निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
2. अर्जदाराने दिनांक 21.6.2001 रोजी ‘जय शिवराय नागरी सहकारी बँक मर्यादित नांदेड’ शाखा श्रीनगर या बँकेकडून कपडयाचे दुकान टाकण्यासाठी 40,000/- रुपये मुदती कर्ज घेतले होते. ज्याचा कर्ज खाते क्र. 3110/230 असून सदरील बँकेचे गैरअर्जदार यांच्या बँकेमध्ये आज रोजी विलीनीकरण झालेले आहे. कर्ज घेते वेळेस अर्जदाराने गॅरेंटर म्हणून संजय लक्ष्मण जोशी व डी.एम. नवरे यांची नावे दिलेली आहेत. अर्जदाराने दिनांक 27.12.2004 पर्यंत ‘जय शिवराय नागरी सहकारी बँक मर्यादित नांदेड’ यांचेकडे रक्कम रुपये 39,761/- कर्ज परतफेडी पोटी भरलेली आहे. त्यानंतर अर्जदाराने राहिलेल्या संपूर्ण रक्कमेची चौकशी केली असता संबंधीत अधिका-याने अर्जदाराला एकूण शिल्लक रक्कम रुपये 10,000/- राहिले आहेत अशी माहिती दिली. त्यानुसार दिनांक 10.2.2005 रोजी अर्जदार एक रक्कमी रु.10,000/- राहिलेले कर्ज भरण्यासाठी गेला असता बँक बंद झालेली आहे. त्यामुळे सदरील रक्कम भरता येणार नाही असे सांगितले. त्यामुळे अर्जदार सदरील रक्कम भरु शकला नाही. त्यानंतर गैरअर्जदाराने गॅरेंटर संजय लक्ष्मण जोशी यांना दिनांक 18.11.2014 रोजी नोटीस पाठवून अर्जदाराची बाकी राहिलेली परतफेडीची रक्कम ही रु.80,559/- असून सदरील रक्कम गॅरेंटरच्या पगारातून कपात करावी अशी नोटीस दिली. अर्जदाराने याबाबत चौकशी केली असता गैरअर्जदार यांनी थकीत रक्कमेची माहिती देण्यास टाळाटाळ केली. गैरअर्जदार यांनी थकीत रक्कमेची माहिती अर्जदारास न देवून सेवेत त्रुटी दिलेली आहे. अर्जदाराने एकूण रक्कम रु. 39,761/- कर्ज परतफेडीपोटी भरलेले आहेत व उर्वरीत रक्कम रु. 10,000/- भरण्यास तयार आहे परंतू गैरअर्जदार रु.80,559/- एवढी चुकीची रक्कम शिल्लक असल्याची नोटीस देत आहेत. त्यामुळे अर्जदारास मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अर्जदाराने सदरील प्रकरण दाखल केलेले आहे. तक्रारीमध्ये गैरअर्जदाराने लावलेली चुकीची रक्कम रु.80,559/- ही रद्द करावी व गैरअर्जदार यांना अर्जदार यांच्याकडे राहिलेली रक्कम रु.10,000/- भरुन घेण्याचा व अर्जदाराला झालेल्या त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- दंड व 5000/- दावा खर्च अर्जदारास देण्याचा आदेश करावा अशी मागणी तक्रारीद्वारे अर्जदाराने केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना दिनांक 02.01.2015 रोजी नोटीस प्राप्त झाली. गैरअर्जदार वकीलामार्फत प्रकरणामध्ये हजर झाले परंतू अनेक संधी देवूनही गैरअर्जदार यांनी लेखी जबाब दाखल केलेला नाही. दिनांक 20.03.2015 रोजी गैरअर्जदार यांनी तारखेपूर्वी जबाबाची प्रत अर्जदारास दयावी असा आदेश दिलेला होता. त्यानंतरही दिनांक 15.04.2015 रोजी गैरअर्जदाराने लेखी जबाब दाखल केलेला नाही त्यामुळे दिनांक 15.04.2015 रोजी गैरअर्जदार यांच्या विरुध्द नो-से चा आदेश पारीत करण्यात आला. आज दिनांक 17.6.2015 रोजी अर्जदाराचा युक्तीवाद ऐकला. अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
4. गैरअर्जदार यांनी दिनांक 18.11.2014 रोजी जमानतदार जोशी संजय लक्ष्मण यांचे नियोक्ते (Employer) यांना नोटीस पाठवून जमानतदार यांच्या पगारातून दरमहा रु.5,000/- ची कपात करावी अशी नोटीस दिलेली आहे. सदर नोटीसचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी दिनांक 21.06.2001 रोजी रु.40,000/- कर्ज ‘जय शिवराय नागरी सहकारी बँक मर्यादित नांदेड’ यांच्याकडून घेतलेले आहे व ‘जय शिवराय नागरी सहकारी बँक मर्यादित नांदेड’ ही बँक पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑप. बँक या बँकेत मा. सहकार आयुक्त यांच्या आदेशान्वये दिनांक 13.09.2009 पासून विलीन झालेली आहे. यावरुन जय शिवराय बँक ही बंद होती. त्यामुळे अर्जदार हप्ते भरु शकलेला नाही, अर्जदाराचे हे म्हणणे योग्य वाटते. गैरअर्जदार यांना अनेक संधी देवूनही गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या तक्रारीवर आपले म्हणणे दिलेले नाही. यावरुन गैरअर्जदारास अर्जदाराच्या तक्रारीतील कथन मान्य असल्याचे दिसून येते.
5. अर्जदाराने जय शिवराय बँकेमध्ये कर्जाच्या परतफेडीपोटी रक्कम रु. 39,761/- जमा केलेली असल्याचे दाखल पावतीवरुन स्पष्ट होते. मंचासमोर कर्जासंबंधीचे कागदपत्र उपलब्ध नसल्यामुळे कर्जाची मुद्दल रक्कम व व्याज रक्कम किती आहे याचा बोध होत नाही. त्यामुळे मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदाराने अर्जदारास दिनांक 18/11/2014 रोजी रक्कम रु. 80,559/- ची
वसूलीची नोटीस रद्द करण्यात येते.
3. गैरअर्जदार बँकेने अर्जदाराच्या कर्ज करारानुसार (Loan Agreement) अर्जदाराची मुद्दल
रक्कम + व्याज रक्कम (Principle amount + interest amount) मधून अर्जदाराने भरलेली रक्कम वजा करुन उर्वरीत भरावयाची रक्कम अर्जदारास आदेश मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत कळवावी.
4. गैरअर्जदाराने उर्वरीत भरावयाची रक्कम अर्जदारास कळविल्यानंतर 8 दिवसाच्या
आत अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे रक्कम जमा करावी व त्यानंतर गैरअर्जदाराने
पुन्हा सदर कर्जापोटी कोणतीही रक्कम वसूल करु नये.
5. खर्चाबद्दल आदेश नाही.
6. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.