::: आ दे श प त्र :::-
मा. अध्यक्षा, सौ. एस.एम. उंटवाले यांनी निकाल कथन केला :-
1. तक्रारकर्त्याने सदर अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सादर केला.
2. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचे जवळून दि. 30-01-2015 रोजी व्यंकटेश कृषी केंद्र, कॉटन मार्केट रोड, अमरावती येथून शेतीला लागणा-या बियाणे तिळ ज्याचा क्रमांक 55255 डब्ल्यू.आर.एस. 2014-51 वजन 500 ग्राम संख्या पाकीट 16 नग तसेच डी.डी. 14-5007 वजन 500 ग्राम संख्या पाकीट 32 नग खरेदी केले. एकूण बियाण्यांची रक्कम रु. 6,400/- एकमुस्त प्रो. व्यंकटेश कृषी केंद्र, अमरावती यांना देण्यात आले. सदर बियाणे हे शेतामध्ये 1 हेक्टर 75 आर. याप्रमाणे हेक्टरी 3.00 कि. ग्रामप्रमाणे बिज प्रक्रिया केलेले बियाणे पेरणी केली. परंतु, बियाण्यांच्या पॅकेटस वर बियाणे तपासणीचा दिनांक 15-09-2014 मुद्रित आहे व बियाण्यांची अंतिम मुदत 14 जून 2015 मुद्रित आहे व सेमी रब्बी व खरीप हंगाम मुद्रित आहे. उन्हाळी हंगामासाठी बियाणे असे मुद्रित नसल्यामुळे प्रो. व्यंकटेश कृषी केंद्र तसेच व्यवस्थापक, दप्तरी अॅग्री सिडस लि. सेलु, वर्धा यांनी कोणत्याही प्रकारची उन्हाळी हंगामासाठी बियाणे उपयुक्त नाही, याबद्दल बियाणे विकत घेतांना तक्रारकर्त्यास कल्पना दिली नाही. त्यामुळे, तक्रारकर्त्याला हेक्टरी 10 ते 15 क्विंटल तिळाचे उत्पादन होणे अपेक्षित असतांना पूर्णतः तिळ पिक याचे नुकसान झाले. सदयपरिस्थितीत, तिळ 100/- रुपये प्रति किलो याप्रमाणे प्रति क्विंटल 10,000/- रुपये याप्रमाणे हेक्टरी 10 ते 15 क्विंटल या प्रमाणात 1,00,000/- ते 1,50,000/- रुपयाचे नुकसान झाले. तक्रारकर्त्याने शेतात 1 हेक्टर 75 आर तिळ पेरणी केली. यानुसार तक्रारकर्त्याला 2,50,000/- रुपयाचे उत्पादन उन्हाळी तिळ पेरणीद्वारे तक्रारकर्त्यास शेतात उत्पन्न मिळाले असते. परंतु, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याची फसवणूक केली त्यामुळे तक्रारकर्त्याला मिळणारे 2,50,000/- रुपयाचे उत्पन्न बुडाले. तसेच 1 हेक्टर 75 आर शेती करिता करावी लागणारी मशागत पेरणी तसेच मजुरांचा खर्च हेक्टरी रु. 50,000/- याप्रमाणे 1 हेक्टर 75 आर चा खर्च रु. 75,000/- सुध्दा वाया गेला, यास विरुध्दपक्ष जबाबदार आहेत.
3. सबब, तक्रारकर्त्याची विनंती की, 1) तक्रारकर्त्यास विरुध्दपक्ष यांचेकडून रु. 5,25,000/- व्याजासह मिळावे. 2) तक्रारकर्त्यास न्यायालयीन खर्च सुध्दा मिळावा. 3) ईतर न्यायाची दाद मिळावी, अशी विनंती तक्रारकर्त्याने तक्रारीत केली आहे.
4. सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 09 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 चा लेखी जवाब
5. विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारीतील कथन अमान्य करुन असे नमूद केले की, तक्रारकर्ता व त्यांची आई यांनी विरुध्दपक्षाविरुध्द वेगवेगळी प्रकरणे दाखल केलेली आहे. परंतु, दोघांचाही 7-12 दस्त एकच आहे. तसेच बियाणे खरेदीची पावती तक्रारकर्त्याचे नावे नाही. त्यामुळे तक्रार चालू शकत नाही. विरुध्दपक्ष क्रमांक 2 ची कंपनी महाराष्ट्र शासनद्वारा नोंदणीकृत परवानाधारक आहे. तक्रारकर्त्याने बियाणे असमाधानकारक उगविले याची तक्रार या विरुध्दपक्षाकडे केली नव्हती, समितीने जो अहवाल दिला तो शासनाच्या परिपत्रकानुसार नाही व त्यात अनेक त्रुटी आहेत. बियाणे उगवणशक्तीची तक्रार पेरणीनंतर खूप उशिरा केलेली आहे. तसेच तक्रारकर्त्याने अजून दुस-या कंपनीचे बियाणे देखील पेरले होते व ईतके बियाणे पेरण्याकरिता तक्रारकर्त्याजवळ शेत जमीन नाही, तक्रारकर्त्याची तक्रार लेबल संबंधी आहे, असे दिसते. त्यामुळे समितीने बियाणे कायदयाच्या कलम 23-अ (1) बाबतीतील कार्यपध्द्ती अवलंबणे भाग होती. परंतु, समितीने तसे न करता अहवाल दिला व निश्चित उगवणशक्ती नमूद केली नाही, त्यामुळे तक्रार खारीज करावी.
:: कारणे व निष्कर्ष ::
6. या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 चा संयुक्त लेखी जवाब, उभयपक्षाने दाखल केलेले सर्व दस्ताऐवज, तक्रारकर्ते यांचे प्रतिउत्तर व उभयपक्षाचा लेखी युक्तीवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देऊन नमूद केला.
7. तक्रारकर्ते यांनी सदर तक्रार, त्यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडून, विरुध्दपक्ष क्रमांक 2 कंपनीचे बियाणे विकत घेऊन पेरणी केली असता अपेक्षित उत्पादन न झाल्यामुळे, शिवाय बियाणे पॅकेटसवर उन्हाळी हंगामासाठी बियाणे असे मुद्रित नसल्यामुळे, तक्रारकर्त्याची जी फसवणूक विरुध्दपक्षाने केली, त्याबद्दलची नुकसान भरपाई मिळण्याकरिता, मंचात दाखल केली. तक्रारकर्ते यांनी त्यांची भिस्त तालुका तक्रार निवारण समितीच्या अहवाल/पंचनाम्यावर ठेवली आहे.
8. विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी सदर अहवालातील त्रुटी मंचाच्या निदर्शनास आणून, तक्रारकर्त्याच्या तक्रारीस विरोध दर्शविला आहे.
9. दाखल दस्त तपासले असता, मंचाला असे निदर्शनास आले की, सदर बियाणे खरेदीची पावती तक्रारकर्त्याच्या नावे नाही ती प्रकाश देशमुख यांच्या नावे आहे. परंतु, तक्रारकर्त्याने याबद्दलचे स्पष्टीकरण तक्रारीत नमूद केले नाही तसेच बियाणे खरेदी पावतीवरुन असा बोध होतो की, प्रकाश देशमुख यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 2 या कंपनीच्या बियाण्यांच्या 16 बॅग व मे. वेस्टर्न अॅग्री. सिडस लि. या कंपनीच्या 16 बॅग असे बियाणे खरेदी करुन त्याची पेरणी शेतात केली होती. परंतु, तालुका तक्रार निवारण समितीच्या अहवालात निरीक्षणे व निष्कर्ष यामध्ये दोन कंपन्यांपैकी एकाही कंपनीचा नावानिशी उल्लेख नाही. तसेच कोणत्या क्षेत्रात, कोणत्या कंपनीचे बियाणे पेरले होते, याबद्दलचा स्पष्ट उल्लेख नाही, तक्रारकर्त्याची तक्रार ही बियाणे खरेदी पाकीट वरील लेबल संबंधी असतांना, समितीने, त्याबद्दलची कार्यवाही पोलीस तक्रार देवून, अथवा बियाणे निरीक्षकाकडे तक्रार देऊन बियाणे कायदा कलम 23–अ (1) नुसार केलेली नाही. त्यामुळे, समितीचा अहवाल हा संदिग्ध आहे. यावरुन विरुध्दपक्षाची सेवा न्युनता सिध्द् होत नाही. म्हणून तक्रारकर्ते यांना त्यांच्या प्रार्थनेनुसार नुकसान भरपाई देता येणार नाही. सबब, तक्रारकर्ते यांची तक्रार खारीज करण्यात येते.
- अंतिम आदेश -
1) तक्रारकर्ते यांची तक्रार खारीज करण्यात येते.
2) न्यायीक खर्चाबाबत कोणतेही आदेश पारीत नाही.
3) उभयपक्षकारांना सदर आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात याव्या.