श्री. मनोहर चिलबुले, मा. अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
-// आ दे श //-
(पारित दिनांकः 23/02/2015)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे थोडक्यात कथन असे की, वि.प. क्र. 1 नागपूर येथे PVR Cinemas Nagpur या नावाने मल्टीप्लेक्स सिनेमा थिएटर चालवित असून सदर थिएटर हे वि.प.क्र. 2 कडून मालकी हक्काने किंवा फ्रेंचाईजी तत्वावर चालविले जाते. श्री कमल गियाचंदाणी हे सदर वि.प.क्र. 2 कंपनीचे प्रेसिडेंट, अजय बिजली हे मॅनेजिंग डायरेक्टर आणि संजिव बिजली हे जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.
वि.प. त्यांच्या थिएटरमध्ये दाखविण्यांत येणा-या सिनेमाची जाहिरात करतात व त्यांत सिनेमाचे नांव आणि भाषा नमुद करतात. तक्रारकर्त्याने वि.प.च्या वेबसाईटवरुन 8 मार्च, 2013 रोजी 22.00 वाजता दाखविण्यांत येणा-या “Zero Dark Thirty (English)(A) ” या सिनेमाची 3 तिकिटे रु.560.56 ऑनलाईन पेमेंट करुन खरेदी केली. सदर तिकीटाची झेरॉक्स प्रत तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दाखल केली आहे.
तक्रारकर्ता मित्रांबरोबर थिएटरमध्ये गेला आणि सिनेमा सुरु झाला, तेंव्हा दाखविण्यांत येत असलेला सिनेमा इंग्रजी भाषेत नसून हिंदीत असल्याचे आढळून आले. तक्रारकर्ता व इतर प्रेक्षकांनी याबाबत वि.प.क्र. 1 कडे तक्रार केली परंतु त्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही. तक्रारकर्त्याने तिकिट कलेक्टर तसेच बुकिंग काऊंटर इन्चार्ज शेख कुरेशी यांचेकडे तक्रार केली आणि इंग्रजी ऐवजी हिंदी भाषेत दाखविण्यांत येत असलेला चित्रपट इंग्रजीत दाखविण्याची मागणी केली. परंतु शेख कुरेशी यांनी आहे तसा सिनेमा पहा, तुमच्या म्हणण्याप्रमाणे सिनेमा बदलता येणार नाही असे अरेरावीचे उत्तर दिले. तक्रारकर्त्याने त्यांना म्हटले कि, इंग्रजी सिनेमाचे तिकीट विकले असून इंग्रजी सिनेमा दाखवित नाही तर तिकीटाचे पैसे परत करा. त्यावर त्यांनी उध्दतपणे वर्तन केले आणि तिकीटाचे पैसे परत केले नाही. तक्रारकर्त्याने तिकीट इन्चार्ज यांना मॅनेजरला बोलविण्यास म्हटले असतो कोणासही भेटू देणार नाही, आहे तो सिनेमा पहावयाचा असेल तर पहा असे म्हणून तक्रारकर्त्याचा अपमान केल्यामुळे तक्रारकर्ता 7 ते 10 मिनिटातच सिनेमा न पाहता थिएटर सोडून निघून आला.
तक्रारकर्त्याने दुस-या दिवशी वि.प.क्र. 1 च्या मॅनेजरची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला असता त्यांनी कबुल केले कि, आयोजनातील चुकीमुळे इंग्रजी सिनेमाची जाहीरात करण्यांत आली आणि तिकिट विकण्यांत आले. मात्र तांत्रिक कारणामुळे तो दाखविता आला नाही. मात्र तोच सिनेमा दाखविण्यांत आल्यामुळे तिकीटाचे पैसे परत करण्यांस त्यांनी नकार दिला.
तक्रारकर्त्याने वि.प.ला ई-मेलव्दारे नोटीस पाठवून झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासाबाबत रु.50,000/- नुकसान भरपाईची मागणी केली, परंतु वि.प.ने त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही. सदर नोटीसची प्रत दस्त क्र. 2 वर दाखल केली आहे. विरुध्द पक्षाची सदर कृती बेकायदेशीर व ग्राहकांना लुबाडण्याची असून सेवेतील न्यूनतापूर्ण व्यवहार व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे आणि त्यांस विरुध्द पक्ष क्र.1 व 2 संयुक्त व पृथकपणे जबाबदार आहेत. म्हणून तक्रारकर्त्याने खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
1. शारीरीक व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रु.50,000/-
2. तक्रारीचा खर्च रु.10,000/-
3. शास्ती स्वरुपातील खर्च (Examplaray cost) रु. 5,000/-
एकुण नुकसान भरपाई रु. 65,000
2. तक्रार दाखल झाल्यानंतर मंचामार्फत विरुध्द पक्षांना नोटीस पाठविण्यांत आली. सदर नोटीस मिळाल्यावर वि.प.क्र. 1 व 2 तर्फे नवनित देशपांडे सिनेमा मॅनेजर PVR LTD, Nagpur यांनी तक्रारीस उत्तर दाखल केले असून त्यांत म्हटले आहे कि, तक्रारीत नमुद चित्रपट हिंदी मध्येच दाखविणार होते, परंतू इंटरनेटवर नमुद करतांना चुकून इंग्रजीत नमुद केले गेले. सदर चुक जाणीवपूर्वक झालेली नसून यापुढे याप्रकारची चुक होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतल्या जाईल. सदर चुकीमुळे ग्राहकाच्या झालेल्या गैरसोईबद्दल दिलगिर आहेत. मंच म्हणेल ती नुकसान भरपाई देण्यास वि.प. तयार आहेत. तसेच विरुध्द पक्षासोबत तक्रार आपसात तडजोडीने मिटविण्यास तयार आहेत.
3. सदर प्रकरणात मंचाने तक्रारीत दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे विचारार्थ आलेले मुद्दे, निष्कर्ष व त्यावरील कारणमिमांसा पुढीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) विरुध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार किंवा
अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे काय ? होय.
2) तक्रारकर्ता रक्कम परत मिळण्यांस तसेच झालेल्या
मानसिक शारीरिक त्रासाची भरपाई घेण्यांस
पात्र आहे काय ? अंशतः.
3) आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
4. मुद्दा क्र.1 व 2 नुसार - सदरच्या प्रकरणात तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.1 कडून “Zero Dark Thirty (English)(A) ” या सिनेमाची तीन तिकिटे इंटरनेटद्वारे रु.560.56 देऊन विकत घेतली होती आणि सदर तिकिटाप्रमाणे तक्रारकर्ता दि.08.03.2013 रोजी रात्री 10-00 वा. वि.प.क्र. 1 च्या थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेला असता त्याला दिलेल्या तिकिटांप्रमाणे इंग्रजी चित्रपट न दाखविता थिएटरमध्ये हिंदी भाषेतील चित्रपट लावण्यात आला होता. ही बाब वि.प.क्र. 1 व 2 यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या लेखी उत्तरात मान्य केली आहे. तक्रारकर्त्याने इंग्रजी चित्रपटाचे तिकिट काढले असून हिंदी भाषेतील चित्रपट दाखविण्यात आलेला असल्यामुळे तिकिटाचे पैसे वि.प.क्र. 1 च्या तिकिट इंचार्ज, तसेच व्यवस्थापकास परत मागूनही त्यांनी तिकिटाचे पैसे परत केले नाही. ही बाबदेखील वि.प.ने नाकारलेली नाही. एकंदरीत इंग्रजी चित्रपटाची जाहिरात देऊन आणि इंग्रजी चित्रपटाची तिकिटे विकून प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये आल्यानंतर त्यास इंग्रजी चित्रपट न दाखविता हिंदी भाषेतील चित्रपट दाखविणे आणि प्रेक्षकांनी सदर चित्रपट पाहावयाचा नसल्याने तिकिटाचे पैसे परत मागितले असता ते परत न करणे ही निश्चितच सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे.
सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने शारिरीक व मानसिक त्रासाच्या नुकसान भरपाईबाबत रु.50,000/-, तक्रारीच्या खर्चाबाबत रु.10,000/- आणि शास्ती स्वरुपातील खर्च रु.5,000/- अशी एकूण रु.65,000/- च्या नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. परंतू सदर प्रकरणाची वस्तूस्थिती लक्षात घेता तक्रारकर्त्यास तिकिटाची रक्कम रु.560/- व शारिरीक व मानसिक त्रासाबाबत व झालेल्या अवहेलनेबाबत नुकसान भरपाई रु.5,000/-, तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- मंजूर करणे न्यायोचित होईल, म्हणून मुद्दा क्र. 1 ते 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- आदेश -
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2) वि.प.क्र. 1 ते 2 यांना निर्देश देण्यांत येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला तिकिटांची किंमत रु.560/- परत करावी.
3) वि.प.क्र. 1 ते 2 यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबाबत रु.5,000/- व तक्रारीचा खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे.
4) वि.प.क्र. 1 ते 2 यांनी आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्याचे तारखेपासून 30 दिवसांचे आंत करावी.
5) उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
6) तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.