ग्राहक तक्रार क्र. : 112/2014
दाखल तारीख : 16/05/2014
निकाल तारीख : 17/10/2015
कालावधी: 01 वर्षे 05 महिने 02 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. किशोर महादेव जाधव,
वय - 34 वर्ष, धंदा- शेती,
रा.तिर्थ (खू) ता. तुळजापूर, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. प्रो. प्रा. पुजा अॅग्रो एजन्सीज,प ससयससव्यवस्थापक,
पंचायत समिती शेजारी, नळदूर्ग रोड,
तुळजापूर, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद.
2. व्यवस्थापकीय संचालक,
महाराष्ट्र स्टेट सिडस कार्पोरेशन लि.,
महाबीज भवन, कृषि नगर, अकोला- 444104. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री. एन.एस.लोमटे.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधिज्ञ : श्री. एम.टी. आपचे.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे विधिज्ञ : श्री. ए.पी. जगताप.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
विरुध्द पक्षकार (विप) क्र.1 बिज पुरवठादार यांचे मार्फत बीज उत्पादक संस्था विप क्र.2 यांनी उत्पादन केलेले परभणी मोती रब्बी ज्वारीचे बी घेऊन पेरले असता उत्पादन आले नाही व विप यांनी दोषयुक्त माल पुरविल्यामुळे भरपाई मिळावी म्हणून तक्रारकर्ता (तक) यांने ही तक्रार दिलेली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.
1. तक हा मौजे तिर्थ (खू) ता. तुळजापूर चा रहिवासी असून त्यांला जमीन गट क्र.184 मध्ये 2 हे.07 आर आहे. साल सन 2013-14 च्या रब्बी हंगामासाठी विप क्र.1 कडून त्यांनी केलेल्या शिफारशीवरुन विप क्र.2 उत्पादीत परभणी मोती ज्वारी बी च्या दोन बँगा तक ने खरेदी करुन आपल्या शेतात पेरल्या. तक ने पुर्व मशागत करुन पेरणीकरीता आवश्यक गोष्टी करुन रब्बीसाठी शेत तयार केले होते. तक ने पेरणी केली व आवश्यक ती काळजी घेतली मात्र. सदर परभणी मोती ज्वारीची उगवण चांगली झाली नाही. म्हणून सदर भेसळ उगवणीबाबत उपविभागीय कृषी अधिकारी उस्मानाबाद यांना व विप क्र. 2 यांना कळविले असता त्यांनी पाहणी व पंचनामा केला नाही.
2. ज्वारीचा सरासरी भाव प्रती क्विंटल रक्कम रु.3,500/- असल्याने तक यांना त्यांचे शेतातून एकरी रक्कम रु.35,000/- प्रमाणे रक्कम रु.70,000/- चे उत्पन्न मिळाले असते म्हणून विप यांना विप क्र.1 व 2 यांना दि.21/02/2014 रोजी नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली असता त्यांनी ती दिली नाही म्हणून सदरची तक्रार करणे भाग पडले म्हणून तक यांना झालेल्या मानसिक, शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसानी पोटी एकूण रक्कम रु.1,30,000/- मिळावे अशी विनंती केली आहे.
3. तक यांनी तक्रारीसोबत बियाणे खरेदी पावती, सातबारा नमूना सात, गाव नमुना आठ – अ, तलाठी यांचा पिक पेरा प्रमाणपत्र, तक यांनी बियाणे महामंडळ यांना दिलेले दोन अर्ज इ. कागदपत्रांच्या प्रती तक्रारीसोबत दाखल केले आहे.
4. सदर तक्रारी बाबत विप क्र.1 यांना नोटीस पाठवली असता त्यांनी आपले म्हणणे दि.08/09/2014 रोजी दाखल केले असून ते थोडक्यात खालीलप्रमाणे.
विप क्र.1 यांनी तक यांनी संपूर्ण खरी नसल्याने मान्य व कबून नाही. विप यांनी सदर बियाणे घेणेची शिफारस केलेली नव्हती व नाही. तक यांनी सदर हायब्रीड उगवणीबाबत योग्य तो पुरावा द्यावा. विप क्र. 1 हे सदर बियाणांचे उत्पादक नाहीत. विप हे सदर बियाणे उत्पादक कंपनीकडून सिलबंद जसे मिळाले तसेच सिलबंद पध्दतीने विक्री केलेली आहे. म्हणून विप क्र.1 हे सदर नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही.
5. सदर बाबत विप क्र.2 यांना नोटीस पाठवली असता त्यांनी आपले म्हणणे दि.08/09/2014 रोजी दिले असून ते खालीलप्रमाणे.
तक यांची तक्रार अमान्य असून तक यांनी झालेल्या नूकसानीबाबत योग्य तो पूरावा देणे आवश्यक आहे. तक यांनी पंचनामा दाखल केलेला नाही. पिक-पेरा प्रमाणपत्र बनावट व खोटे आहे. अर्जदाराने 80 आर. क्षेत्रात पेरा केल्याचे म्हंटले आहे पण प्रमाणपत्रात 1 हे. क्षेत्रात पेरा झाल्याचा उल्लेख आहे यावरुन इतर वाण मिसळून पेरणी केल्याचे दिसते. पिक पेरा 29/04/2013 रोजी चा दिसतो ज्यामध्ये ज्यारी पेर चा उल्लेखही नाही. त्यामध्ये 2 हे 7 आर क्षेत्रात पेरणी केल्याचा उल्लेख आहे. कडबा व ज्वारीचे उत्पन्न एकूण रु.1,00,000/- मिळाले असते व नुकसान झाले हा मजकूर खोटा आहे. भेसळीबाबत बीज तपासणी बियाणे कायद्या अंतर्गत प्रयोगशाळेमार्फत करवून न घेतल्याने प्रस्तूतचा अर्ज चालू शकत नाही. तसेच महामंडळाला बीज प्रमाणिकरण यंत्रणेने मुक्तता अहवाल दिल्यानंतरच बियाणे बिक्रीस उपलब्ध केल्यामुळे तक ची कथने खोटी असून खर्चासह रद्द व्हावा असे नमूद केले आहे.
6. तक ची तक्रार, त्यांनी दिलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांचे समोर खालील दिलेल्या कारणासाठी दिली आहेत.
मुद्दे उत्तरे
1. तक ची ही तक्रार ग्राहक तक्रार होते काय ? होय.
2. विप ने दोषयुक्त बियाण्याचा तक ला पुरवठा केला काय ? होय.
3. तक अनुतोषास पात्र आहे काय ? अंशतः होय.
4. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिंमासा
मुद्दा क्र.1 ः-
7. विप क्र.1 ने दिलेली दि.6.11.2013 ची पावती तक ने हजर केलेली आहे. विप क्र.2 द्वारा मोती ज्वारी दोन पिशव्या प्रति पिशवी रु.200/- प्रमाणे तक ने खरेदी केल्या होत्या. 7/12 उतारा व पिक पेरा प्रमाणपत्राप्रमाणे तक ने 1 हेक्टर क्षेत्रात ज्वारीची पेरणी केली होती. तक चे म्हणण्याप्रमाणे पेरणी दि.8.11.2013 रोजी केलेली होती. घेतलेल्या बियाण्याची दोन एकर क्षेत्रामध्ये पेरणी केलेली होती. विप चा बचाव आहे की, दोन एकर क्षेत्रात पेरणी करण्यासाठी दोन पिशव्या मोती ज्वारीचे बि घेतले परंतु प्रत्यक्षात एक हेक्टर क्षेत्रात पेरणी केली. म्हणजे तक नेच दुसरे बि भेसळ करुन आपल्या शेतात पेरले. तक ने विप क्र.1 कडून दि.6.11.2013 रोजी मोती ज्वारीचे बियाणे घेतले. तसेच त्या बियाण्यात दुसरे मिसळून आपल्या जमिनीत ज्वारीचे बि पेरले होते. या गोष्टी विप चा बचाव तक ने बियाणे दुस-याला दिले व मुददाम भेसळळयूक्त बियाणे आपल्या जमिनीत पेरले असेल असा दिसतो. शेतकरी हा चांगल्या प्रकारे पिक घेऊन त्याद्वारे नफा मिळवण्यासाठी मेहनत मशागत करत असतो. त्यामुळे पेरणी पिकाचे क्षेत्र 1 हेकटर नोंदले यावरुन तक ने भेसळ बियाणे पेरले असेल असे दिसत नाही. तक ने विप क्र.1 कडून ज्वारीचे बि घेतले हे उघड असल्याने ही तक्रार ग्राहक तक्रार होते. असे आमचे मत आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देतो.
मुद्दा क्र 2 व 3 ः-
8. तक चे म्हणण्याप्रमाणे त्यांने दोन एकर क्षेत्रात दि.8.11.2013 रोजी मोती ज्वारीचे बि पेरले. त्यानंतर उत्कृष्ट देखभाल केली. मात्र हायब्रीड ज्वारीची उगवण झाल्याचे आढळून आले. कृषी अधिकारी उस्मानाबाद यांना वेळोवेळी विनंती करुनही त्यांनी पाहणी व पंचनामा केला नाही. जिल्हा व्यवस्थापक म्हणजे विप क्र.2 कडे तसेच उपविभागीय कृषी अधिकारी यांचेकडे दि.5.2.2014 रोजी दिलेल्या अर्जाच्या स्थळप्रति पोहोचसह तक ने हजर केल्या आहेत. जर कृषी अधिकारी यांनी पंचनामा केला नसेल तर त्यासाठी तक ला दोषी मानता येणार नाही.
9. विप क्र.2 कडे तक ची तक्रार आल्यानंतर विप क्र.2 ने त्याबाबत योग्य ती पावले उचलणे जरुर होते. जर कृषी अधिकारी यांनी पंचनामा करुन तक चे म्हणणे अयोग्य असल्याचे ठरवलेले असेल तर अशा पंचनाम्याची प्रत विप क्र.2 ने हजर करणे जरुरी आहे. विप तर्फे क्षेत्र पाहणी केली असती तर तक ने बियाण्यात भेसळ केली या म्हणण्याला काही वजन प्राप्त झाले असते. मात्र तक चे म्हणणे आहे की, हायब्रीड ज्वारीची उगवण झाली व तक ला मिळणा-या उत्पन्नापासून वंचित व्हावे लागले. जर पिक पे-या प्रमाणे तक ने एक हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी केली असेल तर त्यांचा अर्थ तक ने दुस-या वाणांचे बि पण पेरलेले असणार. त्यामुळे विप क्र.2 तर्फे मिळालेले बियाणे अंशतः दोष युक्त होते असे वाटते.
10. तक चे म्हणण्याप्रमाणे त्यांला ज्वारीचे प्रति एकरी रु.35000/- पिक निघाले असते. कारण प्रति क्विंटल भाव रु.3500/- होता. म्हणजेच एकरी उत्पन्न 10 क्विंटल मिळाले असते. हा आकडा अवास्तव वाटतो. एकरी 8 क्विंटल प्रमाणे दोन एकरात 16 क्विंटल ज्वारी झाली असती. त्यापैकी 50 टक्के नुकसान विप चे बियाण्यामुळे झाले असे धरले तर एकूण आठ क्हिवंटल ज्वारीचे नुकसान झाले असे धरता येईल. ज्वारीचा भाव दर क्विंटल रु.2700/- प्रमाणे रु.31600/- चे ज्वारीचे नुकसान धरता येईल. तक चे म्हणण्याप्रमाणे कडब्यापासून मिळणा-या उत्पन्नाचे रु.30,000/- चे नुकसान झाले. मात्र आठ क्विंटल ज्वारीला 800 क्विंटल कडबा होणे जरुरी असते. दर पेडीला रु.5/- प्रमाणे कडब्याचे नुकसान रु.4000/- चे धरता येईल. अशा प्रकारे एकूण नुकसान रु.35600/- चे धरता येईल. म्हणून मुददा क्र.2 व 3 चे उत्तर होकारार्थी देतो व खालील प्रमाणे आदेश करतो.
आदेश
1. तक ची तक्रार खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विप क्र.1 व 2 यांनी स्वतंत्रपणे व संयूक्तपणे नुकसान भरपाई रु.35,600/-(रुपये पस्तीस हजार फक्त) तक ला 30 दिवसाचे आंत दयावी, न दिल्यास त्यावर तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 दराने रक्कम फिटेपर्यत व्याज द्यावे.
3. विप क्र.1 व 2 यांनी स्वतंत्रपणे व संयूक्तपणे तक ला तक्रारीचा खर्च म्हणून रु.3000/-(रुपये तीन हजार फक्त) द्यावेत.
4. विप क्र.1 व 2 व शासनामार्फत तक ला पुर्वी भरपाई मिळाली असल्यास ती रक्कम वरील रक्कमेतून वजा करण्यात यावी.
5. वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज द्यावा.
6. उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.