द्वारा- मा. अध्यक्ष, श्रीमती अंजली देशमुख
:- निकालपत्र :-
दिनांक 10 ऑक्टोबर 2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार जाबदेणारांकडून पडदयाचे कापड घेऊन त्यांच्याकडेच पडदे शिवुन घेण्यासाठी दिनांक 28/5/2011 रोजी दुकानात गेले. त्यांनी रुपये 495/- प्रति मिटर कापडाची निवड केली असता जाबदेणार यांनी त्यांनी निवडलेले कापड त्यांच्याकडे सद्य परिस्थितीत उपलब्ध नसल्याचे सांगितले व ते कापड मागून घेऊन पडदे शिवुन देऊ असे सांगितले. पडदयाच्या मापासाठी टेलरला तक्रारदारांच्या घरी पाठवून देऊ असे जाबदेणारांनी तक्रारदारांना सांगितले. जाबदेणारांनी तक्रारदारांकडून रुपये 2,000/- अॅडव्हान्स घेतले व टेलर घरी आल्यानंतर रुपये 3000/- त्यांच्या जवळ दयावेत असे सांगितले. तक्रारदार घरी आल्यानंतर त्यांच्या घरातील कुटूंबियांसमवेत चर्चा केल्यानंतर सध्या पडदे शिवावयास नको असे ठरले. त्यादिवशी रात्री 11 वाजलेले असल्यामुळे तक्रारदारांनी जाबदेणारांना दिलेली ऑर्डर रद्य करण्यास सांगितले नाही. म्हणून तक्रारदारांनी दुस-या दिवशी सकाळी टेलर पडदयाचे माप घेण्यासाठी आला असता पडदे शिवायचे नाहीत, माप घेऊ नये असे सांगितले. टेलरनी त्यांना दुकानात हे सर्व सांगा असे सांगितल्यावरुन तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या दुकानातील मॅनेजर यांना दिलेली ऑर्डर रद्य करावी असे सांगितले. त्यावेळी मॅनेजरनी मालक नाहीत नंतर फोन करा असे सांगितले. तक्रारदारांनी अनेक वेळा फोन करुनही मालक भेटले नाही. म्हणून तक्रारदार स्वत: दुकानात गेले असता मालक भेटले नाहीत. तक्रारदार दिनांक 29/5/2011 रोजी म्हणजेच 15 दिवसांनी पुन्हा दुकानात गेले असता त्यांना प्रोप्रायटर भेटले असता तक्रारदारांनी रुपये 2000/- परत मागितले. परंतू जाबदेणारांनी त्यास नकार दिला. त्यानंतर दिनांक 8/6/2011 रोजी तक्रारदारांनी जाबदेणार यांना ई-मेल केला. आजपर्यन्त ई-मेल चे उत्तर नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 2000/- परत मागतात, तसेच मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 500/- मागतात. तक्रारदारांनी तक्रारीसोबत प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून त्यांच्याविरुध्द दिनांक 10/10/2011 रोजी एकतर्फा आदेश मंचानी पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली असता तक्रारदारांनी दिनांक 28/5/2011 रोजी जाबदेणारांकडे रुपये 2000/- भरल्याचे पावतीवरुन दिसून येते. त्यानंतर तक्रारदारांनी ताबडतोब पडदयाची ऑर्डर रद्य केल्याचे त्यांच्या शपथपत्रात म्हणतात, तसेच ई-मेल वरुन दिसून येते. ऑर्डर रद्य करुनही तक्रारदारांना रुपये 2000/- परत मिळाले नाहीत. वास्तविक पाहता तक्रारदारांनी दुस-याच दिवशी जाबदेणा-यांचा टेलर त्यांच्या घरी पडदयाचे माप घ्यावयास आला असता त्याचवेळी पडदयाची मापे घेऊ दिली नाहीत व ऑर्डर रद्य करण्यास सांगितले. यावरुन तक्रारदारांनी जाबदेणारांचे कापड खराब होऊ नये याची दक्षता घेतल्याचे दिसून येते. कापड कापून पडदे शिवण्याच्या ब-याच आधी तक्रारदारांनी ऑर्डर रद्य केल्याचे सांगूनही जाबदेणारांनी तक्रारदारांनी भरलेली रक्कम परत केली नाही. जाबदेणारांच्या पावतीवर काही अटी व शर्ती नमूद केलेल्या आहेत. त्यात विक्री केलेला माल परत घेतला जाणार नाही व बदली करुन मिळणार नाही असे नमूद केलेले आहे. परंतू प्रस्तूत तक्रारीत माल घेण्याच्या आधीच ऑर्डर रद्य केलेली आहे हे दिसून येते. या ऑर्डरवर, पावतीवर तक्रारदारांची सही नसल्यामुळे तसेही पाहता या अटी व शर्ती तक्रारदारांना बांधील नाहीत असे मंचाचे मत आहे. यासर्व प्रकरणात जाबदेणारांचे कुठलेही नुकसान झालेले नाही असे मंचाचे मत आहे. म्हणून मंच जाबदेणारांना तक्रारदारांकडून घेतलेले रुपये 2000/- परत दयावे असा आदेश देतो. ऑर्डर दिल्याच्या दुस-याच दिवशी तक्रारदारांनी ऑर्डर रद्य केली. तेव्हापासून अनेकवेळा प्रयत्न करुनही जाबदेणारांनी तक्रारदारांना रुपये 2000/- परत केले नाहीत. यावरुन जाबदेणारांनी अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केल्याचे दिसून येते. तक्रारदारांना निश्चितच मानसिक, शारिरीक, आर्थिक त्रास सहन करावा लागला असेल असे मंचाचे मत आहे. म्हणून नुकसान भरपाईपोटी तक्रारदार रुपये 1000/- मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
:- आदेश :-
[1] तक्रार मंजूर करण्यात येते.
[2] जाबदेणारांनी तक्रारदारांना रुपये 2000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावेत.
[3] जाबदेणारांनी तक्रारदारांना नुकसान भरपाईपोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 500/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावेत.
[4] आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.