(मंचाचा निर्णय: श्री. मिलिंद केदार – सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 27/12/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 16.10.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्यांनी प्रस्तुत तकारीन नमुद केल्यानुसार ते 40 गाळे धारक असुन त्यांनी गाळे धारकांची सहकारी संस्था नोंदणीकृत केलेली आहे. सदर सहकारी संस्थेमार्फत ही तक्रार अध्यक्ष, श्री. प्रमोद शामरावजी चौधरी यांनी दाखल केलेली आहे. त्यांनी तक्रारीमध्ये मुख्यत्वे गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून गाळे/सदनिका विकत घेतल्याचे म्हटले आहे व त्यामधे गैरअर्जदारांनी बांधलेल्या ‘राहूल कॉम्प्लेक्स-1 विंग 3’ मधील सुरक्षेच्या दृष्टीने 1) सुरक्षा भिंत उभारली नाही, 2) विंग-3 करीता पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन नाही, 3) सर्व्हीस टॅक्सचे पैसे गैरअर्जदारांनी जे घेतले ते संबंधीत विभागात जमा केली नाही, त्यामुळे ते परत करावी, 4) मेंटनन्सचे रु.10,000/- परत करावे, 5) इमारतीतील बेसमेंटमध्ये 3 ते 4 फूट पाणी पावसाळयात जमा होते ते पाणी बाहेर निघण्यासाठी व्यवस्था करावी, 6) फायर फायटींग करीता वेगळया टाक्याची व्यवस्था करण्यांत यावी व आपतकालीन परिस्थितीत उतरावयाच्या जिन्याला प्रायमर पेंट सुध्दा लावलेला नाही, त्याची व्यवस्था करावी, 7) टेरेसवरुन पिण्याच्या पाण्याच्या टाकीपर्यंत पोहोचण्याकरीता जिन्याची व्यवस्था करावी, 8) लिफ्टमध्ये पावसाळयात पाणी जाते ते जाऊ नये याची व्यवस्था करावी, 9) पाय-यावर लावलेल्या स्टेअरकेस अर्धवट जोडलेल्या आहे, 10) सदर संकुलातील एक गाळा कम्युनिस्ट पार्टीला व्यावसायीक गाळा विकण्यात आलेला आहे त्यांची सभा, मोर्चे दर पंधरा दिवसांतून होत असतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचे कार्यालयात जाण्याकरीता बाहेरुन जिन्याची व्यवस्था करावी, 11) इलेक्ट्रीक वायरींग करतांना अर्थींगची व्यवस्था केलेली नाही, 12) इमारतीच्या आजूबाजूला प्रकाश व्यवस्था नाही, 13) विंग-3 मध्ये बनविण्यांत आलेल्या आपतकालीन शिडी कोप-यातून बाहेर येण्यास बनवावयास पाहीजे होती, 14) सदर इमारतीचा संबंधीत जागा विकत घेतल्यापासुनचा टॅक्स गैरअर्जदारांनी अद्यापही भरलेला नाही, तो त्वरीत भरण्यांत यावा, 15) फायर पाईप लाईन बुजलेली असल्यामुळे पावसाळयात पाणी जाऊ शकत नसल्यामुळे मीटर रुममध्ये पाणी जमा होते, 16) जाहीरात दिल्याप्रमाणे बांधकाम नसुन ते निकृष्ठ दर्जाचे आहे व 17) कंपाऊंड वॉल बनविलेली नाही ती त्वरीत बनवुन द्यावी. इत्यादी असुविधा व त्रुटया गैरअर्जदारांनी दिल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. तक्रारकर्त्यांनी पुढे नमुद केले आहे की, सदर त्रुटयांचे निराकरण करण्याकरीता रु.18,00,000/- एवढा खर्च अपेक्षित आहे. तसेच शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.1,00,000/- व त्यावर 24% व्याजाची मागणी केलेली आहे. तसेच गैरअर्जदार क्र.1 हे सामायीक गच्चीवर मोबाईल टावर बसविण्याची शक्यता आहे, त्यामुळ आरोग्यास धोका होऊ शकतो व सदर कृत्य बेकायदेशिर असल्याचे तक्रारकर्त्याने नमुद केले असुन वरील सर्व त्रासाकरीता तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे. 3. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना बजावण्यांत आली असता ती प्राप्त झाल्यावर ते मंचासमक्ष हजर झाले असुन त्यांनी आपले लेखी उत्तर दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 व 4 ते 9 यांनी आपल्या उत्तरात तक्रारकर्त्याचे सर्व म्हणणे नाकारले असुन ही बाब मान्य केली आहे की, तक्रारकर्ता ही गाळे धारकांचे सहकारी संस्था असुन ती नोंदणीकृत आहे. त्यांनी तक्रारकर्त्यांना सदर संकुलातील गाळे व सदनिका विकल्याचे सुध्दा मान्य केलेले आहे, तसेच आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, करारनाम्यानुसार ‘राहूल कॉम्प्लेक्स’ विंग-3 च्या गच्चीचे पूर्ण अधिकार गैरअर्जदारांना आहे. त्यांनी पुढे असेही नमुद केले आहे की, ब्रोशरमध्ये कुठेही सुरक्षा भिंत दाखविलेली नाही व सदर संकुलनामध्ये दुकानाचे गाळे असल्यामुळे 4 ही बाजूस सुरक्षा भिंत राहूच शकत नाही. तसेच सदर कॉम्प्लेक्स मधील विंग-3 ची पिण्याचे पाण्याची व्यवस्था उत्तम करण्यांत आली होती, परंतु विंग-3 मधील गाळे धारकांनी लिहून दिले आहे की, पाण्याचे बिल आम्ही देऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही आपसात सहमत घेऊन विंग-2 ला नळ कनेक्शन स्थानांतरीत केले आहे. 4. गैरअर्जदारांनी ज्या गाळे धारकांकडून सेवा शुल्क घेतले होते ते परत केलेले आहे तसेच मेंटनन्सचे घेतलेले रु.10,000/- हे सोसायटी बनन्यापूर्वी केलेल्या मेंटनन्सच्या संबंधाने असल्याचे म्हटले आहे. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांचे इतर सर्व म्हणणे नाकारले असुन सदर तक्रार खारिज करण्याची विनंती केली आहे. 5. सदर तक्रारीला गैरअर्जदारांनी आपले उत्तर दाखल केल्या नंतर तक्रारकर्त्यांनी कोणतेही प्रतिउत्तर किंवा तक्रारीच्या आक्षेपांच्या दृष्टीने कोणतेही प्रतिज्ञापत्र अथवा पुरावा दाखल केलेला नाही, त्यामुळे प्रकरण युक्तिवादाकरीता नेमण्यांत आले. युक्तिवादाचे वेळी तक्रारकर्ता व त्यांचे वकील गैरहजर होते, गैरअर्जदारांनी त्यांचे वकीलामार्फत युक्तिवाद केला. मंचाने दोन्ही पक्षांचे कथन व दाखल दस्तावेज यांचे निरीक्षण केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 6. उभय पक्षांचे कथनावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्ता ही गाळे धारकांची नोंदणीकृत सहकारी संस्था आहे व त्या संस्थेच्या सभासदांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून गाळे/सदनिका खरेदी केले आहे. त्यामुळे ते गैरअर्जदारांचे ‘ग्राहक’ ठरतात असे मंचाचे मत आहे. 7. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये ज्या इमारतींच्या बांधकामाच्या त्रुटींबाबत जे म्हणणे सादर केलेले आहे ते सिध्द करण्याचे दृष्टीने कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तसेच गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरात तश्या कोणत्याही त्रुटया नसल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यामुळे इमारतीत असलेल्या कोणत्याही त्रुटया तक्रारकर्ता सिध्द करु न शकल्यामुळे इमारतीच्या बांधकामात गैरअर्जदारांनी त्रुटी दिल्याचे स्पष्ट होत नाही. 8. तक्रारकर्त्यानी गैरअर्जदार हे टेरेसवर मोबाइल टावर बनविण्याकरता टाटा टेलि सर्व्हिसेसला अनुमती देत असल्याचे म्हटले आहे. त्याबाबत गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरात सदर टेरेसवर करारनाम्यानुसार विक्रीपत्रातील पान क्र.8 चे परिच्छेद क्रमांक 6 मध्ये नमुद केल्याप्रमाणे त्याचे पूर्ण अधिकार गैरअर्जदारांकडे राहील असे नमुद असल्यामुळे त्याचा उपयोग गैरअर्जदार आपल्या पध्दतीने करु शकतात असे म्हटले आहे. परंतु मंचाच्या मते मोबाइल टावर संबंधीची परवानगी देणे व तसे टावर टेरेसवर उभारल्यामुळे आरोग्यास बाधा होऊ शकते व त्या दृष्टीने नुकतेच केंद्र सरकारने निर्देश पारित केलेले आहेत. त्या निर्देशांचे पालन गैरअर्जदारांनी केल्याचे स्पष्ट होत नसल्यामुळे गैरअर्जदारांनी जरी करारनाम्यामध्ये टेरेस/ गच्चीचे संपूर्ण अधिकार त्यांचेकडे असले तरी असे कोणतेही बांधकाम उभारु नये की, त्यामुळे संकुलात राहणा-या जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होईल त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 हे सदर गच्चीवर मोबाईल टावर उभारु शकत नाही. 9. तक्रारकर्त्यांनी तक्रारीमध्ये शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.1,00,000/- व तक्रारीच्या खर्चाचे रु50,000/- व नोटीसच्या खर्चाचे रु.2,000/- ची मागणी केलेली आहे. सदर मागणी अमान्य केलेली आहे. 10. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी ‘राहूल कॉम्प्लेक्स-1 विंग 3’ च्या टेरेस/गच्चीवर आरोग्यास धोका निर्माण होईल असे कोणतेही बांधकाम अथवा मोबाइल टावरची उभारणी करु नये. 3. उभय पक्षांनी आप-आपला खर्च स्वतः सोसावा..
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |