(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौरव जागीरदार मा.सदस्या)
(पारीत दिनांक – 20 मे, 2019)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांचेकडून नुकसान भरपाई मिळावी, म्हणून दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून त्याचे मालकीची मौजा हत्तीडोई, येथे भूमापन क्रं- 69/1 आराजी 0.95.65 हे आर ही शेत जमीन आहे, तो सदर शेतजमीनीमध्ये नियमितपणे मिरचीचे उत्पादन घेत होता. विरुध्दपक्ष क्रं-1) हे मिरचीच्या पिकाच्या दृष्टीने उपयोगी अशा मल्चींग फिल्म विकण्याचा व्यवसाय करतात. विरुध्दपक्ष क्रं 1 ने, तक्रारकर्ता यांना मल्चींग फील्म खरेदीच्या वेळी मल्चिंग फील्मच्या वापरामुळे मिरचीच्या उत्पन्नात वाढ होते व मिरचीच्या रोपाच्या सभोवताल कोणत्याही प्रकारे कचरा/गवत न वाढता मिरचाच्या पिकाचे भरघोस उत्पन्न मिळते असे सांगितले होते.
तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं. 1 यांचे दुकानातुन मल्चींग फिल्म 1X400 मिटर या आकाराचे रुपये 1,900/- प्रति प्रमाणे 14 बंडलचे एकूण रुपये 26,600/- चा माल दिनांक 28/07/2015 रोजी खरेदी केला. सदर मल्चींग फिल्म खरेदी करते वेळी विरुध्दपक्ष क्रं 1 याने मल्चींग फिल्मच्या उत्कृष्ट प्रतिची खात्री दिली होती व या मल्चींग फिल्ममुळे सतत 2 वर्षे उत्पन्न घेता येईल आणि टिकाऊपणाबद्दल देखील हमी दिली होती, त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी मिरचीचे पिक घेण्यास दिलेल्या सुचनेप्रमाणे मिरचीची लागवड केली.
तक्रारकर्ता पुढे असे नमुद करतो की, तक्रारकर्त्याने मल्चींग फिल्म घेतल्यानंतर ताबडतोब ऑगस्ट 2015 च्या पहिल्या आठवडयात मिरचीचे पिक लावले त्यास अंदाजे नोव्हेंबर 2015 पासून मिरची लागण्यास सुरुवात होते, परंतु लावलेली मल्चींग फिल्म 15 ते 20 दिवसातच म्हणजे अंदाजे 31 ऑगस्ट 2015 पर्यंत मल्चींग फिल्म निकृष्ट दर्जाची असल्यामुळे पूर्णपणे फाटली व पिक उघडे पडून पिकाचे अतोनात नुकसान झाले. तक्रारकर्त्याने मिरचीचे पिक घेण्यासाठी नांगरणी व खरणी, बियाणे, शेणखत, औषध फवारणी, बांबु तोडणे व लावणे यासाठी जवळपास रुपये 2,19,640/- एवढा खर्च केला. तक्रारकर्त्याने माहे सप्टेंबर 2015 मध्ये खराब झालेली मल्चींग फिल्म विरुध्द पक्ष क्रं. 1 यांचे दुकानात नेऊन प्रत्यक्ष मल्चींग फिल्म दाखविली तेव्हा विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी त्यावेळी मल्चींग फिल्म उत्पादन करणा-या कंपनीला कळवून व तक्रारीची योग्य शहानिशा करुन तक्रारकर्त्याला योग्य ती कारवाई करण्याची हमी दिल्यामुळे तक्रारकर्त्याने मिरचीचे पिक तसेच वाढू दिले. तक्रारकर्त्याने लावलेली मिरची ऑक्टोंबर, नोव्हेंबर मध्ये पूर्णपणे फुलावर येऊन मिरच्या पिकाची तोडणी सुरु होत, मल्चींग फिल्म खराब झाल्यामुळे मिरचीच्या रोपाच्या बाजूने गवत वाढून झाडांची वाढ खुंटली व पिक देखील पुरेसे आले नाही. मिरचीच्या रोपाच्या भोवती वाढलेले तण काढण्यासाठी मोठया प्रमाणांत खुरपणी/निंदा/मशागत करावी लागली व त्याचा खर्च देखील मोठया प्रमाणावर बसला. विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी दिनांक 07/11/2015 रोजीच्या तक्रारी नंतरही तक्रारकर्त्याला सहाय्य करण्याचे किंवा कबूल केल्याप्रमाणे कोणतीही कारवाई केली नाही आणि मल्चींग फिल्म देखील बदलवून दिली नाही. विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी आपला प्रतिनिधी पाठवून मल्चींग फिल्मचे काही नमुने घेऊन गेले. तक्रारकर्त्याने झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत विरुध्द पक्ष क्रं.1 यांना दिनांक 07/11/2015 रोजी नोटीस पाठविली व त्यामध्ये सर्व घटना व आलेला खर्च, झालेले नुकसान व निष्काळजीपणामुळे तसेच सेवेतील त्रुटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीस आपण जबाबदार असल्याचे कळविले व दरवर्षी होणा-या मिरचीच्या पिकापेक्षा 75 टक्के पिक कमी झाल्यामुळे आर्थिक, शारीरीक व मानसिक नुकसान झाल्याचे कळविले विरुध्द पक्ष क्रं.1 यांनी दिनांक 16/11/2015 रोजी तक्रारकर्त्याच्या नोटीसला उत्तर दिले व त्यात विरुध्द पक्ष क्रं. 1 हे मल्चींग फिल्म बनवत नसल्यामुळे मल्चींग फिल्म उत्पादन करणारी कंपनी विरुध्द पक्ष क्रं. 2 यांचेकडे तक्रार करावी असे सुचविले.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी सांगितल्याप्रमाणे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं. 2 यांना दिनांक 28/12/2015 रोजी डाक नोंद पोच देय याद्वारे नोटीस पाठविला व सदर नोटीस त्यांना दिनांक 04/01/2016 रोजी प्राप्त झाली. तक्रारकर्त्याच्या विरुध्द पक्ष क्रं. 1 च्या दुकानातील भेटीत विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी मल्चींग फिल्मचा दर्जा चांगला नसल्याचे कबूल केले व ते नुकसान भरपाईसाठी काही रक्कम देण्यास तयार आहेत असे सांगितले होते परंतु विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी नुकसान भरपाई दिलेली नसल्यामुळे तक्रारकर्त्याला विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी केलेल्या सेवेतील त्रृटीमुळे आर्थिक, मानसिक व शारीरीक त्रास सहन करावा लागला, म्हणून त्याने नुकसान भरपाई रुपये 7,19,000/- व त्यावरील व्याज 18 टक्के दराने मिळावा आणि झालेल्या आर्थिक, मानसिक व शारीरीक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांचेकडून मिळण्याकरीता सदर तक्रार दाखल केली आहे.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 यांना मंचाची नोटीस मिळूनही ते ग्राहक मंचा समक्ष उपस्थित झाले नसल्याने त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने दिनांक-04.07.2016 रोजी पारीत केला होता, सदर ग्राहक मंचाचे आदेशा विरुध्द विरुध्दपक्ष क्रं 1 यांनी मा.राज्य ग्राहक आयोग, परिक्रमा खंडपिठ नागपूर यांचे समोर रिव्हीजन पिटीशन क्रं-RP/17/2 दाखल केली होती, त्यामध्ये मा.राज्य ग्राहक आयोग, परिक्रमा खंडपिठ नागपूर यांनी दिनांक-03 एप्रिल, 2017 रोजी आदेश पारीत करुन विरुध्दपक्ष क्रं 1 यांनी दिनांक-03.05.2017 पूर्वी तक्रारकर्त्याला खर्चा दाखल रुपये-10,000/- अदा करावेत अथवा जिल्हा मंचात तक्रारकर्त्याचे नावे खर्चाची रक्कम जमा करावी असे आदेशित केले होते तसेच त्यात असेही आदेशित करण्यात आले होते की, जर विरुध्दपक्ष क्रं 1 यांनी विहित मुदतीत खर्चाची रक्कम न दिल्यास रिव्हीजन पिटीशन खारीज होईल. मा.राज्य ग्राहक आयोगाचे आदेशा प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं.1 यांनी खर्चाची रक्कम डि.डी.क्रं 921723, दिनांक-26.05.2017 अन्वये रुपये-10,000/- मंचात जमा केली. विरुध्दपक्ष क्रं 1 यांनी खर्चाची रक्कम डी.डी.व्दारे जमा केलेली असल्याने व विरुध्दपक्ष क्रं 1 यांचे लेखी उत्तर अभिलेखावर घेण्यासाठी तक्रारकर्त्याची कोणतीही हरकत नसल्याने विरुध्दपक्ष क्रं 1 चे लेखी उत्तर दिनांक-12.06.2017 रोजी अभिलेखावर घेण्यात आले. तक्रारकर्त्याला सदर खर्चाची रक्कम रुपये-10,000/- मंचाचे मार्फतीने अदा करण्यात आलेली आहे.
विरुध्द पक्ष क्रं.1 यांनी त्यांचे लेखी उत्तरात असे नमुद केले की, ते विविध कृषि उत्पादने व उपकरणे यांचे केवळ विक्रेता असुन, उत्पादक नाही. विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी तक्रारकर्त्याने त्यांच्या दुकानातुन मल्चींग फिल्म विकत घेतल्याची बाब मान्य केली असुन, विरुध्द पक्ष क्रं. 2 आनंद ट्रेडर्स हे सदर मल्चींग फिल्मचे उत्पादक असल्याची बाब स्पष्ट केली आहे. सदरच्या मल्चींग फिल्मच्या वापरामुळे भरघोस पिक येण्याची हमी विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी घेतली होती हे तक्रारकर्त्याचे कथन अमान्य केले आहे तसेच मल्चींग फिल्म खरेदी वेळी तक्रारकर्त्याने स्वतःच्या मर्जीप्रमाणे ती खरेदी केली असल्याची बाब स्पष्ट केली. त्यासाठी विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी तक्रारकर्त्यावर कुठल्याही प्रकारे जबरदस्ती केली नाही. मल्चींग फिल्म खरेदी करते वेळीच विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी तक्रारकर्त्याला सांगितले होते की, सदरची मल्चींग फिल्म ही विरुध्द पक्ष क्रं. 2 उत्पादीत असल्यामुळे वॉरन्टी किंवा ग्यॅारन्टी नाही व मल्चींग फिल्मच्या गुणवत्तेविषयी निश्चित खात्री देता येणार नाही ही बाबही स्पष्ट केली होती. “Caveat Emptor” या तत्वानुसार कुठलीही वस्तु खरेदी करते वेळी त्याची गुणवत्ता आणि उपयुक्तता याची खात्री करण्याची संपूर्ण जबाबदारी खरेदीदाराची असते त्यासाठी विरुध्द पक्ष क्रं. 1 हे जवाबदार नाही. मल्चींग फिल्म खराब असण्याचे तक्रारकर्त्याचे विधान खोटे आहे. कथित मल्चींग फिल्मच्या ग्यॅारन्टी किंवा वॉरन्टी विषयी विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी तक्रारकर्त्याला काहीही लिहून दिलेले नाही तसेच मौखिक सुध्दा सांगितलेले नाही.
तक्रारकर्त्यास योग्य पिक घेण्यासाठी योग्य हवामान तसेच इतरही घटक जसे की, योग्य प्रमाणात पाणी, खते तसेच औषधी द्रव्यांचा वापर हे घटकही कारणीभूत असतात. अश्या परिस्थितीत संपूर्ण जवाबदारी विरुध्द पक्ष क्रं. 1 वर टाकण्याची तक्रारकर्त्याची कृती अयोग्य असल्याचे कथन केले आहे. तक्रारकर्त्याने कृषिक वस्तु जसे, औषधी द्रव्ये व खते ही भंडा-यामधील इतर दुकानामधुन खरेदी केली होती व त्यांना सदर प्रकरणात पक्ष म्हणून जोडलेले नाही. तक्रारकर्त्याची तक्रार खोटी व तत्थहीन असुन तक्रारीसोबत पिक नुकसानीबाबत कोणत्याही तज्ञांचा अहवाल जोडलेला नाही. विरुध्द पक्ष क्रं. 1 यांना तक्रारीत जाणुनबुजून गोवण्यात आले आहे. तक्रारकर्त्याची तक्रार खोटी असुन विरुध्द पक्ष क्रं. 1 यांना बदनाम करणारी आहे, ज्यामुळे विरुध्द पक्ष क्रं.1 यांना विनाकारण शारीरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार दंडासह खारीज करण्याची विनंती विरुध्द पक्ष क्रं.1 यांनी केली आहे.
04. विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी लेखी उत्तर दाखल करुन प्राथमिक आक्षेपासह असा आक्षेप घेतला आहे की, विरुध्द पक्ष क्रं. 2 हे कुठल्याही मल्चींग फिल्मचे उत्पादक नाही तर व्यापारी आहेत. विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी कधीही विरुध्द पक्ष क्रं.1 यांना मल्चींग फिल्म विकण्याकरीता पुरविली नाही. विरुध्द पक्ष क्रं.1 यांचेशी आमचा कुठलाही संबंध नाही. विरुध्द पक्ष क्रं.1 यांनी दिलेल्या बिलावर सुध्दा विरुध्द पक्ष क्रं.1 यांनी तक्रारकर्ता यांना विकलेली मल्चींग फिल्म विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी उत्पादीत केल्याविषयी कोणताही उल्लेख नाही. तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद पिक नुकसानी संदर्भात कुठलाही तज्ञांचा अहवाल किंवा पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारकर्त्याने बियाणे व किटकनाशके यांची खोटी बिले दाखल केलेली आहेत. विरुध्द पक्ष क्रं. 2 ने पुढे असे नमुद केले आहे की, जर मल्चींग फिल्म ऑगस्ट मध्ये फाटली असेल तर तक्रारकर्त्याने त्याचवेळी त्याबाबतची तक्रार विरुध्द पक्ष क्रं. 2 यांचेकडे न नोंदविता दिनांक 28/12/2015 म्हणजेच नोटीस पाठविण्याच्या दिनांकापर्यंत तक्रार का नोंदविली नाही? त्यामुळे तक्रारकर्त्याच्या पिक नुकसानीस विरुध्द पक्ष क्रं. 2 कुठल्याही प्रकारे जवाबदार नाही.
विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी पुढे असे नमुद केले आहे की, कृषीक जमीनीवर पिक घेतेवेळी योग्य पिकास ब-याच गोष्टी कारणीभूत असतात जसे की, योग्य हवामान, पाऊस, कृत्रीम पाणी पुरवठा, बियाणांचा व किटकनाशके यांचा दर्जा व योग्य प्रमाणात केलेली लागवड, बियाणांचे व किटकनाशकांचे योग्य प्रमाण या सगळया घटकांचा समावेश असतो, त्यामुळे सदरचे पिक नुकसानीस मल्चींग फिल्म जवाबदार असल्याची तक्रारकर्त्याची तक्रार चुकीची आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं.2 यांना मल्चींग फिल्म खराब असल्याविषयी कधीही सांगितले नाही तसेच विरुध्द पक्ष क्रं.2 यांना मल्चींग फिल्म तसेच इतर कोणते घटक पिक नुकसानीस जबाबदार आहे त्याविषयी पाहणी करण्याची संधी दिली नाही, त्यामुळे विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी सेवेत कुठलीही त्रुटी ठेवली नाही. तक्रारकर्त्याने दिनांक 28/12/2015 रोजी पाठविलेली कायदेशीर नोटीस मिळाल्याची बाब मान्य केली असुन सदर नोटीसला विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी दिनांक 30/01/2016 रोजी उत्तरही दिलेले आहे. विरुध्द पक्ष क्रं. 2 हे तक्रारकर्त्याच्या पिक नुकसानीस जवाबदार नसल्यामुळे त्यांच्या विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
05. तक्रारकर्त्याने त्याच्या तक्रारीचे पृष्टयर्थ दस्तऐवज यादी पृष्ट क्रं-10 नुसार एकूण-18 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या आहेत. तक्रारकर्त्याला शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल करावयाचा नाही अश्या आसयाची पुरसिस दाखल केली.
06. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-1) व 2 तर्फे लेखी उत्तर, शपथपत्र, लेखी युक्तिवाद आणि उभय पक्षाने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले. तसेच तक्रारकर्त्याचे वकील यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, विरुध्दपक्षा तर्फे वकील श्री. शेख यांनी मौखिक युक्तिवाद करावयाचा नाही अश्या आसयाची पुरसिस दाखल केली.
07. वरील प्रमाणे तक्रारकर्ता व विरुध्द यांचे परस्पर विरोधी विधानावरुन खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ काढून त्यावरील निष्कर्ष पुढील प्रमाणे आहे.
अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी त.क. यांना दोषपूर्ण सेवा दिल्याचे दिसून येते काय? | होय |
3 | तक्रारकर्ता प्रार्थनेतील मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय ? | अंशतः स्वरुपात |
4 | आदेश काय ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
:: निष्कर्ष ::
08. मुद्या क्रमांकः- 1 दोन्ही विरुध्दपक्षांनी दाखल केलेल्या उत्तराचे मंचा तर्फे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले. विरुध्द पक्ष क्रं.1 यांनी विविध कृषि उत्पादने व उपकरणे विक्रेता असल्याची बाब आपल्या उत्तरात मान्य केलेली आहे. परंतु विरुध्दपक्ष क्रं. 2 आनंद ट्रेडर्स यांनी ते मल्चींग फील्मचे निर्माता असल्याची बाब स्पष्टपणे नाकारलेली असून ते केवळ व्यापारी असल्याचे नमुद केले. त्याच बरोबर त्यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 यांना मल्चींग फील्म विकल्याची बाब नाकारलेली आहे. तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 यांनी दिलेल्या बिलावर, विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी मल्चींग फील्म उत्पादीत केल्या बाबत कोणताही उल्लेख नाही. तसेच असाही आक्षेप घेतलेला आहे की, जर मल्चींग फील्म ऑगस्ट मध्ये फाटली असेल तर तक्रारकर्त्याने त्या बाबतची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 2 यांचेकडे त्याच वेळी न नोंदविता नोटीस पाठविण्याचा दिनांक-28.12.2015 रोजी नोंदविली. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 2 यांना मल्चींग फील्म पाहण्याची संधी दिली नाही. विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी तक्रारकर्त्याचे नोटीसला उत्तर सुध्दा पाठविले आहे. तसेच विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी असाही बचाव घेतला की, पिकाचे वाढीस योग्य हवामान, पाऊस, बियाणे व किटकनाशके यांचा दर्जा व प्रमाण या गोष्टी कारणीभूत असतात.
मंचाचे मते विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी ते मल्चींग फील्मचे उत्पादक नसल्याची बाब नाकारलेली असली आणि मल्चींग फील्मचे ते केवळ व्यापारी असल्याची बाब जरी त्यांचे लेखी उत्तरात नमुद केलेली असली तरी त्यांनी त्यांचे उत्तरात मल्चींग फील्मचे नेमके उत्पादक कोण आहेत या बाबत कोणताही खुलासा मंचा समोर केलेला नाही व ती बाब मंचा पासून लपवून ठेवलेली आहे, त्यामुळे मंचाव्दारे असा निष्कर्ष काढण्यात येतो की, विरुध्दपक्ष क्रं 1 यांनी, विरुध्दपक्ष क्रं 2 यांचे कडून विकत घेतलेली मल्चींग फील्म ही तक्रारकर्त्याला विकलेली आहे त्यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं 2 चा सुध्दा अप्रत्यक्ष ग्राहक होतो आणि त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 चा ग्राहक होतो असे मंचाचे मत आहे. त्यामुळे मुद्या क्रं 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्या क्रं 2 व 3 बाबत- विरुध्दपक्ष क्रं 1 यांनी त्यांचे लेखी उत्तरात मल्चींग फील्म दोषपूर्ण असल्याची बाब मान्य करुन, विरुध्दपक्ष क्रं 2 हे उत्पादन करणारे असून त्यांचेकडे जाऊन योग्य ती दाद मागावी असे तक्रारकर्त्याला लेखी कळविलेले आहे, यावरुन असा निष्कर्ष निघतो की, सदर मल्चींग फील्म दोषपूर्ण असल्याची बाब विरुध्दपक्ष क्रं 1 यांना माहिती होती आणि त्यासाठी त्यांनी तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष क्रं 2 कडे जाऊन नुकसान भरपाई मागण्यास सुचित केले. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 हे एकमेकांवर दोषारोप लावून आपली जबाबदारी झटकू पाहत आहेत परंतु तक्रारकर्त्याचे कथना प्रमाणे त्याने खरेदी केलेली मल्चींग फील्म ही शेतात लावल्या पासून 15 ते 20 दिवसात फाटली याचाच अर्थ असा होतो की, सदर मल्चींग फील्म ही निकृष्ट दर्जाची होती. विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी ते मल्चींग फील्मचे निर्माता नसल्याची बाब फक्त नाकारली परंतु मल्चींग फील्मचा दर्जा चांगला होता कि निकृष्ट होता या बाबत कोणतेही भाष्य आपल्या लेखी उत्तरात केलेले नाही यावरुन असाही निष्कर्ष काढता येऊ शकतो की, मल्चींग फील्मचा दर्जा हा निकृष्ट होता ही बाब विरुध्दपक्ष क्रं 2 यांना सुध्दा मान्य आहे. मल्चींग फील्मचा दर्जा उत्कृष्ट होता हे दाखविण्यासाठी कोणताही सक्षम पुरावा विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी मंचा समक्ष दाखल केलेला नाही. कोणताही ग्राहक शेतकरी हा कोणा विरुध्द विनाकारण ग्राहक मंचा समक्ष तक्रार दाखल करणार नाही. निकृष्ट मल्चींग फील्म मुळे तक्रारकर्त्याचे शेतातील मिरचे पिकावर परिणाम झाल्याने त्याचे आर्थिक नुकसान झाले तसेच त्याने पिकासाठी केलेला खर्च वाया गेला या संबधाने कोणताही सक्षम असा तज्ञांचा पुरावा जसे कृषी अधिकारी/तलाठी यांनी केलेला पंचनामा इत्यादी तक्रारकर्त्याने मंचा समोर दाखल केलेला नाही. मल्चींग फील्मचे निकृष्ट पणामुळे संपूर्ण मिरची पिकाचे नुकसान झाले असाही निष्कर्ष काढता येऊ शकत नाही. तसेच मंचाचे मते त्याला मिरचीचे उत्पादन झालेले असणार परंतु नेमके किती उत्पादन आले या बाबी सुध्दा त्याने मंचा समोर तक्रारी मध्ये स्पष्ट केलेल्या नाहीत, तसेच मिर्ची पिकाचे नुकसानी संबधात तलाठी/तहसिलदार/कृषी अधिकारी यांनी नुकसानी संबधाने केलेला पंचनामा इत्यादी लेखी पुरावा ग्राहक मंचा समोर दाखल केलेला नाही त्यामुळे योग्य त्या सक्षम पुराव्या अभावी पिकाचे नुकसानी बाबत त्याने केलेली मागणी जशीच्या तशी मंजूर करणे मंचास शक्य नाही. तक्रारकर्त्याने त्याचे शेतातील मिर्ची पिकाचे नुकसानी संबधी योग्य सक्षम पुरावा ग्राहक मंचा समक्ष सादर केलेला नसल्यामुळे मंचाने अॅग्रोवन तर्फे प्रसिध्द केलेल्या कृषी साहित्याचा अभ्यास केला असता त्यामध्ये जलसिंचन जमीनी मध्ये हेक्टरी म्हणजे 2.5 एकरा मध्ये 80 क्विंटल हिरवी मिरचीचे अपेक्षीत उत्पादन येत असल्याचे नमुद केलेले आहे. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या 7/12 उता-याचे प्रतीमध्ये त्याने सन-2014-2015 चे खरीप हंगामात जलसिंचन म्हणून 0.60 क्षेत्रात म्हणजेच दिड एकर क्षेत्रात मिरची पिकाचे उत्पादन घेतलेले आहे. जर 100 आर क्षेत्रात 80 क्विंटल मिरचीचे अपेक्षीत उत्पादन विचारात घेतले तर तक्रारकर्त्याचे शेतातील 60 आर क्षेत्रात अपेक्षीत हिरव्या मिरचीचे उत्पादन हे 48 क्विंटल एवढे येते. सन 2014-2015 मध्ये हिरव्या मिरचीचे दर हे सरासरी प्रतिक्विंटल 1800/- रुपये एवढे असल्याचे अपेक्षीत आहे, त्यानुसार 48 क्विंटल हिरव्या मिरचीचे अपेक्षीत उत्पादनाची किम्मत ही रुपये-86,400/- एवढी येते. परंतु तक्रारकर्त्याचे मल्चींग फील्म ही निकृष्ट दर्जाची असल्यामुळे संपूर्ण पिकाचेच नुकसान झाले या बाबीशी हे ग्राहक मंच सहमत नाही. मल्चींग फील्म ही निकृष्ट दर्जाची असल्यामुळे अपेक्षीत उत्पादनापैकी सरासरी 20 टक्के अपेक्षीत उत्पादनाचे नुकसान झाले असल्याचा ग्राहक मंच निष्कर्ष काढीत आहे. त्यानुसार वर नमुद केल्या प्रमाणे एकूण मिरचीचे अपेक्षीत उत्पादनाची किम्मत रुपये-86,400/- च्या 20 टक्के म्हणजे रुपये-17,280/- एवढे अपेक्षीत उत्पादनाचे नुकसान तक्रारकर्त्याचे झाल्यामुळे तेवढी पिकाचे नुकसानी बाबत भरपाई तक्रारकर्त्याला मंजूर करणे योग्य व वाजवी आहे असे मंचाचे मत आहे.
या सर्व वस्त्ुस्थितीचा विचार करता तक्रारकर्त्याला निकृष्ट मल्चींग फील्ममुळे अपेक्षीत मिरची पिकाचे नुकसानी बाबत भरपाई महणून रुपये-17,280/- एवढी नुकसान भरपाई मिळणे योग्य व वाजवी आहे. तसेच निकृष्ट मल्चींग फील्म पुरविल्यामुळे त्याने निकृष्ट मल्चींग फील्मचे बिलापोटी विरुध्दपक्षांना अदा केलेली रक्कम रुपये-26,725/- रक्कम अदा केल्याचा दिनांक-28.07.2015 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह परत करणे योग्य व वाजवी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. दोन्ही विरुध्दपक्षांनी आप-आपली जबाबदारी झटकल्यामुळे व दिलेल्या दोषपूर्ण सेवेमुळे शेवटी तक्रारकर्त्याला मंचा समक्ष तक्रार दाखल करावी लागली या सर्व प्रकारामुळे त्याला निश्चीतच शारिरीक व मानसिक त्रास सुध्दा सहन करावा लागल्याने नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/- आणि तक्रारखर्च रुपये-5000/- मंजूर करणे योग्य व वाजवी आहे असे मंचाचे मत आहे.
09. मुद्या क्रमांकः- 3 वर नमूद मुद्यांचा विचार करता हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
:: आदेश ::
(01) तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं- 1 व क्रं 2 यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी निकृष्ट दर्जाची मल्चींग फील्म तक्रारकर्त्याला पुरविली असल्यामुळे त्याचे मिरची पिकाचे झालेल्या नुकसानी बाबत नुकसान भरपाई म्हणून रुपये-17,280/- (अक्षरी रुपये सतरा हजार दोनशे ऐंशी फक्त) एवढी रक्कम तक्रार दाखल दिनांक-14/03/2016 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह तक्रारकर्त्याला अदा करावी
(03) विरुध्दपक्ष क्रं- 1 व क्रं 2 यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्या कडून मल्चींग फील्म विक्रीपोटी स्विकारलेली रक्कम रुपये-26,725/- (अक्षरी रुपये सव्वीस हजार सातशे पंचविस फक्त) रक्कम अदा केल्याचा दिनांक-28.07.2015 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह परत करावी.
(04) विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांच्या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये- 5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) यांनी तक्रारकर्त्याला द्यावेत.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत आदेशाचे अनुपालन न केल्यास तक्रारकर्त्यास अंतिम आदेशातील अक्रं-(02) आणि अक्रं-(03) मधील नमुद रक्कमा या मुदती नंतर पासून ते प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे. 12 टक्के दंडनीय व्याज दराने देण्यास दोन्ही विरुध्दपक्ष हे जबाबदार राहतील.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकाराना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.