जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
मा.अध्यक्षा- सौ.व्ही.व्ही.दाणी
मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन
मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – ३९/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २८/०२/२०१२
तक्रार निकाली दिनांक – १९/०८/२०१३
अॅड.मदन पुनमचंद परदेशी ----- तक्रारदार.
उ.व.५०, व्यवसाय-शेती.
रा.खरेवाडा,शिरपूर.ता.शिरपूर,जि.धुळे.
विरुध्द
(१)मा.सप्लाय ऑफीसर साो. ----- सामनेवाले.
पुरवठा विभाग,शिरपूर ता.शिरपूर,जि.धुळे.
(२)मा.तहसिलदार साो
तहसिल कार्यालय,शिरपूर,ता.शिरपूर,जि.धुळे.
(३)मा.पुरवठा अधिकारी साो.
जिल्हाधिकारी कार्यालय,धुळे.ता.जि.धुळे
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी )
(मा.सदस्याः सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य: श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – स्वत:)
(सामनेवाले क्र.२ तर्फे – स्वत:)
(सामनेवाले क्र.१ व ३ तर्फे – गैरहजर)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) तक्रारदारांनी, सामनेवाले यांच्याकडून सदोष सेवेमुळे नुकसान भरपाई मिळावी आणि किरोसीन देण्याचा आदेश व्हावा या मागणीसाठी सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांचा सि.स.नं.१०४९,१०५० खरेवाडा शिरपूर येथील रेशन दुकान के.एम.दलाल यांचे आहे. मात्र रॉकेलसाठी गाडी बदल्यामुळे ता.०१-०१-२०११ पासून एकवेळा ही रॉकेल मिळाले नाही. त्याबाबत तक्रारदारांनी कार्यावाही करण्याकामी दि.११-०४-११ ला अर्ज दिला, त्यानंतर दि.१९-१०-११ ला नोटीस दिली. नोटीसचे उत्तर ता.१९-०१-११ ला तहसिलदार शिरपूर यांनी देतांना २ गॅस सिलेंडर असल्यामुळे शिधापत्रिका धारकांना केरोसिन कोटा अनुज्ञेय नाही असे म्हटले आहे. तहसिलदार यांनी दिलेल्या उत्तर मध्ये यादीत नाव नाही, सोबत भरुन दिलेल्या फॉर्मची झेरॉक्स प्रतजोडली आहे. वास्तविक त्या फॉर्म मागे २ गॅस कोणीतरी सही केली आहे. अर्जावर तक्रारदारांची सही डयुपलिकेट केली आहे मी भरलेला अर्ज गाळ केला आहे.
(३) शिरपूर शहरात रॉकेल हॉर्क्स वाटणारे व्यवस्थित वाटत नाही सर्व ग्राहकांच्या तक्रारारी आहे. काळाबाजार मध्ये रिक्षा, व गाडीवाल्यांना रॉकेल विकतात. तक्रारदारांचे कार्ड असलेल्या हॉर्क्स वाले सुध्दा रिक्षावाल्यांना रॉकेल विकतो का त्यांच्यावर गुन्हे दाखल करीत नाही. उलट भष्ट्राचारांना साथ देवून ग्राहकांना चांगली सेवा पुरवठा विभाग शिरपूर करीत नाही. म्हणून त्यांच्याकडून ही नुकसान भरपाई मिळावी. आणि तक्रारदारांच्या कार्डाचे रॉकेल मागील न दिलेले त्याला देण्याचा आदेश व्हावा. अशी मागणी हया तक्रारारीमध्ये मागित आहे.
(४) सर्व जाबदेणारे निष्काळजीपणाने वागत आहे. भष्ट्राचारामध्ये सामील आहात व रॉकेल घेणा-या ग्राहकांची अडवणूक करुन पिळवणूक करीत आहे. पुरवठा विभाग ते रॉकेल, रेशन विकणारे यांची साखळी आहे. हया तक्रारारी मध्ये सप्लायर डिपॉटमेंटची चुक आहे. जाबदेणार नं.१ व २ मिळून नोटीसीचे खोटे उत्तर देवून फॉर्मवर दोघांनी खोटी सही केली आहे. ते सही कोणी केली त्यांच्यावर आय.पी.सी.कलम ४२० व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करणे आहे. त्यासोबत १ व २ यांना ही आरोपी करणे आहे. म्हणून ग्राहक मंचात त्यांचा खुलासा येवून त्यांचे म्हणणे आल्यानंतर फौजदारी केस करणे सोयीचे होईल. त्या अगोदर ही ग्राहक मंचात केस आहे.
(५) तक्रारदार यांचे नांव यादीतून कमी करण्याचे व ठेवण्याचे काम सामनेवाले यांचे आहे. सामनेवाले यांनी बेकायदेशीरपणे नांव कमी केले व ग्राहकाचे नुकसान केले आहे. तक्रारदारांची विनंती अशी आहे की, तक्रारदार यांना सामनेवाले क्र.१ ते ३ यांच्याकडून व्यक्तीशा अगर सामाईक रु.५५,०००/- नुकसान भरपाई मिळावी, तसेच तक्रारदारांचे नांव केरोसीन यादीत घेवून, केरोसीन देण्याचा आदेश व्हावा, तक्रारीचा खर्च व व्याजाची रक्कम मिळावी.
(६) सामनेवाले नं.१ व ३ यांना या न्यायमंचाची रजिष्टर्ड पोष्टाद्वारे पाठविलेले नोटिस मिळाल्याचे दाखल पोहोच पावतीवरुन स्पष्ट होत आहे. परंतु सामनेवाले नं. १ व ३ हे सदर प्रकरणी स्वत: अथवा अधिकृत प्रतिनिधी मार्फत हजर झाले नाही. तसेच त्यांनी त्यांचे बचावपत्रही दाखल केलेले नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द दि.१९-०३-२०१३ रोजी एकतर्फा आदेश करण्यात आला आहे.
(७) सामनेवाले नं.२ यांनी त्यांचा लेखी खुलासा देऊन सदर तक्रार अर्ज नाकारला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, सदर बाबत चौकशी केली असता अपात्र शिधापत्रीका शोध मोहिमे अंतर्गत तक्रारदारांनी शिधापत्रीका तपासणीनुसार माहिती भरुन, शिधा वाटप धान्य दुकानदार श्री.के.एम.दलाल यांचे मार्फत सादर केली आहे. सदर फॉर्ममध्ये तक्रारदार यांनी त्यांच्याकडे भारजा गॅस कंपनीचे दोन सिलेंडर कनेक्शन असल्याचे नमूद करुन त्यावर स्वाक्षरी केलेली आहे. शासन परिपत्रक क्र.केईआर/१०९७/जून९७/प्रक्र.५३४०/नापू २७/दिनांक ११ जुलै १९९७ नुसार २ सिलेंडर असलेल्या शिधापत्रीका धारकास केरोसीन साठा देय नाही. तक्रारदार यांनी स्वत: शिधापत्रीकेची तपासणी कामी दिलेल्या माहितीचा विचार करुन किरकोळ केरोसीन विक्रेत्याच्या केरोसीन वितरन करावयाच्या ग्राहकांच्या यादीत तक्रारदारांचे नांव कमी करण्यात आले आहे. तक्रारदार यांनी शिधापत्रीकेसाठी शोध मोहिमेअंतर्गत फॉर्मवर तक्रारदार अर्जदारांची डयुप्लीकेट सही आहे व त्यांनी स्वत: दिलेला फॉर्म गहाळ केला आहे, हे कथन खोटे आहे. शासन निर्णय क्र.शिवाप-१४११/प्रक्र२५/नापू-२८/दिनांक ११ फेब्रुवारी ११ नुसार शिधापत्रीका धारकांची शिधापत्रीका रद्द करण्याची तरतुद आहे. परंतु तक्रारदार यांनी तसा कोणताही अर्ज केलेला नाही. तक्रारदार हे २ गॅस सिलेंडर धारक असल्याने ते स्वत: जबाबदार आहेत. त्यामुळे सदरचा तक्रार अर्ज रद्द करण्याची विनंती केली आहे.
