निकालपत्र (दि.23.09.2014) व्दाराः- मा. सदस्या - सौ.रुपाली डी.घाटगे
1 प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे सामनेवाले क्र.1 व 2 यांनी सेवेत त्रुटी ठेवलेमुळे नुकसानभरपाई मिळणेसाठी दाखल केलेली आहे.
2 प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाले क्र.1 व 2 यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाले क्र.1 हे मंचापुढे उपस्थित राहून त्यांनी म्हणणे दाखल केले. सामनेवाले क्र.2 यांना नोटीस लागू होऊन देखील सदर कामी हजर राहील नाहीत, त्याकारणाने दि.04.03.2014 रोजी सामनेवाले क्र.2 यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. तक्रारदार व सामनेवाले क्र.1 तर्फे वकीलांचा तोंडी अंतिम युक्तीवाद ऐकला.
3 तक्रारदाराची तक्रार थोडक्यात तक्रार-
तक्रारदार हे सामनेवाले क्र.1 हे आर.के.गॅस एजन्सी असून यांचे ग्राहक असून सामनेवाले क्र.2 हे गॅस उत्पादित करणारी कंपनी आहे. तक्रारदारांचा ग्राहक क्र.20454 असा आहे. तक्रारदारांचा मुलगा –रमेश वसंत जोशी हा दि.27.08.2011 रोजी आंघोळीसाठी पाणी तापवित असताना गॅस सिलेंडरमधून लिकेज होऊन गॅसचा अचानक भडका झाल्याने गंभीर भाजून सी.पी.आर.मध्ये उपचार चालू असताना मयत झाला. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे नुकसानभरपाईची मागणी केली असता, न्यू इंडिया इन्शु. कंपनीचा विमा उतरविलेबाबत विमा पॉलीसी तक्रारदारांना उत्तरीय नोटीसीसोबत पाठविले. तक्रारदारांनी न्यू इंडिया इन्शु. कंपनीकडे विमा रक्कमेची मागणी केली असता, विमा कंपनीने ग्राहकांचा विमा उतरविले नसलेबाबतचे कळविले. सामनेवाले क्र.1 यांनी फक्त मालाचे व वस्तुंचा विमा उतरविल्याचे दिसुन येते. त्याकारणाने ग्राहकांना देण्यात येणा-या सेवासुविधांमध्ये दुजाभाव करणे व सदोष गॅस सिलेंडर देऊन सेवेत त्रुटी केलेने नुकसानभरपाईसाठी सदरची तक्रार दाखल केली आहे. सामनेवाले क्र.2 ही गॅस उत्पादन करणारी कंपनी असल्याने सदर कामी आवश्यक पक्षकार केलेले आहे. सबब, तक्रारदारांचा तक्रार अर्ज मंजूर करुन सामनेवाले क्र.1 व 2 यांचेकडून रक्कम रू.5,00,000/- व दि.27.08.2011 पासून द.सा.द.शे.18 टक्के व्याज मिळावे. शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- मिळावे अशी विनंती मंचास केली आहे.
4 तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत अ.क्र.1ला दि.14.03.2012 रोजी सामनेवाले क्र.1 यांना विमा कंपनीने अर्जदारांचा विमा देय लागत नाही याबाबतचे विमा कंपनीचे पत्र, अ.क्र.2ला तक्रारदारांनी सामनेवाले क्र.1 यांना पाठविलेली नोटीस, अ.क्र.3ला सदर नोटीसीस सामनेवाले क्र.1 यांचे उत्तर आणि अ.क्र.4ला सदर नोटीसीसोबत दिलेली विमा पॉलीसीची प्रत तसेच दि.22.02.2013 रोजी अ.क्र.1ला दि.30.05.2012 रोजीचे सी.आर.पी.सी.-174 प्रमाणे अखेर अहवाल, अ.क्र.2ला सी.पी.आर.हॉस्पीटलचे मृत्यु प्रमाणपत्र, अ.क्र.3ला दि.27.08.2011 रोजीचे को.म.न.पा.चे अग्नि निवारण दल यांचा दाखला, दि.22.08.2013 रोजी सामनेवाले क्र.1 यांनी को.म.न.पा.कडे दिलेले पत्र, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तसेच त्यासोबत दि.04.03.2014 चे तक्रारदारांचे अॅफीडेव्हीट दाखल केले आहे.
5 सामनेवाले क्र.1 यांनी दि.18.07.2013 रोजी आपले म्हणणे दाखल केले असून तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाले क्र.1 यांनी जुलै-2011 रोजी 280549 या क्रमांकाचे सिलेंडर दिले होते. अपघातग्रस्त सिलेंडरचा क्रमांक 260546 असा असून अपघाताशी सामनेवाले क्र.1 यांचा कोणताही संबंध नाही. अपघाताची दि.27.08.2011 असलेने 280549 चे सिलेंडर डिलेव्हरी दिलेपासून 57 दिवसाने अपघात झालेला आहे व तो सिलेंडर क्रमांक 280549 या सिलेंडरचा आहे. सामनेवाले क्र.1 यांनी दिलेल्या सिलेंडर क्रमांक 260546 चे बाबतचे लेखी कागदोपत्री पुरावा उपलब्ध आहे व त्यावर तक्रारदारांच्या सहयां आहेत. त्या कारणाने, सामनेवाले यांचेकडून बेकायदेशीरपणे रक्कम उकळणेसाठी तक्रारदारांनी काल्पनिक मजकुर तयार केलेला आहे. सिलेंडरचा लिकेझ झालेस पूर्ण स्फोट होऊन अपघातग्रस्त इमारत व आजूबाजूचा परिसर नष्ट होतो. अपघातग्रस्त सिलेंडर पाहता, कोणतेही नुकसान झालेले नाही. रेग्यूलेटर व टयूब आहे त्या स्थितीत आहेत. त्यामुळे गॅस गळतीने भडका झाला हे म्हणणे चुकीचे आहे. बेफेकीरपणे गॅस सोडून अग्नी प्रज्वलीत केलेचे प्राथमिकदृष्टया दिसून येते. सामनेवाले क्र.2 कंपनीची सदर अपघातात कोणतीही कसल्याही प्रकारची जबाबदारी कायदयाने येत नाही. पोलीसांच्याकडे मयताने दिलेला जबाब व फायर ब्रिगेडचा अहवाल यामध्ये अपघाताच्या कारणामध्ये विसंगती आहे. सिलेंडरची डिलेव्हरी देताना लिकेझ तपासून मिळाले म्हणून प्रत्येक ग्राहकाची सही घेतली जाते. प्रत्येक ग्राहकास वापराविषयी मार्गदर्शन व प्रात्यक्षिके सामनेवाले क्र.1 तर्फे दिली जातात. गॅसचा काळजीपूर्वक वापर करणे हे ग्राहकाचे कर्तव्य आहे. त्या कारणाने तक्रारदारांच्या तथाकथीत अपघातास सामनेवाले हे जबाबदार नव्हते हे स्पष्टपणे शाबीत होते. त्याकारणाने सामनेवाले यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- तक्रारदारांचेकडून दंडाची रक्कम मिळावी ही विनंती सामनेवाले यांनी केलेली आहे.
6 सामनेवाले क्र.1 यांनी अ.क्र.1 ला तक्रारदारांचे नावे असलेले गॅस कनेक्शन रिफील बुकींग व डिलेव्हरीचे पासबुक, अ.क्र.2 ला सिलेंडर दिलेबाबतची पावती, अ.क्र.3 ला बुकींग डिलेव्हरी व बिल नंबर, वगैरेबाबतचे सामनेवाले यांचेकडे असलेले कॉम्प्युटराईज्ड असलेली नोंदीची प्रत, अ.क्र.4 ते 8 ला अपघातग्रस्त सिलेंडरचे फोटो, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
7 तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदारांचे अॅफीडेव्हीट, सामनेवाले क्र.1 यांची कैफियत तसेच अनुषांगिक कागदपत्रे व उभयतांचे तोंडी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता, न्यायनिर्णय कामी पुढील मुद्दे उपस्थित होतात.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | होय. |
2 | तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | आदेश काय ? | अंतिम निर्णयाप्रमाणे. |
कारणमिमांसाः-
