न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रारदार यांनी त्यांचे कुटुंबाकरिता म्हणून वि.प.क्र.2 व 3 यांनी सुचविल्याप्रमाणे वि.प.क्र.1 यांचेकडून म्हैसाना जातीची म्हैस रक्कम रु. 62,000/- या रकमेस खरेदी घेतलेली होती. सदर म्हैशीला मस्टिडीज तसेच दूधाची तक्रार व तिचे बाळंतपणानंतर वेगवेगळया तक्रारी झालेल्या होत्या. म्हणून तक्रारदारांनी याबाबत वि.प.क्र.1 यांचेशी संपर्क साधून म्हैस परत नेणेस सांगितली. त्याप्रमाणे वि.प.क्र.1 यांनी म्हैस परत नेली आहे. परंतु वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.62,000/- परत दिलेली नाही. म्हणून तक्रारदार यांनी शिरोळ पोलिस स्टेशन यांचेकडे वि.प.क्र.1 विरुध्द तक्रारी अर्ज दिला आहे. शिरोळ पोलिस स्टेशन यांनी वि.प. यांचेविरुध्द सीआरपीसी 149 प्रमाणे नोटीस देवून तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये तडजोड घडवून दोघांनाही निकाली समजपत्र देण्यात आले होते. मात्र काही तांत्रिक घटनेमुळे संबंधीत सहायक फौजदार श्री आर.एस.चव्हाण यांचेकडून दि. 3/12/2016 चे जबाबामध्ये रक्कम रु. 62,000/- ऐवजी रोख रक्कम रु. 25,000/- व उर्वरीत रक्कम रु. 37,000/- पंधरा दिवसांमध्ये तक्रारदार यांना वि.प. यांनी देणेऐवजी रक्कम रु.12,000/- अशी नजरचुकीने नोंद केलेली आहे व तशी समज देण्यात आली होती. परंतु असे असूनही वि.प.क्र 1 हे त्याप्रमाणे वागत नाहीत. सबब, तक्रारदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले असे तक्रारदाराचे कथन आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी त्यांचे कुटुंबाकरिता म्हणून वि.प.क्र.2 व 3 यांनी सुचविल्याप्रमाणे वि.प.क्र.1 यांचेकडून म्हैसाना जातीची म्हैस रक्कम रु. 62,000/- या रकमेस खरेदी घेतलेली होती. या व्यवहाराबाबत वि.प.क्र.2 व 3 यांना तक्रारदार यांनी भरघोस कमिशन दिलेले होते. सदर म्हैशीला मस्टिडीज तसेच दूधाची तक्रार व तिचे बाळंतपणानंतर वेगवेगळया तक्रारी झालेल्या होत्या. या सर्व गोष्टी वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांचेपासून लपवून ठेवून तक्रारदार यांची फसवणूक केली आहे. तक्रारदारांनी याबाबत वि.प.क्र.1 यांचेशी संपर्क साधून म्हैस परत नेणेस सांगितली. त्याप्रमाणे वि.प.क्र.1 यांनी म्हैस परत नेली आहे. परंतु वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.62,000/- परत दिलेली नाही. म्हणून तक्रारदार यांनी शिरोळ पोलिस स्टेशन यांचेकडे वि.प.क्र.1 विरुध्द तक्रारी अर्ज दिला आहे. शिरोळ पोलिस स्टेशन यांनी वि.प. यांचेविरुध्द सीआरपीसी 149 प्रमाणे नोटीस देवून तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये तडजोड घडवून दोघांनाही निकाली समजपत्र देण्यात आले होते. मात्र काही तांत्रिक घटनेमुळे संबंधीत सहायक फौजदार श्री आर.एस.चव्हाण यांचेकडून दि. 3/12/2016 चे जबाबामध्ये रक्कम रु. 62,000/- ऐवजी रोख रक्कम रु. 25,000/- व उर्वरीत रक्कम रु. 37,000/- पंधरा दिवसांमध्ये तक्रारदार यांना वि.प. यांनी देणेऐवजी रक्कम रु.12,000/- अशी नजरचुकीने नोंद केलेली आहे व तशी समज देण्यात आली होती. परंतु असे असूनही वि.प.क्र 1 हे त्याप्रमाणे वागत नाहीत. म्हणून तक्रारदार यांनी दि. 6/6/2017 रोजी वि.प.क्र.1 यांना वकीलामार्फत नोटीस पाठवून रक्कम रु. 37,000/- 15 दिवसांचे आत देणेची विनंती केली. परंतु वि.प.क्र.1 यांनी सदरची रक्कम तक्रारदार यांना अद्यापही दिलेली नाही. म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदाराची रक्कम रु. 37,000/- वि.प.क्र.1 यांचेकडून वसूल होवून मिळावी, सदर रकमेवर 18 टक्के दराने व्याज तसेच मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- देणेबाबत वि.प.क्र.1 यांना आदेश व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत तक्रारदार यांनी पाठविलेली नोटीस, नोटीसची पोस्टाची पावती, शिरोळ पोलिस स्टेशन यांचा दाखला, म्हैशीचे फोटो, फोटोग्राफरचे बिल इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प.क्र.1 यांना नोटीस लागू झालेनंतर वि.प.क्र.1 यांनी मंचासमोर हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केले. वि.प.क्र.1 यांनी आपले लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील संपूर्ण मजकूर नाकारला आहे. वि.प. क्र.1 यांचे कथनानुसार, तक्रारदार हे स्वच्छ हाताने या मंचासमोर आलेले नाहीत. ते अर्धसत्य वस्तुस्थिती कथन करीत आहेत. सदरची तक्रार या आयोगासमोर चालणेस पात्र नाही कारण तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये ग्राहक व विक्रेता असे नातेसंबंध तयार होत नाहीत. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीप्रमाणे जेथे जाबदार वास्तव्यास आहेत व जेथे व्यवहार घडला आहे, त्या स्थळसिमेतच तक्रार अर्ज दाखल करावा लागतो. सदरचा व्यवहार हा एरंडोली येथे घडला आहे. सबब, प्रस्तुतचा अर्ज चालविण्याचा या आयोगास अधिकार प्राप्त होत नाही. तक्रारदार यांनी वादातील म्हैस वि.प.क्र.1 यांचेकडून नेल्यानंतर तिची गैरनिगा केल्याने सदर धडधाकट असेलेली म्हैस अशक्त झाली. त्यानंतर तक्रारदार यांचे वडील हे सदर म्हैस एरंडोली येथे घेवून आले व तेथे आल्यानंतर सदर म्हैशीची किंमत रु. 37,000/- इतकी ठरविण्यात आली व सदरची किंमत वि.प. यांनी तक्रारदार यांना एक महिन्याचे कालावधीत देण्याचे कबूल केले. त्यावेळी तेथे गावातील पंच श्री उत्तम माने (सरकार) ग्रामपंचायत सदस्य, श्री सुरगोंडा पाटील, अध्यक्ष तंटामुक्ती ग्राम व तक्रारदार यांचे पाहुणे श्री रविंद्र शिरदवडे सर्व रा. एरंडोली उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत सर्वांच्या संमतीने सदर म्हैशीची किंमत ठरविण्यात आली. तदनंतर वि.प. यांनी सदर म्हैशीचे उपचारासाठी जवळजवळ रु.10,000/- इतका खर्च केला. सदर रक्कम रु. 37,000/- पैकी रु.25,000/- वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांना पोलिस ठाणे, शिरोळ येथे अदा केले. त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी पोलिस स्टेशनला जबाबही दिला आहे. त्यानंतर उर्वरीत रक्कम रु.12,000/- पैकी रक्कम रु.10,000/- तक्रारदार यांच्या वडीलांना गावातील पंचासमक्ष दिली आहे व उर्वरीत रु.2,000/- हे वि.प.क्र.1 हे आजही तक्रारदार यांना देण्यास तयार आहेत. अशा प्रकारे वि.प. क्र.1 यांनी तक्रारदारास कोणतीही सेवात्रुटी न दिलेने तक्रारअर्ज नामंजूर करावा अशी मागणी वि.प. क्र.1 यांनी केली आहे.
5. वि.प. क्र.2 व 3 यांना याकामी वगळण्यात आले आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, दाखल पुरावे व युक्तिवाद तसेच वि.प.क्र.1 यांचे म्हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन मंचासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा वि.प.क्र.1 यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
7. तक्रारदार यांनी त्यांचे कुटुंबाकरिता म्हणून वि.प.क्र.2 व 3 यांनी सुचविल्याप्रमाणे वि.प.क्र.1 यांचेकडून म्हैसाना जातीची म्हैस रक्कम रु. 62,000/- या रकमेस खरेदी घेतलेली होती. सदरची बाब वि.प.क्र.1 यांनी मान्य केली आहे. याबाबत उभय पक्षांमध्ये वाद नाही. सबब, तक्रारदार व वि.प.क्र.1 यांचेमध्ये सेवा घेणार व सेवा देणार हे नाते प्रस्थापित झालेचे दिसून येते. सबब, तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार वि.प.क्र.1 यांचे ग्राहक होतात या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
8. तक्रारदार यांनी अर्जात नमूद म्हैसाना जातीची म्हैस रक्कम रु. 62,000/- इतक्या किंमतीस वि.प.क्र.1 यांचेकडून खरेदी केली ही बाब उभय पक्षांस मान्य आहे. तथापि सदरची म्हैशीची दुधाची तक्रार तसेच मस्टीडीज झालेने तक्रारदार यांचे सांगणेवरुन वि.प. यांनी सदरची म्हैस परत नेली व तडजोडीनंतर दि. 3/12/2016 चे जबाबामध्ये रक्कम रु.62,000/- पैकी रोख रक्कम रु.25,000/- व उर्वरीत रक्कम रु. 37,000/- पंधरा दिवसांमध्ये वि.प. यांनी देणेऐवजी रक्कम रु.12,000/- नजरचुकीने लिहिले आहे. सबब, वि.प. हे रक्कम रु. 37,000/- देणे लागतात असे तक्रारदार यांचे कथन आहे. तथापि दाखल कागदपत्रांचा विचार करता तक्रारदाराने त्याचा स्वतःचा व वि.प. यांचा जबाब दाखल केला आहे व या दोन्ही जबाबात तक्रारदाराची म्हैस ही तडजोड होवून रक्कम रु.25,000/- जबाबाचे दिवशी व रक्कम रु.12,000/- हे 15 दिवसांत देणेचे उभयपक्षी मान्य असलेचे दिसून येते. तक्रारदाराने स्वतःचे तसेच त्यांचेतर्फे गजानन रामचंद्र शिंदे यांचे शपथपत्र दाखल केले आहे. वि.प. यांनीही स्वतःचे तसेच साक्षीदार श्री रविंद्र शंकर शिरदवाडे तसेच उत्तम गणपती माने यांचे शपथपत्र दाखल केले आहे व यामध्ये वि.प. यांनी शपथपत्राद्वारे आपण फक्त रु.2,000/- देणे लागत असलेचे कथन केले आहे. तसेच तक्रारदार यांनीही रक्कम रु.37,000/- देणे असलेचे कथन केले आहे. तथापि उभय पक्षांनी या व्यतिरिक्त कोणताही पैसे देवघेवीच्या व्यवहाराची कागदपत्रे या आयोगासमोर दाखल केलेली नाहीत. सबब, या अर्जाचे कामी दाखल केले तक्रारदार व वि.प. यांचे जबाबामध्ये साम्यता असलेने व रक्कम रु. 25,000/- ही रोख दिली असलेने याबाबत उभय पक्षांमध्ये कोणताही वाद दिसून येत नाही व उर्वरीत रक्कम रु. 12,000/- ही सदरचे जबाबाचे तारखेपासून 15 दिवसांचे आत देणेचे निरिक्षण या आयोगाने नोंदविले आहे. सबब, सदरची उर्वरीत रक्कम रु.12,000/- वि.प. यांनी तक्रारदारास अदा केलेचा कोणताही पुरावा या आयोगासमोर दाखल नसलेने रक्कम रु.12,000/- वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांना अदा करणेचे आदेश करणेत येतात तसेच सदरची रक्कम रु.12,000/- ही तक्रारअर्ज दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने देणेचे आदेश वि.प.क्र.1 यांना करणेत येतात तसेच तक्रारदारास या गोष्टीचा निश्चितच मानसिक त्रास झालेने त्यापोटी रक्कम रु. 5,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- देणेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांना उर्वरीत रक्कम रु.12,000/- ही तक्रार दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने होणा-या व्याजासह अदा करावी.
3. तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- देणेचे आदेश वि.प.क्र.1 यांना करणेत येतात.
4. वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प.क्र.1 यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5. विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6. जर यापूर्वी वि.प.क्र.1 यांनी काही रक्कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्याची वजावट करण्याची वि.प.क्र.1 यांना मुभा राहील.
7. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.