श्रीमती. अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 16 मे 2011
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार हे पुनम स्वीट्स नावाचे दुकान जाबदेणार क्र.1 व 2 यांच्या पुणे सेंन्टल मॉल, बंडगार्डन येथे चालवित होते. जाबदेणार क्र.1 पुणे सेन्ट्रल मॉल चालवितात व जाबदेणार क्र.2 हे कार्पोरेट रजिस्टर्ड ऑफिस आहे. जाबदेणार क्र.2 हे जाबदेणार क्र.1 मॉल चे व्यवस्थापन व नियंत्रण करतात. जाबदेणार क्र.3 हे पुणे सेन्ट्रल मॉल इथे ग्राहक व मालासाठी lift – एलेव्हॅटर बसविल्या त्यांचे उत्पादक आहेत. जाबदेणार क्र.4 हे जाबदेणार क्र.3 चे सबसिडीअरी ऑफिस आहे ते त्या एलेव्हेटर बसवून देतात व त्याची दुरुस्ती, देखभालही करतात. जाबदेणार क्र.1 व 2 हे पुणे सेन्ट्रल मॉल चे दैनंदिन कामकाज चालवितात व मॉलमध्ये रोजच्या घडामोडी/व्यवहार होतात त्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. दिनांक 19/9/2005 रोजी तक्रारदार व जाबदेणार क्र.1 व 2 यांच्यात मेमोरॅन्डम ऑफ अन्डरस्टॅन्डींग झाले. दिनांक 18/8/2007 रोजी संध्याकाळी 4.30 वा. तक्रारदार त्यांची पत्नी व आणखी पाच माणसे lift मधून खाली येत असतांना, lift त्याची रोप वायर तुटल्यामुळे वेगानी खाली आली, जमिनीवर आदळली. त्यामुळे तक्रारदार व त्यांची पत्नी गंभीररित्या जखमी झाले. तक्रारदाराच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले. त्यांच्या पत्नीच्या दोन्ही पायास आतल्या आत मुकामार बसला. तक्रारदारास लगेचच साधु वासवानी मिशनच्या मेन्किल कॉम्प्लेक्स इथे उपचारासाठी नेण्यात आले. तक्रारदाराच्या डाव्या गुडघ्यास पायास फ्रॅक्चर झाले व उजव्या गुडघ्यास दुखापत झाली. तक्रारदारांस त्यांच्या उपचारासाठी दिनांक 18/8/2007 ते 26/8/2007 पर्यन्त दवाखान्यात राहवे लागले. त्याचा खर्च रुपये 28,301/- आला व औषधीचा खर्च मिळून रुपये 34,489/- असा आला. नंतर तक्रारदारास डॉक्टरांची फी, नर्सिंग चार्जेस, औषधी व इतर खर्च दिनांक 14/1/2008 पर्यन्त रुपये 2,82,000/- आला. एकूण खर्च रुपये 3,16,489/- आला. तक्रारदारास डॉक्टरांनी दुसरे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. दुस-या ऑपरेशन झाल्यानंतरच तक्रारदार पुर्णपणे तंदुरुस्त् होणार आहेत, त्याचा खर्च रुपये 3,00,000/- येईल असे तक्रारदारास सांगण्यात आले. तक्रारदार दोन्ही गुडघ्यांमुळे संपुर्ण अपंग झालेले आहेत. आर्टिफिशिअल गुडघे बसविण्याचा खर्च रुपये 3,00,000/- येणार आहे. या अपघातामुळे तक्रारदाराच्या व्यवसायावरही परिणाम झालेला आहे. तक्रारदार व त्यांचे संपुर्ण कुटूंब या व्यवसायावर अवलंबून आहे. तक्रारदारास व्यवसायात रुपये 4,00,000/- तोटा आलेला आहे. तक्रारदाराबरोबर त्यांच्या पत्नीसही lift पडल्यामुळे मार लागला. त्या उपचारासाठी रक्कम रुपये 50,000/- खर्च आला. तक्रारदार व त्यांच्या पत्नीच्या उपचाराचा खर्च भागविण्यासाठी रुपये 6,00,000/- कर्ज/उसने नातेवाईक व मित्रमंडळीकडून घेतले होते. हे सर्व जाबदेणार यांच्या lift तुटण्यामुळे, त्याची व्यवस्थित देखभाल केली नसल्यामुळे झाले. म्हणून तक्रारदारानी जाबदेणार यांना दिनांक 14/1/2008 रोजी कायदेशिर नोटीस पाठवून नुकसान भरपाई मागितली. जाबदेणार यांना नोटीस प्राप्त झाली. त्यानंतर त्यांनी तक्रारदारासोबत झालेला मेमोरॅन्डम ऑफ अंडरस्टॅन्डींग रद्य केला. ते दुकान तक्रारदाराकडून रिकामे करुन घेण्यात आले. त्यामुळे तक्रारदाराचा व्यवसायच गेला. म्हणून सदरील तक्रार; तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 19,00,000/- नुकसान भरपाई मागतात, तसेच तक्रारीचा खर्च व इतर दिलासा मागतात. तक्रारदारानी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार क्र.1 व 2 यांनी संयुक्तपणे त्यांचा लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार हे ग्राहक नाहीत. तक्रारदार हे मेमोरॅन्डम ऑफ अंडरस्टॅन्डींग च्या अटी व शर्तीनुसार, कमिशन बेसिसवर दुकान चालवित होते. त्यामुळे तक्रारदार व जाबदेणार यांचे संबंध व्यावसायिक तत्वाचे होते. ग्राहक व सेवा देणारे नव्हते. तक्रारदाराचे तिथे दुकान असल्यामुळे त्यांना तेथील परिसर परिचयाचा होता. अपघाताच्या दिवशी तक्रारदार व त्यांची पत्नी यांनी Goods lift मध्ये बराच माल असतांनाही घुसले व lift चालू करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता त्यांना याची माहिती होती की, lift फक्त माल ने-आण करण्याचीच होती, पॅसेंजर किंवा जनरल पब्लिक साठी नव्हती.
तक्रारदारानी त्यांच्या दिनांक 14/1/2008 च्या नोटीसमध्ये रुपये 32,16,489/- इतकी नुकसान भरपाई मागितली होती. परंतू इथे रुपये 19,00,000/- मागतात. यावरुन जाबदेणार यांच्याकडून फक्त पैसे उकळण्यासाठीच तक्रार केलेली आहे. इतर सर्व आरोप अमान्य करीत वरील सर्व कारणांवरुन तक्रार नामंजूर करावी अशी मागणी करतात.
3. जाबदेणार क्र.3 व 4 यांनी प्राथमिक मुद्ये नमूद करीत अर्ज दाखल केला व हे मुद्ये प्रथम निकाली लावावेत असा दिनांक 7/12/2009 रोजी अर्ज दिला. त्यावर मंचानी दिनांक 30/9/2010 रोजी अंतिम सुनावणीच्या वेळेस हा अर्ज निकाली काढण्यात येईल असा आदेश दिला.
जाबदेणार क्र.3 व 4 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार व त्यांच्यात कुठलाही करार झालेला नव्हता. त्यांनी कुठलीही सेवा तक्रारदारास दिलेली नाही. तक्रारदार हे व्यवसाय करीत होते. तक्रारदार त्यांचे ग्राहक होत नाहीत. त्यामुळे त्यांच्या सेवेत त्रुटी ठेवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जाबदेणार क्र.3 व 4 यांचे असे म्हणणे आहे की lift खाली पडल्यामुळे तक्रारदारास जो मार लागला, गुडघ्याचे ऑपरेशन करावे लागले, त्यासाठी तक्रारदारानी पुरावा दाखल केलेला नाही. प्रस्तूतचे जाबदेणार यांनी जाबदेणार क्र.1 व 2 यांच्याशी मेन्टेनन्स कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. त्यानुसार नियमित देखभालही केलेली आहे. त्याचप्रमाणे lift मध्ये कुठलाही उत्पादकीय दोष नाही व सेवेतही त्रुटी नाहीत. Lift ऑपरेट करण्यास कुठलीही व्यक्ती ऑपरेटर म्हणून नेमलेली नव्हती व तशी सदरील जाबदेणार यांची जबाबदारी नाही. सदरील जाबदेणार यांचे मेन्टेनन्स इंजिनीअर नी अपघाताच्या दिवशी स्वत: जाऊन lift ची पाहणी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार lift मध्ये कुणीही नव्हते. Lift मध्ये साखरेचे दाणे पडलेले दिसून आले. Lift ची मेन्टेनन्स रोपही तुटलेली नाही. पुर्वी जशी होती तशीच सुरक्षित स्थितीत आहे. त्यांनी lift खाली येण्याचे कारण ओव्हर लोडींग सांगितले. वरील कारणांवरुन तक्रार नामंजूर करावी, अशी मागणी जाबदेणार करतात.
जाबदेणार क्र.3 व 4 यांनी ओमेगा कंपनीचे इंजिनिअर श्री.रामचंद्र सैनी यांचे दिनांक 25/9/2005 चे शपथपत्र दाखल केले.
4. सर्व पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदार व जाबदेणार क्र.1 व 2 यांच्यात दुकान चालविण्याबद्यलचा करार झाला. पुणे सेन्ट्रल मॉल येथील फुड बझार येथे स्वीट्स चे दुकान तक्रारदार चालवित होते. त्या दोघांमध्ये प्रत्येक महिन्यास 20 टक्के अॅक्चुअल सेल्स gross sales वर तक्रारदार जाबदेणार क्र.1 यांना काही रक्कम देत होते. ते मेमोरॅन्डम् ऑफ अंडरस्टॅन्डींग प्रमाणे होते हे दोन्ही पक्षकारांना मान्य आहे. याच मेमोरॅन्डम् ऑफ अंडरस्टॅन्डींग मध्ये क्लॉज डी हा सोयी-सुविधांचा आहे. त्यामध्ये सेन्ट्रल मॉल [कंपनी] ही वीज, एअर कंडिशनिंग, कॉमन सिक्युरिटी सर्व्हिस, कॉमन हाऊस किपींग, मेन्टेनन्स ऑफ ऑल कॉमन equipment, कॉमन लाईटिंग हया सोई-सुविधा देणार होते. त्यातील मेन्टेनन्स ऑफ ऑल कॉमन मेन्टेनन्स ऑफ कॉमन equipment हया सुविधेनुसार [Lift] Elevator च्या देखभालीचीही जबाबदारी जाबदार क्र 1 व 2 कंपनीवरच येते. तक्रारदार या सोयीतील Lift ही जोरात आदळल्याने जखमी/अपंग झाले, त्यासही जाबदार क्र 1 व 2 जबाबदार ठरतात. कारण त्याची व्यवस्थित देखभाल झाली नाही. जाबदार क्र 1 व 2 यांनी Lift च्या देखभालीबद्यल कुठलाच पुरावा दाखल केला नाही. त्यांच्या मते तक्रारदार ग्राहक होत नाही. तक्रारदार व जाबदार क्र 1 व 2 यांच्यात मेमोरॅन्डम ऑफ अंडरस्टॅन्डींग झालेला आहे. तक्रारदार हे पुनम स्वीट्स चे शॉप चालवितात. त्याबद्यल ते 20 टक्के रक्कम अॅच्युअल सेल्सवर जाबदार यांना देतात. तक्रारदार व्यवसाय करतात या एकाच कारणावरुन ते ग्राहक होत नाहीत हे जाबदारांचे म्हणणे चुकीचे आहे. तक्रारदार हे त्यांच्या नोटीस व तक्रारीतसुध्दा Lift पडल्यामुळे अपंगत्वामुळे त्यांचा बिझनेस होत नाही, त्यांचे कुटूंब त्यावर अवलंबून आहे असे म्हणतात. म्हणजेच ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी हा व्यवसाय करीत होते हे स्पष्ट आहे. म्हणूनच ते ग्राहक होतात. मेमोरॅन्डम ऑफ अन्डरस्टॅन्डींग च्या अटी व शर्ती दोघांनाही बांधील असतात. क्लॉज डी नुसार Lift च्या देखभालीची जबाबदारी जाबदार क्र 1 व 2 यांच्यावर असतांना त्यांनी ती पार पाडलेली नाही हे दिसून येते. त्यांनी जाबदार क्र 3 व 4 यांना मेन्टेनन्स करण्यासाठी दिला. जाबदार क्र 3 व 4 यांनी दिनांक 31/7/2007 रोजी चेक अप केले होते त्याचा अहवाल दिला. ज्यांनी हे चेक अप केले त्यांचे नाव, पद त्या अहवालावर नमूद नाही, तसेच त्यांचे हयाबाबतीत प्रतिज्ञापत्र नाही. कारण, ओमेगा एलेव्हेटर्स चे इंजिनिअर श्री. रामचंद्र सैनी हयांनी त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले . त्यात, त्यांचेच [उरण] चे मेकॅनिक श्री. बळीराम व श्री. वाघ यांनी जुलै 2007 Lift साठी सर्व्हिस दिली होती. त्यावर ओनर ऑक्युपायरने सही केली असेही त्यांच्या शपथपत्रात म्हणतात. Lift मेन्टेनन्स चार्ट ची मंचानी पाहणी केली. त्यामध्ये श्री. वाघ यांनी रिमार्क्स च्या जागी “Call switch not working. Both low insided call display not working, not rectified” असे नमूद केलेले आहे. याचाच अर्थ त्यादिवशी lift मध्ये बिघाड होता व तो दुरुस्त केला नाही असे म्हटलेले आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात lift बंदच होती असेही नमूद केलेले आहे. या चार्ट वरुनच lift मध्ये बिघाड आहे दाखवूनही ओनरनी त्यात दुरुस्ती करुन घेतलेली नाही आणि म्हणूनच अपघात झाला. याबद्यल जाबदेणार क्र.1, 2, 3 व 4 यांनी काहीही स्पष्टीकरण त्याच्या लेखी जबाबातही दिले नाही.
तक्रारदारानी इनलॅक बुधरानी व रांका हॉस्पिटलची कागदपत्रे दाखल केलेली आहेत. इनलॅक बुधरानी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिनांक 18/8/2007 च्या history मध्ये “sustained trauma to Lt. knee due to fall of lift at Pune Central at ground 5 p.m.” असे नमूद केलेले आहे. असे असतांनाही जाबदेणार तक्रारदारानी त्याचा पुरावा दिलेला नाही असे म्हणतात. सर्वांनाच lift पडली हे मान्य आहे व त्या lift मध्ये तक्रारदार व त्यांची पत्नी होती हेही मान्य आहे. जाबदेणार यांचे असे म्हणणे आहे की, lift goods साठी होती. पॅसेंजरसाठी नव्हती. तक्रारदार व त्यांची पत्नी, जबरदस्तीने goods भरलेल्या lift मध्ये जाऊन lift चालू केली व त्यामुळे पडले. हया त्यांच्या म्हणण्यास जाबदेणार यसांनी कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. Lift ओव्हरलोडेड होती असा निष्कर्ष त्यांच्या इंजिनिअरनी काढला. रोप तुटली नाही. ओव्हरलोड मुळे पडली. हयासाठी त्यांनी पंचनामा केलेला नव्हता. पंचांच्या सहया नाहीत. केवळ जाबदेणार म्हणतात, यास काही अर्थ नाही. वास्तविक पाहता ओमेगा कंपनी lift चे उत्पादक म्हणून व्यवस्थित स्पष्टीकरण देऊ शकले असते. परंतू त्यांनी दिलेले नाही. म्हणूनच या सर्वांवरुन तक्रारदार व त्यांच्या पत्नी lift मध्ये असतांना lift पडली. त्यामुळे तक्रारदारास मार लागला. त्यांना ऑपरेशन करावे लागले हे सिध्द होते. Lift मेंटेनन्सची जबाबदारी जाबदेणार क्र.3 व 4 यांच्यावर टाकलेली होती. त्यांनी त्यांचा अहवाल दिला. परंतू जाबदेणार क्र.1 व 2 यांनी त्या दुरुस्ती रेक्टीफाईड करुन घेतलेल्या नाहीत, हे स्पष्ट होते. म्हणूनच यासर्वांस जाबदेणार क्र.1 व 2 जबाबदार ठरतात. त्यांच्यामुळेच तक्रारदारास शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. म्हणून तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरतात असे मंचाचे मत आहे. जाबदेणार क्र.3 व 4 यांची कुठलीही सेवेतील त्रुटी नाही. म्हणून मंच जाबदेणार क्र.1 व 2 यांना असा आदेश देते की त्यांनी तक्रारदाराच्या उपचाराचा खर्च व औषधीचा मिळुन रक्कम रुपये 34,489/- दयावी. आणि नुकसान भरपाईपोटी रक्कम रुपये 50,000/-, तसेच तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 1,000/- तक्रारदारास दयावा.
वरील विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येतो-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येते. जाबदार क्र. 3 व 4 विरुध्द आदेश नाही.
2. जाबदेणार क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या आणि वैयक्तिकरित्या तक्रारदारास रक्कम रुपये 34,489/-आणि नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये 50,000/-तसेच तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 1,000/- तक्रारदारास आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयात दयावी. वेळेत पुर्तता न केल्यास त्यावर 9 टक्के व्याज आकारले जाईल.
3. आदेशाची प्रत दोन्ही पक्षास विनामूल्य देण्यात यावी.