::: आ दे श प त्र :::-
मा. अध्यक्षा, सौ. एस.एम. उंटवाले यांनी निकाल कथन केला :-
1. तक्रारकर्त्याने सदर अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सादर केला.
2. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचे जवळून दि. 30-01-2015 रोजी व्यंकटेश कृषी केंद्र, कॉटन मार्केट रोड, अमरावती येथून शेतीला लागणा-या बियाणे तिळ ज्याचा क्रमांक 55255 डब्ल्यू.आर.एस. 2014-51 वजन 500 ग्राम संख्या पाकीट 16 नग तसेच डी.डी. 14-5007 वजन 500 ग्राम संख्या पाकीट 32 नगर खरेदी केले. एकूण बियाण्यांची रक्कम रु. 6,400/- एकमुस्त प्रो. व्यंकटेश कृषी केंद्र, अमरावती यांना देण्यात आले. सदर बियाणे हे शेतामध्ये 2 हेक्टर याप्रमाणे हेक्टरी 2.500 ते 3.00 कि. ग्रामप्रमाणे बिज प्रक्रिया केलेले बियाणे पेरणी केली. परंतु, बियाण्यांच्या पॅकेटस वर बियाणे तपासणीचा दिनांक 15-09-2014 मुद्रित आहे व बियाण्यांची अंतिम मुदत 14 जून 2015 मुद्रित आहे व सेमी रब्बी व खरीप हंगाम मुद्रित आहे. उन्हाळी हंगामासाठी बियाणे असे मुद्रित नसल्यामुळे प्रो. व्यंकटेश कृषी केंद्र तसेच व्यवस्थापक, वेस्टर्न कृषी सिडस लि. गांधीनगर, गुजरात यांनी कोणत्याही प्रकारची उन्हाळी हंगामासाठी बियाणे उपयुक्त नाही, याबद्दल बियाणे विकत घेतांना तक्रारकर्त्यास कल्पना दिली नाही. त्यामुळे, तक्रारकर्त्याला हेक्टरी 15 ते 16 क्विंटल तिळाचे उत्पादन होणे अपेक्षित असतांना पूर्णतः तिळ पिक याचे नुकसान झाले. सदयपरिस्थितीत, तिळ 100/- रुपये प्रति किलो याप्रमाणे प्रति क्विंटल 10,000/- रुपये याप्रमाणे हेक्टरी 15 ते 16 क्विंटल या प्रमाणात 1,50,000/- ते 1,60,000/- रुपयाचे नुकसान झाले. तक्रारकर्त्याने शेतात 2 हेक्टर तिळ पेरणी केली. यानुसार तक्रारकर्त्याला 3,00,000/- रुपयाचे उत्पादन उन्हाळी तिळ पेरणीद्वारे तक्रारकर्त्यास शेतात उत्पन्न मिळाले असते. परंतु, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याची फसवणूक केली त्यामुळे तक्रारकर्त्याला मिळणारे 3,00,000/- रुपयाचे उत्पन्न बुडाले. तसेच 2 हेक्टर शेती करिता करावी लागणारी मशागत पेरणी तसेच मजुरांचा खर्च हेक्टरी रु. 50,000/- याप्रमाणे 2 हेक्टरचा खर्च रु. 1,00,000/- सुध्दा वाया गेला, यास विरुध्दपक्ष जबाबदार आहेत.
3. सबब, तक्रारकर्त्याची विनंती की, 1) तक्रारकर्त्यास विरुध्दपक्ष यांचेकडून रु. 6,00,000/- व्याजासह मिळावे. 2) तक्रारकर्त्यास न्यायालयीन खर्च सुध्दा मिळावा. 3) ईतर न्यायाची दाद मिळावी, अशी विनंती तक्रारकर्त्याने तक्रारीत केली आहे.
4. सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 09 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 चा अतिरिक्त जवाब
5. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी प्रस्तुत प्रकरणात अतिरिक्त जवाब दाखल केला असून त्यानुसार त्यांनी तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबूल करीत अतिरिक्त जवाबात असे नमूद केले आहे की, प्रस्तुत प्रकरणी तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचे कृषी सेवा केंद्रातून कोणतेही बियाणे खरेदी केलेले नाही. कारण सदरचे व्यवहारासंदर्भात तक्रारकर्ता यांचे नावाने बियाणे खरेदीची पावती अभिलेखामध्ये दाखल केलेली नाही.
6. विरुध्दपक्ष क्रमांक 1 हे कृषी उपयोगी बी बियाण्यांचे विक्रेते असल्याने त्यांचा बीज उत्पादनाचे तांत्रिक प्रक्रियेशी कोणताही संबंध येत नाही. तरीही बी-बियाणे विकत असतांना बियाण्यांचा दर्जा व संबंधित कंपनीची व्यावसायिक प्रतिमा याची खात्री करुनच बियाणे वा इतर साहित्य विक्रीसाठी ठेवले जाते. तक्रारकर्ता यांची तक्रार व ते कथित नुकसान भरपाईचा दावा करीत असलेले सदरचे तिळाचे बियाणे समान लॉट मधून अनेक ग्राहकांना विकले गेलेले आहे. परंतु, विक्रेता म्हणून अदयाप त्यापैकी इतर कोणत्याही ग्राहकाची तक्रार विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचेकडे आलेली नसल्याने तक्रारकर्ता यांनी विदयमान मंचासमक्ष दाखल केलेली तक्रार ही बनावट व केवळ येनकेन प्रकारे नुकसान भरपाई लाटण्याचे उद्देशाने केलेली आहे, असे दिसून येते.
7. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांना त्यांचे तक्रारीबद्दल कोणत्याही माध्यमातून अवगत केलेले नाही. तरी देखील त्यांचेवर सदोष बियाणे विकल्याचा ठपका ठेवून त्यांना चुकीची तपशीलवार आधारित नोटीस पाठविली, त्यास विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी दिनांक 22-06-2015 रोजी सविस्तर उत्तर दिलेले आहे. तक्रारकर्ता त्यांचे तक्रारीत दावा करीत असलेले कथित नुकसान हे विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी विकलेल्या बियाण्यामुळे झाले आहे, हे म्हणणे तर्कशुध्द तर नाहीच, याउपर तक्रारकर्ता यांनी या संबंधाने त्यांचे झालेल्या कथित नुकसानाचा कोणताही शास्त्रीय पुरावा सुध्दा दाखल केलेला नाही, विरुध्दपक्ष क्रमांक 1 हे नमूद करतात की, कोणत्याही पिकाचे एकूण उत्पादन हे निव्वळ बियाण्यांचे दर्जावर कधीही अवलंबून नसते व त्यासाठी जमिनीचा पोत, हवामान, तापमान, पाणी, व्यवस्थापन, पेरणीपूर्व मशागत, आर्द्रता व तसेच खते आणि औषधांच्या व्यवस्थापनावर सुध्दा विचार होणे सुध्दा जरुरीचे व क्रमप्राप्त असल्याने त्यांना केवळ एक विक्रेता म्हणून सदरचे तक्रारीचे अनुषंगाने जबाबदार ठरविणे न्यायोचित ठरणार नाही, तरी तक्रारकर्ता यांनी दाखल केलेली तक्रार ही खोटी व तथ्यहिन असल्याने ती तक्रार खर्च व दंडात्मक खर्चासह फेटाळण्यात यावी, अशी विनंती विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी केली आहे.
विरुध्दपक्ष क्रमांक 2 चा लेखी जवाब :-
8. विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी प्रस्तुत प्रकरणात लेखी जवाब दाखल केला असून त्यानुसार त्यांनी तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबूल करीत अतिरिक्त जवाबात असे नमूद केले आहे की, सदर प्रकरणामध्ये मुळात तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रमांक 2 चा ग्राहक होत नाही. कारण बियाणे खरेदीची पावती त्याच्या नावे नाही. तसेच तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये बियाण्याची पेरणी कधी केली, कोणत्या पध्द्तीने केली, शेतीसाठी सिंचनाची काय सुविधा होती, इत्यादीबाबत काहीही माहिती दिलेली नाही. तसेच तक्रारकर्त्याने बियाणे खरेदी केल्यानंतर पेरणी करेपर्यंत कोणत्या स्थितीमध्ये ठेवले याबाबतही तक्रारीमध्ये काहीही नमूद केले नाही आणि केवळ समितीने वरवर पाहणी करुन दिलेल्या अहवालावर विसंबून अवाच्यासव्वा नुकसान भरपाईची मागणी केली आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे तक्रारकर्त्याने पिकाच्या पेरणीसाठी झालेला खर्च व त्यापासून मिळणारे उत्पादन या दोन्ही बाबत नुकसान भरपाई मागितलेली आहे. परंतु, खर्चाबाबत किंवा मिळणा-या उत्पादनाबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही.