(८) तक्रारदारांचा अर्ज, शपथपत्र, कागदपत्र तसेच सामनेवाले नं.२ यांचा खुलासा, शपथपत्र, कागदपत्र पाहता तसेच तक्रारदारांचा तोंडी युक्तिवाद युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि उभयतांचा लेखी युक्तिवाद पाहता, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)सामनेवाले यांच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होते काय ? | : नाही. |
(ब)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे. |
विवेचन
(९) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांची तक्रार अशी आहे की, त्यांना दि.०१-११-२०११ पासून एकदाही रॉकेल मिळालेले नाही व त्यांनी भरुन दिलेल्या फॉर्मवर २ सिलेंडरची नोंद करुन त्यांची डयुप्लीकेट सही सामनेवाले यांनी केली आहे व त्यांनी भरुन दिलेला फॉर्म गहाळ केला आहे.
(१०) तक्रारदार यांनी त्यांच्या शिधापत्रीकेची छायांकीत प्रत नि.नं.४/२ वर दाखल केलेली आहे. सदर शिधापत्रीका पाहता त्यावर तक्रारदार व त्यांच्या कुटूंबीयांची नांवे असून सदर शिधापत्रीका ही दि.०९-०९-१९९९ रोजी दिलेली दिसून येत आहे. सदर शिधापत्रीकेवर गॅस वितरकांचे नांव व ठिकाण यामध्ये भारजा गॅस एजंसी, सिलेंडर एक अशी माहिती नमूद केलेली आहे. या शिधापत्रीके प्रमाणे तक्रारदारांकडे एक गॅस सिलेंडर असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रमाणे तक्रारदार यांना रॉकेल न मिळाल्याने त्यांनी सामनेवाले यांना दि.२६-०८-२०११ रोजी नोटीस पाठविली आहे. ती नि.नं.४/३ वर दाखल आहे.
(११) सदर नोटीसला उत्तर सामनेवाले यांनी तक्रारदारांना दि.१९-०९-२०११ रोजी दिले असून ते पत्र नि.नं.४/४ वर दाखल आहे. या पत्राप्रमाणे शिधापत्रीका शोध मोहिम तपासणी अंतर्गत भरुन दिलेल्या फॉर्मवर दोन गॅस सिलेंडर असल्या बाबतची माहिती तक्रारदारांनी नमूद केली आहे. त्यामुळे तक्रारदारांना केरोसीन कोटा अनुज्ञेन नाही हे त्यांना कळविल्याचे दिसत आहे.
(१२) या पत्रासोबत सामनेवाले यांनी शिधापत्रीका तपासणी नमूना फॉर्म नि.नं.४/५ वर दाखल केला आहे. सदर फॉर्मचे अवलोकन केले असता त्यावर तक्रारदारांचा फोटो असून त्यात तक्रारदारांचे नांव व इतर कौटूंबीक माहिती नमूद केलेली आहे. यामध्ये कलम (३) मध्ये गॅस सिलेंडरची संख्या : दोन यावर बरोबरची खुण केलेली आहे. तसेच कलम (४) मध्ये गॅस कंपनीचे नांव: भारजा गॅस, अशी माहिती नमूद केलेली आहे. यावर हमीपत्र नमूद केले असून त्यावर तक्रारदारांची सही आहे. सदर फॉर्मवरुन असे लक्षात येते की, तक्रारदारांचे नांवे दोन गॅस सिलेंडर भारजा कंपनीचे आहेत.
(१३) या बाबत सामनेवाले यांनी शासन परिपत्रक क्र.केईआर/१०९७/जून९७/प्रक्र.५३४०/नापू २७/दिनांक ११ जुलै १९९७ यास अनुसरुन केलेला पत्रव्यवहार दाखल केला आहे. या पत्राप्रमाणे शहरी भागातील बिगर गॅस धारकांना पर्यायी इंधन उपलब्ध नसल्याने केरोसीनचा वापर मोठया प्रमाणात होतो, त्यामुळे दि.१ जून १९९७ पासून अंमलात आलेल्या रॉकेल वाटपाच्या परिणामामध्ये सुधारणा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. तरी यापुढे खालील परिमाणा नुसार केरोसीनचे वाटप करण्यात यावे. या प्रमाणे दोन गॅस धारकांना रॉकेलचा पुरवठा “काही नाही” असे नमूद आहे. या शासन परिपत्रका प्रमाणे दोन गॅस सिलेंडर धारकांना रॉकेल देता येत नाही. या फॉर्म व परिपत्रका प्रमाणे तक्रारदार यांनी त्यांच्या फॉर्ममध्ये नमूद केलेल्या माहितीप्रमाणे तक्रारदार हे दोन गॅस सिलेंडर धारक आहेत. त्यामुळे तक्रारदार हे रॉकेल मिळण्यास अपात्र आहेत हे स्पष्ट होत आहे.
(१४) या बाबत तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार हे स्वत एक गॅस सिलेंडर धारक आहेत व फॉर्ममध्ये नमूद केलेली माहिती ही खोटी व चुकीची असून त्यावर त्यांची डयुप्लीकेट सही कोणीतरी केलेली आहे. परंतु तक्रारदारांनी या बाबत संबंधित अधिकारी यांच्याकडे तशी तक्रार अर्ज देऊन खुलासा करणे आवश्यक होते व तशी दुरुस्ती त्यांनी त्यांच्या फॉर्ममध्ये करुन घेणे अभिप्रेत आहे. परंतु तसा कोणताही अर्ज करुन तक्रारदारांनी दुरुस्ती करुन घेतलेली दिसत नाही. तक्रारदार यांनी, त्यांच्या मुळ तक्रार अर्जामध्ये खोटा मजकूर लिहून डयुप्लीकेट सही केली आहे या बाबत कोणताही पुरावा सदर अर्जात दाखल केलला नाही. तसेच सदरची डयुप्लीकेट सही व खोटा मजकूर सामनेवाले यांनी नमूद केला आहे हा तक्रारदारांचा मुद्दा या ग्राहक मंचात सिध्द करता येणार नाही. या बाबत तक्रारदारांनी योग्य त्या न्यायालयात न्याय मागणे रास्त होईल.
(१५) तक्रारदार यांच्या शिधापत्रीकेत एक गॅस सिलेंडर धारक अशी नोंद असल्याचे दिसत आहे. परंतु सदर फॉर्ममध्ये तक्रारदारांच्या माहितीप्रमाणे, तक्रारदार हे दोन गॅस सिलेंडरधारक आहेत अशी नोंद असल्याचे दिसत आहे. तक्रारदार यांनी एक गॅस सिलेंडर धारकाच्या नोंदी प्रमाणे तशी दुरुस्ती त्यांच्या फॉर्ममध्ये करुन घेतलेली नाही. त्यामुळे सामनेवाले यांनी नमूद फॉर्ममध्ये असलेल्या माहितीप्रमाणे तक्रारदार हे दोन गॅस सिलेंडर धारक आहेत या प्रमाणे तक्रारदाराचे नांव हे किरकोळ केरोसीन विक्रेत्याच्या केरोसीन वितरण करण्याच्या ग्राहकाच्या यादीतून, नांव कमी केले आहे व त्यामुळे त्यांना केरोसीन कोटा हा अनुज्ञेय होत नाही. या माहिती प्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदार यांना आजपावेतो रॉकेल पुरवठा केलेला दिसत नाही. सदरची सामनेवाले यांची बाब ही योग्य व रास्त आहे. त्यामुळे सामनेवालेंच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होत नाही. म्हणून मुद्दा क्र. “अ” चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(१६) वरील सर्व बाबीचा विचार होता, व उभयपक्षांनी दाखल केलेली कागदपत्र पाहता तसेच युक्तिवाद ऐकला असता, तक्रारदारांची तक्रार रद्द करणे योग्य होईल असे या मंचाचे मत आहे. सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज रद्द करण्यात येत आहे.
(ब) अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांकः १९/०८/२०१३
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.एस.एस.जैन) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे. (महाराष्ट्र राज्य)