ग्राहक तक्रार क्र. 167/2013
अर्ज दाखल तारीख : 03/12/2013
अर्ज निकाल तारीख: 24/02/2015
कालावधी: 01 वर्षे 02 महिने 11 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. भारत नारायण यादव,
वय-सज्ञान, धंदा – शेती,
रा.कळंब, ता. कळंब, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. आर. जे. टोपरानी,
मॅनेजर ओरिएंटल इन्शुरन्स कं. लि. सोलापूर,
2. डी.व्ही. कंदले,
मॅनेजर ओरिएंटल इन्शुरन्स कं. लि. उस्मानाबाद. ....विरुध्द पक्षकार.
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विदयुलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.ए.जी. गरड.
विरुध्द पक्षकार तर्फे विधीज्ञ : श्री.डी.आर.कुलकर्णी.
न्यायनिर्णय
मा. सदस्या श्रीमती विदयुलता जे.दलभंजन यांचे व्दारा :
तक्रारकर्ताच्या (तक) तक्रारी अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे.
अ) 1) अर्जदार भारत नारायण यादव हे कळंब जि. उस्मानाबाद येथील रहीवाशी आहेत. त्यांनी (संक्षिप्त रुपात विमा कंपनी) यांचे विरुध्द तक्रार दाखल केली आहे.
2) अर्जदार हे शेतकरी आहेत व जोंडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात त्यांनी प्रियदर्शनी अर्बन को. ऑप. बँक लि. यांचे मार्फत म्हशी विकत घेतल्या व विमा कंपनी मार्फत म्हशीचा विमा काढला होता.
3) अर्जदाराची म्हैस जीचा रंग काळा, शिंगे पाठीमागे गोल, शेपूट गोंडा पांढरा व म्हशीच्या उजव्या कानात टॅग होता. ज्याचा नंबर OIC 26321 असा होता व पॉलिसी क्र.161990/47/2012/300 हा होता.
4) अर्जदाराची म्हैस दि.18/06/2012 रोजी सकाळी 9 वाजण्याचे सुमारास मयत झाली. विमा कंपनी यांना लेखी स्वरुपात कळवले त्यानंतर विमा कपंनीचे प्रतिनीधी येऊन संपूर्ण चौकशी करुन अर्जदार तसेच गावातील इतर दोन व्यक्तिंचे जबाब घेऊन गेले.
5) म्हैस दि.18/06/2012 रोजी मयत झाली नंतर 12 ते 1 च्या दरम्यान म्हशीचे पी. एम. केले व क्लेम फॉर्म भरुन उस्मानाबाद येथील विमा कंपनीकडे जमा केला परंतु आज मंजूर होईल उदया मंजूर हेाईल अशी उडवा उडवीची उत्तरे दिली.
6) अर्जदाराने दि.26/06/2013 रोजी विमा कंपनीस विधीज्ञामार्फत नोटीस पाठवून क्लेम मंजूर करण्याविषयी कळवले परंतु विमा कंपनीने क्लेम मंजूर केला नाही म्हणून अर्जदाराने प्रस्तुत तक्रारीव्दारे म्हैस मयत झाल्यापासुन आजपर्यत नुकसान भरपाई पोटी विम्याची रक्कम व त्यावर 15 टक्के व्याज शारीरिक मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु.5,000/- विमा कंपनीकडून मिळावी अशी विनंती केलेली आहे.
ब) विमा कंपनी कार्यालय सोलापूर यांनी त्यांचे म्हणणे अभिलेखावर दाखल केलेले आहे. त्याचे म्हणण्यानुसार तक्रार चुकीच्या माहितीवर आधारीत असल्याने नामंजूर करावी. म्हशीच्या फोटोची मागणी करुनही अदयाप ती पुर्ण न केल्याने तक्रार पुढे चालू शकत नाही. करारातील शर्ती व अटी अर्जदारावर बंधनकारक असूनही त्याचे अनुपालन झाले नसल्यामुळे तक्रार खर्चासह नामंजूर होणे योग्य होईल असे म्हंटले आहे. बँक आवश्यक पक्षकार असून ही बँकेस पक्षकार केलेले नाही. म्हशीच्या मृत्यूचे कारण पूर्ण तक्रारीमध्ये कोठेही नमूद नाही. विप ने सेवेत कसलीही त्रुटी केलेली नाही त्यामुळे तक्रार खर्चासह खारीज करावी अशी विनंती विमा कंपनी सोलापूर यांनी केलेली आहे.
क) 1) अर्जदाराने तक्रारीसोबत म्हशीचा फोटो विमादावा फॉर्म, म्हैस मृत्यू प्रमाणपत्र, शवविच्छेदन अहवाल, cattle valuation certificate, घटनास्थळ पंचनामा, Discharge voucher, नोटीस, पॉलिसी शेडयूल आणि लेखी म्हणणे या कागदपत्राचे सुक्ष्म अवलोकन केले. लेखी युक्तिवाद वाचला व तोंडी युक्तिवाद ऐकला असता सदर प्रकरणात खालीप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) विमा कपंनीने सेवेत त्रुटी केली का ? होय.
2) अर्जदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत का ? होय.
3) काय आदेश ? होय.
कारणमिमांसा
ड) 1) मुद्दा क्र. 1 व 2 :
अर्जदाराची म्हैस मयत झाली व विमा कंपनीने रक्कम दिली नाही अशी अर्जदाराची तक्रार आहे. अर्जदाराने म्हशीचा फोटो दाखल केलेला आहे. वर्णन केल्याप्रमाणे फोटोमध्ये म्हैस निदर्शनास येते. तक्रारीतील टॅग क्रमांक व पी. एम. रीपोर्ट, क्लेम फॉर्म, डेथ सर्टीफिकेट आणि पॉलिसी शेडयूल मधील टॅग नंबर अगदी तंतोतंत जुळतो त्यामुळे अर्जदारास विमा रक्कम देणे गरजेचे होते. परंतू विमा कंपनीने अदयापही क्लेम दिलेला नाही.
2) विमा कंपनीने त्यांचे निवेदनात म्हंटलेले आहे की म्हशीचा फोटो अदयापही मिळालेला नाही परंतु विमा कंपनीने दि.01/02/2014 रोजी व्ही पी से दाखल केलेला आहे. त्यादिवशी त्यांनी तक्रारीसोबत दाखल केलेले सर्व कागदपत्र पाहीलेलेच असतील यात वादच नाही. तेव्हा म्हशीचा फोटो बघीतलाच असेल त्यामुळे व्हीपी दाखल केल्यापासून 3 महिन्यातच क्लेम सेटल करणे गरजेचे होते परंतु विमा कंपनीने तसे काहीही केलेले दिसत नाही. तांत्रीक कारण पूढे करुन अर्जदारास विमा रक्कमे पासून वंचित ठेवलेले आहे. असे करुन अर्जदाराचा विमा रक्कमेचा हक्क संपुष्टात येत नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे. आणि ही सेवेतील गंभीर त्रुटी आहे हे सिध्द होते त्यामुळे मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
3) वरील विवेचनावरुन आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहचलो आहोत की अर्जदार म्हशीची विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत. म्हणून खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विमा कंपनीने अर्जदारास संयुक्तीरित्या व एकत्रीतरित्या म्हशीची विमा रक्कम रु.35,000/- दि.01/02/2014 पासून 9 टक्के व्याज दराने आदेश दिल्या तारखेपासून 30 दिवसात दयावी.
3) विमा कंपनीने अर्जदारास संयुक्तित्या व एकत्रितरित्या तक्रार खर्चापोटी रक्कम रु.3,000/- आदेश तारखेपासुन 30 दिवसात दयावी.
4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस दिवसात करुन विरुध्द पक्षकार यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विरुध्द पक्षकार यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद