ग्राहक तक्रार क्र. : 174/2014
दाखल तारीख : 22/08/2014.
निकाल तारीख : 19/09/2015
कालावधी: 01 वर्षे 0 महिने 28 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. महादेव सुर्यभान भांगे,
वय - 50 वर्षे, धंदा – शेती,
रा. डोका, ता. केज, जि. बीड. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. प्रो. प्रा. महावीर कृषी सेवा केंद्र,
शिवाजी चौक कळंब,
ता. कळंब, जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. प्र.अध्यक्ष.
2) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.पी.एम.टेळे.
विरुध्द पक्षकारा तर्फे विधीज्ञ : श्री.बी.आर.पवार.
न्यायनिर्णय
मा. प्र. अध्यक्ष श्रीमती विद्युलता जे.दलभंजन यांचे व्दारा:
अ) अर्जदार सुर्यभान भांगे हे मौजे डोका ता. केज जि. बीड येथील रहिवाशी आहेत त्यांनी विरुध्द पक्ष यांचेवर नुकसान भरपाईची तक्रार दाखल केलेली आहे.
1. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे.
अर्जदार शेती करुन स्वत:ची व कुटूंबाची उपजिविका भागवितात अर्जदाराला मौजे डोका ता. केज जि. बीड येथे जमीन नं.39/2/क क्षेत्र 56 आर व जमीन गट क्र.41/2/13 क्षेत्र 98 आर ही जमीन असून जमीन बागायती स्वरुपाची आहे. सदर जमीनीत अर्जदार ऊस, कापूस या सारखे नगदी पिके घेतात त्यांत सन 2012 चे जुन मध्ये मालकीचे शेती जमीनीत 7 बॅग कापसाची लागवड केली शेती व कापूस चांगल्या प्रतीचा लावलेला होता.
2. जमीनीची नांगरणी, मोडगणी, पाळी अशा स्वरुपाची मेहनत करुन मशागत करुन जमीनीती दहा ट्रॅक्टर शेणखत टाकून अजित सिडस या कंपनीचे अजित 155 या जातीचे 3 बँग शेणखत टाकून अजित सिडस या कंपनीचे अजित 155 या जातीचे 3 बॅग व कणक 7351 या जातीच्या 4 बॅग अशा एकूण 7 बॅग कापसाची लागवड केली होती. सदरचा कापूस पिकास अर्जदार यांनी 20:20:0 दहा पोते व 5 पोते असा खत घतलेला असून सदर कापूस पिकाची 2 वेळा खुरपणी केली. सदर कापूस पीक चांगल्या प्रकारे वाढलेले असतांना या पिकावर किटकांचा प्रादुर्भाव झाल्याने विप यांचे दुकानात येऊन दि.28/09/2012 रोजी कळंब येथील विप यांचे मालकीचे कृषी सेवा केंद्र शिवाजी चौक, कळंब या दुकानातून अॅसीफेट 75 एसपी व थेरॉन 5 इ.सी. (लॅन्डा सायहॅलोथ्रीन) या औषधाची पावती क्र.240 वरती खरेदी केलेली होती.
3. अर्जदार यांनी विप च्या सांगण्यावरुन औषधाचे मिश्रण करुन त्यांचे शेतात कापसाचे संपूर्ण पिकावर दि.29/09/2012 रोजी फवारणी केली सदरचे पीक फवारणी केल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी करपण्यास सुरुवात झाली. सदरचा कापुस काही दिवसांनी संपूर्णपणे करपून जाऊन कापूस पिकाचे नुकसान झाले.
4. अर्जदाराने सर्व हकिकत कळंब येथे येऊन अर्जदारास सांगितली परंतू विप ने काही एक ऐकून घेतले नाही सदरचे औषध हे कालबाहय झालेले असून औषधाच्या डब्यावर व पॉकेटवर एक्सपायरी डेट व मॅनिफॅक्चरींग डेट दिसून येत नाही. ही बाब अज्रदाराला लिहिता वाचता येत नसल्याचा गैरफायदा घेऊन अर्जदाराचे नुकसान केलेले आहे.
5. अर्जदाराचे पिकाचे नुकसान झालेबाबत तालूका कृषी अधिकारी यांचेकडे दि.05/10/2012 रोजी पीक करपलेबाबत अर्ज दिला त्यानुसार दि.08/10/2012 रोजी समक्ष पंचनामा केला.
6. अर्जदाराकडे असलेल्या औषधाच्या पुडया वरील व डब्यावरील उत्पादन तारखा कालबाहय तारखा खोडल्याचे दिसुन आले आणि अर्जदाराच्या नुकसानीस संपूर्णपणे विप जबाबदार आहेत. विप यांनी स्वत: चा फायदा करुन घेणेकामी कालबाहय झालेल्या औषधांची विक्री करुन फसवणूक केली आहे असे अर्जदाराचे म्हणणे आहे.
7. अर्जदारास शेती शिवाय उपजिवीकेचे दुसरे कोणतेही साधन नाही. अर्जदाराने शेणखत घालण्यासाठी रु.30,000/- बियाणे खरेदी, खत रु.23,000/-, लागवडीसाठी रु.10,000/-, खुरपणे, दोन वेळा फवारणी, रसायनिक खतासाठी रु.22,000/- खर्च झालेला आहे. अर्जदार कापूस लागवड मागील 15 वर्षापासून करीत आहेत. प्रतिवर्ष 12 क्विंटल कापसाचा उतारा येतो. अर्जदारास कापूस पिकापासून प्रति बॅग 12 क्विंटल प्रमाणे 80 ते 85 क्विंटल कापसाचे उत्पादन घेता आले असते व त्यापासून रु.3,50,000/- चे उत्पादन मिळाले असते.
8. अर्जदाराने विप यांना दि.08/03/2013 रोज विधिज्ञा मार्फत नोटीस पाठवून रु.4,35,000/- ची मागणी केली. सदर नोटीस दि.09/03/2013 रोजी मिळून ही अर्जदाराची नुकसान भरपाईची रक्कम दिली नाही त्यामुळे सदर तक्रारीमार्फत अर्जदाराने शेणखताचे रु.30,000/-, बियाणे खरेदीचे रु.23,000/-, लागवडीचे रु.10,000/- रसायनिक खते खुरपणी, 2 वेळा फवारणी असा एकूण 22,000/- आणि 80 ते 85 क्विंटल कापसाचे झालेले नुकसान रक्कम रु.4,35,000/- विप कडून मिळावेत अशी विनंती केलेली आहे.
9. विप यांनी त्यांचे म्हणणे अभिलेखावर दाखल केलेले आहे. त्यांचे म्हणण्यानुसार तक्रार खोटया काल्पनीक कथनावर आधारलेली आहे तसेच औषध निर्माण करणा-या कंपनीस आवश्यक पार्टी न केल्याने अर्ज नामंजूर करावा. असे विप ने म्हंटले आहे.
10. अर्जदार हा ग्राहक होतो असे कोठेही कथन नाही त्यामुळे अर्ज खर्चासह नामंजूर करावा. अर्जदाराचे तथाकथीत कापूस पीक आले हेाते याबद्दल सक्षम पुरावा दिलेला नाही. तक्रार खर्चासह नामंजूर करावी.
11. अर्जदाराने जमीनीची नांगरणी मोडणी पाळी अशा स्वरुपाची मशागत केली, अजित 155 जातीच्या तीन बँग व कनक 7351 या जातीच्या 4 बॅग अशा 7 बॅग कापसाची लागवड केली. कापूस पिकास 20:20:00 10 पोते व युरिया 05 पोते असे खत घातलेला कापूस पिकावर किटकाचा प्रादूर्भाव झाला. विप कडून औषधाची खरेदी केली हा मजकूर मान्य केला आहे.
12. तथाकथित 20:20:00 10 पोते व युरीया पाच पोते हे रासायनीक खत एकदाच दिल्यामुळे कापूस करपू शकतो हे नाकरता येत नाही असे विप चे म्हणणे आहे. दुकानदार हे नामंकित दुकानदार असून शेतकरी व इतर ग्राहकाची कधीही फसवणूक करत नाहीत किंवा केलेली नाही. अर्जदाराच्या सांगण्यावरुन रितसर पावती देऊन औषधे दिली आहे. विप चे सांगण्यावरुन अर्जदाराने फवारणी केली हे अमान्य केले आहे. तसेच विप ने इतर शेतक-यांना या सदर लॉटचे औषध दिलेले आहे परंतू त्याची कसलीही तक्रार आलेली नाही.
13. अर्जदाराचा अर्ज काल्पनीक स्वरुपाचा असल्याने बदनामी करण्याच्या हेतूने नमूद केला तो अमान्य आहे. विप कडे अर्जदार खरेदी नंतर कधीही आले नाहीत.
14. अर्जातील परीच्छेद 6 मधील मजकूर कसलीही नोटीस व पत्र न देता अधिका-याशी संगनमत करुन केलला आहे असे म्हणणे आहे. एखादे पीक जर करपले तर ते कोणत्याही औषधाने खताने कि पाण्यामुळे किंवा इतर रोगराई ते करपले हे सांगणारी तज्ञ कमीटी नमूद कथनात नाही. किटकनाशके कायदा (insecticide Act 1968) प्रमाणे तज्ञ कमेटी नाही. तथाकथीत पाने कोणत्या औषधाने जळाले हे कळण्यासाठी ही पाने विद्यापीठाकडे अन्य तज्ञांकडे पाठवली नाही. पंचनाम्यास विप यांना न बोलावलेमुळे सक्षम बाजू मांडण्याची संधी न दिल्याने संपूर्ण मजकूर अमान्य आहे. अर्जदाराची फसवणूक केलेली नाही. विप जबाबदार नाही सदरचा पुडा, डब्बा आजतागायत मंचात दाखल नाही त्याबाबत कायद्याप्रमाणे पंचनामा जप्ती न केल्यामुळे अर्ज नामंजूर करावा. तालूका कृषी अधिकारी केज हे एकटेच कसे आले. अर्जदार यांनी किती प्रमाणात कशाच्या सहाय्याने औषधे फवारले. किती औषघ लागले किती शिल्लक राहिले हे नमूद केलेले नाही.
15. अर्जदाराने दि.08/03/2013 रोजी विधज्ञामार्फत विप ला नोटीस दिली हे बरोबर आहे आणि नोटीस मिळूनही नुकसान भरपाई अथवा नोटीसचे उत्तर दिले नाही हे चुकीचे आहे अर्जदाराच्या नोटीसला दि.12/03/2013 रोजी उत्तर दिले. परंतू अर्जदार गावी रहात नसल्याने सदरची नोटीस परत आली. विप ने टाटा असाटाफ 75 एसपी हे कसे व किती फवारावे याबाबत पुस्तिका सोबत जोडली आहे हे औषध 1 हेक्टर क्षेत्रापूरते मर्यादित आहे. अर्जदाराने एकूण 3 एकर 34 गुंठयामध्ये फवारलेले आहे. तरीपण सदरचे औषध शिल्लक राहिले विप ने कसलीही त्रुटी केली नाही.
16. पंचनाम्यात औषध शिल्लक असताना औषध शिवदास महादेव भांगे यांचे शेतातील 10 कापसाच्या झाडांवर फवारणी केलेचे प्रमाणपत्रात उल्लेख आहे जो संशयास्पद आहे. शिवदास भांगे यांचे शेतातील 10 कापसांची झाडे 4 दिवसांनी जळून गेलेली आहेत असा उल्लेख प्रमाणपत्रात आहे.
17. विक्रेत्याला पंचनामा करण्यासाठी बोलावणे बंधनकारक असताना बोलावले नाही. औषधाचा नमूना प्रयोगशाळेत पाठवलेला नाही. कंपनीकडून मागणी केलेली नाही विप नोंदीचा उतारा नाही कापसाची नोंद नाही. अर्जदाराची तक्रार अर्ज सर्वे नं.41 मधील आहे व पंचनामा केलेला नाही. कापसाची लागण केलेल्या सर्वे नंबरची लांबी, रुंदी व पिकाखालील क्षेत्र सर्वे नंबर वाईज नमूद नाही. रॅंडम पुस्तक प्रमाणे प्लॉट टाकून पिकाची लागण पध्दत दोन ओळीतील अंतर दोन रोपातील अंतर बियाणाचे प्रमाणे खताचे प्रमाण इ. सविस्तर पंचनामा केलेला नाही. असाटाफ 75 एसपी हे औषधे वापरण्या बद्दलचे माहितीपत्रिका सोबत पुराव्या कामी जोडलेली आहे ते पुराव्यात वाचणे योग्य आहे. अर्जदाराचा अर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी विनंती विप यांनी केलेली आहे.
