निकालपत्र :- (दि.17.08.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.11 यांनी म्हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाले गैरहजर आहेत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे दामदुप्पट ठेव स्वरुपात ठेवलेली आहे, त्याचा तपशील खालीलप्रमाणे :- अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | ठेव तारीख | मुदतपूर्ण तारीख | 1. | 249 | 20000/- | 17.07.2003 | 17.01.2009 |
(3) सदर ठेवीची मुदत संपल्यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेकडे रक्कमांची वारंवार मागणी केली आहे. तक्रारदाराना सदर रक्कमांची आर्थिक गरजा भागविण्यासाठी आवश्यकता आहे. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्कमा देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदारांनी दि.18.12.2009 रोजी वकिलामार्फत नोटीस देवून व्याजासह ठेवींच्या रक्कमांची मागणी केली. तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या ठेव रक्कमा अदा केल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदारांनी व्याजासह ठेव रक्कम, आर्थिक-शारिरीक-मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई, कोर्ट खर्च, वकिल फी व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावती व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्यादींच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवाला क्र.11 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांची नोटीस दि.18.12.2009 रोजी मिळताच प्रस्तुत सामनेवाला यांनी तक्रारदारांना सदर पतसंस्थेवर प्रशासक यांची नियुक्ती झालेली असून सर्व आर्थिक व्यवहार ते पहात असून ठेव देण्याचे मान्य केले असल्याचे सांगितले. सन 2008 पासून संस्थेवर प्रशासक असल्यान प्रस्तुत सामनेवाला हे कायद्याने तक्रारदारांची ठेव देणे जबाबदार नाहीत. तक्रारदारांनी ठेव संस्थेच्या चेअरमन, सेक्रेअरी व मॅनेजर यांचेशी वैयक्तिक असलेल्या संबंधातून सन 2003 साली ठेवली आहे. तिची मुदत सन 2009 साली संपलेली आहे. मात्र, प्रस्तुत सामनेवाला यांच्या संचालक पदाची मुदत सन 2005 मध्ये संपली आहे म्हणून काहीही संबंध राहिलेला नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (6) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्थेमध्ये ठेव रक्कम ठेवलेली आहे; सदर ठेव पावतीचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्थेमध्ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्कम सामनेवाला क्र.11 यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव पावतीची मुदत संपून गेलेली आहे व सदर रक्कमेची तक्रारदारांनी व्याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टीप्रित्यर्थ कोणताही समाधानकारक पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. तसेच, त्यांच्या म्हणण्यातील कथनांचा तक्रारदारांच्या तक्रारींशी कोणताही दुरान्वयेदेखील संबंध नसल्याचे स्पष्ट होते. सबब, तक्रारदारांच्या व्याजासह ठेव रक्कमा सामनेवाला यांनी न देवून त्यांच्या सेवेत त्रुटी केली आहे. (7) सामनेवाला क्र.1 ते 10 व 12 यांना या मंचाने संधी देवूनही त्यांनी आपली बाजू शाबीत केलेली नाही. सदर सामनेवाला यांचे वर्तणुकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या व्याजासह रक्कमा परत करण्याकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्न केलेले नाहीत हे स्पष्ट दिसून येते. तसेच, सामनेवाला यांनी सदर प्रकरणी म्हणणे दाखल न करुन सामनेवाला यांना तक्रारदारांची तक्रार मान्य असल्याचे दाखवून दिले आहे. सबब, सामनेवाला क्र.1 व 3 ते 12 यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला संस्थेचे अधिकारी असल्याने त्यांना केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांची ठेव रक्कम व्याजासह परत करणेकरिता जबाबदार धरणेत यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (8) तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या ठेव पावत्यांचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्या या दामदुप्पट ठेवींच्या असून त्यांच्या मुदती संपलेल्या आहेत असे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे दामदुप्पट ठेव पावत्यांवरील मुदतपूर्ण रक्कमा मुदत संपलेल्या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (9) तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला क्र.1, 3 ते 12 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.2 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना रक्कम रुपये 40,000/- (रुपये चाळीस हजार फक्त) द्यावी. सदर रक्कमेवर दि.18.01.2009 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याज द्यावे. (3) सामनेवाला क्र.1, 3 ते 12 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.2 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
| | [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |