श्री. एस.के.कापसे, मा. सदस्य यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 29 नोव्हेंबर 2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार जेष्ठ नागरिक असून अशिक्षीत आहेत. तक्रारदारांचे जाबदेणार बँकेमध्ये खाते आहे. तक्रारदारांनी दिनांक 27/11/2007 रोजी जाबदेणार बँकेमध्ये रक्कम रुपये 90,000/- 12 महिने कालावधीकरिता मुदत ठेवीमध्ये गुंतविले होते. मुदत ठेव पावती क्र.231452 20202 होता. मुदतीअंती दिनांक 27/11/2008 रोजी तक्रारदारांना रुपये 99,343/- मिळणार होते. तक्रारदार जेष्ठ नागरिक व अशिक्षीत असल्यामुळे मुदतीअंती त्या लगेचच बँकेत गेल्या नाहीत. सप्टेंबर 2009 मध्ये तक्रारदार बँकेमध्ये गेल्या व मुदतठेवीची मिळणारी रक्कम रुपये 99,343/- पुढील एक वर्ष कालावधीकरिता परत गुंतविण्यात यावी अशी विनंती त्यांनी बँकेला केली असता मुळ मुदत ठेवीची पावती बँकेकडे जमा करण्यात यावी असे तक्रारदारांना सांगण्यात आले. बँकेच्या सांगण्यानुसार तक्रारदारांनी मुळ मुदतठेवीची पावती शाखाअधिकारी श्री.एम.पी.किंकरे यांच्याकडे सुपूर्द केली. श्री. किंकरे यांनी पुर्नगुंतवणूकीची प्रोसिजर पुर्ण झाल्यानंतर तक्रारदारांना नवीन मुळ मुदतठेव पावती 3 ते 4 दिवसांनी घेऊन जाण्यास सांगितले. एक आठवडयानंतर तक्रारदार बॅंकेत गेल्या व नवीन मुळ मुदतठेव पावतीची मागणी केली असता सर्व रेकॉर्ड तपासून पहावे लागेल असे तक्रारदारांना सांगण्यात आले व परत एक आठवडयानंतर येण्यास तक्रारदारांना सांगण्यात आले. तक्रारदार परत बँकेत गेल्या असता तक्रारदारांच्या नावे दिनांक 27/11/2007 रोजी अशी कुठलीही रक्कम नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. तक्रारदारांनी दिनांक 27/11/2007 च्या मुदत ठेव पावतीची छायांकीत प्रत जाबदेणार यांना दाखविली असता तक्रारदारांच्या नावे चुकून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. म्हणून तक्रारदारांनी दिनांक 14/11/2009 रोजी जाबदेणार यांना नोटीस पाठविली. जाबदेणार यांनी त्यास दिलेले उत्तर चुकीचे आहे, ते तक्रारदारांना मान्य नाही. तक्रारदारांना मुदतीअंती मुदत ठेव पावतीची रक्कम मागणी करुनही जाबदेणार यांनी दिली नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार बँकेकडून रक्कम रुपये 99,343/- दिनांक 27/11/2008 पासून संपुर्ण रक्कम मिळेपर्यन्त 10 टक्के व्याजासह परत मागतात. तसेच मानसिक व शारिरीक नुकसान भरपाई पोटी रुपये 15,000/-, तक्रारीचा खर्च व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार बँकेला मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून त्यांच्याविरुध्द दिनांक 1/2/2011 रोजी एकतर्फा आदेश मंचाने पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदारांनी दाखल केलेल्या मुदतठेव पावतीचे अवलोकन केले असता, जाबदेणार बँकेनी तक्रारदारांच्या नावे रिइनव्हेस्टमेंट स्किम या नावाखाली दिनांक 27/11/2007 रोजी रक्कम रुपये 90,000/- मिळाल्याचे व 12 महिन्यांच्या कालवधीनंतर रक्कम रुपये 99,343/- तक्रारदारांना देय होणार असल्याचे दिसून येते. मुदत ठेव पावती वर क्र.231452 20202 नमूद करण्यात आलेला आहे. मुदतीअंती तक्रारदार बँकेत गेल्या असता व त्यांनी उपरोक्त रकमेची मागणी केली असता अशी रक्कम तक्रारदारांच्या नावे दिनांक 27/11/2007 रोजी अशी कुठलीही रक्कम नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. तक्रारदारांनी दिनांक 27/11/2007 च्या मुदत ठेव पावतीची छायांकीत प्रत जाबदेणार यांना दाखविली असता तक्रारदारांच्या नावे चुकून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. जाबदेणार ही एक अग्रगण्य बँक आहे. तक्रारदारांनी जर मुदतठेव पावतीमध्ये दिनांक 27/11/2007 रोजी रक्कम गुंतविलेली नसतीच तर जाबदेणार बँकेनी त्यांच्या नावाने मुदतठेव पावती देण्याचे काही कारणच नव्हते. तक्रारदार हया जेष्ठ नागरिक व अशिक्षीत असून त्यांच्या नावाने उपरोक्त रक्कम रुपये 90,000/- स्विकारुन मुदतीअंती रक्कमेची मागणी करुनही ती त्यांना न देणे ही जाबदेणार बँकेची सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापारी पध्दत आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदारांची मुदतठेव पावती रक्कम रुपये 90,000/- दिनांक 27/12/2007 पासून 12 महिने कालावधीकरिता म्हणजेच दिनांक 27/12/2008 रोजी देय होती. देय दिनांकास तक्रारदारांना रक्कम रुपये 99,343/- मिळणार होती. दिनांक 27/12/2008 पासून जाबदेणार बँकेनी सदरील रक्कम तक्रारदारांना मागणी करुनही परत केली नाही, ही रक्कम बँकेने पुढील कालावधीकरिता वापरलेली आहे असे मंचाचे मत आहे. दिनांक 27/12/2007 च्या मुदतठेव पावतीवर व्याजदर 10 टक्के असा नमूद करण्यात आलेला आहे. त्यामुळे जाबदेणार बँकेनी तक्रारदारांना रक्कम रुपये 99,343/- दिनांक 27/12/2008 पासून 10 टक्के व्याजदराने संपूर्ण रक्कम तक्रारदारांना मिळेपर्यन्त परत करावी असा मंच आदेश देतो. जाबदेणार बँकेच्या सेवेतील त्रुटी मुळे तक्रारदार- जेष्ठ नागरिक यांना निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला असणार असे मंचाचे मत आहे. म्हणून जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये ---------- अदा करावेत असा मंच आदेश देतो.
वरील विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार मान्य करण्यात येत आहे.
2. जाबदेणार बँकेने तक्रारदारांना रक्कम रुपये 99,343/- 10 टक्के व्याजासह दिनांक 27/12/2008 पासून संपुर्ण अदा होईपर्यन्त आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावी.
3. जाबदेणार बँकेने तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 25,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावी.
4. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.