::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 08/09/2015 )
आदरणीय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …
तक्रारकर्त्याने दि. 28/7/2014 रोजी सॅमसंग गॅलक्सी हॅन्डसेंट विरुध्दपक्ष क्र. 1 चे दुकानातून रु. 8400/- नगदी देऊन खरेदी केला. सदर मोबाईल हा वॉरंटी पिरेड मध्ये असतांना, त्याची बॅटरी स्टोरेज होत नव्हती, त्यावरुन तिन महिन्याचे कालावधीतच दि. 25/10/2014 रोजी तक्रारकर्त्याने, विरुध्दपक्ष क्र. 1 चे सांगण्यावरुन विरुध्दपक्ष क्र. 2 कडे सदर मोबाईल दुरुस्तीसाठी दिला. त्या बाबत विरुध्दपक्ष क्र. 2 ने वर्क ऑर्डर क्र. 39706 दि. 25/10/2014 दिली. परंतु या नंतर विरुध्दपक्ष यांनी अर्जदारास मोबाईल दुरुस्त करुन दिला नाही. तक्रारकर्त्याने मोबाईल करिता विरुध्दपक्ष यांचेकडे अनेक चकरा मारल्या, परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी फोन देण्यास नकार दिला. त्यावरुन विरुध्दपक्ष यांना दि. 8/12/2014 रोजी रजिस्टर नोटीस पाठविण्यात आली. परंतु विरुध्दपक्ष यांनी सदर नोटीसची कोणतीही दखल घेतली नाही. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीद्वारे मंचास विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व तक्रारकर्त्यास विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 कडून नविन सॅमसंग गॅलक्सी, त्याने खरेदी केलेला रु. 8400/- चा मोबाईल हॅन्डसेट देण्याचा आदेश व्हावा. विरुध्दपक्षाने अर्जदारास नादुरुस्त मोबाईल देऊन तक्रारकर्त्याची फसवणुक केली व त्यास नविन मोबाईल दिला नाही व त्यामुळे तक्रारकर्त्यास मानसिक त्रास झाला त्याकरिता विरुध्दपक्षाकडून दंडाचे स्वरुपात रु. 8400/- मिळावे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 06 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा लेखीजवाब :-
2. विरुध्दपक्ष क्र. 1यांनी प्रस्तुत प्रकरणात लेखी जबाब दाखल केला असून, त्यानुसार त्यांनी तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल करीत असे नमुद केले की, मोबाईल विकल्यानंतर त्यात खराबी आल्यास दुरुस्ती करण्याकरिता कंपनीने विरुध्दपक्ष क्र. 2, विमल इंटरप्रायजेस, यांची नियुक्ती केली आहे. तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 1 कडे कुठलीही मोबाईल दुरुस्तीची तक्रार घेवून आलाच नव्हता, वादीत मोबाईल मध्ये डिफेक्ट असल्याबाबत सिध्द करण्याची पुर्ण जबाबदारी ही कायदेशिररित्या तक्रारकर्त्याची असून वर्क ऑर्डर 39706 दि. 25/10/2014 नुसार असे दिसून येते की, सदर मोबाईल मध्ये कुठलेही दोष नसून, मोबाईलची बॅटरी स्टोरेज चा दोष हा मोबाईलचा उपयोग व वापर करणा-या व्यक्तीवर अवलंबून असतो. करिता तक्रारकर्त्याची तक्रार ही चुकीची व खोटी असल्यामुळे दंडासहीत खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्र. 2 यांचा लेखीजवाब :-
विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी आपला लेखी जवाब दाखल केला असून त्याद्वारे त्यांनी तक्रारीतील विधाने अमान्य केली आहेत व पुढे असे नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने सदर मोबाईल दि. 28/7/2014 रोजी विकत घेतला होता व त्या तारखेपासून दि. 25/10/2014 पर्यंत त्यात कसलाही बिघाड झाला नाही, यावरुन सिध्द होते की, सदर मोबाईल मध्ये कसलाही निर्मिती दोष नाही. जेंव्हा प्रथम दि. 25/10/2014 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 कडे सदर मोबाईल आणल्या गेला, त्या वेळेस विरुध्दपक्ष क्र. 2 ने सदर मोबाईल त्वरीत ठिक करुन ठेवला. मोबाईल गरम होणे हा कसल्याही प्रकारचा निर्मिती दोष नाही. तक्रारकर्त्याने असा कोणताही पुरावा जोडला नाही, ज्याद्वारे स्पष्ट होईल की, तो त्याचा मोबाईल बरोबर वापरत होता. सदर मोबाईल जास्त चार्जीग करीत असल्यामुळे किंवा एका वेळेस जास्त ॲप्लीकेशन वापरल्यामुळे गरम होत असावा. तक्रारकर्ता सदर मोबाईल परत घेण्यासाठी विरुध्दपक्ष क्र. 2 कडे कधीच आला नाही. आजही अर्जदाराचा मोबाईल बरोबर चालू आहे व विरुध्दपक्ष क्र. 2 तो मोबाईल वापस देण्यास तयार आहे. विरुध्दपक्ष क्र. 2 ने तक्रारकर्त्यास मोबाईल परत घेऊन जाण्याबाबत फोनद्वारे कळविले होते. परंतु तक्रारकर्ता सदर मोबाईल परत घेण्यासाठी विरुध्दपक्ष क्र. 2 कडे कधीच आला नाही. विरुध्दपक्ष क. 2 ने वारंटीच्या अटी व शर्ती प्रमाणे तक्रारकर्त्यास सेवा दिलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार दंडासहीत खारीज करावी.
विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी त्यांचा लेखी जवाब प्रतिज्ञालेखावर दाखल केला आहे
::: का र णे व नि ष्क र्ष :::
3. या प्रकरणात तक्रारकर्त्याची तक्रार, सोबत दाखल केलेले सर्व दस्तऐवज, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचा स्वतंत्र लेखी जवाब, उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून नमुद केला तो येणे प्रमाणे …
या प्रकरणातील तक्रारकर्ता, विरुध्दपक्ष क्र. 1 व विरुध्दपक्ष क्र. 2 यांना ह्या बाबी मान्य आहेत की, तक्रारकर्ते यांनी दि. 28/7/2014 रोजी सॅमसंग गॅलक्सी कंपनीचा मोबाईल विरुध्दपक्ष क्र. 1 कडून रु. 8400/- नगदी देवून खरेदी केला होता. विरुध्दपक्ष क्र. 2 हे सॅमसंग कंपनीचे अकोला येथील अधिकृत सर्वीस सेंन्टर आहे व दि. 25/10/2014 रोजी तक्रारकर्त्याने सदर मोबाईल हा दुरुस्ती करिता विरुध्दपक्ष क्र. 1 च्या सांगण्यावरुन, विरुध्दपक्ष क्र. 2 कडे दिला होता. तक्रारकर्त्याने रेकॉर्डवर दि. 28/7/2014 ची मोबाईल खरेदी पावती व दि. 25/10/2014 ची वर्क ऑर्डरची पावती दाखल केली आहे, त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचा “ग्राहक” आहे, यात वाद नाही.
तक्रारकर्त्याचा युक्तीवाद असा आहे की, विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी सदर मोबाईल दुरुस्तीसाठी ताब्यात घेतला, तशी पावती दिली, परंतु मोबाईल दुरुस्त करुन दिला नाही, किंवा नवीन फोन दिला नाही. या करिता तक्रारकर्त्यास वारंवार विरुध्दपक्ष क्र. 2 कडे चकरा माराव्या लागल्या, शिवाय कायदेशिर नोटीस पाठवावी लागली. परंतु विरुध्दपक्षाने उत्तर दिले नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याचे रु. 8400/- चे नुकसान झाले, म्हणून विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी नविन सॅमसंग गॅलक्सी कंपनीचा, खरेदी किंमत रु. 8400/- चा मोबाईल हॅन्डसेट देण्याचा आदेश व्हावा व नुकसान भरपाई मिळावी.
यावर विरुध्दपक्ष क्र. 1 चे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्ते विरुध्दपक्ष क्र. 2 कडे सदर तक्रार व मोबाईल घेवून गेले, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 ची जबाबदारी येत नाही व मोबाईल मध्ये दोष आहे, हे सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारकर्त्याची आहे. कारण सदर मोबाईल मध्ये बॅटरी स्टोरेजचा दोष दिसून येतो, तो उपयोग करणा-या व्यक्तीवर अवलंबुन असतो.
विरुध्दपक्ष क्र. 2 च्या युक्तीवादानुसार, तक्रारकर्त्याने सदर मोबाईल दि. 25/10/2014 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 कडे दुरुस्तीसाठी आणला होता, तो त्वरीत ठिक करुन ठेवला, त्यातील दोष, निर्मिती दोष नाही. म्हणून सदर मोबाईल बरोबर चालू आहे. परंतु तक्रारकर्ता सदर मोबाईल परत घेण्यासाठी विरुध्दपक्ष क्र. 2 कडे कधीही आला नाही.
उभय पक्षांचा हा युक्तीवाद ऐकून, दि. 25/10/2014 ची विरुध्दपक्ष क्र. 2 कडील, सदर मोबाईलची वर्क ऑर्डर पाहता, त्यात तक्रारकर्त्याची अशी तक्रार होती की, “ मोबाईल गरम होतो, बॅटरी स्टोरेज होत नाही. ” सदर दोष मोबाईल खरेदी केल्यानंतर साधारण तिन महिन्याच्या कालावधीत आलेला असल्यामुळे, तो विनामुल्य दुर करणे हे विरुध्दपक्ष क्र. 2 चे काम आहे व तक्रारकर्त्याला सर्व्हीस सेंटर ( विरुध्दपक्ष क्र. 2 ) कडे विरुध्दपक्ष क्र. 1 ने पाठविले होते, असेही दिसून येते. विरुध्दपक्ष क्र. 2 च्या मते सदर मोबाईल दुरुस्ती करुन ठेवला होता, पण तक्रारकर्ता मोबाईल घेण्यास आला नाही, परंतु दाखल दस्तऐवज असे दर्शवितात की, तक्रारकर्त्याने सदर फोनची मागणी दोन्ही विरुध्दपक्षाकडे त्यांना नोटीस पाठवून केली होती, परंतु नोटीस बद्दल माहीती प्राप्त होवूनही विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी तसे उत्तर तक्रारकर्त्याला पाठविले नाही, म्हणून तक्रारकर्त्याला हे प्रकरण दाखल करावे लागले. तक्रारकर्त्याची अशी विनंती आहे की, विरुध्दपक्षाकडून नवीन सॅमसंग गॅलक्सी कंपनीचा रु. 8400/- चा मोबाईल हॅन्डसेट देण्यात यावा. परंतु तक्रारकर्त्याने सॅमसंग कंपनीला या प्रकरणात पक्ष केले नाही, शिवाय वर्क ऑर्डर वरुन, मोबाईल मध्ये जो दोष आहे, तो निर्मिती दोष आहे, असे सिध्द करणारे कोणतेही दस्तऐवज मंचासमोर नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची ही विनंती मान्य करता येणार नाही. सदर मोबाईल विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी दि. 25/10/2014 च्या वर्क ऑर्डरनुसार त्यातील दोष पुर्णपणे विनामुल्य दुर करुन तो चालु स्थितीत तक्रारकर्त्यास वापस करावा व तक्रारकर्त्याला झालेल्या त्रासापोटी विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे वा वेगवेगळे, या प्रकरणाचा न्यायिक खर्चासह रु. 3000/- नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश पारीत केल्यास ते न्यायोचित होईल, असे मंचाचे मत आहे. सबब अंतीम आदेश पारीत केला तो येणे प्रमाणे…
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी दि. 25/10/2014 च्या तक्रारकर्त्याच्या सदर मोबाईलच्या वर्क ऑर्डर नुसार, त्यातील दोष पुर्णपणे विनाशुल्क दुरुस्त करुन, तो चालु स्थितीत तक्रारकर्त्यास वापस करावा.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे वा वेगवेगळे, तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी व प्रकरण खर्चासह रु. 3000/- (रुपये तिन हजार ) द्यावे.
- सदर आदेशाचे पालन, निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावे.
- सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.