::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 26/07/2017)
|
अर्जदार वरील पत्त्यावर रहात असून गैरअर्जदार क्र.1 हे आयडीया सेल्युलर लि. मोबाईल कम्युनिकेशन सेवा पुरविण्याचा तसेच सीम व मोबाईल इन्स्ट्रुमेंट विकण्याचा व्यवसाय करतात तर गैरअर्जदार क्र.2 आयडीया सेल्युलर लि. कंपनी हे मोबाईल कम्युनिकेशन सेवा पुरविणारे सप्लायर आहेत. अर्जदाराकडे असलेल्या मोबाईलमध्ये गै.अ.क्र.1 व 2 चे क्र.9595976969 चे सीम असून सदर्हु मोबाईल क्रमांकानुसार अर्जदार हे गै.अ.क्र.1 व 2 चे ग्राहक आहेत. सदर्हु पोस्टपेड कनेक्शन प्रिपेड करण्याकरीता अर्जदाराने गै.अ.क्र.1 ला विनंती केलीअसता गै.अ.क्र.1 ने ते करून देण्यांस टाळाटाळ केली.गै.अ.क्र.1 हे तक्रारकर्त्याला,अॅडव्हान्स बिल भरावे लागते असे सांगत होते, परंतु बिल जनरेट झाल्याशिवाय अॅडव्हान्स रक्कम भरून घेण्यांस तयार नव्हते. बिल जनरेट व्हायला वेळ लागेल म्हणून गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्त्यास दि.27/7/2017 ला बोलाविले, व त्यानंतर 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट,2017, 8 सप्टेंबर आणि त्यानंतर 12 व 13 सप्टेंबरला बोलाविले. परंतु तक्रारकर्त्याने वारंवार चकरा मारूनही त्याचा सिम प्रिपेड करून देण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यानंतर तक्रारकर्ता दिनांक 18 सप्टेंबरला गै.अ.क्र.1 कडे गेले असता त्यांनी अर्जदाराला रू.580/- चे बिल बनवून दिले व हे बिल भरल्यावर प्रिपेड सिमसुध्दा दिले व सांगितले की पोस्ट पेडचे कव्हरेज गेल्यावर प्रिपेडचे सिम टाकून घ्या. अर्जदाराने त्यानुसार आठ दिवस वाट पाहुनसूध्दा प्रिपेड झालेले नसल्यामुळे गै.अ.क्र.1 कडे तक्रार केली असता दोन दिवसात प्रिपेड होवून जाईल असे सांगितले. परंतु अर्जदाराचे प्रिपेड सिम चालू झाले नाही. त्यानंतर वारंवार चकरा मारूनसुध्दा आऊटस्टॅंडींग अमाउंट भरा व त्यानंतर प्रिपेड होईल असे गै.अ.नी सांगितले. अर्जदाराने रू.580/- रक्कम भरली असतांनासुध्दा पुन्हा तीच रक्कम भरणे म्हणजे अर्जदाराची फसवणूक आहे. अर्जदाराच्या विनंतीनुसार अर्जदाराचे सिम प्रिपेड करून देणे ही गैरअर्जदारांची जबाबदारी आहे. गै.अ.च्या कृत्यामुळे अर्जदाराचे व्यवसायाचे नुकसान झाले आहे व मनस्ताप झाला आहे. सबब गै.अ.क्र.1 व 2 हे अर्जदारांस नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. त्याबद्दल गै.अ.क्र.1 व 2 यांना अर्जदाराने वकीलामार्फत नोटीस पाठविली. नोटीस प्राप्त होवूनसुध्दा मोबाईलची सेवा पुरविली नसल्यामुळे अर्जदाराने सदर तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने मागणी केली आहे की, गै.अ.क्र.1 व 2 ने अर्जदाराला मोबाईलची सेवा पुरविली नसल्यामुळे अर्जदाराच्या व्यवसायाच्या झालेल्या नुकसानापोटी नुकसान-भरपाई म्हणून रू.50,000/- तसेच नोटीस व तक्रारखर्चापोटी रू.10,000/- गै.अ.क्र.1 व2 यांचेकडून मिळण्याचे आदेश व्हावेत. |
|
2. अर्जदाराची तक्रार स्विकृत करून विरुध्द पक्ष क्र. १ व 2 यांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार क्र. १ व २ हजर होवून त्यांनी आपले लेखी उत्तर दाखल करून अर्जदाराचे तक्रारीतील कथन खोडून काढले व पुढे नमुद केले कि, गै.अ. कंपनी ही प्रतिष्ठीत कंपनी आहे. अर्जदार हा शिक्षीत व्यक्ती असून त्याने रिलायनस् कंपनीला सदर तक्रारीत पक्ष बनविले नसल्यामुळे सदर तक्रार खारीज होण्यास पात्र आहे तसेच पोस्ट पेड आणी प्रिपेड हया दोन भिन्न सेवा असून त्या घेण्यासाठी वेगवेगळया प्रोसिजर आहेत. त्या पूर्ण केल्यानंतरच त्या सेवा प्राप्त करून घेता येतात.सदर तक्रारीत अर्जदाराचा मुळ नंबर हा रिलायन्सचा होता त्यानंतर तो दिनांक 30/3/2017 ला आयडीयामध्ये बदलविण्यात (पोर्टेड) आला. सदर नंबर हा मुळातच रिलायन्स कंपनीचा असल्यामुळे तो नंबर बंद करण्याचा अधिकारही त्या कंपनीचा आहे. अर्जदाराने सदर तक्रार दाखल करतांना काही गोष्टी मुद्दाम लपवून ठेवल्या आहेत. गै.अ. हे नमुद करीत आहे की जेव्हा पोस्ट पेड कनेक्शन हे प्रिपेडमध्ये बदलविण्यात येतं तेंव्हा ग्राहकाला पोस्टपेडचे मागील पूर्ण सरासरी काढलेले बिल फेडायचे असते आणि त्यानंतर नवीन अर्ज द्यावा लागतो. सदर तक्रारीत अर्जदाराकडून मागणीअर्ज हा दि.18/8/2017 रोजी आला. त्यानंतर त्याला पूर्ण हिशोब करून बिल भरण्यांस सांगितले, परंतु सदर बिल अर्जदाराने पूर्ण भरले नाही.सबब अर्जदाराची मागणी 28/8/2017 रोजी नाकारण्यात आली तसेच 8/9/2017 रोजी सुध्दा अर्जदाराने बील रक्कम न भरल्यामुळे अर्जदाराची मागणी नाकारली. अर्जदाराने मागील तीन महिन्याचे बिल न भरल्यामुळे अर्जदाराची सेवा ही तात्पुरती बंद व नंतर दिनांक 17/1/2018 पासून नेहमीसाठी बंद करण्यांत आली. अर्जदाराने सदर तक्रार नोडल ऑफीसर हयांचेकडे दाखल करावयास हवी होती,परंतु सदर पर्याय न घेता अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली. अर्जदाराचा नंबर हा मुळात रिलायन्सचा असल्यामुळे ट्राय गाईडलाईन्सनुसार तो पुनर्स्थापीत करता येत नाही. अर्जदाराने केलेली मागणी ही योग्य नसल्यामुळे ग्राहय धरता येण्यासारखी नाही. सबब गै.अ. यांनी अर्जदारांस योग्य ती सेवेत न्युनता दिली नसल्यामुळे अर्जदारार्ची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
3. तक्रारकर्तीची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व वि.प. क्र. २ यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ती व वि. प क्र. २ यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारकर्ता वि.प.चा ग्राहक आहे काय ?
2. वि.प. क्र. १ व 2 यांनी अर्जदाराला मोबाईल सेवासुविधा
पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारकर्ता सिद्ध करतात काय ? होय
3. आदेश काय ? अंशत: मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ व 2 बाबत :-
4. अर्जदाराने गै.अ.क्र.1 व 2 कडून मोबाईलची सेवा घेतली होती ही बाब गैरअर्जदारांना मान्य असल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 व 2 चा ग्राहक आहे ही बाब सिध्द होत आहे. अर्जदाराने त्याचेकडील पोस्टपेड मोबाईल सेवा प्रिपेड करून देण्याबाबत गै.अ.ना विनंती करूनही त्यांनी ती सेवा प्रिपेड करून दिली नाही अशी अर्जदाराची तक्रार आहे. हयावर गै.अ.यांनी त्यांच्या लेखी उत्तरात प्रिपेड व पोस्टपेड सेवांबद्दलचे विश्लेषण दिले आहे तसेच अर्जदाराचा मुळ नंबर हा रिलायन्स चा होता ही बाब नमूद केली आहे. तसेच ट्राय करारानुसार पोस्टपेडची बंदची प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर तसेच आधीच्या बिलाच्या रकमेचा भरणा केल्यानंतर अर्जदाराला प्रिपेड करून देता येत असे नमूद केलेले आहे परंतु त्याबद्दल दस्तावेज दाखल नाहीत. अर्जदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक असून त्याच्या मागणीप्रमाणे पोस्ट पेडची सेवा प्रिपेड करून देणे ही गैरअर्जदारांची जबाबदारी आहे ,असे मंचाचे मत आहे. अर्जदाराने गै.अ.क्र.1 व 2 कडे मागणी केलेली प्रिपेड सेवा हीसुध्दा गै.अ.कंपनीचीच राहणार होती ही बाब निश्चित आहे. सबब गैरअर्जदार क्र.1 व 2 हयांनी अर्जदाराला मागणी केल्यावरही पोस्टपेडची सेवा प्रिपेड करून न दिल्यामुळे सेवेत न्यूनता दिलेली आहे ही बाब स्पष्ट होत आहे. अर्जदाराने प्रार्थनेत प्रिपेड कनेक्शन करून न दिल्यामुळे त्याचे व्यवसायाचे नुकसान झाले ही बाब नमूद केलेली असली तरी त्याबद्दल कोणतेही दस्तावेज तक्रारीत दाखल केलेले नाहीत. सबब मंच खालील आदेश पारीत करीत आहे.
5. मुद्दा क्र. १ व 2 च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. ग्राहक तक्रार क्र. 196/2017 अंशतः मान्य करण्यात येते.
2. विरुद्ध पक्ष क्र. १ व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे अर्जदारांला
मानसीक व शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्कम रू.3,०००/-,
अर्जदारांस, अदा करावी.
3. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक – 26/07/2018
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.