(मंचाचा निर्णय: श्री. रामलाल सोमाणी- अध्यक्ष यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 05/08/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 20.03.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. प्रस्तुत तक्रारीत तक्रारकर्तीने नमुद केले आहे की, तिने गैरअर्जदाराकडे मौजा पेवठा, खसरा नं.128/1, 128/2, 128/3, 129, 131/1, प.ह.नं. 41 येथील ले-आऊटमधील भुखंड क्र.27 एकूण क्षेत्रफळ 1500 चौ.फुट रु.1,42,500/- ला दि.07.12.2005 रोजी रु.1,000/- देऊन नोंदणीकृत केला. तसेच सदर भुखंडांची उर्वरित रक्कम दि.23.01.2007 पर्यंत वेळोवेळी गैरअर्जदाराला दिल्याचे तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केले असुन त्याबाबतच्या पावत्या दाखल केलेल्या आहेत. तक्रारकर्तीने नमुद केले आहे की, गैरअर्जदाराकडे संपूर्ण रकमेचा भरणा केल्यानंतरही गैरअर्जदार जाणून-बुजून विक्रीपत्र करुन देण्यास टाळाटाळ करीत आहेत. तसेच तक्रारकर्ती भुखंडाचे विक्रीपत्र करुन घेण्यासाठी गैरअर्जदारांचे कार्यालयात जावून विक्रीपत्राच्या नोंदणीसंबंधी विचारणा केली असता गैरअर्जदारांनी विक्रीपत्र करुन देण्यास नकार दिल्याचे नमुद केले आहे. 3. प्रस्तुत तक्रारीत तक्रारकर्तीने नमुद केले आहे की, ती उर्वरित रक्कम देऊन विक्रीपत्र करण्यांस तयार असतांना सुध्दा गैरअर्जदारांनी भुखंडाचे विक्रीपत्र करण्याचे दृष्टीने कोठलीही पाऊल उचलले नाही व त्या संदर्भात तक्रारकर्तीला कुठलीही सुचना आज पर्यंत दिली नाही. म्हणून तिने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली असुन सदर भुखंडाचे विक्रीपत्र करुन देण्याची मागणी केली आहे. अथवा गैरअर्जदारास विक्रीपत्र करुन देण्यांस कायदेशीर अडचण येत असेल तर रु.1,42,500/- ची दि. 23.01.2007 पासुन संपूर्ण रक्कम मिळे पर्यंत द.सा.द.शे.12% व्याजाने मागणी केलेली आहे. 4. तक्रारकर्तीने नमुद केले आहे की, गैरअर्जदाराने प्रस्तुत भुखंडाचे विक्रीपत्र करुन न दिल्यामुळे तिला सदर भुखंडाचा उपभोग घेता आला नाही. त्यामुळे तिला मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला त्याकरता रु.25,000/- ची व तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.10,000/- ची मागणी केलेली आहे. 5. प्रस्तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदारावर नोटीस बजावण्यांत आली असता, त्यांना नोटीस मिळाल्यानंतर ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपला लेखी जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे. 6. गैरअर्जदाराने आपल्या उत्तरातील प्राथमिक आक्षेपात नमुद केले आहे की, ते प्रॉस्पर रिअल मॅनेजमेंट ग्रुपचे भागीदार आहेत व प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्तीने कंपनीच्या इतर भागीदारांना पक्ष म्हणून समाविष्ट करण्यांत आले नसल्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार आवश्यक पक्ष न जोडण्याच्या कारणांवरुन खारिज करण्यांत यावी. तसेच तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार 2 वर्षांचे कालावधीत दाखल केलेली नसुन तक्रारीसोबत विलंब माफीचा अर्जही दाखल केलेला नाही म्हणून ती खारिज करण्यांत यावी अशी मंचास विनंती केलेली आहे. 7. गैरअर्जदाराने आपल्या परिच्छेद निहाय उत्तरात तक्रारकर्तीने मौजा पेवठा, खसरा नं.128/1, 128/2, 128/3, 129, 131/1, प.ह.नं. 41 येथील ले-आऊटमधील भुखंड क्र.26 एकूण क्षेत्रफळ 1500 चौ.फुट रु.1,42,500/- ला विकत घेण्याचा करार केला होता. तसेच दि.07.12.2005 ते दि.23.01.2007 पर्यंत संपूर्ण रक्कम जमा केल्याचे मान्य केलेले आहे. परंतु विक्रीपत्र करुन देण्यांस टाळाटाळ करीत होते हे तक्रारकर्तीचे म्हणणे नाकारले आहे. गैरअर्जदाराने नमुद केले आहे की, त्यांनी तक्रारकर्तीला स्टॅम्प डयुटी व रजिस्ट्रेशन चार्जेस भरुन विक्रीपत्र करुन देण्यास सुचविले असता तिने कोणतीही उत्सुकता दाखविली नाही. 8. गैरअर्जदाराने पुढे नमुद केले आहे की, ते भुखंडांचे मालक श्री. शिंगणे व त्यांचे आममुखत्यार श्री. यशवंत इंगळे यांचेतर्फे अधिकृत प्रतिनिधी म्हणून भुखंडांची विक्री करीत होते व सदर प्रकरणी जमीनीचे मालक व त्यांचे अधिकृत प्रतिनिधी यांना आवश्यक पक्ष करणे गरजेचे होते. तसेच तक्रारकर्तीला सदर व्यवहाराची स्पष्ट कल्पना भुखंड आवंटीत करतांना दिली होती ही बाब तक्रारकर्तीने दाखल केलेल्या भुखंड क्र.91 चे विक्रीपत्रावरुन स्पष्ट होते. म्हणून अधिकृत विक्रेता या नात्याने भुखंडाची किंमत जमीन मालकांचे आममुखत्यार यांना दिलेली असल्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारिज करावी अशी मंचास विनंती केलेली आहे. 9. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.03.08.2010 रोजी आली असता तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे तर्फे वकील हजर. उभय पक्षांचा युक्तिवाद व दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 1. प्रस्तुत प्रकरणामध्ये दोन्ही पक्षांचे कथन व मंचापुढे दाखल दस्तावेज यांचे अवलोकन केले असता तक्रारकर्तीने केलेले प्लॉटचे इसार किमतीबद्दल दिलेल्या रकमेबद्दल, कोणताही आक्षेप घेतलेला नाही. एकूण भुखंडाची संपूर्ण किंमत रु. 1,42,500/- गैरअर्जदारांकडे भरल्याचे स्पष्ट होते, त्यामुळे तक्रारकर्ती गैरअर्जदाराची ‘ग्राहक’ ठरते. गैरअर्जदाराने आपल्या उत्तरातील प्राथमिक आक्षेपात नमुद केले आहे की, ते प्रॉस्पर रिअल मॅनेजमेंट ग्रुपचे भागीदार आहेत व प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्तीने कंपनीच्या इतर भागीदारांना पक्ष म्हणून समाविष्ट केले नसल्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार आवश्यक पक्ष न जोडण्याच्या कारणांवरुन खारिज करण्यांत यावी, अशी मंचास विनंती केलेली आहे. मंचाच्या मते तक्रारकर्तीने नोंदणीपत्रानुसार प्रस्तुत गैरअर्जदारास भुखंडाची संपूर्ण रक्कम दिलेली आहे, त्यामुळे गैरअर्जदाराने तक्रारकर्तीस सदर भुखंडांचे विक्रीपत्र करुन द्यावयास पाहिजे व गैरअर्जदाराचा आक्षेप फेटाळण्यांत येते. 2. प्रस्तुत प्रकरणाला ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 24-A अंतर्गत मुदतीची बाधा येते, कारण तक्रारकर्तीने 2 वर्ष मुदतीत तक्रार दाखल केलेली नाही. सबब ती खारिज करावी असा गैरअर्जदाराचा आक्षेप असुन प्रकरण तपासले असता सदर तक्रारीला कारण सतत घडत असल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदाराने तक्रारकर्ती विरुध्द आक्षेप घेतला की, तिने विक्रीपत्र करुन घेतले नाही, परंतु त्याने सुध्दा त्याचे वतीने काय कार्यवाही केली हे कुठेही स्पष्ट केले नाही, सबब गैरअर्जदाराचा मुदतीचा आक्षेप फेटाळण्यांत येते. 3. उभय पक्षाचे कथन व कागदोपत्री पुराव्यांवरुन स्पष्ट होते की, गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला विक्रीपत्र करुन दिलेले नाही व ते या प्रकरणातील विक्रीपत्र करुन देण्यास समर्थ व जबाबदार आहेत. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रारीत दस्तावेज क्र.1 वर भुखंड क्र.91 चे दि. 08.11.2005 रोजी करुन दिलेले विक्रीपत्र दाखल केलेले आहे. सदर विक्रीपत्राचे अवलोकन केले असता गैरअर्जदाराने तक्रारकर्तीस भुखंड क्र.27 चे विक्रीपत्र आदेश पारित दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करुन द्यावे. तसेच विक्रीपत्राचे नोंदणीचा खर्च तक्रारकर्तीने सोसावा. जर गैरअर्जदार विक्रीपत्र करुन देण्यांस असमर्थ असेल तर त्याचेकडे जमा असलेले रु. 1,42,500/- तक्रार दाखल दिनांक 23.01.2007 पासुन द.सा.द.शे. 7% दराने रक्कम अदा होई पर्यंत व्याजासह परत करावी. तसेच प्रस्तुत भुखंडाचे विक्रीपत्र करुन न दिल्यामुळे तक्रारकर्तीला सदर भुखंडाचा उपभोग घेता न आल्यामुळे तिला मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला त्याकरता रु.25,000/- ची मागणी केलेली आहे परंतु सदर मागणी अवाजवी असुन पुराव्या अभावी मंचास मान्य करता येत नसुन तक्रारकर्तीस रु.5,000/- मानसिक व शारीरिक त्रासाचे द्यावयास पाहिजे तसेच तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.1,500/- द्यावयास पाहिजे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. 4. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करण्यांत येते. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येते की, त्याने तक्रारकर्तीस भुखंड क्र.27 चे विक्रीपत्र आदेश पारित दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करुन द्यावे. तसेच विक्रीपत्राचे नोंदणीचा खर्च तक्रारकर्तीने सोसावा. अथवा त्याचेकडे जमा असलेले रु. 1,42,500/- रक्कम जमा केल्याचा दिनांक 23.01.2007 पासुन द.सा.द.शे. 7% दराने रक्कम अदा होई पर्यंत व्याजासह तक्रारकर्तीला परत करावी. 3. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येते की, त्याने तक्रारकर्तीस मानसिक व शारीरिक त्रासाचे रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाचे रु.1,500/- अदा करावे. 4. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी अन्यथा वरील आदेशीत रक्कम द.सा.द.शे. 9% दराने रक्कम अदा होई पर्यंत व्याजासह परत करावी लागेल. 5. तक्रारकर्त्याला मा. सदस्यांकरीता दाखल केलेल्या (ब,क) प्रति परत कराव्यात. 6. उभय पक्षांना आदेशाची प्रत निशुल्क उपलब्ध करुन द्यावी. (मिलींद केदार) (रामलाल सोमाणी) सदस्य अध्यक्ष
| [HONABLE MR. Mr. Milind R. Kedar] Member[HONABLE MR. Ramlal Somani] PRESIDENT | |