::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 14/09/2016 )
आदरणीय सदस्य श्री कैलास वानखडे, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, . .
तक्रारकर्त्याचा मुलगा सतिषकुमार याच्या लग्नानिमित्य स्वागत समारंभाचा कार्यक्रम दि. 5/12/2015 रोजी संध्याकाळी 7.00 वाजता आयोजीत करण्यात आला होता व त्या कार्यक्रमाकरिता तक्रारकर्त्याने दि. 5/12/2015 रोजी सकाळी 8.00 वा. पासून दि. 6/12/2015 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत विरुध्दपक्षाच्या मंगल कार्यालयाचे बुकींग दि. 22/3/2015 रोजी केले व विरुध्दपक्षाला रु. 15,000/- दिले. विरुध्दपक्ष यांनी बुकींग करतेवेळी संपुर्ण लॉन व हॉलच्या भाडयापोटी रु. 30,000/- लागतील असे तक्रारकर्त्यास सांगितले होते. तसेच हॉलवर डेकोरेशनचे रु. 16000/- अतिरिक्त आकारणी विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यावर केली होती. तसेच लॉनच्या कंपाऊंड वॉलवर व लॉन मधील झाडांवर लायटींग लावण्याकरिता सुध्दा रकमेची आकारणी केली होती. परंतु विरुध्दपक्ष यांनी कार्यक्रमाच्या दिवशी झाडावर व कंपाऊंडवालवर कुठलीही लायटींग लावली नाही. तक्रारकर्त्याने हॉल व लॉनच्या भाडयापोटी रु. 30,000/-, डेकोरेशन करिता रु. 16,000/- व डीपॉझीट म्हणून रु. 15,000/- असे एकूण रु. 61,000/- विरुध्दपक्षाला दिले होते. विरुध्दपक्ष यांनी दि. 22/3/2015 रोजी रु. 15,000/- दि. 12/9/2015 रोजी रु. 5000/-, दि. 10/11/2015 रोजी रु. 41,000/-असे एकूण रु. 61,000/- घेतलेले आहेत. तसेच दि. 8/11/2015 रोजी तक्रारकर्त्याच्या मुलाकडून रु. 15,000/- विरुध्दपक्ष यांनी घेतले आहेत. विरुध्दपक्षाने दि. 5/12/2015 रोजी रात्री 12.00 वाजताच पुर्ण हॉल व लॉन खाली करुन घेतले. त्यामुळे तक्रारकर्त्यास त्याच्या पाहुण्यांची व्यवस्था तक्रारकर्त्याच्या घरीच करावी लागली. त्यामुळे विरुध्दपक्षाने कराराचा भंग केलेला आहे. तसेच विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याकडून इलेक्ट्रीक चार्जेस रु. 14/- प्रतियुनिट प्रमाणे वसुल केले आहेत. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला दि. 22/2/2016 रोजी रजिस्टर पोष्टाने रु. 23400/- नुकसान भरपाई मिळण्याबाबत नोटीस पाठविली, परंतु विरुध्दपक्षाने सदर नोटीसचे खोटे उत्तर दिले. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर व्हावी व विरुध्दपक्ष यांनी करारापेक्षा 8 तास कमी हॉल व लॉन वापरण्यास दिला, त्या भाड्यापोटी रु. 10,000/- कंपाऊंडवाल व झाडावर लायटींग न लावल्यामुळे रु. 3000/-, रात्रीच्या वेळी पाहूण्यांना झालेल्या गैरसोईपोटी रु. 5000/- विद्युत बिलापोटी जास्त लावलेली रक्कम रु. 400/-, तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु. 50,000/- तसेच नोटीस खर्च रु. 1000/- असे एकूण रु. 79,400/- विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास व्याजासह देण्याचा आदेश व्हावा. तसेच तक्रारीचा खर्च रु. 10,000/- देण्याचा आदेश व्हावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 06 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष यांचा लेखीजवाब :-
2. विरुध्दपक्ष यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केला आहे. त्यानुसार विरुध्दपक्षाने तक्रारीतील आरोप नाकबुल करुन असे नमुद केले की, तक्रारकर्त्याने दि. 5/12/2015 चे सकाळी 8.00 वाजता पासून दि. 6/12/2015 चे सकाळी 8.00 वाजेपर्यंत तळमजल्यावरील हॉल व लॉन बुक केले होते. त्यानुसार हॉलचे भाडे रु. 15,000/- लॉनचे भाडे रु. 15,000/- भांडे, बिछायत, इलेक्ट्रीक चार्ज , साफ सफाई चार्ज व तुटफुट नुकसान भरपाईकरिता रु. 15,000/- डिपॉझीट व विद्युत चार्ज रु. 14/- प्रति युनिट, व सफाई चार्ज रु. 800/- असे ठरविले होते. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास रु. 61,000/- रक्कम दिलेली आहे. त्यात तळमजल्याचे हॉल व लॉनचे भाडे रु. 30,000/- डेकोरेशनचे रु. 16,000/- भांडे व इलेक्ट्रीक बिलाचे रु. 11,413/- व इलेक्ट्रीक चार्ज, साफ सफाई चार्ज, जनरेटर चार्ज व सामान कमीचे बिलाप्रमाणे रु. 2,896/- असे एकूण रु. 60,309/- चा हिशोब तक्रारकर्त्याला दिला व जमा रु. 691/- च्या ऐवजी रु. 700/- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास रोख दिले. तक्रारअर्जात नमुद केल्याप्रमाणे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला रु. 15,000/- अतिरिक्त दिलेले नाही. तक्रारकर्त्याकडून दि. 5/12/2015 रोजी रात्रीच्या 12.00 वाजता हॉल व लॉन खाली करुन घेतलेले नाही. विरुध्दपक्षाने जर दि. 5/12/2015 च्या रात्री 12.00 वाजता हॉल व लॉन खाली करुन घेतले असते तर त्याच वेळी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाविरुध्द पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली असती. तसेच ठरल्याप्रमाणे लाईटींग लावली नसती तर दि. 5/12/2015 रोजी तक्रारकर्त्याने जनरेटर चार्ज व सामान कमी चे बिलाप्रमाणे रु. 2,896/- असे एकूण रु. 60,309/- चा हिशोब तक्रारकर्त्यास दिल्यानंतर विरुध्दपक्षाकडे लेखी तक्रार केली असती. म्हणून तक्रारकर्त्याने नोटीस देईपर्यंत कुठेही कोणतीही तक्रार विरुध्दपक्षाविरुध्द केली नाही. दि. 4/12/2015 रोजी रात्रीच्या वेळेस हॉल व दुसऱ्या माळयावरील रुम विनामुल्य देण्यास नकार दिल्यामुळे त्याचा राग म्हणून तक्रारकर्त्याने ही खोटी तक्रार दाखल केली आहे. विरुध्दपक्षाने सेवा देण्यास न्युनता दर्शविली नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी. .
3. त्यानंतर तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर दाखल केले व विरुध्दपक्षाने पुरावा दाखल केला, तसेच उभय पक्षांनी तोंडी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याची तक्रार, सोबत दाखल केलेले सर्व दस्तऐवज, विरुध्दपक्षाचा लेखी जबाब, तक्रारकर्त्याचे प्रतिउत्तर, विरुध्दपक्षाचा पुरावा व तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष नमुद केला तो येणे प्रमाणे.
तक्रारकर्त्याने स्वागत समारंभाच्या कार्यक्रमासाठी दि. 5/12/2015 रोजी सकाळी 8.00 वाजता पासून दि. 6/12/2015 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत विरुध्दपक्षाचे मंगल कार्यालय स्वागत समारंभासाठी दि. 22/3/2015 रोजी रु. 15,000/- देवुन बुकींग केले होते. तशी पावती (क्र. 72) सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने दाखल केली आहे, त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक आहे, हे सिध्द होते.
तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार विरुध्दपक्षाचे मंगल कार्यालय हे दि. 5/12/2015 रोजी सकाळी 8.00 वाजता पासून दि. 6/12/2015 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत, दि. 22/3/2015 ला रु. 15,000/- देवून बुक केले. तक्रारकर्त्याने, दि. 12/9/2015 ला रु. 5000/- व दि. 8/11/2015 ला रु. 15,000/- आणि दि. 10/11/2015 ला रु. 41,000/- असे एकुण रु. 61,000/- विरुध्दपक्षाला दिलेले आहेत. परंतु विरुध्दपक्षाने दि. 5/12/2015 रोजी रात्री 12.00 वाजता हॉल व लॉन खाली करुन घेतले. त्यामुळे आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था घरीच करावी लागली. त्यामुळे नातेवाईकांमध्ये तक्रारकर्त्याची बदनामी झाली आहे. अशा प्रकारे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याकडून वेळेच्या आत हॉल व लॉन खाली करुन घेतले व हॉलवर डेकोरेशन सुध्दा केलेले नव्हते. वॉल कंपाउंडवर लाईटींग टाकलेली नव्हती. त्यामुळे दि. 22/2/2016 ला विरुध्दपक्षाला नोटीस पाठवावी लागली. सदर नोटीसला विरुध्दपक्षाने खोटा जबाब दिला असल्यामुळे सदर तक्रार मंचात दाखल करावी लागली.
विरुध्दपक्षाच्या लेखी युक्तीवादातील मुद्दे खालील प्रमाणे आहेत
विरुध्दपक्षाला एकूण रु. 61,000/- तक्रारकर्त्याकडून मिळाले आहे. त्यात तळमजल्याचे हॉल व लॉन, डेकोरेशन, भांडे, इलेक्ट्रीक चार्ज, साफसफाई, जनरेटर चार्ज असे एकूण रु. 60,309/- चा हिशोब तक्रारकर्त्याला दिलेला आहे व रु. 691/- ऐवजी रु. 700/- तक्रारकर्त्याला रोख दिलेले आहे. दि. 6/12/2015 ला तळमजल्याचा हॉल खाली करुन दिल्यानंतर श्री बावनकुळे, अकोट यांना देण्यात आला. तक्रारकर्त्याकडून दि. 5/12/2015 च्या रात्री 12.00 वाजता तक्रार अर्जात नमुद केल्याप्रमाणे हॉल व लॉन खाली करुन घेतलेले नाही. दि. 4/12/2015 रोजी रात्रीच्या वेळेस हॉल व दुसऱ्या माळयावरील रुम विनामुल्य देण्यास नकार दिल्यामुळे त्याचा राग म्हणून तक्रारकर्त्याने अडीच महिन्यानंतर खोटी नोटीस पाठविली आहे. विरुध्दपक्षाने कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही.
उभय पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मंचाने असा निष्कर्ष काढला आहे की, दाखल दस्त दि. 22/3/2015 च्या पावतीवरुन असे लक्षात येते की, दि. 5/12/2015 रोजी सकाळी 8.00 ते दि. 6/12/2015 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत विरुध्दपक्षाचे मंगल कार्यालय तक्रारकर्त्याने स्वागत समारंभासाठी बुक केले होते व तक्रारकर्त्याने वेळेच्या आंत सर्व रक्कम विरुध्दपक्षाला दिलेली असल्याने विरुध्दपक्षाला दि. 5/12/2015 च्या रात्री 12.00 वाजता मंगल कार्यालय खाली करुन घेण्याचा कोणताही अधिकार प्राप्त होत नव्हता, तरीही त्यांनी तक्रारकर्त्याकडून कार्यालय खाली करुन घेतले, असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. परंतु तक्रारकर्त्याला विरुध्दपक्षाचे मंगलकार्यालय वेळेच्या आंत सोडावे लागले, हे सिध्द करणारा एकही पुरावा तक्रारकर्त्याने मंचासमोर दाखल केला नाही. त्यासोबत तक्रारकर्त्याच्या नातेवाईकांची दुसरीकडे सोय करावी लागली, असे तक्रारकर्त्याने म्हटले आहे, परंतु सदर निवासाची सोय कुठे केली व त्यासाठी लागलेल्या खर्चाचा उल्लेख तक्रारकर्त्याने तक्रारीत केला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला मंगल कार्यालय वेळेच्या आत सोडावे लागल्यामुळे त्यांची व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय झाली, या तक्रारकर्त्याच्या आक्षेपात मंचाला तथ्य आढळत नाही. परंतु तक्रारकर्त्याने युक्तीवादाच्या वेळेला दाखल केलेल्या छायाचित्रावरुन, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला शोभनिय व आकर्षक अशी विजेची रोशनाई करुन दिलेली दिसून येत नाही. येथे असे नमुद करण्यात येते की, तक्रारकर्त्याने युक्तीवादादरम्यान छायाचित्र दाखल केले, त्यावर विरुध्दपक्षाने तिव्र आक्षेप घेतला होता, म्हणून मंचाने फक्त Production Allowed असा आदेश पारीत केला. परंतु युक्तीवादादरम्यान विरुध्दपक्षाने देखील सदर छायाचित्रांचा आधार घेतल्याने सदर छायाचित्रे मंचाने विचारात घेतली आहे. त्यामुळे त्यापोटी झालेली नुकसान भरपाई तक्रारकर्ता विरुध्दपक्षाकडून मिळण्यास पात्र असल्याचे निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे. म्हणून नुकसान भरपाई व प्रकरण खर्चासह रु. 4000/- तक्रारकर्ता विरुध्दपक्षाकडून मिळण्यास पात्र आहे, असा निष्कर्ष मंचाने काढला आहे.
सबब अंतीम आदेश पारीत केला तो खालील प्रमाणे.
::: अं ति म आ दे श :::
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याला मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रु. 2000/-(रुपये दोन हजार) द्यावे. तसेच प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 2000/- ( रुपये दोन हजार ) द्यावे.
- सदर आदेशाचे पालन, निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसात करावे.
सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.