Complaint Case No. CC/310/2020 | ( Date of Filing : 21 Aug 2020 ) |
| | 1. MR. JAYANT SHANKARLAL JOSHI | R/O. 110, KHAMLA MAIN ROAD, KHAMLA, NAGPUR-440025 | NAGPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. PUROSURGE HEALTH CARE PVT. LTD. | REG. OFF. AT, FLAT NO.1607, PT-1, PINNACLE DREAMS, PIPLYAKUMAR, NIPANIYA ROAD, NEAR BHAWANS SCHOOL, INDORE-452001 | INDORE | M.P. |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | आदेश मा. अध्यक्ष, श्री. सचिन शिंपी यांच्या आदेशान्वये – - तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्यात नमूद केले की, त्यांचा जयंत मेडिकल अॅन्ड जनरल स्टोअर्स या नावाने व्यवसाय करीत असून कोविड -19 या आजाराचा संसर्ग वाढल्याने धर्मादाय (charity) म्हणून 200 पी.पी.ई.किट मोफत वाटप करण्याचा उद्देश असल्याने त्याने विरुध्द पक्षाशी संपर्क करुन रुपये 850/- प्रमाणे 200 पी.पी.ई.किटची ऑर्डर दिली व त्याकरिता ऑनलाइन द्वारे विरुध्द पक्षाकडे रक्कम रुपये 1,90,400/- अदा केले.
- सदरची पी.पी.ई.किट दि. 01.05.2020 रोजी प्राप्त झाल्यानंतर काही डॉक्टरांना त्याचे वाटप करण्यात आले असता डॉक्टरांनी ते पी.पी.ई.किट नसून एच.आय.व्ही. किट असल्याचे सांगितले व ते किट तक्रारकर्त्याला परत करण्यात आले. सदरची पी.पी.ई.किट कोविड आजारात संरक्षण होण्याच्या उद्देशाने घेतले असल्यामुळे त्याचा कोणताही उपयोग कोविड काळात होऊ शकत नाही असे कारण सांगून डॉक्टरांनी ते परत केले. सदरचे पी.पी.ई.किट जुन 2019 मध्ये तयार करण्यात आले असून त्या काळात कोविडचा कोणताही संसर्ग नव्हता. एच.आय.व्ही.किटची किंमत रुपये 150/- ते 200/- असून त्या किटवर रुपये 2000/- चे लेबल लावून विरुध्द पक्षाने फसवणूक करुन ते किट रुपये 850/- मध्ये तक्रारकर्त्याला विक्री केले आहे. अशा प्रकारे विरुध्द पक्षाने पी.पी.ई.किट सांगून एच.आय.व्ही. किट पाठवून तक्रारकर्त्याची फसवणूक केली आहे, ही बाब दोषपूर्ण सेवा असल्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार आयोगात दाखल करुन विरुध्द पक्षाने पुरविले एच.आय.व्ही.किट परत घेऊन पी.पी.ई.किट द्यावे अथवा पी.पी.ई.किटची किंमत रुपये 1,90,400/-, 24 टक्के दराने व्याजासह परत करावे. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश द्यावा अशी विनंती केली आहे.
- विरुध्द पक्षाने आपल्या लेखी जबाबात नमूद केले की, तक्रारकर्त्याने सदरची पी.पी.ई.किट विक्रीच्या हेतूने खरेदी केली असून धर्मादाय(charity) हेतूने देण्याच्या उद्देशाने घेतल्याबाबतचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. कोविड काळात लॉकडाऊन जाहिर केल्यामुळे नफा कमविण्याच्या उद्देशाने तक्रारकर्त्याने सदरचे पी.पी.ई.किट विक्री करण्याच्या उद्देशाने विरुध्द पक्षाकडून घेतले आहे.
- पी.पी.ई.किट हे वेगवेगळया प्रकारचे कंपनी मार्फत तयार करण्यात येत असून डॉक्टर जे प्रत्यक्ष कोविड रुग्णांच्या संपर्कात येतात , त्यांच्याकरिता 90 जी.एस.एम. चे फेस मास्क, शुज कव्हर, ग्लोज, गॉगल इत्यादी वापरण्यात येतात. परंतु इतर जे व्यक्ती फॉर्मसी स्टोअर्स मध्ये काम करतात अथवा इतर व्यक्ती ज्यांना करोना आजाराचा संसर्ग होण्याचा कमी धोका असतो त्यांना 90 जी.एस.एम. च्या कमी क्षमतेचे किंवा स्पेसिफिकेशनचे किट वापरता येते, याबाबत शासनाने मार्गदर्शन सुचना दिले आहे. तक्रारकर्त्याने पी.पी.ई. किट वॉटसअप द्वारे ऑर्डर करतांना त्या नेमक्या किती क्षमतेचे असावे याबाबतचे वर्णन दिलेले नव्हते. तक्रारकर्त्याला देण्यात आलेले पी.पी.ई. किट हे योग्य दर्ज्याचे आहेत. विरुध्द पक्षाने अनेक सदरचे किट कोईमतूर, कोल्हापूर तसेच इतर व्यक्तीनां विक्री केले असून या किट बाबत कोणत्याही व्यक्तीची तक्रार नाही. तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार ही खोटी व बनावट असल्यामुळे ती खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
- उभय पक्षांनी दाखल केलेले दस्तावेजाचे अवलोकन केले असता व त्यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यावर खालील मुद्दे विचारार्थ घेतले.
- तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करुन
तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय? होय - काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
निष्कर्ष - मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून 200 पी.पी.ई.किट खरेदी केले असून त्याकरिता विरुध्द पक्षाला एच.डी.एफ.सी. बॅंके द्वारे दि. 03.04.2020 रोजी रुपये 1,90,400/- ऑनलाईन द्वारे अदा केले असल्याचे नि.क्रं. 2 वर दाखल बिल व बॅंकेचे स्टेटमेंटवरुन दिसून येते. परिणामी तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याचे सिध्द होते.
- तक्रारकर्त्याने व्यावसायिक हेतूने पुनर्विक्रीसाठी सदरचे पी.पी.ई.किट खरेदी केले होते असे जरी विरुध्द पक्षाने कथन केले असले तरी त्या अनुषंगाने आपल्या कथना समर्थनार्थ कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारकर्त्याने धर्मादाय (charity) हेतूने मोफत वाटप करण्यासाठी सदरच्या किट खरेदी केल्या होत्या याबाबत शपथपत्रावर कथन केले आहे. ही बाब खंडित करण्यासाठी विरुध्द पक्षाने सबळ पुरावा दाखल केलेला नाही. परिणामी तक्रारकर्त्याने व्यावसायिक / पुनर्विक्रीकरिता पी.पी.ई.किट खरेदी केल्याची बाब सिध्द होत नाही.
- तक्रारकर्त्याला विक्री करण्यात आलेली किट ही पी.पी.ई.किट नसून एच.आय.व्ही. किट असल्याबाबतचा तक्रारकर्त्याचा मुख्य आक्षेप आहे. याबाबत तक्रारकर्त्याने डॉ. जयंत जोशी, डॉ. आनंद सक्सेना व डॉ. सुहास बांडे यांचे पत्र नि.क्रं. 2 सोबत दाखल केले आहे. तसेच सदरची तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारकर्त्याला विक्री करण्यात आलेले किट हे पी.पी.ई.किट आहे अथवा नाही ही विवादीत बाब तपासणीकरिता तक्रारकर्त्याच्या विनंतीनुसार एक किट या आयोगा मार्फत इंडियन मेडिकल असोसिएशन यांना पाठविण्यात आली होती. त्या अनुषंगाने दि. 20.04.2022 रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनने त्यांचा अहवाल दिला असून त्यामध्ये त्यांच्याकडे पाठविण्यात आलेले किट हे पी.पी.ई.किट नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.
- विरुध्द पक्षाने त्यांच्या जबाबात पी.पी.ई.किट चे वेगवेगळे वर्णन (स्पेसिफिकेशन) नमूद केले असले तरी तक्रारकर्त्याने कोविड आजाराचा संसर्ग वाढलेला असतांना त्या कालावधीत कोविड आजाराच्या संसर्गापासून संरक्षण होण्याच्या उद्देशाने उत्तम दर्ज्याचे पी.पी.ई.किट मागविले होते, परंतु ते पी.पी.ई.किट नसल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी दिलेले नि.क्रं. 21 वर दाखल अहवालावरुन स्पष्ट होते. सदरचा अहवाल चुकिचा असल्याबाबत विरुध्द पक्षाने जरी आक्षेप घेतला असला तरी त्याला खंडित करणारा कोणताही पुरावा विरुध्द पक्षाने दाखल केलेला नाही. अशा परिस्थितीत तक्रारकर्त्याने दाखल केलेला पुरावा व इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी दिलेले नि.क्रं. 21 वर दाखल अहवालावरुन विरुध्द पक्षाने पी.पी.ई.किट विक्री करण्याचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात पी.पी.ई.किट विक्री न करणे ही अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करणारी कृती असून दोषपूर्ण सेवा असल्याचे दिसून येते. यास्तव मुद्दा क्रमांक 1 व 2 चा निष्कर्ष होकारार्थी नोंदविण्यात येते.
- मुद्दा क्रमांक -3 बाबत - तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाने पुरविले एच.आय.व्ही.किट परत घेऊन पी.पी.ई.किट द्यावे अथवा पी.पी.ई.किटची किंमत रुपये 1,90,400/- व्याजासह परत करण्याची मागणी केली आहे. परंतु दि. 18.12.2013 रोजी पुरसीस दाखल करुन त्याच्याकडे 98 पी.पी.ई.किट असल्याचे नमूद केले आहे. तर 40 पी.पी.ई.किट अमर आशीष हॉस्पीटल , 10 किट डॉ. सक्सेना, 50 किट डॉ. निर्मला ठक्कर व डॉ. बांडे यांच्याकडे दिले असल्याचे नमूद केले आहे. परंतु त्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. अशा परिस्थितीत तक्रारकर्त्याकडे त्यांच्या दाखल केलेल्या पुरसीसनुसार 98 किट असल्याचे स्पष्ट होते. परिणामी विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून 98 पी.पी.ई.किट परत घेऊन रुपये 850/- प्रमाणे 98 किटची किंमत रुपये 83,300/- आदेश पारित दिनांकापासून ते प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजासह परत करावी. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्हणून रुपये 25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये 10,000/- मिळण्यास पात्र आहे असे आयोगाचे मत आहे .
सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून 98 पी.पी.ई.किट परत घेऊन तक्रारकर्त्याला 98 पी.पी.ई.किटची रक्कम रुपये 83,300/- व त्यावर आदेश पारित दिनांका पासून ते प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजासह रक्कम तक्रारकर्त्याला अदा करावी.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- द्यावे.
- विरुध्द पक्षाने उपरोक्त आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 45 दिवसाच्या आंत करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्त्याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
| |