ग्राहक तक्रार क्र. 232/2014
दाखल तारीख : 05/11/2014
निकाल तारीख : 17/10/2015
कालावधी: 0 वर्षे 11 महिने 11 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. पोपट काशिनाथ गजधने,
वय - 49 वर्ष, धंदा – शेती,
रा.आळणी ता. जि. उस्मानाबाद,
ह.मु. आदित्य पेट्रोल पंपामागे, बार्शी रोड, उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. प्रोप्रायटरप ससयससव्यवस्थापक,
श्री. व्यंकटेश अॅग्रो एजन्सी,
किग्ज कॉर्नर कॉम्पलेक्स,
शिवाजी चौक, उस्मानाबाद.
2. व्यवस्थापक,
एएसएन अॅग्री जेनेटीक्स (पी) लि.
38, वेअर हाऊस रोड, गोपाळ मार्केट, इंदौर (म.प्र.). ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.डी.पी.वडगावकर.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधिज्ञ : श्री.एल.आर. कदम.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे विधिज्ञ : श्री.एम.डी. सारडा.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
विरुध्द पक्षकार (विप) क्र.2 निर्मीत वितरक विप क्र.1 मार्फत घेतलेले सोयाबिनचे बियाणे निकृष्ट प्रतिचे दिल्यामुळे उगवण झाली नाही व नुकसान झाल्याने भरपाई मिळण्यासाठी तक्रारकर्ता (तक) यांनी ही तक्रार दिलेली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.
1. तक हा आळणी ता.जि.उस्मानाबाद चा रहिवासी असून गट नंबर 168 जमिन आहे व तो आपली शेती पाहतो. आपल्या जमिन दोन एकर क्षेत्रात सोयाबिनची लागवड करण्याचे तक ने ठरविले. विप क्र.1 कडून विप क्र.2 निर्मीत सोयाबिन बियाणाच्या दोन पिशव्या दि.7.7.2014 रोजी प्रति पिशवी रु.2550/- याप्रमाणे तक ने खरेदी केल्या. त्यामुळे तक विप यांचा ग्राहक आहे. बियाण्याचा लॉट नंबर 43009 व 43028 असा होता वाण जे एस 335 असा होता. तक ने जमिनीची मशागत करुन बियाण्याची पेरणी केली. पेरणी करताना 20 : 20 : 0 खताच्या 50 किलोच्या दोन पिशव्या पेरल्या. आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली. मात्र अपेक्षीत कालावधीत बियाण्याची उगवण झाली नाही.
2. दि.19.07.2014 रोजी तक ने कृषी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांचेकडे अर्ज करुन क्षेत्र पाहणीची विनंती केली. त्याप्रमाणे क्षेत्र पाहणी झाली आहे. एक बाय एक मिटर क्षेत्रात अपेक्षीत सोयाबिनचे 40 क्विंटल आले असते. विप यांनी भेसळयूक्त बियाणे तक ला पुरविले आहे. प्रति बॅग तक ला 20 क्विंटल उत्पन्न मिळाले असते. म्हणजे एकूण 40 क्विंटल उत्पन्न मिळाले असते बाजारभाव रु.3,100/- लक्षात घेता एकूण रु.1,24,000/- उत्पन्न बुडाले आहे. मानसिक त्रासापोटी रु.25,000 व तक्रारीचा खर्च रु.10,000/- तक ला विप कडून मिळणे जरुर आहे म्हणून तक ने ही तक्रार दि.5.11.2014 रोजी दिली आहे.
2. तक्रारी सोबत तक ने गट नंबर 162 चा सातबारा उतारा, विप क्र.1 ने दिलेली दि.7.7.14 ची पावती, उपविगीय कृषी अधिकारी यांनी दिलेले पत्र, दि.22.7.2014 चा तपासणी अहवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे दि.21.10.14 चे पत्र इत्यादी कागदपत्र दाखल केली आहेत.
3. विप क्र.1 ने हजर होऊन दि.21.12.14 रोजी आपले म्हणणे दाखल केले आहे. तक ने बियाणे खरेदी केले हे कबूल आहे. जी पाहणी झाली त्यांची कल्पना या विप ला दिलेली नव्हती. त्यांचे पश्चात तक यांचेशी संगनमत करुन अहवाल दिलेला आहे. पाकीटे सिलबंद होते व त्यांने विप क्र.1 व 2 यांनी उत्पादीत केलेले बियाणे बंद स्थितीत तक ला विकेलेले आहे. या विप ने सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. सदोष बियाण्याचा पुरवठा केलेला नाही. त्यामुळे तक्रार रदद होण्यास पात्र आहे.
4. विप क्र.2 ने लेखी म्हणणे दि.16.2.2015 रोजी दाखल केलेले आहे. कृषी अधिकारी यांनी नमुना घेंऊन प्रयोगशाळेत पाठवावे लागेल कृषी समितीचा अहवाल दोषपूर्ण आहे. व अंदाजे दिलेला अहवाल समितीने बियाणे 23 अ प्रमाणे तरतुदीचे पालन केलेले नाही. उगवणीसाठी तापमान हवामान पाण्याची आर्द्रता व जमिनीचा दर्जा पर्जन्यमान पेरणीची पध्दत या बाबी आवश्यक असतात. समितीने या बाबीचा अभ्यास केलेला नाही. उत्तर प्रदेश राज्य बिज प्रमाणी करण संस्था यांचेकडून बियाणे प्रमाणीत करण्यात येते. विप क्र.2 यांनी या लॉट मधील बियाण्याची महाराष्ट्रात विक्री केलेली आहे. इतर कोणाचीही तक्रार आलेली नाही. तक ने चुकीच्या पध्दतीने सोयाबिन बि ची पेरणी केलेली आहे. विप क्र.2 आपले बियाणे बिज परिक्षण प्रयोगशाळेत पाठविण्यास तयार आहे. तक ने खोटी तक्रार दिली ती रद्द होणेस पात्र आहे.
5. तक ची तक्रार, त्यांनी दिलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुददे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांचे समोर खालील दिलेल्या कारणासाठी दिली आहेत.
मुद्दे उत्तरे
विप यांनी दोषयुक्त बियाण्याचा पुरवठा केला काय ? होय.
तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय,अंशतः
आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिंमासा
मुद्दा क्र.1 व 2 ः-
6. तक ने तक्रारीत म्हटले की, सन 2014-15 चे रब्बी हंगामात त्यांने सोयाबिनचे पिक घेण्याचे ठरवले व दि.7.7.2014 रोजी विप क्र.1 कडून बियाणे विकत घेतले व त्यानंतर पेरणी केली. उगवण न झाल्यामुळे दि.19.7.2014 रोजी कृषी अधिकारी यांचेकडे अर्ज केला. जरी पेरणीची तारीख दिली नसली तरी ती 7.7.2014 ते दि.19.7.2014 यांचेमध्ये असल्याचे स्पष्ट होत आहे. खरीप हंगामात भागात सोयाबिन पिक म्हणून घेतले जाते. तक्रारीत चुकीने रब्बी हंगामात पेरणी करण्यासाठी बि घेतल्याचे लिहील्याचे दिसून येते. विप क्र.1 ने दिलेल्या पावतीवरुन तक ने सोयाबिनचे बियाणे घेतल्याचे उघड होत आहे. विप यांना सुध्दा ही गोष्ट मान्य आहे.त्यामुळे तक ने दि.7.7.2014 रोजी बियाणे घेऊन थोडयाच दिवसांत त्यांची पेरणी केली असणार. 7/12 उता-यावर सन 2014-15 च्या पिकाची नोंद नाही.
7. उपविभागीय कृषी अधिकारी यांचे पत्राप्रमाणे तक चा दि.19.7.2014 चा तक्रारी अर्ज मिळाला होता. समितीने दि.22.5.2014 रोजी क्षेत्र पाहणी केली. समितीने निष्कर्ष काढला की बियाणे दोषयुक्त असल्यामुळे उगवण झालेली नाही. पाहणी प्रमाणे 80 आर क्षेत्रावर पेरणी केली होती. बियाणे 2 ते 3 इंच खोल पेरले होते व कुजले होते. जमिनीत पुरेसा ओलावा होता. उगवण 16 टक्के झाली होती.
8. विप चे म्हणणे आहे की, उगवणीसाठी हवा पाणी इत्यादी घटक जबाबदार असतात. मध्यप्रदेश मधील प्रयोगशाळेत बिज प्रमाणीकरण संस्थेकडे बिज प्रमाणीत केले होते. तसेच या लॉट मधून बियाणे निकृष्ट असल्याबददल इतर कोणत्याही शेतक-यांची तक्रार आलेली नाही. केवळ तक च्या चुकीमूळेच उगवण भरघोस झालेली नाही. विप ने आपल्या बियाणाचे माहीतीपत्रक सादर केलेले नाही. त्यांचप्रमाणे विप ने प्रथम अशी तयारी दाखवली की सदर लॉट मधील बियाण्याचा नमूना स्वतःचे खर्चाने प्रयोगशाळेत तपासून घेण्यास तयार आहेत. मात्र विप क्र.2 ने तसा बियाण्याचा नमूना या मंचात हजर केला नाही. त्याबद्दलचा खर्चही भरलेला नाही. हे खरे आहे की, तक ला सुध्दा बियाण्याचा नमूना हजर करुन प्रयोगशाळेत तपासून घेता आला असता मात्र शेतकरी तसा बियाण्याचा नमूना जपून ठेवेल ही बाब व्यावहारीक दिसत नाही. शेतकरी तसा नमूना जपून ठेवणार नाही. तसेच त्यांचा खर्चही शेतक-यांना भूर्दड पडेल. याउलट विप कडे सर्वसाधारणपणे नमूना उपलब्ध असतो. विप ने नमूना तपासणीबद्दल काहीही व्यवस्था केली नाही. यावरुन बियाणे सदोष असेल हा निष्कर्ष काढता येइल.
9. तक चे म्हणणे आहे की, त्यांला प्रति एकर 20 क्विंटल उत्पादन मिळाले असते. वास्तविक पाहता प्रति हेक्टर 20 क्विंटल असा दावा बियाणे कंपनी मार्फत करण्यात येतो. म्हणजेच प्रति एकर 8 क्विंटल एवढे उत्पन्न अपेक्षीत असते. दोन एकरामध्ये 16 क्विंटल उत्पन्न अपेक्षीत होते. प्रति क्विंटल भाव रु.3100/- असल्याचे दिसते. व 16 क्विंटलचे रु.49600/- पाहणी अहवालप्रमाणे 16 टकके उगवण झाली होती. रु.41,664/- एवढी भरपाई विप कडून मिळण्यास तक पात्र आहे असे आमचे मत आहे म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालील प्रमाणे आदेश करतो.
आदेश
1. तक ची तक्रार अंशतः खालील प्रमाणे मंजूर करण्यात येते.
2. विप क्र.1 व 2 यांनी स्वतंत्रपणे व संयूक्तपणे तक यांला भरपाई रु.41,664/- (रुपये एक्केचाळीस हजार सहाशे चौसष्ठ फक्त) 30 दिवसांचे आंत द्यावी, न दिल्यास वरील रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम फिटेपर्यत दसादशे 9 दराने व्याज द्यावे.
3. विप क्र.1 व 2 यांनी स्वतंत्रपणे व संयूक्तपणे तक ला तक्रारीचा खर्च रु.3000/- द्यावेत.
4. वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज द्यावा.
5. उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.