न्या य नि र्ण य
(दि.24-01-2024)
व्दाराः- मा. श्री. स्वप्निल द.मेढे, सदस्य
1) तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रार अर्ज हा सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून रक्कम स्विकारुनही सोन्याचा दागिना न बनविता सेवेत त्रुटी केलेने सामनेवाला विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा-2019 चे कलम 35 अन्वये दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथने थोडक्यात पुढील प्रमाणे-
यातील सामनेवाला यांचे समर्थ ज्वेलर्स नावाचा ज्वेलर्सचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांना सोन्याचा मेखला बनवायचा असल्याने तक्रारदार यांनी सामनेवाला यांना 60 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मेखला बनविण्यास दि.20/08/2021 रोजी सांगितले. त्यासाठी सामनेवाला यांनी सोने व दागिना बनवण्याचा खर्च असे एकूण रक्कम रु.2,97,000/- व त्यावर सी.जी.एस.टी. रक्कम रु.4,455/- व एस.जी.एस.टी. रक्कम रु.4,455/- अस एकूण रक्कम रु.3,05,910/- चे टॅक्स इन्व्हॉईस बनवले.
तक्रारदार यांनी त्याचदिवशी दि.20/08/2021 रोजी ॲक्सीस बँक लि, शाखा रत्नागिरीचा धनादेश क्र.302183 चा पुरुषोत्तम वैदय यांचे नांवे असलेला रक्कम र.1,50,000/- चा धनादेश दिला. त्यानंतर दि.30/08/2021 रोजी ॲक्सीस बँक शाख रत्नागिरीचा धनादेश क्र.302184 रक्कम रु.65,000/- चा पुरुषोत्तम वैदय यांचे नांवाचा धनादेश दिला. तसेच दि.27/09/2021 रोजी रक्कम रु.50,000/- रोखीने दिले. त्याची नोंद सामनेवाला यांनी टॅक्स इन्व्हॉईसवर करुन दिली. सदर नोंद करताना सामनेवाला यांनी रक्कम रु.65,000/- ऐवजी रक्कम रु.55,000/- असे लिहीलेने तक्रारदाराने रक्कम रु.65,000/- चा धनादेश दिलेला असलेने सामनेवाला यांनी तक्रारदारास रक्कम रु.10,000/- रोखीने परत दिले. त्यामुळे बाकी रक्कम रु.50,910/- तक्रारदाराकडून स्विकारुन सामनेवाला यांनी तक्रारदारास मेखला हा सोन्याचा दागिना दयावयाचा होता.
तक्रारदार यांनी वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी तक्रारदारास सोन्याचा मेखला बनवून न दिल्याने तक्रारदाराने दि.13/05/2022 रोजी सामनेवाला यांना नोटीस पाठवून 15 दिवसाचे आत तक्रारदाराकडून उर्वरित रक्कम रु.50,910/- स्विकारुन 60 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मेखला बनवून दयावा. जर सोन्याचा मेखला बनवून दयावयाचा नसेल तर तक्रारदाराकडून स्विकारलेली रक्कम तक्रारदारास परत दयावी. तसेच मेखला बनवण्यासाठी दिला होता त्यावेळी सोन्याचा दर 10 ग्रॅमला रक्कम रु.43,000/- इतका होता. तो आता दर 10 ग्रॅमला रक्कम रु.50,000/- इतका असलेने रक्कम परत करणार असाल तर सध्याच्या फरकाच्या दराने करावी असे कळविले होते. सदर नोटीसला सामनेवाला यांनी दि.14/06/2022 रोजी उत्तर पाठविले. सदर उत्तरामध्ये सामनेवाला यांचा व्यवसाय आर्थिक नुकसानीमुळे दोन वर्षापूर्वीच बंद पडला असे म्हटले आहे. मेखला बनवण्यासाठी किती सोने लागेल हे करासहित जुन्या पडलेल्या पावती पुस्तकामध्ये लिहून दिले. तसेच दि.20/08/2021 रोजी रक्कम अदा केलेचे नाकारले आहे. तसेच कोरोना कालावधीमध्ये तक्रारदाराने तातडीने सोन्याची चेन व लांब मंगळसुत्र बनवून हवे होते म्हणून सामनेवाला यांनी स्वत:कडील सोन्यामधून ते बनवून दिले. त्याच्या मोबदल्याचे धनादेश आहेत असे सामनेवाला यांनी त्यांचे उत्तरात म्हणत आहेत. सामनेवालांनी खोटया व खोडसाळ मजकूराचे उत्तर देऊन सामनेवाला यांनी तक्रारदार व सामनेवाला यांचेमधील व्यवहारच नाकारला आहे. सामनेवाला यांनी अशाप्रकारे अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे. त्यामुळे सदरची तक्रार दाखल करणे तक्रारदारास भाग पडले आहे. सबब तक्रारदारास सोन्याचा मेखला हा दागिना बनवून दयावा अथवा सामनेवाला यांनी तक्रारदार यांचेकडून मेखला बनवण्यासाठी घेतलेली रक्कम सोन्याच्या चालू बाजारभावाने तक्रारदारास परत करावी. तसेच तक्रारदारास शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.10,000/- सामनेवाला यांचेकडून मिळणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती तक्रारदाराने केली आहे.
2) तक्रारदाराने त्याचे तक्रारीच्या पुष्टयर्थ तक्रारीसोबत नि.6 कडे एकूण 4 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्यामध्ये नि.6/1 कडे सामनेवाला यांनी तक्रारदाराचे नोटीसला दिलेले उत्तर नि.6/2 कडे तक्रारदाराने सामनेवाला यांना पाठविलेली वकीलांमार्फतची नोटीस, नि.6/3 कडे सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेली दि.22/05/21 रोजीची टॅक्स इन्व्हॉईस क्र.508, नि.6/4 कडे दि.20/08/21 चे सामनेवाला यांचे टॅक्स इन्व्हॉईस क्र.515 इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.13 कडे तक्रारदाराचे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.14 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. तसेच नि.18 कडे तक्रारदार यांचे बँक खातेचा उतारा दाखल केला आहे. नि. 19 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
3) प्रस्तुत प्रकरणी सामनेवाला हे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी नि.11कडे त्यांचे म्हणणे दाखल करुन तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. सामनेवाला त्यांचे लेखी म्हणणेमध्ये कथन करतात की, सन-2020 चे दरम्यान कोरोना काळात उदभवलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे सामनेवालांना व्यवसायात झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे सामनेवालांनी श्री समर्थ ज्वेलर्स या नावाने सुरु असलेला व्यवसाय पूर्णपणे बंद केला होता. त्यामुळे त्या व्यवसायाच्या अनुषंगाने तक्रारदाराकडून कोणत्याही व कसल्याही प्रकारच्या दागिन्यांची ऑर्डर घेण्याची व ती ऑर्डर पूर्ण करण्याचा प्रश्न येत नाही. सामनेवाला हे केवळ रत्नागिरी येथील विविध सोनारांकडून दागिन्यांची ऑर्डर घेऊन तसा दागिना बनवून देण्याचा व्यवसाय कारागीर म्हणून करतात. सामनेवाला यांना सोने आणून दिल्यानंतर ते त्या व्यक्तीच्या पसंतीच्या डिझाईनचे दागिने बनवून देऊन त्याची फक्त मजुरी घेतात. तक्रारदाराचे पत्नीस जेव्हा मेखला बनवायाचा होता त्यावेळी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेशी संपर्क साधून मेखला दागिना बनवण्यास किती सोने लागेल याबाबतचा अंदाज काढून मागितला. तेव्हा जुने पडलेल्या पावती पुस्ताकामध्ये सामनेवाला यांनी तक्रारदारास सवयीप्रमाणे सोन्याचे वजन, त्याची किंमत करांसह लिहून दिली. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून दि.20/08/2021 रोजी कोणतीही रक्कम स्विकारलेली नाही. कोरोना काळात सर्व दुकाने व व्यवहार बंद असताना तक्रारदारास तातडीने एक सोन्याची चैन व एक लहान मंगळसुत्र बनवून हवे होते. त्यावेळी सामनेवाला यांनी स्वत:कडे असलेल्या सोन्यामधून ते दागिने बनवून दिले होते. त्याचा मोबदला म्हणून तक्रारदार यांनी काही धनादेश सामनेवाला यांना अदा केलेले होते. त्या रक्कमेचा व धनादेशाचा गैरअर्थ लावून तक्रारदाराने सामनेवाला यांचेविरुध्द सदरची खोटी तक्रार दाखल केली आहे. सबब सामनेवाला हा तक्रारदाराचे कोणतेही कायदेशीर देणे लागत नसलेचे सदरचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी विनंती सामनेवाला यांनी केली आहे.
4) सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे प्रतिज्ञापत्रासह दाखल केले आहे. तसेच नि.16 कडे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.21 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
5) वर नमुद तक्रारदार यांचा तक्रार अर्ज व दाखल कागदपत्रे व लेखी युक्तीवाद, सामनेवाला यांचे म्हणणे व लेखी युक्तीवाद. तसेच उभयतांचा तोंडी युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन करता सदर आयोगाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ खालील मुददे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून रक्कम स्विकारुन सोन्याचा मेखला दागिना बनवून न देऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारास सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून सोन्याचा मेखला दागिना बनवून मिळणेस अथवा त्यापोटी सामनेवाला यांनी स्विकारलेली रक्कम व्याजासह परत मिळणेस तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
-वि वे च न –
6) मुद्दा क्रमांकः 1 – प्रस्तुत सामनेवाला यांचे समर्थ ज्वेलर्स नावाचा व्यवसाय असलेने तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून सोन्याचा मेखला दागिना बनवण्यासाठी ऑर्डर दिली होती. त्याबाबतची सामनेवाला यांचेकडील दि.20/08/21 रोजीचे टॅक्स इन्व्हॉईस क्र.515 तक्रारदाराने नि.6/4 कडे दाखल केलेले आहे. सदर टॅक्स इन्व्हॉईसचे अवलोकन करता सदरची इन्व्हॉईस सामनेवाला यांचे असून त्यावर तक्रारदाराचे नांव असलेचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक असलेचे व सामनेवाला हे विक्रेते/ सेवापुरवठादार असलेची बाब निर्विवादपणे सुस्पष्ट होते. सबब तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व विक्रेता/सेवापुरवठादार आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुददा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
7) मुद्दा क्रमांकः 2 – तक्रारदार यांना सोन्याचा मेखला बनवायचा असल्याने तक्रारदार यांनी सामनेवाला यांना 60 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मेखला बनविण्यास दि.20/08/2021 रोजी सांगितले. त्यासाठी सामनेवाला यांनी सोने व दागिना बनवण्याचा खर्च व त्यावर सी.जी.एस.टी. व एस.जी.एस.टी. अशी एकूण रक्कम रु.3,05,910/- चे टॅक्स इन्व्हॉईस दिले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी त्याचदिवशी दि.20/08/2021 रोजी पुरुषोत्तम वैदय यांचे नांवे असलेला ॲक्सीस बँक लि, शाखा रत्नागिरीचा धनादेश क्र.302183 चा रक्कम र.1,50,000/- चा धनादेश दिला. त्यानंतर दि.30/08/2021 रोजी ॲक्सीस बँक शाख रत्नागिरीचा धनादेश क्र.302184 रक्कम रु.65,000/- चा पुरुषोत्तम वैदय यांचे नांवाचा धनादेश दिला. तसेच दि.27/09/2021 रोजी रक्कम रु.50,000/- रोखीने दिले. त्याची नोंद सामनेवाला यांनी टॅक्स इन्व्हॉईसवर करुन दिली. सदर नोंद करताना सामनेवाला यांनी रक्कम रु.65,000/- ऐवजी रक्कम रु.55,000/- असे लिहीलेने तक्रारदाराने रक्कम रु.65,000/- चा धनादेश दिलेला असलेने सामनेवाला यांनी तक्रारदारास रक्कम रु.10,000/- रोखीने परत दिले. परंतु तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे वेळोवेळी मागणी करुनही सामनेवालांनी तक्रारदारास सोन्याचा मेखला दागिना बनवून दिला नाही. त्यामुळे तक्रारदारास सदरची तक्रार दाखल करावी लागली.
8) परंतु सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये सन-2020 चे दरम्यान कोरोना काळात उदभवलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे सामनेवालांनी त्यांचा व्यवसाय पूर्णपणे बंद केला होता. त्यामुळे व्यवसायाच्या अनुषंगाने तक्रारदाराकडून कोणत्याही प्रकारच्या दागिन्यांची ऑर्डर घेऊन ती पूर्ण करण्याचा प्रश्नच येत नाही. सामनेवाला यांना सोने आणून दिल्यानंतर ते त्या व्यक्तीच्या पसंतीच्या डिझाईनचे दागिने बनवून देऊन त्याची फक्त मजुरी घेतात. सामनेवाला हे कारागीरचा व्यवसाय करतात. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेशी संपर्क साधून मेखला दागिना बनवण्यास किती सोने लागेल याबाबतचा अंदाज काढून मागितला. तेव्हा जुने पडलेल्या पावती पुस्ताकामध्ये सामनेवाला यांनी तक्रारदारास सवयीप्रमाणे सोन्याचे वजन, त्याची किंमत करांसह लिहून दिली. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून दि.20/08/2021 रोजी कोणतीही रक्कम स्विकारलेली नाही. कोरोना काळात सर्व दुकाने व व्यवहार बंद असताना तक्रारदारास तातडीने एक सोन्याची चैन व एक लहान मंगळसुत्र बनवून हवे होते. त्यावेळी सामनेवाला यांनी स्वत:कडे असलेल्या सोन्यामधून ते दागिने बनवून दिले होते. त्याचा मोबदला म्हणून तक्रारदार यांनी काही धनादेश सामनेवाला यांना अदा केलेले होते. त्या रक्कमेचा व धनादेशाचा गैरअर्थ लावून तक्रारदाराने सामनेवाला यांचेविरुध्द सदरची खोटी तक्रार दाखल केली आहे.
9) तक्रारदार यांनी नि.6/4 कडे दाखल केलेले सामनेवाला यांचे इन्व्हॉईस क्र.515 दि.20/08/2021 चे बारकाईने अवलोकन करता, त्यावर तक्रारदाराचे नांव दिसून येते. तसेच सोने मेखला वजन-60 ग्रॅम दर 43000 मजुरी दर 650 रक्कम रु.258000/- व रु.39000/- अशी एकूण रक्कम रु.3,97,000/- तसेच सी.जी.एस.टी. रक्क्म रु.4,455/- व एस.जी.एस.टी. रक्कम रु.4,455/- अशी एकूण रक्कम रु.3,05,910/- असे लिहून दिलेचे स्पष्ट होते. सामनेवाला यांनी सदर मेखला बनवण्याचा खर्च स्वत:चे इन्व्हॉईसवर लिहून दिलेचे मान्य केलेले आहे. यावरुन तक्रारदार यांनी सामनेवाला यांना सोन्याचा मेखला दागिना बनवण्याची ऑर्डर दिलेचे स्पष्ट होते. तसेच सदर इन्व्हॉईसवर डाव्या बाजुला रक्क्म रु.3,05,910/- वजा रक्कम रु.1,50,000/- दि.20/08/21 बाकी रक्कम रु.1,55,910/- वजा रक्कम रु.55000/- बाकी रक्कम रु.1,00910/- वजा रक्कम रु.50,000/- दि.27/09/21 बाकी रक्कम रु.50,910/- असे लिहिलेचे दिसून येते. सदर इन्व्हॉईसवर डाव्या बाजूला जमा रक्कमेचा तपशील व खर्चाचा तपशील पाहिला असता सदर आकडे हे एकाच व्यक्तीने लिहिलेचे स्पष्टपणे दिसून येते तसेच तकारदाराने नि.18/1 कडे त्यांचे बँक खातेचा उतारा दाखल केला असून सदर बँक खातेउता-याचे अवलोकन करता, त्यामध्ये दि.20/08/21 रोजी रक्कम रु.1,50,000/- व दि.30-08-2021 रोजी रक्कम रु.65,000/- सामनेवाला यांचे नांवे खर्ची पडलेचे दिसून येते. यावरुन तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे मेखला दागिना बनवण्यासाठी रक्कम रु.2,55,000/- अदा केलेचे स्पष्ट होते. उर्वरित रक्कम रु.50,910/- अदयाप देणे बाकी होते हे स्पष्ट होते.
10) परंतु सामनेवाला यांनी सदरची बाब नाकारताना तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून मेखला दागिना बनवण्यास किती सोने लागेल याबाबतचा अंदाज काढून मागितला. तेव्हा जुने पडलेल्या पावती पुस्ताकामध्ये सामनेवाला यांनी तक्रारदारास सवयीप्रमाणे सोन्याचे वजन, त्याची किंमत करांसह लिहून दिली. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून दि.20/08/2021 रोजी कोणतीही रक्कम स्विकारलेली नाही असे कथन केले आहे. सदरची बाब शाबीत करण्यासाठी सामनेवाला यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. याउलट तक्रारदार यांनी त्यांचे बँकेचा खातेउतारा दाखल केलेला असून त्यामध्ये सामनेवाला यांचे नांवे दि.20/08/21 रोजी रक्कम रु.1,50,000/- व दि.30/08/21 रोजी रक्कम रु.65,000/- खर्ची पडलेचे दिसून येते.
11) सामनेवाला यांचे कथनानुसार कोरोना काळात सर्व दुकाने व व्यवहार बंद असताना तक्रारदारास तातडीने एक सोन्याची चैन व एक लहान मंगळसुत्र बनवून हवे होते. त्यावेळी सामनेवाला यांनी स्वत:कडे असलेल्या सोन्यामधून ते दागिने बनवून दिले होते. त्याचा मोबदला म्हणून तक्रारदार यांनी काही धनादेश सामनेवाला यांना अदा केलेले होते. तथापि, तक्रारदार यांनी नि.6/3 कडे दाखल केलेले सामनेवाला यांचेकडील दि.22/05/21 रोजीचे टॅक्स इव्हॉईस क्र.508 चे अवलोकन करता, सोने जमा 13.500 ग्रॅम पैकी 8.000 ग्रॅमचे मंगळसुत्र करणे 5.500 ग्रॅम परत देणे, सदर दागिना बनवण्याचा मजूरीचा दर-600 एकूण रक्कम रु.4,800/- असे नमुद केले आहे. याचा अर्थ तक्रारदाराने सामनेवाला यांना मंगळसुत्र बनवण्यासाठी सोने 13.500 ग्रॅम दिले होते व त्यातील 8.000 ग्रॅम सोने वापर करुन मंगळसुत्र बनवण्याचे होते व 5.500 ग्रॅम सोने परत देणेचे होते. त्यासाठी लागणारी मजूरी ही रक्कम रु.4800/- असलेचे दिसून येते. असे असताना तक्रारदार सामनेवाला यांना सदर मंगळसुत्र बनविण्यासाठी रक्कम रु.1,50,000/- व रक्कम रु.65,000/- चा धनादेश देणे शक्य नाही. तसेच सामनेवाला यांनी सदरची बाब शाबीत करण्यासाठी कोणताही कागदोपत्री पुरावा याकामी दाखल केलेला नाही. त्यामुळे सामनेवाला यांचे सदरचे कथन हे आयोग अमान्य करीत आहे.
12) वरील सर्व विवेचनांचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून सोन्याचा मेखला बनवण्यासाठी टॅक्स इन्व्हॉईस दिले व तक्रारदाराकडून रक्कम रु.2,55,000/- स्विकारुनही तक्रारदारास मेखला दागिना बनवून दिलेला नाही यावरुन सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करुन तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी केलेचे या आयोगाचे मत आहे. त्यामुळे मुद्रदा क्र.2 चे उत्तर या आयोगाने होकारार्थी दिले आहे.
13) मुद्दा क्रमांकः 3 – तक्रारदाराने नि.6 कडे दाखल केलेल्या सामनेवाला यांचेकडील टॅक्स इन्व्हॉईस क्र.515 दि.20/08/21 वरुन तक्रारदाराने सामनेवालाकडे सोन्याचा मेखला दागिना बनवण्याची ऑर्डर दिली होती. तसेच सदर इन्व्हॉईसवर डाव्या बाजूला सामनेवाला यांना तक्रारदाराकडून एकूण रक्कम रु.2,55,000/- मिळालेबाबतचा तपशीलही असलेचे स्पष्ट होते. तसेच तक्रारदाराने नि.18 कडे दाखल केलेला त्यांचे बँकेचा खातेउतारा पाहिला असता तक्रारदाराने सामनेवाला यांना रक्कम अदा केलेचे स्पष्ट होते. सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून 60 ग्रॅमचा सोन्याचा मेखला दागिना बनवण्यासाठी ठरलेल्या रक्कमेपैकी उर्वरित रक्कम रु.50,910/-स्विकारुन तक्रारदारास 60ग्रॅम वजनाचा सोन्याचा मेखला दागिना बनवून दयावा. किंवा सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून मेखला दागिना बनवण्यासाठी स्विकारलेली एकूण रक्कम रु.2,55,000/- अदा करावी व सदर रक्कमेवर दि.27-09-2021 पासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9% दराने व्याज अदा करावे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुद्रदा क्र.3 चे उत्तर या आयोगाने होकारार्थी दिले आहे.
14) मुद्दा क्रमांकः 4 – सबब, वरील सर्व विवेचनांचा विचार करता प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून 60 ग्रॅमचा सोन्याचा मेखला दागिना बनवण्यासाठी ठरलेल्या रक्कमेपैकी उर्वरित रक्कम रु.50,910/- स्विकारुन तक्रारदारास 60ग्रॅम वजनाचा सोन्याचा मेखला दागिना बनवून दयावा.
अथवा / किंवा
सामनेवाला यांना सदर वादातील सोन्याचा मेखला दागिना बनवून देणे शक्य नसलेस तक्रारदाराकडून मेखला दागिना बनवण्यासाठी स्विकारलेली एकूण रक्कम रु.2,55,000/- अदा करावी व सदर रक्कमेवर या आदेशाच्या तारखेपासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9% दराने व्याज अदा करावे.
3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) व तक्रार अर्जाचा खर्च रु.1,000/- (रुपये एक हजार फक्त) अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता सामनेवाला यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत सामनेवाला यांनी आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.