचा अर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो. आज पासुन 30 दिवसांच्या आंत गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना खालील प्रमाणे रक्कमा द्याव्यात. 1. कुलरची खरेदी पोटी दिलेली रक्कम रु.2,400/- + मोटर रेट डिफरन्स रु.400/- असे एकुण मिळुन रु.2,800/- द्यावे. मानसिक त्रासापोटी रु.1,000/- व अर्जाच्या खर्चा पोटी रु.1,000/- द्यावे. 2. संबंधीत पक्षकारांना निकाल कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुजाता पाटणकर अध्यक्ष सदस्या गो.प. निलमवार लघूलेखक. |