9. तक्रारकर्त्याने त्यांच्या पिकाच्या उगवणीबाबत विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांना कधीही माहिती दिली नाही. तक्रारकर्त्याने कृषी अधिकारी यांच्याकडे बियाणे उगवणीबाबत तक्रार देतांना विरुध्दपक्ष क्रमांक 2 कंपनीस काहीही माहिती दिली नाही. विरुध्दपक्ष क्रमांक 2 कंपनी एक ख्यातनाम बियाणे उत्पादक कंपनी आहे. कोणतेही बियाणे उत्पादित केल्यानंतर विक्रीसाठी बाजारात खुले करण्यापूर्वी नियमानुसार शासनाच्या आवश्यक त्या चाचण्या करुन जर ते बियाणे नियमाप्रमाणे आवश्यक त्या सर्व गोष्टींची पूर्तता करीत असेल तरच प्रमाणित केले जाते आणि त्यानंतर विक्रीसाठी खुले केले जाते. कंपनीने तिळ वेस्टर्न 11 चे लॉट क्रमांक डब्ल्यू आर एस 2014-51 चे बियाणे सर्वप्रथम कंपनीच्या प्रयोगशाळेमध्ये सर्व चाचण्या घेतल्यानंतर मा. कृषी सहायक संचालक गुजरात राज्य शासनाच्या बियाणे चाचणी प्रयोगशाळेमध्ये सदर लॉटच्या बियाण्याच्या उत्पादकता, अनुवंशिकता, शुध्दता इत्यादी बाबतच्या सर्व चाचण्या घेऊन त्याबाबत दिनांक 19-09-2014 रोजी बियाणे तपासणी अहवाल दिला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रयोगशाळेमध्ये सदर बियाण्याची तपासणी न करता, बियाणे तपासण्यासाठी कोणत्याही शास्त्रीय पध्द्तीचा वापर न करता, समितीने केवळ वरवर पाहणी करुन बियाण्याची उगवण झाली नाही म्हणून बियाणे सदोष आहे, असा निष्कर्ष काढणे आणि त्यासाठी कंपनीस जबाबदार धरणे विरुध्दपक्ष क्रमांक 2 कंपनीवर अन्याय करण्यासारखे आहे. विरुध्दपक्ष क्रमांक 2 कंपनीने सदर लॉटचे तिळाचे शेकडा क्विंटल बियाणे महाराष्ट्रामध्ये विक्री केले असून तक्रारदारा व्यतिरिक्त इतर कोणत्याही शेतक-याची त्याबद्दल काहीही तक्रार नाही. याचाच अर्थ बियाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही, असा होतो. त्यामुळे, अर्जदाराने दाखल केलेली तक्रार ही स्वतःच्या चुकीचे खापर बियाणे उत्पादक कंपनीवर फोडून, उलट कंपनीकडूनच मोठया रकमेची मागणी करुन येनकेनप्रकारे तक्रारकर्त्याने पैसे मिळविण्याचा केलेला प्रयत्न दिसत आहे. म्हणून सदरची तक्रार ही चुकीची, खोटी व तथ्यहीन असल्यामुळे फेटाळण्यात यावी, अशी विनंती विरुध्दपक्ष क्रमांक 2 ने केली आहे.
:: कारणे व निष्कर्ष ::
10. या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 चा स्वतंत्र लेखी जवाब, उभयपक्षाने दाखल केलेले सर्व दस्ताऐवज, तक्रारकर्ते यांचे प्रतिउत्तर व उभयपक्षाचा लेखी युक्तीवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देऊन नमूद केला.
11. तक्रारकर्ते यांचा युक्तीवाद असा आहे की, त्यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडून, विरुध्दपक्ष क्रमांक 2 या कंपनीचे तिळ बियाणे विकत घेतले होते. त्या बियाण्यांच्या पॅकेटस वर सेमी रब्बी व खरीप हंगाम मुद्रीत आहे. उन्हाळी हंगामासाठी सदर बियाणे उपयुक्त नाही असे बियाणे विकत घेतांना विरुध्दपक्षाने सांगितले नव्हते. त्यामुळे, अपेक्षित तिळ पिक झाले नाही व तक्रारकर्त्याची फसवणूक झाली म्हणून याबद्दल तालुका स्तरीय तक्रार निवारण समिती, अचलपूर यांचेकडे तक्रार केली असता, त्यांनी शेत पाहणी करुन जो अहवाल दिला त्यावरुन बियाणे सदोष असल्यामुळे फक्त 14 टक्के उगवण झाल्याचा निष्कर्ष काढला म्हणून प्रार्थनेनुसार नुकसान भरपाई मिळावी.
12. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचा युक्तीवाद असा आहे की, त्यांनी तक्रारकर्ते यांना सदर बियाणे विकलेले नाही, त्यामुळे तक्रारकर्ता ग्राहक नाही. तक्रारकर्ते यांनी नुकसानाबद्दल पुरावा दाखल केला नाही. शिवाय विक्रेत्याचा कोणताही संबंध नसतो.
13. विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचा लेखी जवाब असा आहे की, त्यांनी प्रमाणित केलेले बियाणे विकले आहे, त्यामुळे बियाण्यांची उगवण होण्यासाठी ईतर अनेक गोष्टी परिणाम करतात. बियाणे पॅकेटसवर स्पष्टपणे सदरचे बियाणे हे सेमी रब्बी व खरीप हंगामामध्ये पेरणीसाठी असल्याचे नमूद आहे, त्यामुळे यात फसवणूक केली असे म्हणता येणार नाही. समितीचा अहवाल त्रुटीपूर्ण आहे, समितीने बियाणे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले नाही. तक्रारकर्त्याने मागितलेल्या खर्चाबाबत किंवा मिळणा-या उत्पादनाबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही, त्यामुळे यात विरुध्दपक्ष क्रमांक 2 ची सेवा न्युनता नाही.
14. अशाप्रकारे उभयपक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर, दाखल दस्तांवरुन मंचाचे मत असे आहे की, तक्रारकर्ते यांनी दाखल केलेली बियाणे खरेदीची पावती ही तक्रारकर्त्याच्या नावे नसून प्रकाश देशमुख हया नावाने आहे. तक्रारकर्ते यांनी तक्रारीत याबद्दलचे स्पष्टीकरण दिलेले नाही. तसेच हया बियाणे खरेदी पावतीवरुन असा बोध होतो की, प्रकाश देशमुख यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 2 या कंपनीच्या बियाण्यांच्या 16 बॅग व दप्तरी डी 22 या कंपनीच्या बियाण्यांच्या 16 बॅग असे दोन कंपन्यांचे बियाणे खरेदी केले होते. मात्र दप्तरी कंपनीला तक्रारीत पक्ष केले नाही. तक्रारकर्ते यांच्या कृषी अधिकारी, पंचायत समिती, अंजनगाव सुर्जी कडे केलेल्या अर्जावरुन व तालुका तक्रार निवारण समितीने केलेल्या पाहणी पंचनामा अहवालावरुन असा बोध होतो की, तक्रारकर्ते यांच्या शेत सर्व्हे क्रमांक 52 ज्यातील क्षेत्र 2.00 हे. जे सौ. कल्पना प्रकाशराव देशमुख यांच्या मालकी हक्काचे दाखविले, त्यामध्ये व रुबल प्रकाशराव देशमुख यांच्या क्षेत्र 2.00 हे. मध्ये तसेच अंशुल प्रकाशराव देशमुख क्षेत्र 1.75 हे. हयाप्रमाणे वरील बियाणे पेरण्यात आले होते. समितीच्या अहवालात विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांच्याच कंपनीच्या बियाण्यांचा उल्लेख आहे. मात्र, तक्रारदाराने खरेदी पावतीनुसार दोन कंपनीचे बियाणे शेतात पेरले होते. समितीने कोणत्या क्षेत्रात, कोणते बियाणे पेरले, याबद्दलचा अहवाल दिलेला नाही. उलट, समितीच्या अहवालावरुन असे ज्ञात होते की, विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचे वेस्टर्न-11 या बियाण्याच्या पाकीटवर सेमी रब्बी असे मुद्रित केले असून, उन्हाळी हंगामासाठी बियाणे असे मुद्रित नसल्यामुळे तक्रारकर्ते यांची फसवणूक झाली. मात्र, यात विरुध्दपक्षाची सेवा न्युनता आहे, असे म्हणता येणार नाही. कारण, विरुध्दपक्ष क्रमांक 2 कंपनीच्या वतीने वरीलप्रमाणे स्पष्ट नमूद असतांना तक्रारकर्त्याने ते खरेदी करतांनाच त्याबद्दलची योग्य ती शहानिशा करणे भाग होती, शिवाय, अशा वादाची तक्रार समितीने बियाणे निरीक्षकाकडे करावयास पाहिजे होती. किंवा समितीला संबंधिताच्या विरुध्द पोलीस केस करावयास पाहिजे होती, असे विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी दाखल केलेल्या महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक या दस्तावरुन समजते, त्यामुळे अशी बियाण्यांच्या सत्यतादर्शक लेबल/शिक्का मारल्यासंबंधी तक्रार ग्राहक मंचात करणे योग्य राहणार नाही, असे मंचाचे मत आहे. त्यामुळे, अशा परिस्थितीत तक्रारकर्ते यांची प्रार्थना मंजूर करता येणार नाही, या निष्कर्षाप्रत हे मंच आले आहे. विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी दाखल केलेल्या दस्तांवरुन वादातील बियाण्यांची उगवण क्षमता, त्यांच्या ठरलेल्या परिमानानुसार शासनाच्या प्रयोगशाळेत सिध्द् झालेली आहे, असे दिसते. सबब, तक्रार खारीज करण्यात येते. म्हणून अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे,
- अंतिम आदेश -
1) तक्रारकर्ते यांची तक्रार खारीज करण्यात येते.
2) न्यायीक खर्चाबाबत कोणतेही आदेश पारीत नाही.
3) उभयपक्षकारांना सदर आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात याव्या.