मुद्दा क्र.1- तक्रारदार हे सामनेवाले क्र.1 हे आर.के.गॅस एजन्सी असून यांचे ग्राहक असून सामनेवाले क्र.2 हे गॅस उत्पादित करणारी कंपनी आहे. तक्रारदारांचा ग्राहक क्र.20454 असा आहे. तक्रारदारांचा मुलगा –रमेश वसंत जोशी हा दि.27.08.2011 रोजी आंघोळीसाठी पाणी तापवित असताना गॅस सिलेंडरमधून लिकेज होऊन गॅसचा अचानक भडका झाल्याने गंभीर भाजून सी.पी.आर.मध्ये उपचार चालू असताना मयत झाला. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे नुकसानभरपाईची मागणी केली असता, न्यू इंडिया इन्शु. कंपनीचा विमा उतरविलेबाबत विमा पॉलीसी तक्रारदारांना उत्तरीय नोटीसीसोबत पाठविले. तक्रारदारांनी न्यू इंडिया इन्शु.कंपनीकडे विमा रक्कमेची मागणी केली असता, विमा कंपनीने ग्राहकांचा विमा उतरविले नसून सामनेवाले क्र.1 यांनी फक्त मालाचे व वस्तुंचा विमा उतरविल्याचे सांगितले. सबब, सदरची घटना गॅस सिलेंडरमध्ये दोष असलेने घडलेने सदरची सदोष गॅस सिलेंडरची सेवा देऊन सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्दयाचे अनुषंगाने या मंचाने तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तक्रारदारांनी दि.22.02.2013 रोजी अ.क्र.1 ला दि.30.05.2012 रोजीचा जावक क्र.1959/2012 चा सीआरपीसी-174 अखेर अहवाल दाखल केलेला असून सदर अहवालामध्ये मयताचे नाव-रमेश वसंत जोशी, वय वर्षे 40, मृत्युचे कारण-87% भाजून मृत्यु तसेच सदर अहवालामध्ये आपण आंघोळीकरीता पाणी तापविण्यासाठी किचन रुममध्ये-गॅस शेगडी पेटवताना गॅस लिकेझ झाल्याने त्याचा भडका होऊन त्यात आपण गंभीर भाजल्यामुळे औषधोपचाराकरीता आणले आहे असे नमुद असून त्यावर मयताने आपली सही असल्याचे सांगत आहे. ते साक्षीदार आम्ही समक्ष व्हेरीफाय केले असे नमुद आहे. अ.क्र.2 कडे सी.पी.आर.हॉस्पीटल, कोल्हापूर येथील कॉझ ऑफ डेथ सर्टिफिकेटमध्ये Shock due to 87% burn असे नमुद आहे. अ.क्र.3 कडे अग्नि निवारण दल, कोल्हापूर, महानगरपालिकेकडील दि.27.08.2011 रोजीच्या अहवालामध्ये अपघाताबद्दल तपशीलामध्ये स्फोट होऊन आग लागली होती, त्यामध्ये एक इसम भाजून जखमी झाला. आगीचे संभाव्य कारण – गॅस सिलेंडर व रेग्युलेटर मधून गॅस लिक झाला. वरील सर्व कागदपत्रांवरून तक्रारदारांच्या मुलाचा मृत्यु हा गॅस सिलेंडर व रेग्युलेटरमधून गॅस लिक झालेने भडका होऊन गंभीर भाजल्याने झालेचा स्पष्ट दिसुन येतो.
तथापि, सामनेवाले क्र.1 यांनी जुलै-2011 रोजी 280549 या क्रमांकाचे सिलेंडर दिले होते. अपघातग्रस्त सिलेंडरचा क्रमांक 260546 असा असून अपघाताशी सामनेवाले क्र.1 यांचा कोणताही संबंध नाही. अपघाताची दि.27.08.2011 असलेने 280549 चे सिलेंडर डिलेव्हरी दिलेपासून 57 दिवसाने अपघात झालेला आहे व तो सिलेंडर क्रमांक 260546 या सिलेंडरचा आहे. त्या अनुषंगाने, सामनेवाले क्र.1 यांनी अ.क्र.1 ला तक्रारदारांचे नावे असलेले गॅस कनेक्शन रिफील बुकींग व डिलेव्हरीचे पासबुक, अ.क्र.2 ला सिलेंडर दिलेबाबतची पावती दाखल केली आहे. परंतु केवळ सदर कागदपत्रांवरुन अपघातग्रस्त सिलेंडर सामनेवाले यांचा नव्हता हे शाबीत होत नाही. अ.क्र.3 ला बुकींग डिलेव्हरी व बिल नंबर, वगैरेबाबतचे सामनेवाले यांचेकडे असलेले कॉम्प्युटराईज्ड असलेली नोंदीची प्रतीं दाखल केलेल्या आहेत. तथापि सदरच्या प्रतींवर सिलेंडरचा सिरीयल नंबर नमुद नाही. अ.क्र.4 ते 8 ला अपघातग्रस्त सिलेंडरचे फोटो दाखल केलेले आहेत. सदरचे फोटोचे या मंचाने बारकाईने अवलोकन केले असता, सदर फोटोमधील सिलेंडरचा क्र.260546 असा नमूद दिसतो. सबब, सामनेवाले यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन अपघातग्रस्त सिलेंडरचा क्रमांक 260546 नसून 280549 हे शाबित होत नसलेने सामनेवाले यांचे सदरचे म्हणणे हे मंच विचारात घेत नाही.
तक्रारदारांनी दि.22.08.2013 रोजी सामनेवाले यांनी चिफ फायर ऑफीसर, को.म.न.पा. यांना दि.29.09.2011 रोजी गॅस सिलेंडर परत मिळणेबाबतचे अर्जाची प्रत दाखल केलेली आहे. सदरच्या कागदपत्रांवर आमचे ग्राहक-श्रीमती विजया वसंत जोशी, ग्राहक कमांक 20454 यांचे सिलेंडर तुमच्याकडे जमा आहे. तरी ते सिलेंडर आमचे मेकॅनिक-शरद पवार यांचे ताब्यात दयावे असे नमुद असून सदरचे गॅस सिलेंडर क्रमांक 260546 ताब्यात घेतले म्हणून सामनेवाले यांचे मेकॅनिक-शरद पवार यांची सही आहे यावरुन देखील अपघातग्रस्त सिलेंडरचा क्र.260546 असा आहे हे स्पष्ट होते. वरील सर्व विवेचनाचा विचार करता, सामनेवाले क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना सदोष सिलेंडरची सेवा देऊन सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षास हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 व 3:- प्रस्तुत कामातील तक्रारदारांचा मुलगा-रमेश वसंत जोशी यांचा दि.28.08.2011 रोजी वर नमुद मुद्दा क्र.1 मधील विवेचनाप्रमाणे सदोष गॅस सिलेंडर व रेग्युलेटर मधून गॅस लिक झालेने भडका होऊन 87% भाजून मृत्यु झालेला आहे. मृत्यु समयी तक्रारदारांनी दाखल केलेल्या सीआरपीसी-174 अहवाल तसेच सीपीआर हॉस्पीटलमधील मृत्युचा दाखला, यामध्ये मयताचे वय 40 वर्षे नमुद आहे. प्रस्तुत तक्रार अर्जात तक्रारदारांनी नुकसानभरपाईची रक्कम रु.5,00,000/- ची मागणी केली आहे. परंतु सदरच्या रक्कमेची आकारणी कशी केली आहे याबाबत सविस्तर खुलासा केलेला नाही. मयत रमेश जोशी यांचे अपघात समयीचे वय 40 वर्षे नमुद केले आहे. परंतु त्यांचे दरमहा उत्पनाबद्दल कोणताही कागदोपत्री पुरावा सदर कामी तक्रारदारांनी दाखल केला नाही. मयताचे दररोजचे सरासरी रु.100/- उत्पन्न धरुन हे मंच मयताचे मासिक उत्पन्न दरमहा रु.3,000/- याप्रमाणे वार्षिक उत्पन्न रु.36,000/- येते. सदर उत्पन्नातून मयतानी स्वत:साठी खर्च केलेली रक्कम 1/3 म्हणजेच रु.12,000/- वजा जाता राहिलेले उत्पन्न तक्रारदारांच्या करीता मयताने दिले असते याचा विचार करता, त्याचप्रमाणे मयत व्यक्तीवर अवलंबून असणारे त्यांची आई म्हणजेच प्रस्तुत कामातील तक्रारदार हयां होत. प्रस्तुत कामी तक्रारदाराचे वय तक्रारदारांनी तक्रार अर्जात व.व.77 इतके नमूद केले आहे. तक्रारदाराचे वयाचा विचार करता, प्रस्तुत कामी मोटर व्हेईकल अॅक्ट मध्ये नमुद केलेले II Schedule प्रमाणे Multiplier-5 चा येतो. सबब, मयताचे वाषिक उत्पन्न रु.24000 x 5 =1,20,000/- इतकी रक्कम तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून नुकसान भरपाई म्हणून मिळण्यास पात्र आहेत. तसेच रक्क्मेवर तक्रार दाखल तारखपासून संपूर्ण रक्कम मिळेपावेतो 9 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस पात्र आहेत तसेच उक्त मुद्दा क्र.1 मध्ये नमुद केले प्रमाणे सामनेवाले क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत त्रुटी केलेमुळे तक्रारदारास प्रस्तुतची तक्रार दाखल करावी लागलेने मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4:- सबब, हे मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येते आहे.
- सामनेवाले क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.1,20,000/- अदा करावे व सदर रक्कमेवरील दि.13.03.2013 पासून ते संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9% प्रमाणे व्याज अदा करावे.
- सामनेवाले क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.3,000/- तसेच या अर्जाचा खर्च रक्कम रु.2,000/- अदा करावेत.
- आदेशाच्या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.