::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 25/06/2019)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
2. मुळ तक्रारकर्ता मयत श्री. मनोहर कामडी हे शेतकरी होते. विरूध्द पक्ष क्र.2 हे बियाणे उत्पादक कंपनी तर विरूध्द पक्ष क्र.1 हे सदर बियाण्याचे विक्रेते आहेत. सन 2016-17 च्या खरीप हंगामाकरीता सदर मुळ तक्रारकर्त्याने दिनांक 16/6/2016 रोजी विरूध्द पक्ष क्र.1 कडून विरूध्द पक्ष क्र.2 निर्मीत ‘जानकी’ वाणाचे भात बियाणे रू.4,640/- ला खरेदी केले व त्याबाबत वि.प.क्र.1 ने पावती दिली. वि.प.क्र.1 यांनी वि.प.क्र.2 च्या वतीने आश्वासन दिले होते की सदर बियाण्यापासून येणारे धान पीक लागवडीपासून 140 ते 145 दिवसांत परिपक्व होईल व तसे न झाल्यांस ते दर एकरी रू.25,000/- प्रमाणे नुकसान भरपाई देतील. सदर आश्वासनावर विश्वास ठेवून सदर मुळ तक्रारकर्त्याने सदर बियाण्याची शेतात लागवड केली. मात्र सदर बियाण्यापासून आलेले पीक निर्धारीत 140 ते 145 या कालावधीऐवजी 90 ते 100 दिवसांतच ऐन पावसाळयात परिपक्व झाले व अतीपावसामुळे शेतातील सदर परिपक्व धान सडून तक्रारकर्त्याचे एकरी रू.25,000/- असे तिन एकरांचे एकुण रू.75,000/- नुकसान झाले. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर बाब गैरअर्जदारांना कळवून नुकसान भरपाईची मागणी केली व उचीत तेंव्हा कारवाई करून नुकसान भरपाई देण्यांत येईल असे विरूध्द पक्ष यांनी आश्वासनदेखील दिले. मात्र विरूध्द पक्ष यांनी नुकसान भरपाई दिली नाही. सबब तक्रारकर्त्याने दिनांक 10/10/2017 रोजी विरूध्द पक्षांना अधिवक्त्यामार्फत नोटीस बजावून नुकसान भरपाईची मागणी केली, परंतु पुर्तता न केल्यामुळे मुळ तक्रारकर्त्याने मंचासमक्ष विरूध्द पक्षांविरूध्द तक्रार दाखल करुन त्यामध्ये मागणी केली की, विरूध्द पक्षांनी तक्रारकर्त्यांस सदोष व निःकृष्ट प्रतीचे धान बियाणे विकल्यामुळे तक्रारकर्त्यास झालेल्या, शारिरीक, मानसीक त्रास व आर्थीक नुकसानापोटी एकत्रीत नुकसानभरपाई दाखल रू.95,000/- तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रू.4,990/- देण्यांत यावेत.
3. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करुन विरूध्द पंक्षा विरुध्द नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष क्र.1 व 2 हजर होवून त्यांनी आपले संयुक्त लेखी कथन दाखल करून त्यात विरूध्द पक्ष क्र.2 हे बियाणे उत्पादक कंपनी तर विरूध्द पक्ष क्र.1 हे बियाण्याचे विक्रेते आहेत आणी मुळ तक्रारकर्त्याने दिनांक 16/6/2016 रोजी विरूध्द पक्ष क्र.1 कडून विरूध्द पक्ष क्र.2 निर्मीत ‘जानकी’ वाणाचे भात बियाणे रू.4,640/- ला खरेदी केले तसेच सदोष बियाण्याबाबत तक्रारकर्त्याने पाठविलेली दिनांक 10/10/2017 ची नोटीस प्राप्त झाली या बाबी मान्य केल्या असून नोटीसमधील मजकूर खोटा असल्यामुळे तसे उत्तरदेखील तक्रारकर्त्याला देण्यांत आले असे नमूद केले आहे. तक्रारीतील उर्वरीत कथन नाकबूल करून वि.प.नी आपल्या विशेष कथनात नमूद केले की बियाण्यावर हवामानातील बदलाचा, व तापमानाचा परिणाम होत असतो व बियाणे खरेदीनंतर पेरणीपर्यंत तसेच त्यानंतरदेखील जर योग्य ती काळजी घेतली गेली नाही तर त्याचा विपरीत परिणाम पिकावर होत असतो. तक्रारकर्त्याने पिकाची योग्य काळजी घेतली होती याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. वि.प.क्र.2 हे बियाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करूनच ते विक्रीसाठी उपलब्ध करीत असतात. प्रस्तूत जानकी वाणाचे लॉट क्र.1538 धान बियाणेदेखील नागपूर येथील शासकीय प्रयोगशाळेतून तपासून घेतले होते व सदर बियाण्याच्या क्षमता,शुध्दता इत्यादिबाबत प्रयोगशाळा,नागपूर यांनी दिनांक 10/3/2016 रोजी अनुकूल अहवाल दिल्यानंतरच त्यांनी सदर बियाणे बाजारात विक्रीकरीता उपलब्ध केले. तक्रारकर्त्याने वापरलेले वि.प.निर्मीत जानकी वाणाचे बियाणे अतिशय चांगल्या प्रतिचे असून त्यात कोणताही दोष नव्हता हे तपासणी अहवालावरून दिसून येते व सदर बियाण्याबाबत तक्रारकर्त्याच्याच क्षेत्रातील इतर कोणत्याही शेतक-याची कोणतीही तक्रार नाही. वि.प.क्र.2 हे मागील 20 वर्षांपासून शेतक-यांच्या सेवेत बियाणे उपलब्ध करून देत असून तत्पर सेवा तसेच उत्कृष्ट बियाण्याबाबत त्यांची ख्याती आहे. तसेच वि.प.क्र.1 हेदेखील सदर प्रभागातील प्रस्थापित दुकानदार आहेत. मात्र तक्रारकर्त्याने अनुचीत मार्गाने पैसे उकळण्याच्या उद्देशाने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे. सदर तक्रार खोटी असल्याने ती खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
4. तक्रारकर्त्यांची तक्रार, दस्तावेज, तक्रारकर्त्याच्या तक्रारीलाच शपथपत्र समजण्यात यावे अशी नि.क्र.23 वर पुरसीस दाखल तसेच विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांचे संयुक्त लेखी म्हणणे, शपथपत्र, लेखी युक्तिवाद आणी उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व विरूध्द पक्षांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता क्र.1 ते 3 हे विरूध्द पक्षांचे ग्राहक आहेत काय ? : होय
2) विरूध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्त्यांप्रती अनुचित व्यापार : होय
पध्दतीचा अवलंब करून न्युनता पूर्ण सेवा दिली आहे काय ?
3) विरूध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्यांप्रती न्युनता पूर्ण सेवा दिली
आहे काय ? : नाही
4) तक्रारकर्ते मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहेत
काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. तक्रारकर्त्यांच्या मालकीची खास मौजा चारगांव (ब) तालुका सिंदेवाही, भूमापन क्र. 129, 127 येथे शेत जमीन आहे. मूळ तक्रारकर्त्याने दिनांक 16.6.2016 रोजी विरुद्ध पक्ष क्र. 1 यांचेकडून विरुद्ध पक्ष क्र. 2 निर्मित जानकी वाणाच्या लॉट क्र. 1538 च्या धान बियाण्याच्या 8 बॅग्स प्रति बॅग रू. 580 दराने एकूण रु.4,640/- ला खरेदी केल्या. त्याबाबत विरुद्ध पक्ष क्र. 1 यांनी दिलेली पावती निशाणी क्र. 5 दस्त क्र. 1 वर दाखल आहे व तक्रारकर्ता हे मूळ तक्रारकर्त्याचे वारस असल्याने विरुद्ध पक्ष क्र. 1 व 2 यांचे ग्राहक आहेत हे सिद्ध होते. सबब मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. मूळ तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्ष क्र. 1 यांचेकडून विरुद्ध पक्ष क्र. 2 निर्मित जानकी वाणाचे उपरोक्त बीज खरेदी करून उपरोक्त शेतीमध्ये दिनांक 25.6.2016 रोजी प-हे टाकले व त्यानंतर दिनांक 21.7.2016 रोजी रोपांची पुनर्लागवड केली. विरुद्ध पक्ष क्र. 1 यांनी विरुद्ध पक्ष क्र. 2 कंपनीच्या वतीने देण्यांत आलेल्या हमी नुसार सदर पीक हे रोवणी लागवडीपासून 140 ते 145 दिवसात परिपक्व व्हायला पाहिजे होते. परंतु सदर पीक हे 90 ते 100 दिवसातच परिपक्व झाले व त्या वेळी शेतात पाणी असल्यामुळे पीक सडून त्यांचे नुकसान झाल्याने, तक्रारकर्त्याने कृषी अधिकारी, सिंदेवाही यांच्याकडे लेखी तक्रार दिली. तालुका कृषी अधिकारी, व संबंधित कृषी अधिकारी, यांनी दिनांक 27.10.2016 रोजी तक्रारकर्त्यांचे उपरोक्त शेतातील पिकाची पाहणी करून अहवाल दिला. सदर अहवालामध्ये रोवणी केल्यापासून 110 ते 115 दिवसांमध्ये सदर जानकी वाणापासून आलेले पिक 100 टक्के परिपक्व झाले, परंतु त्यावेळी शेतामध्ये पाणी असल्याने शेतकऱ्यांचे 40 ते 50 टक्के नुकसान झाल्याचे व पिकाची निर्धारित कालावधीपेक्षा लवकर परिपक्वता असे नमूद आहे. अहवालावर उपविभागीय कृषी अधिकारी, नागभिड व संबंधित कृषी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षर्या आहेत, व तो अहवाल नि. क्र.5 दस्त क्र.7 वर दाखल आहे. तक्रारकर्त्यांनी, सदर जानकी धान बियाणे हे स्वतः तसेच श्री.विजय अलोणे, कैलास गेडाम, मंगल गेडाम, पुंडलीक मेश्राम या इतर शेतकऱ्यांनी वापरल्याने त्यांच्या शेतातील पिकाचे देखील नुकसान झाल्याने त्यांनी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार दिली व कंपनीवर कारवाई होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली असे नमूद असलेल्या दिनांक 11.11.2016 च्या लोकमत या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण तक्रारकर्त्यांनी तक्रारीत दाखल केलेले आहे.
7. यावरून निदर्शनास येते की तालुका कृषी अधिकारी, यांचेकडे तक्रारकर्त्याने लेखी तक्रार दिल्यानंतर तक्रारकर्त्याच्या शेतातील पिकाची पाहणी करून सदर धान पीक हे 140 ते 145 दिवस या निर्धारित कालावधीपेक्षा लवकर म्हणजे 90 ते 100 दिवसात परिपक्व झाले हा निष्कर्ष नमूद केला. असे असतांना तक्रारकर्त्यांनी या बाबीचा उल्लेख प्रकर्षाने करूनही सदर बाब विरूध्द पक्ष क्र.2 यांनी नाकारलेली नाही. त्यामुळे सदर पिक निर्धारित कालावधीपेक्षा लवकर परिपक्व झाले ही बाब त्यांना सुद्धा मान्य आहे असा गर्भित अर्थ निघतो. तक्रारकर्त्याने सदर धान पिकाची योग्य काळजी घेतली नसल्यामुळे पिकावर वरीलप्रमाणे विपरीत परिणाम होवून नुकसान झाले असे दर्शविणारा कोणताही दस्तावेज वा पुरावा विरूध्द पक्षांनी दाखल केलेला नाही. सविस्तर चौकशी अहवालामध्ये संबंधीत कंपनी व विक्रेत्यास पत्र क्र.120/2016 पंचायत समिती कार्यालय, सिंदेवाही दि.26/10/2016 अन्वये मौका तपासणीकरीता हजर राहण्याच्या सुचना देण्यांत आल्या असे नमूद आहे.याशियाय सदर क्षेत्रीय भेटीचा अहवाल व पंचनामा यावर विरुद्ध पक्ष क्र. 1 यांचीसुद्धा स्वाक्षरी असून त्यातील निष्कर्षावर त्यांनी कोणताही आक्षेप घेतलेला नाही. तक्रारीत दाखल दस्तावेजांवरून उपरोक्त शेतामध्ये विरुद्ध पक्षांकडून विकत घेतलेल्या जानकी वाणाचे धान बीजा पासून उत्पन्न पीक हे लागवडीपासून निर्धारीत कालावधीपेक्षा लवकर परिपक्व झाल्याने तक्रारकर्त्याचे पिकाचे नुकसान झाले हे सिद्ध होते. माननीय राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली यांनी Indian farmers fertilizers versus Vijaykumar & another या प्रकरणात दिनांक 14 जून 2018 रोजी दिलेल्या निवाडयामध्ये ‘’failure to follow the procedure prescribed under the circulars issued by the Government of Maharashtra will not it be fatal to the complainants …या विचाराधीन मुद्यावर ‘’No reason to discard the report prepared by the officers of the Agriculture Department’’ असा निर्वाळा दिलेला आहे. सदर निवाड्यातील मा. राष्ट्रीय आयोगाने निर्धारित केलेले न्यायतत्व प्रस्तुत प्रकरणात तंतोतंत लागू होते.
8. वरील बाबी विचारात घेता मंचाच्या मते मुळ तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्षांचे जानकी वाणाचे धान बियाणे वापरले परंतु उपरोक्त बियाण्यातून उत्पन्न धान पिक लवकर परिपक्व झाल्याने व त्या वेळी शेतात पाणी असल्याने ते सडून तक्रारकर्त्यांचे नुकसान झाले. यावरून विरूध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्त्यांप्रती अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब करून न्युनतापूर्ण सेवा दिल्याचे सिद्ध होते. त्यामुळे तक्रारकर्त्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई विरुद्ध पक्ष यांचेकडून मिळण्यांस ते पात्र आहेत असे मचांचे मत आहे. परंतु तक्रारकर्त्यांनी पिकाचे निश्चित किती नुकसान झाले याबाबत कोणताही दस्तावेज दाखल केलेला नाही. परंतु पीक लवकर आल्यामुळे तक्रारकर्त्यांचे आर्थिक नुकसान झालेले असल्यामुळे तक्रारकर्ते, विरुद्ध पक्ष क्र.2 यांचेकडून यथोचित नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत मंच आलेले आहे. सबब मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
9. प्रस्तूत प्रकरणातील विवादीत जानकी वाणाचे धान बियाणे हे विरूध्द पक्ष क्र.2 यांनी निर्मीत केलेले असून विरूध्द पक्ष क्र.1 यांनी केवळ सदर बियाण्याची, त्याचे वैधता कालावधीमध्ये विक्री केलेली आहे. सबब सदर बियाण्याच्या दर्जाबाबत विरूध्द पक्ष क्र.1 यांना जबाबदार ठरवता येत नाही असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्र. 3 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
10. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते
(2) तक्रारकर्त्यांना आर्थिक नुकसानापोटी नुकसान भरपाई दाखल विरुद्ध पक्ष क्र. 2 यांनी रू. 30,000/- तक्रारकर्त्यांना द्यावेत.
(3) विरुद्ध पक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्त्यांना शारीरिक व मानसिक त्रास तसेच तक्रार खर्च यापोटी एकत्रितपणे रू. 10,000/- द्यावेत.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
चंद्रपूर
दिनांक – 25/06/2017
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.