18. अर्जदाराने तक्रारी सोबत, 8- अ, 7/12, प्रमाणपत्र, कृषी अधिकारी केज जि. बीड विस्तार कृषी विद्यावेता यांचे पत्र, अर्जदाराचा कृषी अधिकारी यांना तक्रारी अर्ज, दि.08/09/2012 किटकनाशक खरेदी पावती, पंचनामा कृषी अधिकारी केज यांचा दि.08/10/2012 तहसिलदार यांना तक्रारी अर्ज, नोटीस, ही कागदपत्रे अर्जदाराने दाखल केलेली आहेत तसेच विप यांनी महाराष्ट्र शासनाचे शासन परीपत्रक विप यांनी सदर लॉट चे औषध इतर शेतक-यांना दिलेल्या पावत्या नोटीसची उत्तर टाटा असाटाफ वापरण्यासंबंधी पुस्तिका, शपथपत्र राजेंद्र माधव मडके (इतर शेतकरी) निवडणूक ओळखपत्र राजेंद्र मडके यांचे इ.कागदपत्राचे सुक्ष्म अवलोकन केले. विधिज्ञांचा तोंडी युक्तिवाद थोडक्यात ऐकला असता सदर प्रकरणात खालील प्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर,
1) अर्जदाराने वादीत औषध कंपनीला प्रकरणात
विरुध्द पक्षकार म्हणून समाविष्ट केले आहे का ? नाही.
2) अर्जदाराने खरेदी केलेलेकिटक नाशकाचा डबा व पॉकेट यावर
खाडाखोड झालेली मंचात पुरावा म्हणून दाखल केले का ? नाही.
3) विप यांनी अर्जदारास देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केली
हे अर्जदाराने सिध्द केले काय ? नाही.
4) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत का ? नाही.
5) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1
19. अर्जदाराने विप यांचे कडून किटकनाशक खरेदी केले हे विवादीत नाही पंरतु खरेदी केलेले किटकनाशक हे नक्कीच व निश्चितच विप यांनी उत्पादीत केलेले नाही. विप यांनी विक्री केलेले किटकनाशक याची निर्मीता कंपनी ही मुंबई आणि जिल्हा रत्नागिरी महाराष्ट्र या आहेत आणि अर्जदाराने तक्रार दाखल करतांना सदर वादीत किटकनाशक उत्पादीत कंपनीला विरुध्द पक्ष म्हणून समाविष्ट केलेले नाही व नोटीस ही पाठवलेली दिसत नाही. व त्यांचे विरुध्द नुकसान भरपाई मागितलेली नाही. कारण वादातीत औषध हे मुंबई व रत्नागिरी यांनी तयार केलेले आहे आणि त्या दोन्ही कंपन्या तक्रारीत विप म्हणून समाविष्ट करणे गरजेचे होते परंतु अर्जदार यांनी तसे केलेले निदर्शनास येत नाही म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर नकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 2
20. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की विप ने किटकनाशक जे दिलेले आहे त्यावर खाडाखोड झालेली आहे. मुदतबाहय आहे. असे अर्जदाराचे म्हणणे आहे तसेच Expiry date मध्ये खाडाखोड झालेली आहे असे अर्जदाराचे म्हणणे असेल तर अर्जदाराने तक्रारी सोबत पॉकेट व डबा दाखल करणे गरजेचे होते. परंतु निर्णयासाठी ठेवलेले असतांना सुध्दा दरम्यान च्या कालावधीत वादातीत किटक नाशकाचा डबा व पॉकेट मंचात पुरावा म्हणून दाखल केलला नाही.
21. तसेच तालूका कृषी अधिकारी ता. केज जि. बीड यांनी प्रमाणपत्र दिलेले आहे. त्या प्रमाणपत्रात असे नमूद केलेले आहे की, किटकनाश कालबाहय झालेली असल्याचे वाटते बाटली व पुडयावरील आवरणावर उत्पादक दिनांक व कालावधी संपल्याचा दिनांकाच्या नोंदीवर खोडाखोड केल्याचे दिसते असे नमूद केलेले आहे आणि सदर प्रमाणपत्र हे दि.09/11/2012 रोजी दिलेले आहे म्हणजे त्या दिवसापर्यंत सदर बाटली व पुडा हा बघण्यास उपलब्ध होता. व तो तालूका कृषी अधिकारी यांनी क्षेत्राची तपासणी केली तेव्हा उपलब्ध होती व त्यांनी त्यांचे निरीक्षण केले.
22. अर्जदार तक्रारीत औषधाचा डबा व पॅाकेट असे संबोधतात व कृषी अधिकारी बाटली व पुडा असे संबोधलेले आहे. दोन्ही गोष्टी मध्ये तफावत आहे. कृषी अधिकारी यांनी सदर किटकनाशक हे कालबाहय साठयातील असल्यामुळेच कापूस पिकाचे नुकसान होते असे ठामपणे सांगिलेले आहे त्यामुळे सदर बाटली, पुडा, डबा अथवा पॉकेट हे मंचात दाखल केली असती तर त्याची शहानिशा करुनच कार्यवाही करणे आणखी सोपे झाले असते परंतु अर्जदाराने कालबाहय असलेली खाडाखोड झालेली विवादीत बाटली पुडा, डबा व पॉकेट हे मंचात पुरावा म्हणून दाखल केलेली नाहीत त्यामुळे मुद्दा क्र. 2 चे उत्तर नकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 3 व 4 :
23. अर्जदाराने वादीत किटकनाशक औषधे विप कडून घेतले हे वादीत नाही पंरतु सदर औषधे हे उत्पादीत कंपनीकडून विक्रीसाठी विप ने उत्पादीत कंपनीकडून विकत घेतलेले होते त्यामुळे अर्जदार हा विप याला औषधाचे पैस देऊन सेवा घेतली त्यामुळे तो विप चा ग्राहक होतो परंतु विप यांने सेवा देण्यास त्रुटी केली ही बाब संयुक्तिक वाटत नाही कारण उत्पादीत कंपनीने सदर औषधे सिल बंद करुन दिलेले असणार हे नक्कीच आणि अर्जदाराचे असे म्हणणे आहे की डबा बाटली, पुडा, पॉकेट यात खाडाखोड झाली होती ते कालबाहय होते. परंतु असे जरी अर्जदार व कृषी अधिकारी म्हणत असले तरी त्याच्या पुष्ठयार्थ कोणताही सबळ पुरावा मंचासमोर आलेला नाही. त्यामुळे विप ने खाडाखोड केली असे मुळीच म्हणता येणार नाही आणि विप ने सेवेत त्रुटी केली असे म्हणणे संयुक्तिक वाटत नाही त्यामुळे मुद्दा क्र. 3 चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
24. सदर प्रकरणात वास्तविक पाहता अर्जदाराचे वस्तुमध्ये काहीदोष असल्याची तक्रार निर्माण झाल्यास दोषयुक्त वस्तुचे पृथ:करण अथवा परीक्षण केलेशिवाय दोष शोधून काढता येत नाही त्यादृष्टीने ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 13 (1) सी अन्वये सदोष वस्तूचा नमूना पृथ:करण अथवा परीक्ष्ाण करणेसाठी उचित प्रयोगशाळेकडे पाठविणे तक्रारकर्त्यास बंधनकारक आहे. आणि अशी परिस्थिती निर्माण झाल्यास अर्जदाराची कायदेशीर दृष्टया तक्रार समर्थनीय होऊ शकत नाही.
25. विप हे बियाणे किटकनाशके इ. विक्रीचा व्यवसाय करतात. सदर वस्तु ते विविध कंपनीकडून खरेदी करुन शेतक-यांना विक्री करतात. विप हे कोणत्याही प्रकारच्या औषधांचे उत्पादक नाहीत. कंपनीकडून आलेली औषधे ते शेतकरी ग्राहकांना विक्री करतात त्यामुळे सदर प्रकरणातील किटक नाशकाबद्दल विप यांना जबाबदार धरता येणार नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
26. अर्जदाराने सदर प्रकरणात 7/12 उतारा दाखल केलेला आहे. त्या 7/12 उता-यावर कापूस पिकाची नोंद दिसून येत नाही व तसा कापूस पीक घेतल्याचा कोणताही पुरावा मंचासमोर दाखल नाही तसेच अर्जदाराने कापूस पिकावर फवारणी केली किंवा कसे हे सिध्द होऊ शकलेले नाही त्यामुळे विप यांचा काहीही दोष सिध्द होऊ शकत नसून तसा पुरावा मंचात दाखल नाही. तसेच अर्जदाराचे तक्रारीत असेही म्हणणे आहे की मागील दहा ते पंधरा वर्षापासून सदर कापूस पिकाची लागवड करीत आलेले आहेत परंतु 15 वर्षापासून कापूस पीक घेत असल्याचा कोणताही पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही त्यामुळे अर्जदार 15 वर्षापासून कापूस पीक घेत होते असे ग्राहय धरता येणार नाही.
