::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 04/11/2016 )
आदरणीय, अध्यक्ष श्रीमती एस.एम.उंटवाले यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …
तक्रारकर्त्यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचेकडून मौजे अकोली बु. ता.जि. अकोला चे कक्षेतील संकेत विहार अपार्टमेंट, विंग ए, विंग बी, विंग सी या चार मजली इमारतीमध्ये विविध सदनिका खरेदी केल्या आहेत. उपरोक्त तिनही इमारतीमध्ये उदवाहक (लिफ्ट) तसेच इतर अनुषंगीत सुविधा लवकरच पुरविण्यात येतील, असे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी आश्वासन दिले आहे. परंतु विरुध्दपक्षांनी आश्वासनाप्रमाणे अद्यापही लिफ्ट बसवून दिली नाही, तसेच इतर सुविधा सुध्दा पुरविलेल्या नाहीत. या असुविधेमुळे तक्रारकर्त्यांना या ठिकाणी निवास करणे अश्यक्य होत आहे. तक्रारकर्त्यांनी सदर सदनिका घेण्याकरिता गृहकर्ज घेतलेले आहे व त्यामुळे त्यांना व्याजाचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. लिफ्ट न बसविल्यामुळे त्या जागी खोल पोकळी असून लहान मुलांकरिता ते धोकादायक आहे व त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. लिफ्ट न बसविल्यामुळे इमारतीमधील अपंग, वृध, रुग्ण तसेच लहान मुलांना 4 मजले जिना चढण्यास व उतरण्यास त्रास होत आहे. तक्रारकर्त्यांना सदर सुविधा पुरविण्याबाबत तक्रारकर्त्यांनी विरुध्दपक्षाला दि. 16/9/2015 रोजी नोंदणीकृत टपालाने पत्र पाठविले असून ते त्यांना प्राप्त झाले आहे. परंतु विरुध्दपक्षाने अद्यापपर्यंत त्याची दखल घेतली नाही. म्हणून तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्यांची तक्रार मंजुर करण्यात यावी व विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी सदनिका खरेदीचे वेळी ( लिफ्ट, इलेक्ट्रीक फिटींग, व अनुषंगीत सर्व सुविधा ) दिलेले आश्वासन विहीत कालावधीत पुर्ण करण्याबाबत आदेश विरुध्दपक्षास द्यावा. तक्रारकर्त्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई व गृहकर्जावरील व्याज विरुध्दपक्ष यांनी देण्याचा आदेश व्हावा. तक्रारकर्त्यांना भाडेतत्वावर इतरत्र राहावे लागत असल्याने रु. 5,000/- प्रतिमाह प्रमाणे विरुध्दपक्षाने द्यावे. मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु. 1,00,000/- देण्याचा विरुध्दपक्षांना आदेश व्हावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 05 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष 1 व 2 यांचा लेखीजवाब :-
2. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी त्यांचा संयुक्त लेखी जबाब दाखल केला असून,तक्रारीतील आरोप नाकबुल करुन, असे नमुद केले की, वरील इमारतीमध्ये उदवाहक बसविण्यात आलेले नाही किंवा अस्तीत्वात नाही, या बद्दल कोणताही वाद नाही. दोन्ही तक्रारकर्त्यांनी एकाच इमारतीमधील सदनिका विकत घेतलेल्या आहेत. खरेदी खतामध्ये, उदवाहक बसवून देण्याची जबाबदारी विरुध्दपक्षाची राहील, या संबंधी काहीही नमुद नाही. इसार पावतीमध्ये उदवाहक बसविणे बद्दल, मेंन्टेनंस भरल्यास लिफ्ट प्रपोज करण्यात आली आहे. वास्तविकत: करारनाम्याच्या सर्व अटी किंवा शर्ती हया खरेदीखत झाल्यावर अस्तीत्वात राहत नाहीत व इसारचिठ्ठी ही खरेदी खतामध्ये समाविष्ठ होते. विरुध्दपक्षाने नकाशा मंजुर करतांना उदवाहक प्रपोज केले होते, परंतु त्या संबंधी मेंन्टेनंस चार्जेस जमा करुन त्याची काळजी घेण्यासाठी कोणताही सदनिका धारक तयार नसल्यामुळे नकाशा प्रमाणे ती जागा उदवाहकासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. विरुध्दपक्षाने मार्केट मध्ये उपलब्ध असलेल्या चांगल्या दर्जाचे वायर वापरुन इलेक्ट्रीक फिटींग केलेली आहे. तक्रारकर्ते क्र. 1 हे त्याच ठिकाणी सदनिकेमध्ये राहतात. तक्रारकर्ते क्र. 2 हे सिंगापुर येथे वास्तव्यास आहेत व त्यांनी सदनिका घेतल्यानंतरही त्याचा कोणताही वापर केला नाही व इलेक्ट्रीक मिटर सुध्दा घेतलेले नाही. वरील तिन्ही इमारती ह्या अकोली ग्राम पंचायतच्या हद्दीमध्ये आहेत व तो भाग अजुन पुर्णपणे विकसित झालेला नाही. सदर ग्राम पंचायतने सर्व जागा स्वत:च्या ताब्यात घेतल्या आहेत व जो पर्यंत ग्रामपंचायतची मोठी नाली बांधल्या जात नाही, तो पर्यंत त्या विभागामध्ये बांधलेल्या घरातील सांडपाणी व्यवस्थीतपणे मोठया नालीला जोडता येणार नाही. विरुध्दपक्षाने सांडपाणी इमारतीपासून 200 फुटापर्यंत अंडरग्राउंड पाईलाईन टाकुन खुल्या प्लॉट मध्ये मोठा खड्डा करुन त्यामध्ये ती पाईप लाईन सोडली आहे. इमारतीपर्यंत पोहोचण्याचा रस्ता हा ग्राम पंचायतच्या अखत्यारीत आहे व तो रस्ता तयार केलेला आहे. कोणत्या तक्रारकर्त्याने कोणती सदनिका खरेदी केली आहे या बाबत पुर्ण तक्रार मोघम आहे. तक्रारकर्त्यांनी सदर खोटी तक्रार दाखल केलेली आहे त्यामुळे ती खारीज करण्यात यावी.
3. त्यानंतर तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर दाखल केले, तसेच विरुध्दपक्षाने लेखी युक्तीवाद दाखल केला व उभय पक्षाने तोंडी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. या प्रकरणात तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्ष 1 व 2 यांचा संयुक्त लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ते यांचे प्रतिउत्तर, श्री अंकुल अशोक अग्रवाल, कमीशनर यांचा अहवाल, तसेच उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद व विरुध्दपक्ष यांचा लेखी युक्तीवाद, यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देऊन नमुद केला.
उभय पक्षाला मान्य असलेल्या बाबी अशा आहेत की, विरुध्दपक्षाच्या मौजे अकोली बु. ता.जि. अकोला येथील सर्वे नं. 12/1 मधील लेआऊट, प्लॉट क्र. 1 ए+बी, 2-ए+बी, 3-ए+बी, व 4 व 5 प्लॉट वरील संकेत विहार अपार्टमेंट या नावाने विंग-ए, विंग-बी, विंग-सी, असे एकूण 54 सदनिकेपैकी तक्रारकर्ते क्र. 1 यांनी विंग-ए मधील चौथ्या मजल्यावरील सदनिका क्र. 401 ही दि. 28/12/2013 रोजीच्या रजिष्टर खरेदी खताद्वारे विरुध्दपक्षास मोबदला देवून खरेदी केली आहे व तक्रारकर्ते क्र. 2 यांनी वरील वर्णन केलेल्या सदनिकेपैकी विंग-ए मधील चौथ्या मजल्यावरील सदनिका क्र. 402 ही सदनिका दि. 16/11/2013 रोजीच्या रजिस्टर खरेदी खताद्वारे विरुध्दपक्षाला मोबदला देवून खरेदी केली आहे. यावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्ते विरुध्दपक्षांचे ग्राहक आहेत.
तक्रारकर्ते यांचे तक्रारीतील कथन असे आहे की, तक्रारकर्ते क्र. 1 हे सदर सदनिकेत मे 2015 पासून राहण्यास गेले आहेत व तक्रारकर्ते क्र.2 हे अजुन तेथे राहण्यास आले नाही. विरुध्दपक्षाने सदरहु सदनिकेमध्ये उदवाहक (लिफ्ट) तसेच इतर अनुषंगीक सुविधा लवकरच पुरविण्यात येतील, असे आश्वासन देवूनही अजुन ते पुर्ण केले नाही. सदर इमारतीमधील इलेक्ट्रीक फिटींग अत्यंत निम्न दर्जाची केलेली असून,फ्लॅट मधील इलेक्ट्रीक बोर्ड निकामी झालेले आहेत. पार्कींगचे काम अपुर्ण व निम्न दर्जाचे केलेले असून, टाईल्स फुटलेल्या आहेत. सांडपाण्याची विल्हेवाट लावलेली नाही, इमारती समोरील रस्ता तयार करुन दिलेला नाही, त्यामुळे ही सेवा न्युनता आहे. तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्षाला नोटीस पाठवून, त्यानंतर ही तक्रार दाखल केली. प्रार्थनेप्रमाणे तक्रार मंजुर करावी, अशी विनंती तक्रारकर्ते यांनी केली आहे.
यावर, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चा लेखी युक्तीवाद दाखल आहे. तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 ने तोंडी युक्तीवाद केला. युक्तीवादानुसार विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचे असे म्हणणे आहे की, सदरहु सदनिका विकते वेळी विरुध्दक्षाने लिफ्ट ( उदवाहक ) प्रस्तावित आहे, असे स्पष्ट केले होते व विरुध्दपक्षाचे उदवाहक सदर इमारतीत लावणे सुरु आहे. परंतु उदवाहकास वेगळे इलेक्ट्रीक मिटर घ्यावे लागते व सदरहु मिटर घेण्याकरिता विरुध्दपक्षाने महावितरण कंपनीकडे अर्ज केलेला आहे. मिटर लागल्याबरोबर उदवाहकाचे काम पुर्ण करुन, सुरळीत चालु करुन देण्याची जबाबदारी विरुध्दपक्षास मंजुर आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी या प्रकरणातील कमीशनरचा अहवाल आक्षेप घेत, तो कसा बरोबर नाही, त्याबद्दल युक्तीवादात कथन केले आहे व तक्रारकर्त्याने नमुद केलेल्या सदर सदनिकेमधील इतर उणीवा अमान्य केल्या आहेत. त्यामुळे पुनरावृत्ती टाळण्यासाठी विरुध्दपक्षाच्या युक्तीवादातील इतर मुद्दे खालील प्रमाणे निष्कर्षात नमुद केले आहेत, जसे की, कमीशनरने अहवाल दाखल करुन त्यासोबत फोटोग्राफ्स दाखल केले आहे. विरुध्दपक्षाने सदर सदनिका तक्रारकर्ते क्र. 1 व 2 यांना विक्री करारनाम्यानुसार व गाळा विक्री पध्दतीचे नियम-अटी नुसार विकल्या आहे, त्यामुळे हया सदनिका खरेदीचा इसार व व घोषणापत्र, या दस्तांचा विचार करावा लागेल, असे मंचाचे मत आहे. म्हणून या बाबीबद्दलचा विरुध्दपक्षाचा आक्षेप गृहीत धरता येणार नाही. इसार व घोषणापत्रामध्ये ज्या बाबी विरुध्दपक्ष पुर्ण करुन देणार होते, त्या सर्व बाबींची व आवश्यक गोष्टींची पुर्तता विरुध्दपक्षाने केली कां ? हे कमीशनर अहवालावरुन मंचाने तपासले. तक्रारकर्ते यांचे असे म्हणणे आहे की, विरुध्दपक्षाने या इमारतीमध्ये इसार व घोषणापत्रानुसार उदवाहक (लिफ्ट) बसविलेली नाही, त्याजागी खोल पोकळी असून, अपघात होण्याचा संभव आहे. या बद्दल विरुध्दपक्षाने वरील प्रमाणे लेखी युक्तीवादात कबुली दिली आहे. तसेच ही बाब कमीशनरने अहवालात नमुद केली असून, रेकॉर्डवर इतर गाळेधारकांचे या बद्दलचे प्रतिज्ञालेख दाखल आहेत. त्यामुळे या बाबत विरुध्दपक्षाची सेवा न्युनता आहे, असे मंचाचे मत आहे.
तक्रारकर्ते यांची अशी तक्रार आहे की, विरुध्दपक्षाने खरेदीपुर्वी पार्कींगचे काम केले नाही. या बद्दल कमीशनरच्या म्हणण्यानुसार, पार्कींग जागेवरील टाईल्स तुटलेल्या असून, बरोबर लावलेल्या नाहीत, तसेच त्या जाणत्या कारागीराकडुन लावलेल्या नाही. कारण त्याचा कॉलम योग्यरित्या दुरुस्त केलेला दिसतनाही. कमीशनरने अहवालासोबत याचा फोटोग्राफ दाखल केला आहे. विरुध्दपक्षाच्या मते जर दोन वर्षानंतर एखाद-दोन टाईल्स फुटल्या तर विरुध्दपक्ष त्यास जबाबदार राहणार नाही. त्यावर सामान आपटले तर टाईल्स फुटणारच. परंतु विरुध्दपक्षाचे हे स्पष्टीकरण न पटणारे आहे. तक्रारकर्ते यांचे असे म्हणणे आहे की, इमारतीचे इलेक्ट्रीक काम उत्कृष्ट मटेरियल वापरुन पुर्ण केले नाही. परंतु कमीशनर अहवालात या बद्दल हे काम आय.एस.आय. मार्कचे आहे, असे नमुद आहे. त्यामुळे ही बाब सिध्द होत नाही. तक्रारकर्ते यांचे असे म्हणणे की, सांडपाण्याची विल्हेवाट लावलेली नाही. विरुध्दपक्षाचे यावर म्हणणे असे आहे की, सांडपाणी हे पी.व्ही.सी. पाईपने एका चेंबर मध्ये सोडलेले आहे व तेथून ते रस्त्याच्या दुसरीकडे नाल्यात सोडले आहे. परंतु कमीशनरने या बद्दल अहवालात, वादातील जागेवर पाईप व चेंबर आढळलेले नाही, असे कथन केले आहे व कमीशनरने या बद्दल, हे पाईप – चेंबर कुठे आहे ? अशी विचारणा विरुध्दपक्षाला केल्याचे लिहले आहे. त्यामुळे या बद्दलचा विरुध्दपक्षाचा आक्षेप गृहीत धरला नाही. तक्रारकर्ते यांचे असे म्हणणे आहे की, इमारतीला पोहचण्याकरिता योग्य प्रकारे स्लोप करुन, रस्ता करुन दिलेला नाही. परंतु ही बाब योग्य तऱ्हेने तक्रारकर्त्याने सिध्द केलेली नाही. विरुध्दपक्षाचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्ते क्र. 2 हे हया सदनिकेत राहत नाही, त्यांचे घर बंद आहे. दाखल इतर दस्तांवरुन ही बाब स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्ते क्र. 2 बाबतची तक्रार मंजुर करता येणार नाही. तसेच कमीशनर अहवालातील इतर मुद्दे, तक्रारकर्त्याच्या कथना अभावी मंचाने तपासले नाही. तक्रारकर्ते भाडे तत्वावर इतरत्र राहतात, हे सिध्द झालेले नाही. अशा रितीने वर नमुद विष्लेशनानुसार तक्रारकर्ते क्र. 1 ची तक्रार खालील अंतीम आदेशानुसार अंशत: मंजुर करण्यात येते.
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्ते क्र. 1 बाबत तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीकरित्या वा संयुक्तपणे तक्रारकर्ते क्र. 1 च्या इमारतीमध्ये प्रस्तावित उदवाहक (लिफ्ट) स्वखर्चाने लावून द्यावे. तसेच सदनिका खरेदीचे वेळी उदवाहक व इतर (निकालात नमुद केलेल्या ) सुविधा न पुरविणेबाबतच्या नुकसान भरपाईपोटी तसेच या सेवा न्युनतेमुळे तक्रारकर्ते क्र. 1 यांना झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी, प्रकरण खर्चासह रक्कम रु. 30,000/- ( रुपये तिस हजार फक्त ) तक्रारकर्ते क्र. 1 यांना द्यावी.
- सदर आदेशाचे पालन, निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाच्या आंत करावे.
- सदर आदेशाच्या प्रती संबंधीतांना निशुल्क देण्यात याव्या.