जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 241/2010. तक्रार दाखल दिनांक : 17/05/2010. तक्रार आदेश दिनांक :28/03/2011. प्रविण अरुण घाडगे, वय 29 वर्षे, व्यवसाय : शिक्षक, रा. इंदिरा गांधी चौक, माढा, ता. माढा, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द राहूल अटोमोबाईल्स, पंढरपूर रोड, कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : आर.व्ही. पाटील विरुध्द पक्ष गैरहजर / एकतर्फा आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, दि.8/11/2007 रोजी विरुध्द पक्ष यांना रु.62,896/- मोबदला देऊन बजाज कंपनीची पल्सर मोटार सायकल खरेदी केली असून तिचा रजि. नं. एम.एच.25/आर.9128 असा आहे. मोटार सायकल खरेदी करताना विरुध्द पक्ष यांनी त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन चार्जेस स्वीकारले आहेत. विरुध्द पक्ष यांनी त्यांना आर.सी. बूक दिले नाही. तक्रारदार यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अकलूज यांच्याकडून माहिती मागविली असता, तक्रारदार यांचे वाहनाचा एकरकमी कर भरला नसल्याचे कळविण्यात आले. विरुध्द पक्ष हे तक्रारदार यांना आर.सी. बूक देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन त्यांच्या मोटार सायकलचे आर.सी. बूक देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा आणि त्यांनी भरलेला दंड रु.2,000/-, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रार खर्चापोटी रु.3,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांना मंचाच्या नोटीसची बजावणी होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत आणि म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करुन तक्रार सुनावणीसाठी घेण्यात आली. 3. तक्रारदार यांची तक्रार व त्यांनी दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांनी बजाज कंपनीची पल्सर मोटार सायकल खरेदी करण्यासाठी विरुध्द पक्ष यांच्याकडून घेतलेल्या कोटेशनप्रमाणे रक्कम रु.62,000/- रोख अदा केल्याची पावती रेकॉर्डवर दाखल आहे. त्यानंतर तक्रारदार यांना मोटार सायकलचा ताबा देण्यात आल्याचे तक्रारदार यांना मान्य आहे. 5. प्रामुख्याने, मोटार सायकलचा मोबदला दिल्यानंतर व तिचा ताबा मिळाल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी त्यांना आर.सी. बूक दिलेले नाही, अशी तक्रारदार यांची प्रमुख तक्रार आहे. तक्रारदार यांनी मोटार सायकल खरेदी करताना आवश्यक मोबदला रक्कम विरुध्द पक्ष यांना अदा केल्याचे निदर्शनास येते. मोटार सायकलची किंमत मिळाल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी त्याचा ताबा तक्रारदार यांना दिलेला आहे. तसेच सदर मोटार सायकलची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकलूज यांच्याकडे एम.एच.25/आर.9128 क्रमांकाने नोंद आहे. परंतु विरुध्द पक्ष यांनी त्यांना आर.सी. बूक दिलेले नाही. 6. वाहनाचे आर.सी. बूक वाहन चालक-मालकाकडे असणे अनिवार्य आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दिलेल्या कोटेशनमध्ये नमूद केल्याप्रमाणे ‘रजिस्ट्रेशन चार्जेस :- रु.4,069/- स्वीकारल्याचे निदर्शनास येते. याचाच अर्थ, तक्रारदार यांच्या मोटार सायकलचे आर.टी.ओ. रजिस्ट्रेशन करण्याची जबाबदारी विरुध्द पक्ष यांनी स्वीकारलेली आहे. तक्रारदार यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अकलूज यांच्याकडून माहिती मागविली असता, तक्रारदार यांचे वाहनाचा एकरकमी कर भरला नसल्याचे कळविण्यात आलेले आहे. याचाच अर्थ, विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्याकडून रजिस्ट्रेशनची आवश्यक रक्कम स्वीकारुनही पुढील जबाबदारी पूर्ण करण्यामध्ये त्रुटी ठेवलेली आहे आणि सदर कृत्य त्यांच्या सेवेतील त्रुटी ठरते. सबब, तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांच्याकडून आर.सी. बूक मिळविण्यास पात्र ठरतात. 7. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत मोटार सायकल नं. एम.एच.25/आर.9128 चे आर.सी. बूक तक्रारदार यांना द्यावे. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.2,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/24311)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |