सौ. मंजुश्री खनके, सदस्या यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 01/07/2014)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात असा की, वि.प. 1 ते 3 यांचा प्रास्पर रीएल ईस्टेट मॅनेजमेंट गृप या नावाने व्यवसाय असून, ते भूखंड खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. तक्रारकर्त्याने परिवाराच्या भविष्यात राहण्याच्या दृष्टीने नागपूर येथे प्लॉट विकत घेण्याचे ठरविले. वि.प.कडून मौजा-पेवठा, ख. क्र. 128/1, 128/2, 128/3, 129 व 131/1, प.ह.क्र.41, प्लॉट क्र. 14, एकूण क्षेत्रफळ 1500 चौ.फु. हा रु.1,42,500/- मध्ये प्लॉट खरेदी करण्याचे निश्चित केले. भुखंड निश्चित करण्याकरीता वि.प.ला तक्रारकर्त्याने धनादेशाद्वारे दि.22.12.2005 ते 20.09.2006 पर्यंत वेळोवेळी रु.1,42,500/- दिले. सदर रकमेच्या पावत्या वि.प.ने तक्रारकर्त्याला दिल्या. तक्रारकर्त्याने संपूर्ण रक्कम अदा करुनही वि.प.ने तक्रारकर्त्याला भुखंडाचे विक्रीपत्र करुन दिले नाही. तक्रारकर्त्याने वारंवार वि.प.च्या कार्यालयात त्याबाबत विचारणा केली व शेवटी कायदेशीर नोटीसही बजावली. परंतू वि.प.ने त्याची दखल घेतली नाही. म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन, भुखंडाचे विक्रीपत्र करुन द्यावे अन्यथा भुखंडाबाबत अदा केलेली रक्कम 12 टक्के व्याजासह अदा करावी, तसेच शारिरीक व आर्थिक त्रासाबाबत नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चाची मागणी केलेली आहे.
2. वि.प.क्र. 1 ते 3 ला नोटीस बजावण्यात आली असता वि.प.क्र. 3 हे मंचासमोर हजर न झाल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
3. वि.प.क्र. 1 ने लेखी उत्तर दाखल करुन, तक्रारकर्त्याचे तक्रारीतील सर्व कथन अमान्य केले आणि वि.प.क्र. 1 हा प्रास्पर रीएल ईस्टेट मॅनेजमेंट गृप भागीदारी पेढीचा 21.09.2010 पर्यंतच भागीदार होता व त्यानंतर वि.प.क्र. 1 यांनी सदरहू भागीदारी पेढीचे काम केलेले नाही आणि आज तो भागीदारही नाही. यापुढे वि.प.ने असे कथन केले की, भुखंडा संदर्भात वि.प.क्र.1 व 2 हेच सर्व कामे बघत असत, त्यामुळे भुखंडाचे गैरव्यवहारासंबंधी वि.प.क्र. 1 यांना काहीही माहित नाही. तक्रारकर्त्याने ज्या भुखंडा संदर्भात गैरव्यवहार झाल्याचे म्हटले आहे, तो व्यवहार वि.प.क्र. 2 व 3 सोबत केल्यामुळे, तसेच मौजा पेवठा येथील जागा यशवंत इंगळे यांचे नावाने आहे, त्यामुळे वि.प.क्र. 1 चा हयाच्याशी कुठलाही संबंध नाही. यशवंत इंगळे यांचेसोबत वि.प.क्र. 2 व 3 यांनी मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडींग केले होते. परंतू वि.प.क्र. 2 व 3 यांच्या निष्काळजीपणामुळे व गैरवर्तणुकीमुळे वि.प.क्र. 2 व 3 सोबत आणि भागीदारी संस्थेसोबत वाद करुन भुखंडाचे विक्रीपत्र करुन दिले नाही. त्यामुळे यशवंत इंगळे सदर प्रकरणी आवश्यक विरुध्द पक्षकार आहेत. वि.प.क्र. 1 हे नाममात्र भागीदार आहेत व वि.प.क्र. 2 ही भागीदारी संस्थेच्या देणेकरीता एकटी जबाबदार आहे. वि.प.क्र. 2 व 3 सदर संस्थेचा आजही कारभार पाहतात व तेच तक्रारकर्त्याला देणे लागतात. तक्रारकर्त्याची मागणी ही पूर्णपणे खोटी आहे, वि.प.क्र. 1 त्यास उत्तरदायी नसल्याने कुठल्याही प्रकारची भरपाई देण्यास ते जबाबदार नाहीत. तक्रारकर्त्याची नोटीस त्यांना प्राप्त झाली होती, परंतू संस्थेचे ते भागीदार नसल्याने त्यांनी नोटीसला उत्तर दिले नाही.
4. उभय पक्षांचा युक्तीवाद मंचाने ऐकला. तसेच दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे विचारार्थ खालील मुद्दे, निष्कर्ष व त्यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे आहे.
मुद्दे निष्कर्ष
1) वि.प.चे सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापार प्रथा दिसून येते काय होय.
2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मागण्यास पात्र आहे काय होय.
3) आदेश तक्रार अंशतः मंजूर.
-कारणमिमांसा-
5. मुद्दा क्र. 1 बाबत – वि.प. भागीदारी संस्था हे प्लॉटचे विक्री करणारे व विकासक आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने त्यांचेकडून प्लॉट विकत घेण्याचे ठरवून दि.21.12.2005 रोजी नोंदणी पत्रानुसार प्रस्तुत योजनेतील प्लॉट क्र. 14, रु.1,42,500/- मध्ये विकत घेण्याचे ठरविल्याचे निदर्शनास येते आणि त्यानुसार वेळोवेळी वि.प.ला एकूण रक्कम रु.1,42,500/- दिल्याचे पावत्यांवरुन स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने प्लॉटची संपूर्ण रक्कम देऊनही वि.प.क्र. 2 व 3 ने त्याला प्लॉटचे विक्रीपत्र करुन दिले नाही. वि.प.ची सदर कृती ही अनुचित व्यापार प्रथेत मोडते असे मंचाचे मत आहे. करीता तक्रारकर्ता प्रस्तुत तक्रारीमध्ये दाद मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
6. मुद्दा क्र. 2 व 3 बाबत – तक्रारकर्त्याने सदर प्रकरणी प्लॉट क्र. 14 चे विक्रीपत्र व ताबा मिळण्याची मागणी केलेली आहे. याबाबत प्लॉटची संपूर्ण किंमत वि.प. भागीदारी संस्थेने स्विकारली असल्याने, तक्रारकर्ता मागणीप्रमाणे निश्चितच दाद मागण्यास पात्र आहे. तसेच यशवंत इंगळे हे जमिन मालक असल्याने आणि सदर जमिनीचा व्यवहार वि.प.क्र. 2 व 3 हेच बघत असल्यामुळे आणि वि.प.क्र. 1 हे 2010 नंतर या संस्थेचे भागिदार नाहीत असे त्यांनी शपथपत्रावर मंचासमोर नमूद केल्यावरही, वि.प.क्र. 2 व 3 हे मंचासमोर हजर झाले नाही व आपले म्हणणेही मांडले नाही. यावरुन वि.प.क्र. 1 चे शपथपत्रावरील अभिकथन हे सत्य मानण्यास मंचाला हरकत वाटत नाही. वि.प.क्र. 2 व 3 ची विक्रीपत्र करुन देण्याची सर्वस्वी जबाबदारी असल्यामुळे आणि ती त्याने पूर्ण न केल्यामुळे वि.प.क्र. 2 व 3 तक्रारकर्त्याची मागणी पूर्ण करण्यास सर्वस्वी जबाबदार आहेत. वि.प.क्र. 2 व 3 च्या सदर कृतीमुळे तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रास झाल्याने, तो सदर त्रासाच्या नुकसान भरपाईदाखल रक्कम व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. उपरोक्त निष्कर्षावरुन व दाखल दस्तऐवजांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) वि.प.क्र. 2 व 3 ने तक्रारकर्त्याला प्लॉट क्र. 14 चे विक्रीपत्र करुन, प्रत्यक्ष ताबा द्यावा. विक्रीपत्राचा खर्च तक्रारकर्त्याने सोसावा.
-किंवा-
वि.प. जर प्लॉट क्र. 14 चे विक्रीपत्र करुन देण्यास असमर्थ असतील तर त्यांनी तक्रारकर्त्याकडून प्लॉटच्या किंमतीबाबत घेतलेली रक्कम रु.1,42,500/- ही दि.20.09.2006 पासून तर रकमेच्या प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे.12 टक्के व्याजासह द्यावी.
3) वि.प.क्र. 2 व 3 ने तक्रारकर्त्याला शारिरीक व मानसिक नुकसान भरपाईदाखल रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चादाखल रु.3,000/- अदा करावे.
4) वि.प.क्र. 1 विरुध्दची तक्रार खारिज करण्यात येते.
5) सदर आदेशाची पूर्तता वि.प.क्र. 2 व 3 ने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून एक महिन्याचे आत संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे आत करावी.