तक्रार क्र. CC/ 13/19 दाखल दि. 09.05.2013
आदेश दि. 10.10.2014
तक्रारकर्ती :- सौ.सुनिता मुरलीधर वंजारी,
वय – 35 वर्षे, धंदा शेतमजुरी,
रा.जुनोना, ता.पवनी, जि.भंडारा
-: विरुद्ध :-
विरुद्ध पक्ष :- 1. आर.के.एन्टरप्राइजेस,
काब्रा हाऊस नं.470, ए बास्केट बॉल ग्राऊंड
जवळ, हनुमान नगर, नागपुर,
ता.जि.नागपुर
गणपूर्ती :- मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी
मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक
मा.सदस्य हेमंतकुमार पटेरिया
उपस्थिती :- तक्रारकर्तीतर्फे अॅड.ए.बी.गभणे.
वि.प. तर्फे अॅड.एच.एस.बानाईत
.
(आदेश पारित द्वारा मा. सदस्य श्री हेमंतकुमार पटेरिया )
-// आ दे श //-
(पारित दिनांक 10 ऑक्टोंबर 2014)
1. तक्रारकर्ती सौ.सुनिता मुरलीधर वंजारी यांनी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत रुपये 2,25,000/- गृहउदयोग अंतर्गत कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरीता शेवई व फरसान तयार करण्याची मशीन खरेदीसाठी विरुध्द पक्षाला डिमांड ड्राप्ट रुपये 1,95,000/- दिले. विरुध्द पक्षाने मशीनचा पुरवठा केला परंतु आजपर्यंत सदर मशीनची जोडणी करुन दिली नाही या विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटीबाबत तक्रारकर्तीने सदरहू तक्रार न्यायमंचात दाखल केली आहे.
तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
2. तक्रारकर्ती ला पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) योजनेअंतर्गत महाव्यवस्थापक जिल्हा उदयोग केंद्र, भंडारा यांनी दिनांक 13/12/2010 ला शाखा व्यवस्थापक, वैनगंगा कृष्णा ग्रामिण बँक,पवनी जि.भंडारा यांना उददेशून कर्ज रक्कम रुपये 2,25,000/- मंजुर केली. त्याअनुषंगाने तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष आर.के.एन्टरप्राइजेस हनुमान नगर, नागपुर (प्रोप्रायटर श्री रविन्द्र खडसे) यांचे दिनांक 15/09/2010 चे कोटेशन व दिनांक 14/10/2010 चे Invoice No 1009 प्रमाणे वैनगंगा क्षेत्रीय ग्रामिण बँकेने रुपये 1,95,000/- डिमांड ड्राप्ट नं.043025 दिनांक 12/8/2011 ला शेवई व फरसान तयार करण्याची मशिन खरेदी करीता दिला. डिमांड ड्राप्ट विरुध्द पक्षाला मिळाल्या नंतर तक्रारकर्तीच्या मागणीप्रमाणे दिनांक 14/10/2011 ला शेवई व फरसान बनविण्याच्या मशिनचा पुरवठा केला. शेवई व फरसाण बनविण्याची मशीन तक्रारकर्तीच्या गांवी मौजा जुनोना येथे आणल्यानंतर मशिनचे जोडणी करण्यासाठी मॅकेनिक व कर्मचारी पाठविण्याचे विरुध्द पक्षाने कबुल केले. कारण मशीन जोडणी करुन देण्याची व मशीन सुरु करुन देण्याची जबाबदारी विरुध्द पक्षाची होती. परंतु विरुध्द पक्षाने मशिनची जोडणी करुन दिली नाही व सुरु करुन दिली नाही.
तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाला अनेकदा त्यांचे नागपुर येथील कार्यालयात भेटून सदर मशीन जोडून देवून सुरु करण्यासंबंधी विनंती केली. तक्रारकर्तीचे पती नामे मुरलीधर वंजारी यांनी सुध्दा विरुध्द पक्षाला भ्रमणध्वनीद्वारे अनेकदा सदर मशीन जोडून देवून सुरु करण्यासंबंधी विनंती केली.
परंतु विरुध्द पक्षाने त्यांचे मॅकेनिक व कर्मचारी यांना मशीन जोडण्याकरीता व सुरु करण्याकरीता पाठविले नाही. तक्रारीच्या दिनांकापर्यंत सदर मशिनची जोडणी व मशीन सुरु करुन दिली नाही व ती मशीन विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीकडे आणून ठेवल्या त्या स्थितीतच आहेत. विरुध्द पक्ष हे स्वतः जाणून आहेत की तक्रारकर्तीने वैनगंगा कृष्णा ग्रामिण बँक, पवनी जि.भंडारा कडून शासकिय योजनेअंतर्गत कर्ज घेवून सदर मशीन खरेदी केल्या आहेत.
विरुध्द पक्षाचे हलगर्जीपणामुळे तसेच फसवणूकीमुळे तक्रारकर्तीवर कर्जबाजारी व उपासमारीची पाळी येऊ नये म्हणून तक्रारकर्तीने तिचे वकील अॅड.व्ही.सी.खोब्रागडे यांचे मार्फत दिनांक 12/11/2012 ला नोटीस पाठवून सदर मशीन जोडून सुरु करुन दयावी अथवा विरुध्द पक्षाने पाठविलेल्या मशीन परत घेवून बँकेकडून डी.डी.द्वारे घेतलेली रक्कम रुपये 1,95,000/- परत करावे अशी विनंती केली. परंतु विरुध्द पक्षाने सदर नोटीसची अजिबात दखल न घेता नोटीसचे उत्तर सुध्दा दिले नाही.
विरुध्द पक्षाला दिनांक 4/2/2013 ला नोटीस देऊन पुन्हा संधी दिली परंतु कोणतीही दखल न घेतल्याने व तक्रारकर्तीने दोनदा नोटीस विरुध्द पक्षाला दिल्यामुळे तक्रारकर्तीने सदरहू प्रकरण न्यायमंचात दाखल केले आहे.
3. मंचाने तक्रार दाखल करुन विरुध्द पक्षाला नोटीस पाठविली. विरुध्द पक्षाची नोटीस ‘Left’ या शे-यासह परत आली त्यामुळे मंचाने दिनांक 11/2/2014 ला त्यांच्याविरुध्द एकतर्फी आदेश पारीत केला.
4. तक्रारकर्तीचे वकील यांनी दिनांक 12/5/2014 ला तक्रारकर्तीचा तक्रार अर्ज हाच लेखी युक्तीवाद समजण्यात यावा, अशी पुरसीस दिली.
5. तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, कागदपत्रे यावरुन खालील मुद्दा उपस्थित होतो.
1. तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे का? – होय.
कारणमिमांसा
5. तक्रारकर्तीने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत (PMEGP) कर्ज वैनगंगा कृष्णा ग्रामिण बँक यांचेकडून घेतले होते. महाव्यवस्थापक जिल्हा उदयोग केंद्र, भंडारा यांनी दिनांक 13/12/2010 ला कर्ज रक्कम रुपये 2,25,000/- मंजुर केली होती, त्याबाबतचे दस्त पान नं.19 वर दाखल आहे. विरुध्द पक्षाचे कोटेशन प्रमाणे वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक यांनी डिमांड ड्राप्ट नं.043025 दिनांक 12/8/2011 ला विरुध्द पक्षास दिले जे पान नं.22 वर दाखल आहे, त्यावरुन दिसून येते व सिध्द् होते की तक्रारकर्तीने सदर शेवई व फरसाण तयार करण्याच्या मशीनची खरेदी विरुध्द पक्षाकडून केली होती.
6. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीचे गांवी मौजा जुनाना येथे मशिनचे जोडणी करण्याकरीता मॅकेनिक व कर्मचारी पाठविले नाही. त्यामुळे मशीनची जोडणी न झाल्यामुळे सुरु न होता तशीच पडून आहे. तक्रारकर्त्याने वारंवार विनंती करुन देखील विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीच्या तक्रारीच्या कोणत्याही बाबीची दखल घेतली नाही.
6. तक्रारकर्तीने अॅड.व्ही.सी.खोब्रागडे यांचे मार्फत दिनांक 12/11/2012 ला नोटीस पाठवून सदर मशीन जोडून सुरु करुन दयाव्या किंवा विरुध्द पक्षाने पाठविलेल्या मशीन परत नेवून बँकेकडून घेतलेली रक्कम रुपये 1,95,000/- परत करावे असे कळविले, त्या नोटीसची प्रत पान नं.15 वर दाखल आहे. तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाला पुन्हा एक संधी देण्याकरीता म्हणुन दुसरी नोटीस दिनांक 12/11/2012 ला पाठविली जी पान नं.17 वर दाखल आहे. परंतु विरुध्द पक्षाने त्या नोटीसची कोणतीही दखल घेतली नाही.
7. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीच्या तक्रारीची कोणतीही दखल न घेणे म्हणजेच विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटी होय, असे मंचाचे मत आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला विकलेल्या मशीनची जोडणी करुन सुरु करुन न देणे ही विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटी असल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
8. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला व तिच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरीता घेतलेली मशीन सुरु करुन न दिल्यामुळे तक्रारकर्तीला रोजगार सुरु करता आला नाही त्यामुळे तक्रारकर्ती बँकेच्या कर्जाची परतफेड करु शकली नाही. त्यामुळे तक्रारकर्तीला मानसिक त्रास सहन करावा लागला. तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक त्रासासाठी विरुध्द पक्ष हेच जबाबदार आहेत, असे मंचाचे मत असल्यामुळे तक्रारकर्ती मानसिक नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे.
करीता आदेश पारीत.
अंतीम आदेश
1.तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजुर.
1.
2.विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीने घेतलेली शेवई व फरसाण तयार करण्याची मशीन आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 3 दिवसांचे आंत योग्य रित्या जोडणी करुन सुरु करुन दयावी.
3.अन्यथा उपरोक्त 3 दिवसांनंतर विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला 1,95,000/- (एक लाख पंचानऊ हजार) रुपये 18% व्याजदराने परत करावे. व्याजाची आकरणी दिनांक 9/5/2013 पासून ते वसुली पर्यंत करावी. तसेच मशीन तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाला परत करावी. मशीन परत नेण्याचा खर्च विरुध्द पक्षाने स्वतः करावा.
3.
4.विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई म्हणुन रुपये 75,000/-(पंचाहत्तर हजार) दयावे.
5.विरुध्द पक्षाने सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.
5.
6.प्रबंधक, जिल्हा ग्राहक मंच, भंडारा यांनी तक्रारकर्त्यास सदर आदेशाची प्रत नियमानुसार विनामुल्य उपलब्ध करुन दयावी.