निकाल
(घोषित दि. 28.06.2016 व्दारा श्री.सुहास एम.आळशी, सदस्य)
तक्रारदार हा वरील ठिकाणचा राहणारा असून शेती करुन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवितो तसेच पालनपोषण व मुलांचे शिक्षण करीत आहे. अर्जदाराचा मुलगा नामे श्रीराम परसराम गिराम यांनी महेंद्रा सेंच्युरी कंपनीची दुचाकी वाहन ज्याचा क्रमांक एम.एच.21-अे.एस.-5605 दि.07.06.2014 रोजी फायनान्सद्वारे खरेदी केलेली आहे. परंतू गैरअर्जदार क्र.1 शकुंतला मोटार्स (महेंद्रा) जालना यांनी श्रीराम परसराम गिराम यांना जो नंबर दिला आहे तो चुकीचा, बेकायदेशीर, खोडसाळपणाने दिलेला आहे तसेच तक्रारदाराच्या मुलानी दि.05.06.2015 रोजी उपप्रादेशिक कार्यालय जालना येथे नोंदणीसाठी गेले असता गाडीची नोंद त्यांच्या रजिष्टरला दिसून आली नाही, अर्जदाराचे मुलाने फायनान्सची रक्कम रु.1990/- प्रतिमहा प्रमाणे 12 महिने भरणा केलेला आहे.
तक्रारदाराचे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलाने म्हणजे श्रीराम परसराम गिराम यांनी फायनान्सचे हपते वेहोवेळी भरलेले आहे. तसेच रोख रक्कम रु.20,500/- भरलेले असून तक्रारदाराचा मुलगा फायनान्सचे हप्ते न चुकता वेळोवेळी भरीत आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार त्यांना कमी शिक्षणामुळे तसेच कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास फसविले आहे.
तक्रारदार व तक्रारदाराचा मुलगा श्रीराम परसराम गिराम यांनी सतत उपप्रादेशिक अधिकारी जालना यांना समक्ष भेट दिली व विनंती केली परंतू त्यांनी तक्रारदारास स्पष्ट भाषेत समजाविले की, आमच्या कार्यालयात या गाडीची नोंद नाही. त्यामुळे तक्रारदारास व तक्रारदाराच्या मुलास झालेला मानसिक त्रास, प्रकरण दाखल करण्यासाठी आलेला खर्च रु.5,000/- तक्रारदाराच्या मुलाच्या नावाने पासिंग करुन देऊन रु.5,000/- व इतर खर्च रक्कम रु.15,000/-, नुकसान भरपाई देण्याचा आदेश व्हावा. तसेच तक्रारदाराचा मुलगा नामे श्रीराम परसराम गिराम यांनी महेंद्रा सेंच्युरी कंपनी ज्याचा क्रमांक एम.एच.21-अे.एस.-5605 दि.07.06.2014 रोजी खरेदी केलेल्या गाडीची उपप्रादेशिक अधिकारी जालना येथे नोंद नसल्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश व्हावेत, यासाठी तक्रारदाराने ही तक्रार मंचात दाखल केली आहे. तसेच सदर प्रकरणामध्ये वाहनाचे मालक श्रीराम गिराम यांनी सदर तक्रार चालविण्याकरता परसराम गिराम यांना अधिकारपत्र दिले आहे.
तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना नोटीसेस काढण्यात आल्या. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 व 2 चे कथन की, त्यांनी तक्रारदाराची तक्रार परिशिष्टनिहाय नाकारली आहे. तसेच तक्रारदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक नाही असे म्हटले असून सदर तक्रार जाणिवपूर्वक केली आहे, तसेच अर्जदाराच्या मुलाने सदर रक्कम कुणाकडे भरली आहे याबाबत माहिती नाही. गाडीची शोरुम किंमत 49,908/- आहे आणि त्या गाडीचा विमा रु.1500/- मध्ये काढला जातो. आर.टी.ओ. पासींगसाठी रु.4300/- फीस आहे. हायपोथिकेशनचे रु.150/- असे आर.टी.ओ.ऑफीसमध्ये भरावे लागतात व अर्जदाराच्या मुलाने खरेदी केलेल्या गाडीची किंमत 55,858/- अशी होते असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे अर्जदाराच्या मुलाने जी गाडी विकत घेतली तिचे पासींगकरुन देण्याची कोणतीही जबाबदारी गैरअर्जदाराची नाही असे म्हटले असून वाहन खरेदी करणा-या ग्राहकास स्वतः आर.टी.ओ. पासींग करुन घ्यावे लागते व त्याचा खर्च स्वतः करावा लागतो. तसेच दि.07.06.2014 रोजी अर्जदाराचा मुलगा गाडी घेऊन गेलात्यानंतर श्रीराम सिटी फायनान्स कंपनीने दि.25.06.2014 रोजीधनादेश क्र.951593 अन्वये रक्कम रु.35280/- गैरअर्जदार दिली. व पावती क्र.871 घेतली त्यामुळे अर्जदाराच्या वाहनाच्या पासींगचा प्रश्न निर्माण होत नाही असे म्हटले असून याबाबतची कोणतीही जबाबदारी गैरअर्जदाराची नाही असे जबाबात म्हटले आहे. त्याचप्रमाणे आर.टी.ओ.पासींगची वाहनाची फी वाचविण्याकरता अर्जदार प्रयत्न करीत आहे असे देखील म्हटले आहे.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, व गैरअर्जदार यांनी प्रकरणात दाखल केलेले लेखी जबाब यानुसार खालील मुद्दे मंचाने विचारात घेतले.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक
आहे काय ? होय.
2) गैरअर्जदाराने तक्रारदाराना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी केली आहे का ? होय.
3) काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
कारणमीमांसा
मुददा क्र.1 ः गैरअर्जदाराने त्यांच्या जबाबामध्ये असे नमुद केले आहे की, अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक नाही परंतू अर्जदाराच्या मुलाने महेंद्रा सेंच्युरी कंपनीची दुचाकी वाहन ज्याचा क्रमांक एम.एच.21-अे.एस.-5605 दि.07.06.2014 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडून विकत घेतली असून त्यानुसार अर्जदाराचा मुलगा हा गैरअर्जदार यांचा ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2 (1) (डी) नुसार ग्राहक होतो.
मुददा क्र.2 ः अर्जदाराचा मुलगा नामे श्रीराम परसराम गिराम यांनी महेंद्रा सेंच्युरी कंपनीची दुचाकी वाहन ज्याचा क्रमांक एम.एच.21-अे.एस.-5605 दि.07.06.2014 रोजी फायनान्सद्वारे खरेदी केलेली आहे. तसेच गैरअर्जदार यांची संपूर्ण रक्कम अदा केलेली आहे असे दिसते तसेच सदर वाहन खरेदी करण्यापूर्वी गैरअर्जदार क्र.1 यांनी वरील वाहनाचे कोटेशन म्हणून अर्जदाराच्या मुलास 58958/- रुपयाचे कोटेशन दिले आहे त्यामध्ये पासींगचा खर्च रु.4,550/- हा देखील लावण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सदर वाहनाचा गैरअर्जदार यांनी जो क्रमांक श्रीराम गिराम यांच्या गाडीला दिला आहे त्याबाबत आर.टी.ओ. कार्यालयात विचारणा केली असता त्यांनी सदर प्रकरणामध्ये क्रमांक एम.एच.21-अे.एस.-5605 हा क्रमांक महेंद्र सरोदे यांच्या स्कूटरचा असल्याबाबतचे लेखी पत्र मंचात दाखल केले असून हा क्रमांक इतर दुस-या कोणत्याही वाहनाला या आर.टी.ओ. कार्यालयाअंतर्गत देण्यात आलेला नाही असे म्हटले आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांनी वरील क्रमांक श्रीराम गिराम यांच्या वाहनाला दिलेला आहे तो बनावट असल्याचे दिसून येते. तसेच वाहनाची पासींगची रक्कम नगदी स्वरुपामध्ये गैरअर्जदाराकडे भरणा केल्याची बाब अर्जदाराने त्याच्या शपथपत्रात म्हटलेली आहे व नवीन वाहन विकत घेतेवेळी त्याची पासींग करुन देण्याची जबाबदारी गैरअर्जदार यांची होती व आहे त्यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदारास सेवा देण्यामध्ये ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2(1) (जी) प्रमाणे ग्राहकास द्यावयाच्या सेवेत त्रुटी निर्माण केली आहे.
त्यामुळे दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून गैरअर्जदार क्र.1 यांनी श्रीराम गिराम यांच्या वाहनाचे आर.टी.ओ. पासींग करुन द्यावे असे या मंचाचे मत आहे. त्यामुळे मुददा क्र.2 चे उत्तर होकारार्थी देऊन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार नं.1 यांनी अर्जदाराचा मुलगा श्रीराम परसराम गिराम याला वाहनाचे आर.टी.ओ.पासींगचे खर्चापोटी रु.6,000/- द्यावे.
- गैरअर्जदार नं. 1 यांनी शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.2,500/- व प्रकरणाचा खर्च रु.2500/- द्यावा.
- वरील आदेशाचे पालन आदेश दिनांकापासून 45 दिवसाचे आत करण्यात यावे.
श्री. सुहास एम.आळशी श्रीमती रेखा कापडिया श्री. के.एन.तुंगार
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना