(आदेश पारीत व्दारा - श्री शेखर प्र. मुळे, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 20 एप्रिल, 2018)
1. तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये, ही तक्रार विरुध्दपक्षाविरुध्द तक्रारकर्तीने घेतेलेल्या ऑटोरिक्षा सबंधी अनुचित व्यापार पध्दती आणि सेवेतील कमतरता यासबंधी दाखल केली आहे. तक्रारकर्तीची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ती ही तिन चाकी प्रवाशी ऑटोरिक्षा परमीट धारक आहे. ऑटोरिक्षा चालवून ती आपल्या कुंटुंबाचा उररनिर्वाह करते. विरुध्दपक्ष ही महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीचे वाहन विक्री करणारी कंपनी आहे. तक्रारकर्तीने दिनांक 6.3.2014 ला विरुध्दपक्षाकडून महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीचा तिनचाकी ऑटोरिक्षा रुपये 2,39,592/- मध्ये खरेदी केला. त्या ऑटोचा क्रमांक MH-40 - 2363 असा आहे. विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीला सदर वाहनावर रुपये 20,000/- ची सुट देण्याचे कबुल केले होते. तक्रारकर्तीचे असे म्हणणे आहे की, सदर ऑटोरिक्षा व्यवस्थित चालत नव्हता, तसेच नवीन ऑटोरिक्षा सारखा परिणामकारक नव्हता, तो डाव्या बाजुला झुकत होता, त्याच्या गिअरबॉक्स मध्ये बिघाड होता, क्लच व्यवस्थित काम करीत नव्हते आणि इंजिनमधून आवाज येत होता. तिने जेंव्हा तो विरुध्दपक्षाकडे दुरुस्तीसाठी नेला त्यावेळी लक्षात आले की, ऑटोरिक्षाच्या ब-याच भागांमध्ये बिघाड आहे. विरुध्दपक्षाने मोफत ऑटोरिक्षा दुरुस्त करुन दिला, तरी सुध्दा तो नव्या ऑटोरिक्षा प्रमाणे काम करीत नव्हता. त्यानंतर सुध्दा तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडे बरेचदा ऑटोरिक्षा दुरुस्तीकरीता नेला, परंतु विरुध्दपक्षाने नंतर दुरुस्त केले नाही किंवा ऑटोरिक्षा बदलवून दिला नाही. दिनांक 30.8.2014 ला तिच्या लक्षात आले की, विरुध्दपक्षाने तिला विकलेला ऑटोरिक्षा सेकंडहॅन्ड आहे, तो ऑटोरिक्षा पूर्वी कृष्णा निंबाळकर याला विकला होता, ज्याचे नावाने ऑटोरिक्षाची गेटपास सुध्दा आहे. अशारितीने विरुध्दपक्षाने रुपये 20,000/- ची सुट देण्याचे प्रलोभन दाखवून तिला जुना वापरलेला ऑटोरिक्षा विकला. ही विरुध्दपक्षाची अनुचित व्यापार पध्दती आहे, तसेच सेवेतील कमतरता सुध्दा आहे. म्हणून या तक्रारीव्दारे तिने विरुध्दपक्षाकडून रुपये 1,30,000/- चे झालेले आर्थिक नुकसानीची भरपाई मागितली असून झालेल्या त्रासाबद्दल रुपये 30,000/- आणि तक्रारीच्या खर्च म्हणून रुपये 10,000/- मागितला आहे.
3. तक्रारकर्तीच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्षांना मंचा मार्फत नोटीस पाठविण्यात आली. त्यानुसार विरुध्दपक्षाने आपला लेखी जबाब सादर करुन तक्रार नाकबुल केली. विरुध्दपक्षाचे असे म्हणणे आहे की, तक्रार ही मुदतबाह्य आहे. तसेच, सदर ऑटोरिक्षामध्ये पूर्वीपासून बिघाड होता यासंबंधी तज्ञ अहवाल नाही. या प्राथमिक आक्षेपावर तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली. विरुध्दपक्ष हा महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीचे वाहनाचा अधिकृत विक्रेता असल्याचे मान्य करुन तक्रारकर्तीने त्याचेकडून ऑटोरिक्षा विकत घेतल्याची बाब सुध्दा मान्य केली आहे. परंतु, हे नाकबुल केले आहे की, त्यांनी सुट देण्याचे प्रलोभन देऊन तक्रारकर्तीला ऑटोरिक्षा घेण्यास प्रेरीत केले. तक्रारकर्ती म्हणते त्यानुसार ऑटोरिक्षात पूर्वीपासून बिघाड होता, ही बाब नाकबुल केली. ऑटोरिक्षाचे गिअरबॉक्स मध्ये आवाज येत असल्याने त्याची दुरुस्ती विनामोबदला करण्यात आली होती. पुढे असे नमूद केले की, तक्रारकर्तीने सदर ऑटोरिक्षाची बुकींग 10 जुन 2014 ला केली, त्याअगोदर कृष्णा निंबाळकर याने त्याच ऑटोरिक्षाचे बुकींग केले होते. परंतु, पढे काही कारणास्तव निंबाळकरने बुकींग रद्द केली आणि त्याने पूर्ण पैसे दिले नसल्याने तो ऑटोरिक्षा त्याला देण्यात आला नव्हता. तक्रारकर्तीला याची माहिती देण्यात आली होती आणि तिने तो ऑटोरिक्षा विकत घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे, तिने निंबाळकरने सही केलेल्या गेटपासवर स्वतःची सही केली. तो ऑटोरिक्षा तिच्या नावाने नोंदणीकृत करण्यात आला. तक्रारकर्तीने या सर्व बाबी लपवून ठेवल्या. सबब, तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
4. तक्रारकर्ती व विरुध्दपक्षाच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. उभय पक्षकारांनी अभिलेखावर दाखल केलेले लेखी बयाण, दस्ताऐवज, युक्तीवादाचे अवलोकन केले, त्यावरुन खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
// निष्कर्ष //
5. तक्रारकर्तीचे विरुध्दपक्षाविरुध्द दोन आरोप आहेत. पहिला म्हणजे विरुध्दपक्षाने तिला सेकंडहॅन्ड ऑटोरिक्षा विकला. कारण, तो ऑटोरिक्षा पूर्वी निंबाळकर याला विकण्यात आला होता. दुसरा आरोप असा आहे की, त्या ऑटोरिक्षामध्ये पूर्वीपासून निर्मिती दोष होता. पहिल्यांदा तिचा पहिला आरोप की, तिला जुना ऑटोरिक्षा विकला या आरोपाचा विचार करु. विरुध्दपक्षाने हे नाकबुल केले नाही की, सदर ऑटोरिक्षा पूर्वी कृष्णा निंबाळकर याने बुक केला होता, त्यामुळे त्याचे नावे इनव्हाईस आणि गेटपासवर दिसून येते. यासबंधी स्पष्टीकरण देतांना विरुध्दपक्षा तर्फे सांगण्यात आले की, तक्रारकर्तीच्या पूर्वी सदर ऑटोरिक्षाची बुकींग कृष्णा निंबाळकर या इसमाच्या नावाने करण्यात आले होते. त्यामुळे, इनव्हाईस आणि गेटपासवर सुध्दा त्याचे नाव लिहिण्यात आले. परंतु, पुढे निंबाळकरने पैसे भरले नाही आणि बुकींग रद्द केली, त्यामुळे सदर ऑटोरिक्षा कृष्णा निंबाळकरला कधीच विकण्यात आला नव्हता, त्यानंतर तक्रारकर्तीने त्याच ऑटोरिक्षाचे बुकींग केले. विरुध्दपक्षाचे वकीलांनी पुढे असे सांगितले की, सदर ऑटोरिक्षा कृष्णा निंबाळकर याला कधीच विकण्यात आला नसल्याने तो ऑटोरिक्षा त्या इसमाचे नावाने कधीच नोंदणीकृत करण्यात आला नाही. सदर ऑटोरिक्षा कृष्णा निंबाळकरच्या नावाने प्रादेशिक वाहन कार्यालयात नोंदणीकृत झाल्यासबंधी कुठलाही दस्ताऐवजी पुरावा नाही. तसेच, ऑटोरिक्षाची विमा पॉलिसी सुध्दा त्याचे नावाने नाही.
6. केवळ, कृष्णा निंबाळकरचे नाव इनव्हाईसमध्ये आणि गेटपासवर दिसून येते म्हणून त्यावरुन असे म्हणणे चुकीचे ठरेल की, तो ऑटोरिक्षा कृष्णा निंबाळकरला विकण्यात आला होता आणि त्याचे नावाने नोंदणीकृत करयात आला होता. जर त्या ऑटोरिक्षाच्या आर.सी.बुकमध्ये कृष्णा निंबाळकरचे नाव असते तर तक्रारकर्तीचा हा आरोप मान्य करण्या योग्य होता. असे बरेचदा घडते की, एखादे वाहन विकत घेण्याचे दृष्टीने विक्रेत्यांकडे चौकशी करीता जातो आणि त्यावेळी वाहनाच्या किंमतीचा इनव्हाईस त्याच्या नावाने तयार करण्यात येतो. परंतु, पुढे तो ग्राहक ते वाहन विकत घेत नाही, केवळ या कारणास्तव ते वाहन जुने किंवा सेंकडहॅन्ड होते हे म्हणणे पुर्णपणे चुकीचे ठरेल. तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाविरुध्द जुने वाहन विकण्यासंबंधी पोलीसांकडे तक्रार केली होती. त्यावेळी, पोलीसांनी केलेल्या चौकशीत कृष्णा निंबाळकरचे बयाण नोंदविण्यात आले होते आणि त्याने बयाणामध्ये तेच सांगितले जे विरुध्दपक्षाने आपल्या उत्तरात किंवा युक्तीवादात सांगितले आहे. जरी आम्हीं या पोलीस बयाणावर भिस्त ठेवत नसलो तरी ते बयाण विरुध्दापक्षाच्या बयाणाला पुष्ठी देते, ही बाब नाकारता येत नाही. म्हणून, एकंदर वस्तुस्थिती आणि दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर आम्ही तक्रारकर्तीचे या आरोपाशी आम्हीं सहमत नाही की तिला विरुध्दपक्षाने जुना किंवा सेंकडहॅन्ड ऑटोरिक्षा विकला.
7. ऑटोरिक्षाच्या निर्मीती दोषासबंधी विचार केला तर हे नमूद करावे लागेल की, विरुध्दपक्षाने त्या ऑटोरिक्षामध्ये काही बिघाड होता हे नाकारलेले नाही आणि त्याची दुरुस्ती सुध्दा विरुध्दपक्षाने विनामोबदला केलेली आहे. परंतु, त्या ऑटोरिक्षात तक्रारकर्ती म्हणते त्याप्रमाणे बिघाड झाल्याचे विरुध्दपक्षाने नाकबुल केले आहे. दिनांक 4.10.2014 ला केलेल्या मोफत दुरुस्तीनंतर तक्रारकर्तीकडून पुन्हा ऑटोरिक्षा बिघाडासंबंधी तक्रार आली नव्हती. ही तक्रार दिनांक 6.10.2016 ला दाखल करण्यात आली होती. म्हणजेच दोन वर्षा पेक्षा जास्त कालावधीमध्ये त्या ऑटोरिक्षात बिघाड आल्याची तक्रार नव्हती. त्याशिवाय ऑटोरिक्षातील निर्मिती दोष किंवा बिघाडासंबंधी तज्ञ अहवाल अभिलेखावर नाही. वाहनामधील निर्मिती दोष हा एक तांत्रिक मुद्दा असतो, जो केवळ तक्रारीमधील केलेल्या विधानांवरुन ठरविता येत नाही, म्हणून या मुद्यावर तज्ञ अहवालाची आवश्यकता असते. आणखी एक बाब लक्षात घ्यावी लागेल की, त्या ऑटोरिक्षाच्या व्हेईकल हिस्टरी नुसार दिनांक 30.8.2014 पर्यंत म्हणजे विकत घेतल्यापासून पाच महिन्याच्या आंत तो ऑटोरिक्षा 22567 किलोमीटर चालला होता. यावरुन, हे स्पष्ट आहे की, त्या ऑटोरिक्षा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि त्यामुळे त्या ऑटोरिक्षामध्ये Wear and Tear मुळे काही बिघाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तक्रारकर्तीच्या वकीलांनी, “M/s., Mehata Motors –Vs.- Rameshwar, IV (2003) CPJ 140 (NC)” या निर्णयाचा आधार घेतला. ज्यामध्ये सांगितले आहे की, ज्यावेळी एखादे जुने आणि दोषपूर्ण वाहन दस्ताऐवजांमध्ये खोडतोड करुन नवीन वाहन म्हणून विकण्यात येते, त्यावेळी निर्माता आणि विक्रेता दोघेही वैयक्तीकरित्या आणि संयुक्तीकरित्या वाहनाची किंमत परत करण्यास जबाबदार असतात. परंतु, या निर्णयाचा आधार तेंव्हाच घेता यईल जेंव्हा तक्रारीत केलेले आरोप सिध्द होत असतील.
8. विरुध्दपक्षाच्या वकीलांनी पुढे असा युक्तीवाद केला आहे की, ही तक्रार मुदतबाह्य आहे. “State Bank of India – Versus – M/s. B.S. Agricultural Industries (I), Civil Appeal No. 2067/2002 निकाल पारीत दिनांक 20/3/2009 (NC)” या निर्णयाचा आधार घेऊन सांगितले की, ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 24 – A नुसार मंचाला कुठलीही तक्रार जर ती कारणा घडल्यापासून दोन वर्षाच्या आत दाखल केली नसेल तर ती दाखल करता येत नाही. तक्रारीनुसार तक्रारकर्तीला दिनांक 30.8.2014 ला माहीत पडले की, तिला जुना वापरलेला ऑटोरिक्षा नवीन म्हणून विकण्यात आला होता. त्यामुळे ही तक्रार दाखल करण्याचे कारण पहिल्यांदा दिनांक 30.8.2014 ला घडले, परंतु तक्रार दोन वर्षानंतर म्हणजेच दिनांक 6.10.2016 ला दाखल करण्यात आली. तक्रारकर्तीच्या वकीलांनी असे सांगितले की, विरुध्दपक्षाने नुकसान भरपाई दिली नाही किंवा ऑटोरिक्षा बदलवून दिला नाही, त्यामुळे तक्रारीत सतत कारण घडत आहे. परंतु, वकीलाचा हा युक्तीवाद एकंदर तक्रारीचे स्वरुप पाहता ग्राह्य धरण्याजोगा नाही. सबब, ही तक्रार मुदतबाह्य आहे.
वरील कारणास्तव ही तक्रार खारीज करण्यात येत आहे. सबब, खालील प्रमाणे आदेश देण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात येते.
(2) खर्चाबद्दल कुठलाही आदेश नाही.
(3) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
दिनांक :- 20/04/2018