27. विरुध्द पक्ष यांनी सदर प्रकरणात अर्जदारा व्यतिरिक्त इतर शेतक-यांनी सदर वादीत किटकनाशक खरेदी केलेले आहे व तसे इतर शेतक-यांची खरेदी केलेल्या पावत्या अभिलेखावर दाखल केलेल्या आहेत. त्या शेतक-यांना सदर प्रकरणातील वादीत किटकनाशकाचा पुर्णपणे फायदा झालेला आहे कारण त्यांची कोणतीही तकार नाही आणि एका शेतक-यांचे शपथपत्र ही दाखल केलेले आहे त्याबद्दल अर्जदाराने काही म्हणणे दाखल केलेले नाही.
28. कृषी अधिकारी ता. केज यांनी देखील सदर प्रकरणातील किटकनाशकाची बाटली, पुडा पंचनामा करताना जप्त केलेली नाही किंवा शिल्लक राहिलेले किटकनाशकाचे सॅम्पल भरुन प्रयोगशाळेकडे पाठवलेले दिसून येत नाही. याचा अर्थ असा ही होतो की तालूका कृषी अधिकारी जाय मोक्यावर प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी गेले होते ? किंवा नाही ? कारण किटकनाशकाची बाटली व पुडा पंचनामा करते वेळी जप्त करणे गरजेचे आहे कारण शासन परिपत्रक दि.17 ऑक्टोबर 2013 चा शासन परिपत्रक अभिलेखावर दाखल केलेले निदर्शनास येते. सदर शासन निर्णयाचे परिच्छेद क्र.2 मध्ये दिसून येते की असलेल्या बियाणाच्या लॉटचा नमुना घेऊन अधिसुचित प्रयोग शाळेकडून त्याची तपासणी करुन घ्यावी असे स्पष्ट नमूद असतांना कृषी अधिकारी केज जि. बीड यांनी शासन निर्णयास डावलून काहीही उचित कार्यवाही केलेली नाही. जर त्यांना कालबाहय तारखा खोडलेल्या दिसून येतात आणि बाटली व पुडयावरील आवरणावर उत्पादक दिनांक व कालावधी संपल्याच्या दिनांकाच्या नोंदवर खाडाखोड केल्याचे दिसते असे प्रमाणपत्रात म्हंटलेले आहे त्यामुळे शासन निर्णयाप्रमाणे बाटली व पुडा जप्त करणे कृषी अधिकारी, के जि. बीड यांचे कर्तव्य होते पण त्यांनी ते केलेले नाही. तपासणी वेळी कंपनीच्या प्रतिनिधीला ही कळवलेले दिसत नाही. प्रतिनिधीची व तक्रारकर्त्या शेतक-याची साक्ष घेणे बंधनकारक असतांना अभिलेखावर दिसून येत नाही याचाच अर्थ तालूका कृषी अधिकारी केज जि. बीड यांनी पुरावा म्हणून काहीही वस्तू पंचनाम्याच्या वेळेस जप्त केलेल्या दिसून येत नाहीत. ग्राहक संरक्षण कायद्या अन्वये कलम 13 (1) सी प्रमाणे औषधाचे पृथ:करण किंवा परीक्षण करण्यासाठी उचित प्रयोगशाळेकडे पाठवणे बंधनकारक असताना अर्जदाराने किंवा कृषी अधिकारी केज यांनी पाठवलेले नाही किंवा कसलीही कार्यवाही केलेली दिसुन येत नाही. कोणत्याही उचित पुराव्याअभावी किंवा तज्ञांच्या आणि प्रयोगशाळेच्या अहवाला अभावी औषधामध्ये दोष असल्याचे सिध्द होऊ शकत नाही आणि अर्जदार वादातीत औषधामध्ये दोष होता व ते कालबाहय होते त्या डब्यावर, पुडयावर, बाटलीवर खाडाखोड होती हे पुराव्या अभावी सिध्द करु शकले नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
29. वरील सर्व विवेचनावरु आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहेात की तक्रारदार त्यांची तक्रार सिध्द करण्यास असमर्थ ठरले आणि अर्जदार तक्रारीत मागणी केल्या प्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यास अपात्र ठरले म्हणून मुद्दा क्र. 3 व 4 चे उत्तर नकारार्थी देऊन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2) खर्चाबाबत काहीही आदेश नाहीत.
3) उभय पक्षकारांनी आपआपला खर्च स्वत: सोसावा.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (मा.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य प्र. अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.