,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, भंडारा.
तक्रार दाखल दिनांकः 05/10/2015
आदेश पारित दिनांकः 15/04/2017
तक्रार क्रमांक. : 71/2015
तक्रारकर्ती : 1. प्रशांत हरिश्चंद्र लांजेवार
वय – 48 वर्षे, धंदा – व्यापार
रा.म्हाडा कॉलनी, खात रोड,
भंडारा
-: विरुद्ध :-
विरुध्द पक्ष : 1) प्रो. मेसर्स ‘सुनील शुज’
द्वारा प्रोप्रायटर
दुकान/रा.27-28, रेसिडेंसी रोड, सदर नागपूर
ता.जि.नागपूर
तक्रारकर्त्यातर्फे : अॅड. एम.एस.भिवगडे, अॅड.पी. एस. मिश्रा
वि.प. तर्फे : अॅड. एम. व्ही. तहलानी
गणपूर्ती : श्री. मनोहर चिलबुले - अध्यक्ष.
श्री. एच. एम. पटेरीया - सदस्य.
श्री. हेमंतकुमार पटेरिया, सदस्य यांचे आदेशांन्वये.
-// आ दे श //-
(पारित दिनांक – 15 एप्रिल, 2017)
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली असून तक्रारकर्त्याचे कथन थोडक्यात येणेप्रमाणे.
1. तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्याने दिनांक 21/04/2015 रोजी स्वतःच्या उपयोगासाठी विरुध्द पक्षाकडून इंजिओज कंपनीचे जोडे पावती क्र.12850/- प्रमाणे रुपये 2995/- किंमतीस खरेदी केले. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास जोडे विकत घेत असतांना हमी दिली की जर जोडयामध्ये काही त्रृटी आढळल्यास ते बदलवून दिल्या जातील. तक्रारकर्त्याने जोडे खरेदी केल्यावर त्याचे बिल देत असतांना विरुध्द पक्षाने जोडे पॅक करुन दिले व तक्रारकर्त्याने तसेच पॅक केलेले बॉक्स घेऊन जोडे घरी आणले.
तक्रारकर्त्याने खरेदी केलेले जोडे दिनांक 18/05/2015 रोजी वापरासाठी काढले तेंव्हा त्याला असे आढळून आले की त्याने खरेदी केलेल्या दोन्ही जोडयांच्या रंगात फरक आहे व दोन्ही जोडयांवरील धाग्याच्या शिलाईमध्ये चमक असून त्यात ही फरक आहे. त्याच दिवशी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना दुरध्वनीद्वारे जोडयांच्या त्रृटीबाबत माहिती दिली आणि जोडे बदलवून देण्याबाबत विनंती केली परंतु विरुध्द पक्ष यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. तक्रारकर्त्याने दिनांक 19/05/2015 रोजी विरुध्द पक्षाच्या दुकानात (सुनील शुज) जाऊन तक्रार केली व विरुध्द पक्ष यांनी दिलेल्या हमीबाबत कल्पना देऊन जोडे बदलवून देण्याकरीता विनंती केली. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे तक्रारीवर व विनंतीवर कोणतीही कार्यवाही न करता तक्रारकर्त्यास धमकी दिली. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला दिनांक 26/05/2015 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवली. विरुध्द पक्षाला दिनांक 29/05/2015 रोजी नोटीस मिळाली परंतु त्यांनी नोटीसचा जबाब दिला नाही आणि तक्रारकर्त्याच्या मागणीची पुर्तता केली नाही. म्हणून तक्रारकर्त्याने तक्रारीत खालील प्रमाणे मागणी केलेली आहे.
1. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाच्या दुकानातुन घेतलेले जोडे बदलवून दयावे
किंवा तक्रारकर्त्याकडून घेतलेल्या जोडयांची किंमत रुपये 2,995/-
तक्रारकर्त्यास परत करावी.
2. शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये 10,000/-
मिळावी.
3. तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- मिळावा.
2. तक्रारीच्या पृष्ठर्थ्य तक्रारकर्त्याने जोडयांचे बील, विरुध्द पक्षाला पाठविलेली नोटीस, तक्रारकर्त्याने पोस्टाला दिलेले पत्र, विरुध्द पक्षाला पोस्टाने दिलेले पत्र इ. दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
3. तक्रार दाखल झाल्यानंतर मंचामार्फत विरुध्द पक्षांना नोटीस पाठविण्यात आली. विरुध्द पक्षाने दिनांक 8/1/2016 रोजी जबाब दाखल करुन तक्रारीस सक्त विरोध केला आहे.
विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केलेल्या इंजीओस कंपनीचे जोडे विरुध्द पक्षाकडून विकत घेतले व त्याची किंमत रुपये 2,995/- दिली ही बाब मान्य केली आहे. तक्रारकर्त्याने पुर्ण खात्री करुनच जोडे विकत घेतले, जोडयामध्ये कोणत्याही प्रकारची त्रृटी नव्हती व विरुध्द पक्षाने कोणत्याही प्रकारची हमी दिलेली नव्हती. तसेच त्यांचेकडून कोणताही त्रृटीपुर्ण व्यवहार झालेला नाही. तक्रारकर्त्याने त्यांचे विरुध्द खोटी तक्रार दाखल केली असल्याने ती खारीज करावी अशी विनंती केली आहे.
4. उभयपक्षांच्या परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) विरुध्द पक्षाने सेवेत न्युनतापुर्ण व्यवहार केला आहे? - होय.
2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय? - अंशतः.
3) | अंतीम आदेश काय ? | - | तक्रार अंशतः मंजुर. |
| | | |
| | | |
कारणमिमांसा
5. मुद्दा क्र.1 व 2 बाबत ः- सदरच्या प्रकरणात तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष
सुनिल शुज, नागपुर यांचे कडून जोडे पावती क्र.12850 दिनांक 21/4/2015 प्रमाणे
रुपये 2,995/- किंमतीस विकत घेतला या बाबत Exbt.3/1 वर जोडयांचे बिल आणि
पैसे दिल्याची पावती दाखल केली आहे. यावरुन स्पष्ट होते की तक्रारकर्त्याने दिनांक
21/4/2015 रोजी जोडे विकत घेतले.
सदर दोन जोडयांचा रंग व धाग्यातील चमक भिन्न असल्याचे आढळून आल्याने ते बदलवून देण्याची तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला विनंती केली परंतु त्यास प्रतिसाद न मिळाल्याने तक्रारकर्त्याने दिनांक 26/5/2015 रोजी नोटीस पाठविली ती विरुध्द पक्षाला दिनांक 29/5/2015 रोजी मिळाली असे दिनांक 3/8/2015 चे पत्रान्वये पोस्टमास्टर, भंडारा यांनी तक्रारकर्त्यास कळविले. सदर पत्राची प्रत निशाणी क्र.3/5 वर आहे. विरुध्द पक्ष यांनी नोटीसचे उत्तर दिले नाही व जोडे बदलवून दिले नाही हे तक्रारकर्त्याचे शपथपत्रावरील कथन खोटे ठरविण्याचे कोणतेही संयुक्तिक कारण नाही.
विरुध्द पक्षाने भिन्न रंगाचे व भिन्न धाग्याचे सदोष जोडे तक्रारकर्त्यास बदलवून न देणे किंवा जोडयांची किंमत रुपये 2,995/- परत न करणे ही विरुध्द पक्षाने आचारलेली सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे. म्हणून तक्रारकर्ता तक्रारीतील मागणी प्रमाणे विरुध्द पक्षाच्या दुकानातून घेतलेले सदोष जोडे बदलवून किंवा विरुध्द पक्षाला दिलेली किंमत रुपये 2,995/- मिळण्यास पात्र आहे. या शिवाय शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये 2,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- मंजुर करणे न्यायोचित होईल म्हणून मुद्दा क्र.2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
// अंतिम आदेश //
तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालील
तक्रार वि.प. विरुध्द खालीलप्रमाणे अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
1. तक्रार अंशतः मंजुर.
2. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास विकलेले जोडे बदलवून दयावे किंवा तक्रारकर्त्याकडून घेतलेली किंमत रुपये 2,995/- परत करावी.
3. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 2,000/-(दोन हजार) दयावी.
4. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 2,000/-(दोन हजार)
दयावे.
5. वि.प.ने आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आत
करावी.
6. वि.प. ने दिलेल्या मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्यास ग्राहक हक्क संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 25 व 27 अन्वये होणा-या कारवाईस पाञ राहील.
7. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
8. तक्रारकर्तीला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.