आदेश पारित द्वारा मा. सदस्य श्री. एन. व्ही. बनसोड 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अंतर्गत विरूध्द पक्ष यांच्याविरूध्द दाखल करून, बोअरवेल दुरूस्त करून नवीन मशिनरी लावून द्यावी अथवा बोअरवेल व मशिनरी खर्च रू. 36,344/-, दुरूस्तीचा खर्च रू. 1,000/-, शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रू. 50,000/- व तक्रारीचा खर्च रू. 1,000/- याप्रमाणे एकंदर रू. 88,344/- विरूध्द पक्ष यांचेकडून मिळावे अशी मंचास मागणी केली आहे. तक्रारकर्त्याचे म्हणणे थोडक्यात खालीलप्रमाणेः- 2. तक्रारकर्त्यानुसार, विरूध्द पक्ष हे भंडारा येथे मेसर्स सार्इनाथ मशिनरी या नावाने दुकान चालवित असून सदर दुकानाचे ते प्रोप्रायटर आहेत व बोअरवेल फिटींगचे काम कंत्राटी पध्दतीने करतात म्हणून तक्रार दाखल करण्याचे कारण मंचाच्या क्षेत्रात घडलेले आहे. 3. तक्रारकर्त्याने दिनांक 11/04/2010 ला विरूध्द पक्षाला ठरल्याप्रमाणे बोअरवेल खोदून त्यावर पाणी काढण्याकरिता मशिनरी फिट करण्याचा ठेका रू. 36,344/- मध्ये दिला. त्यानुसार विरूध्द पक्षाने दिनांक 11/04/2010 ला बोअरवेल खोदून त्यावर मशिनरी फिट करून दिली व त्याचा मोबदला रू. 36,344/- पैकी रू. 36,300/- चा अर्बन बँकेचा चेक क्रमांक 696553, दिनांक 14/04/2010 आणि रोख रू. 44/- याप्रमाणे संपूर्ण रक्कम विरूध्द पक्षास दिली. विरूध्द पक्षाने डिलीव्हरी चालान क्रमांक 5481 नुसार तक्रारकर्त्याला बिल दिले. विरूध्द पक्षाकडे पक्क्या बिलाची मागणी केली असता तेच पक्के बिल समजावे असे विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला सांगितले आणि दिनांक 14/04/2010 ते 13/04/2011 पर्यंत संपूर्ण वर्षभरात कोणताही त्रास बोअरवेल व मशिनरी संबंधी दुरूस्ती करिता मोफत सेवा पुरविण्याची खात्री दिली. 4. दिनांक 18/07/2010 ला बोअरवेल मधून पाणी येणे बंद झाल्याबाबत विरूध्द पक्षाकडे तक्रारकर्त्याने तक्रार दिली. तेव्हा विरूध्द पक्ष यांनी म्हटले की, मेकॅनिक बाहेर गेले आहेत, आल्यावर तुमची तक्रार बघतील. तक्रारकर्त्याने व त्याच्या भावाने विरूध्द पक्ष यांच्या दुकानात जाऊन व भ्रमणध्वनीद्वारे बोअरवेल बिघाडासंबंधी तक्रार करून ते दुरूस्त करून देण्याची मागणी केली. विरूध्द पक्षाने तब्बल 2 महिनेपर्यंत त्याबाबतची कोणतीही दखल न घेता श्री. शनवारे नावाच्या व्यक्तीस बोअरवेल दुरूस्तीकरिता पाठविले व त्यांनी दुरूस्तीचा प्रयत्न म्हणून बोअरवेलच्या पाणी उपसणा-या पाईपला 5 ते 6 तुकड्यात कापून टाकले. हे पाहून तक्रारकर्त्यास समजले की, विरूध्द पक्षाने पाठविलेला सदर मेकॅनिक श्री. शनवारे हा निष्णात कारागीर नाही व बोअरवेलची दुरूस्ती न करताच श्री. शनवारे याने दुरूस्तीच्या नावावर रू. 1,000/- ची तक्रारकर्त्याकडे मागणी केली. तक्रारकर्त्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल या आशेने तक्रारकर्त्याने रू. 1,000/- श्री. शनवारे (मेकॅनिक) याला दिले. परंतु आजपर्यंत त्याने बोअरवेल दुरूस्त करून दिला नाही अथवा विरूध्द पक्षाने अन्य कुणाही व्यक्तीस पाठविले नाही. 5. बोअरवेल दुरूस्तीबाबत तक्रारकर्त्याने आग्रह धरल्यानंतर विरूध्द पक्षाने अरेरावीची भाषा करून, ‘बोअरवेल दुरूस्तीचा आम्ही काही लेखी करार केला नाही तेव्हा तुम्हास काय करावयाचे आहे ते करावे व पुन्हा माझ्या दुकानात तुम्ही आलात तर तुमचे हात पाय तोडून टाळकं फोडीन’ अशी धमकी देऊन तक्रारकर्त्यास हाकलले. तक्रारकर्त्याने दिनांक 20/12/2010 ला विरूध्द पक्षास पंजीकृत डाकेने पत्र पाठविले. त्याचे उत्तर विरूध्द पक्षाने दिनांक 24/12/2010 ला पंजीकृत डाकेने पाठवून दिनांक 20/12/2010 च्या पत्रास उत्तर म्हणून कोरा कागद पाठविला. त्यात एकही शब्द वा स्वाक्षरी किंवा शिक्का काहीही नव्हते. म्हणून तक्रारकर्त्याने लगेचच दिनांक 27/12/2010 ला पुन्हा विरूध्द पक्षास पत्र पाठविले. 6. तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, विरूध्द पक्षाने सेवा पुरविण्यात कसूर केली असून सदोष बोअरवेल मशिनरी पुरवून विरूध्द पक्षाने अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यास शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास सेवा पुरविली नाही ही त्यांच्या ग्राहक सेवेतील त्रुटी आहे असे तक्रारकर्त्याने म्हटले आहे. 7. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत अनुक्रमे पृष्ठ क्रमांक 8 ते 12 नुसार एकूण 5 दस्त दाखल केले आहेत. ज्यामध्ये चेकने पेमेंट केल्याबाबत बँकेचे स्टेटमेंट, विरूध्द पक्षाचा दिनांक 11/04/2010 चा डिलीवरी चालान, तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांच्यामध्ये पंजीकृत डाकेद्वारे झालेला पत्रव्यवहार इत्यादींचा समावेश आहे. 8. मंचाने दिनांक 10/03/2011 ला सदर तक्रार दाखल करून विरूध्द पक्ष यांना नोटीस बजावला व तो त्यांनी प्राप्त केल्याचे अनुक्रमे पृष्ठ क्रमांक 14 वरील पोस्टाच्या पोचपावतीवरून स्पष्ट होते. विरूध्द पक्ष यांना मंचाचा नोटीस प्राप्त होऊनही विरूध्द पक्ष मंचासमक्ष हजर झाले नाहीत अथवा त्यांनी तक्रारीस उत्तर सुध्दा दाखल केलेले नाही. 9. मंचाने दिनांक 28/06/2011 ला तक्रारकर्त्याच्या अधिकृत प्रतिनिधीचा युक्तिवाद ऐकला. युक्तिवादाच्या वेळेस विरूध्द पक्ष गैरहजर. मंचाने तक्रारीसोबत असलेल्या संपूर्ण कागदपत्रांचे व दस्तऐवजांचे सुक्ष्म अवलोकन केले. कारणमिमांसा व निष्कर्ष 10. तक्रारकर्त्याने अनुक्रमे पृष्ठ क्रमांक 9 वर दाखल केलेल्या डिलीवरी मेमोवरून हे स्पष्ट होते की, बोअरवेलची खोदाई करणे व त्यावर पंप इत्यादी बसवून बोअरवेल सुरू करून देण्याचा करार हा रू. 36,344/- मध्ये तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांच्यामध्ये झाला होता. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने रू. 36,300/- चेकद्वारे व रू. 44/- रोखीने अदा करून संपूर्ण रक्कम विरूध्द पक्षास दिली आणि विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या मागणीनुसार बोअरवेल खोदून त्यावर पंप इत्यादीची उभारणी करून दिली. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरूध्द पक्षाचा ग्राहक ठरतो. 11. मंचाने विरूध्द पक्षास पाठविलेला नोटीस त्यांना प्राप्त होऊनही विरूध्द पक्ष दिनांक 25/04/2011, 05/05/2011, 10/05/2011, 31/05/2011, 13/06/2011, 18/06/2011 व 28/06/2011 या तारखांना गैरहजर व उत्तराकरिता पुरेपूर संधी मिळाली असतांनाही त्यांनी त्यांचे उत्तर दाखल केले नाही. तसेच युक्तिवादाच्या वेळेस दिनांक 28/06/2011 ला ते गैरहजर होते. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार विरूध्द पक्षास मान्य आहे असे मंचाचे मत आहे. संपूर्ण तक्रारीचे व दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्याचे तक्रारीतील शपथपत्रावरील कथन हे मंचास विश्वसनीय वाटते. सामान्य प्रचलित पध्दतीप्रमाणे तक्रारकर्त्याने साईनाथ मशिनरीकडून बोअरवेलची खोदणी व त्यावर पंप फिटींग इत्यादी सर्व कामे विरूध्द पक्षाकडून करून घेतली व त्यांच्या विश्वसनीयतेबाबत दिनांक 14/04/2010 ते 13/04/2011 पर्यंत बोअरवेल व मशिनरी संबंधी काही बिघाड आल्यास दुरूस्तीची मोफत सेवा देण्याची विरूध्द पक्षाने खात्री दिली होती या तक्रारकर्त्याच्या म्हणण्यात मंचास तथ्य वाटते. 12. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांना वेळोवेळी प्रत्यक्ष भेट देऊन तसेच पत्राद्वारे कळवून सुध्दा विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास योग्य सेवा न पुरविता अप्रशिक्षित मेकॅनिक श्री. शनवारे याला पाठवून बोअरवेल व पंपाची दुरूस्ती करण्याचा असफल प्रयत्न केला व त्याकरिता तक्रारकर्त्याला रू. 1,000/- खर्च आला. त्यानंतर सुध्दा विरूध्द पक्ष यांनी व त्यांच्या मेकॅनिकने कोणतीही सेवा न पुरविल्यामुळे बोअरवेल व मोटर पंप विना उपयोग पडलेले आहेत. त्यामुळे तक्रारकर्त्यास शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला हे तक्रारकर्त्याचे म्हणणे मंचास विश्वसनीय वाटते. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास कोणतीही सेवा दिली नाही उलटपक्षी विरूध्द पक्ष यांनी सदोष बोअरवेल, मशीन पुरवून अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केला हे तक्रारकर्त्याचे म्हणणे मंचास संयुक्तिक वाटते. करिता विरूध्द पक्ष हे सदोष बोअरवेल दुरूस्त करून व नवीन मशिनरी लावून तो कार्यान्वित करण्यास अथवा ते शक्य नसल्यास बोअरवेल व मशिनरीचा संपूर्ण खर्च रू. 36,344/- + दुरूस्तीचा खर्च रू. 1,000/- असे एकूण रू. 37,344/- तक्रार दाखल दिनांक 10/03/2011 पासून द. सा. द. शे. 9% व्याजासह तक्रारकर्त्यास परत करण्यास तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रू. 1,000/- देण्यास बाध्य आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. करिता खालील आदेश. आदेश तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 1. विरूध्द पक्षास आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याकडील सदोष बोअरवेल दुरूस्त करून व नवीन मशिनरी लावून तो कार्यान्वित करून द्यावा. ते शक्य नसल्यास बोअरवेल व मशिनरीचा संपूर्ण खर्च रू. 36,344/- + दुरूस्तीचा खर्च रू. 1,000/- असे एकूण रू. 37,344/- तक्रार दाखल दिनांक 10/03/2011 पासून रक्कम अदा होईपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह तक्रारकर्त्यास परत करावा. 2. विरूध्द पक्षास आदेश देण्यात येतो की, प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्त्यास रू. 1,000/- द्यावे. 3. विरूध्द पक्ष यांनी आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.
| HONABLE MR. N. V. BANSOD, MEMBER | HONABLE MRS. R. D. KUNDLE, PRESIDENT | HONABLE MRS. Geeta R Badwaik, Member | |