( आदेश पारित द्वारा : श्रीमती जयश्री यंगल, मा.सदस्या ) आदेश ( पारित दिनांक : 16 नोव्हेंबर, 2010 ) तक्रारकर्ती सौ.कुमुदिनी गजाननजी आकरे,मु.पो.ता.पारशीवनी,वार्ड नं.2, जि.नागपूर यांची तक्रार विरुध्दपक्ष महादेव लॅन्ड डेव्हलपर्स, नागपूर प्रो.प्रा.चेतन चिंधुजी झाडे, जूनी पारडी, भंडारा रोड, नागपूर यांचे विरुध्द ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत दाखल करुन विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीचे नावे भुखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन देण्याकरिता आणि विक्रीपत्र न केल्यामुळे झालेल्या मनस्तापापोटी रुपये 50,000/- नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रारीचा तपशील खालीलप्रमाणे 1. तक्रारकर्तीने खास मौजा- पारशीवनी, प.ह.नं.11, शेत नं.114, प्लॉट नं.26,उ.द. 19.0 फुट, पु.प. 30.5 एकुण आराजी 3067.75 चौ.फुट भुखंड विकत घेण्याचा सौदा विरुध्द पक्षासोबत दिनांक 17.7.2008 रोजी मोबदला रुपये 3,83,467/- केला आणि त्याबद्दल विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला बयाणा पत्र लिहुन दिले. त्यावर तक्रारकर्तीने रुपये 77,000/- एवढी रक्कम विरुध्द पक्षाला दिली आणि बयाणापत्रात ठरल्याप्रमाणे दर महिन्याला रुपये 2,000/- असे एकुण 24 महिन्यात देण्याचे ठरले होते आणि त्यानंतर विरुध्द पक्ष नोंदणीकृत विक्रीपत्र करुन देईल आणि नोंदणीची मुदत दिनांक 17.7.2008 ते 16.7.2009 पर्यत ठरलेली होती. तक्रारकर्तीने दिनांक 17.7.2008 रोजी रुपये 5,000/- अग्रीम रक्कम म्हणुन विरुध्द पक्षाला दिले होते. अशा प्रकारे तक्रारकर्तीने एकुण रुपये 82,000/- विरुध्द पक्षाला वर नमुद भुखंडाच्या सौदयापोटी दिले होते. 2. तक्रारकर्तीच्या म्हणण्यानुसार जेव्हा बयाणा पत्रात ठरल्याप्रमाणे रुपये 2,000/- मासिक हप्ता विरुध्द पक्षाचे कार्यालयात जमा करण्याकरिता गेले तेव्हा विरुध्द पक्षाचे कार्यालय 15 महिन्यांपासुन आजपर्यत बंद असल्यामुळे तक्रारकर्ती बयाणापत्रात ठरल्याप्रमाणे रक्कम भरु शकली नाही. परंतु तक्रारकर्तीच्या म्हणण्याप्रमाणे तिने ठरलेली रक्कम रुपये 82,000/- नमुद भुखंडाचे खरेदीबद्दल भरले असल्यामुळे विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला भुखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन द्यावयास हवे होते आणि भुखंडाची मोजणी सुध्दा संबंधीत कार्यालयाकडुन करुन द्यावी. 3. तक्रारकर्तीच्या म्हणण्यानुसार उभयपक्षात बयाणापत्रानुसार नोंदणी मुदत दिनांक 17.7.2008 ते 16.7.2009 पर्यत होती. परंतु विरुध्द पक्षाचे कार्यालय बंद असल्यामुळे तक्रारकर्ती मासिक रक्कम भरु शकली नाही आणि याकरता जबाबदार विरुध्द पक्ष स्वतः आहे. विरुध्द पक्षाने आपले कार्यालय बदलविले त्याबद्दल सुध्दा तक्रारकर्तीला कळविले नाही. 4. तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाला दिनांक 15.3.2010 रोजी वकीला मार्फत नोटीस पाठविली त्यात नमुद भुखंडाचे विक्रीपत्र करुन देण्याकरिता मागणी केली व मनस्तापापोटी रुपये 50,000/- नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. 5. तक्रारकर्तीच्या म्हणण्याप्रमाणे विरुध्द पक्षाला वकीलामार्फत दिलेली नोटीस दिनांक 26.3.2010 रोजी विरुध्द पक्षाला मिळाली. त्यासंबधाने पोस्टाची पोचपावती प्राप्त झाली आहे असे डाक खात्याने दिनांक 11.6.2010 रोजी तक्रारकर्तीला पत्राद्वारे कळविले. 6. तक्रारकर्तीने तिचे तक्रारीसोबत एकुण 12 कागदपत्रे दाखल केली आहे. त्यात बयाणा पत्र, अग्रीम पावती, लेआऊटचा नकाशा, वकीलाचा नोटीस, पोस्टाची पोचपावती, पोस्टाचा अर्ज, पोस्टाचे पावतीविषयी माहिती, पोस्टाची पावती, पोचपावती, इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे. 7. तक्रार दाखल झाल्यावर मंचाने विरुध्द पक्षास नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्यात आली. नोटीस मिळुनही विरुध्द पक्ष हजर झाले नाही त्यामुळे त्यांचे विरुध्द मंचानेद्वारे दिनांक 09.09.2010 रोजी प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला. 8. दिनांक 28.10.2010 रोजी मंचाने तक्रारकर्तीचा युक्तिवाद ऐकला व कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले असता मंचाचे निरिक्षणे व निष्कर्ष खालीलप्रमाणे. //-//-//- निरिक्षणे व निष्कर्ष -//-//-// 9. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तऐवजातील बयाणापत्रावरुन उभयपक्षात खास मौजा- पारशीवनी, प.ह.नं.11,शेत नं.114,प्लॉट नं.26,उ.द.19.0 फुट, पु.प.30.5 एकुण आराजी 3067.75 चौ.फुट या भुखंडाबद्दल करार झाला होता आणि दिनांक 17.7.2008 रोजी तक्रारकर्तीने रुपये 77,000/- एवढी रक्कम विरुध्द पक्षाला दिले होते हे दाखल केलेल्या बयाणापत्रावरुन सिध्द होते आणि दिनांक 17.7.2008 रोजी अग्रीम रक्कम 5,000/- भरल्याची पावती सुध्दा रेकॉर्डवर दाखल आहे. त्यावरुन तक्रारकर्तीने एकुण 82,000/- रुपये विरुध्द पक्षाला दिल्याचे सिध्द होते. 10. विरुध्द पक्षाचे कार्यालयाचा पत्ता बयाणा पत्रात ऑफीस - बाजार चौक, पेच रोड, पारशीवनी असा असुन विरुध्द पक्षाचा सध्याचा पत्ता/ तक्रारीतील पत्ता, जुनी पारडी, भंडारा रोड, नागपूर आहे. यावरुन विरुध्द पक्षाने त्यांचे कार्यालय बदल्याचे दिसुन येते. याबद्दल विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला कळविले नाही ही विरुध्द पक्षाचे सेवेतील त्रुटी ठरते असे मचांचे मत आहे. परंतु त्यांने तक्रारकर्तीची भुखंडाबद्दल उर्वरित मोबदला भरण्याची जबाबदारी संपत नाही. 11. तक्रारकर्तीने वकीलामार्फत विरुध्द पक्षास पाठविलेल्या नोटीसमध्ये कुठेही भुखंडाची उर्वरित रक्कम भरण्याची तयारी दर्शविलेली नाही. सबब आदेश -// अं ति म आ दे श //- 1. तक्रार अंशतः मंजूर. 2. तक्रारकर्तीने उर्वरित रक्कम विरुध्द पक्षाकडे भरावी व बयाणापत्रानुसार तक्रारकर्तीकडून संपुर्ण रक्कम प्राप्त झाल्यानंतर विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस खास मौजा- पारशीवनी, प.ह.नं.11, शेत नं.114, प्लॉट नं.26, उ.द. 19.0 फुट, पु.प. 30.5 एकुण आराजी 3067.75 चौ.फुट या भुखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन द्यावे. 3. कराराप्रमाणे दोन्ही पक्षांना त्याची जबाबदारी पार पाडायची असल्यामुळे नुकसानीपोटी कुठलेही आदेश नाही. 4. तक्रारीचा खर्च रुपये 1,000/-(रुपये एक हजार फक्त 1,000/-)विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस दयावा. सदर आदेशाचे पालन उभयपक्षकारांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yangal] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER | |